Palkatva trupti joshi kulshreshtha teenage years children parents opposite behavior ysh 95 | Loksatta

पालकत्व : किशोरवयीन वादळं

स्वत:च्या रूपाकडे नको इतकं लक्ष देणारी, आई-वडिलांनी कशाला विरोध केला की त्यांच्याशी संवादच कमी करणारी किंवा मुद्दाम उलट वर्तन करणारी.

पालकत्व : किशोरवयीन वादळं

तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

ऊर्जेनं भरलेली ‘टीनएज’मधली मुलं. स्वत:च्या रूपाकडे नको इतकं लक्ष देणारी, आई-वडिलांनी कशाला विरोध केला की त्यांच्याशी संवादच कमी करणारी किंवा मुद्दाम उलट वर्तन करणारी. पण ही मुलं वाईट नसतात. त्यांच्या वयाच्या या कालखंडाकडे आपणच पालक म्हणून थोडं वेगळय़ा प्रकारे लक्ष द्यायची गरज असते.

गोबरे-गोबरे गाल, बोबडे बोल, असं आपलं पिल्लू बघितलं, की किती लाड करावेसे वाटायचे ना! तेच पिल्लू थोडंसं मोठं होतं. मग शाळेच्या दगदगीमुळे गाल थोडेसे आत जातात. उंची थोडीशी वाढते आणि मग आपण ‘किती गं बाई दमतो, एवढासा जीव’ असं म्हणून गलबलून जातो.

मूल आठ-दहा वर्षांचं झालं, की त्यांचा अभ्यास आणि उत्तम पालकत्व यासाठी आपण जिवाचं रान करतो. आपण आपल्या पालकत्वाच्या ‘एअर बलून’मध्ये मुलाला घेऊन उंच उंच जायला लागतो. त्या त्या काळातल्या ट्रेण्डप्रमाणे पालक पाल्याला सायना नेहवाल, विराट कोहली, सुंदर पिचई, अगदी शाहरुख खान, बनवायची स्वप्नं पाहातात. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. पण या ‘बलून’ला अकरा-बारा वर्षांचा एक पक्षी चोच मारतो आणि फुगा वेगानं खाली यायला लागतो. वयात येणारं आपलं मूल भरकटू नये यासाठी आपण हात-पाय मारतो, कधी हैराण तर कधी हताश होतो. असं हे खूपच आव्हानात्मक असलेलं पालकत्व म्हणजे किशोरवयीन मुलांचं पालकत्व. 

माझं स्वत:चं ‘टीनएज’ चालू असताना या काळाला ‘वादळी कालखंड’ म्हणतात, असं वाचलं होतं. अर्थातच पटलं नव्हतं. काळ पुढे सरकला. समुपदेशन करता करता या किशोरवयीन वयोगटातल्या मुलांबरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर काम करता आलं. आणि दोन्ही बाजू उलगडत गेल्या, तेव्हा लक्षात आलं, की या वादळासमोर एवढं हतबल होण्याचं कारण नाही. खरं तर या मुलांच्या वागण्याचं, त्यांच्या मानसिकतेचं स्वरूप लक्षात घेतलं, तर या काळातली मुलं म्हणजे उत्साहाचा झरा असतात. त्यांच्या गप्पा, त्यांचे विचार आपल्यालाच खूप काही शिकवून जातात.

बारा ते अठरा वर्षांच्या काळात या मुलांच्या शरीरात हार्मोनल बदल व्हायला सुरुवात होते.  आपल्यातले बदल जाणवायला लागतात. याच वयोगटातली मनाली दिवसभर आपल्या लांब केसांशी खेळत आरशात बघत राहायची. तर शार्दूल आपली उंची बाबापेक्षा जास्त झाली का, हे पडताळून पाहाण्यात गर्क असायचा. मनात ‘खुदसे मैंने इश्क किया रे..’ अशी त्यांची अवस्था असते, पण त्याचवेळी आजूबाजूचे लोक आपल्याबद्दल काय बोलतात, त्यांच्या मनात आपली काय प्रतिमा आहे, याबद्दल या मुलांना प्रचंड उत्सुकता असते. नव्हे, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी चांगलीच महत्त्वाची असते. त्यामुळे चेहऱ्यावर एखादा फोड जरी आला, तरी ते त्याकडे ते दुर्लक्ष करू शकत नाहीत. त्यावर चंदन लाव, बाजारातलं क्रीम लाव, महागडे फेसवॉश आण (याच मानसिकतेचा वापर अनेक कंपन्या करून घेत असतात) असे सगळे उपाय करून बघतात. आपल्या मुलाचं लक्ष अभ्यासापेक्षा याच गोष्टींत जास्त आहे, हे पाहिलं की अनेक पालकांची चिडचिड व्हायला लागते. आपण त्याच्या करिअरचा विचार करत असतो आणि मुलाला आपले केस ‘सिल्की’ कसे दिसतील याची चिंता लागलेली असते. अभ्यास, नोकरी ही सगळी व्यावहारिक व्यवधानं आली असली, तरी विरुद्धिलगी व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी आकर्षक दिसणं ही नैसर्गिक प्रेरणा  फक्त माणसांमध्येच नाही, तर सर्व प्राण्यांमध्ये दिसते. अभ्यास, नोकरी, पैसा, उज्ज्वल भवितव्य कितीही महत्त्वाचं असलं, तरी नैसर्गिक भावना दाबून टाकता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या दिसण्याला ते देत असलेल्या महत्त्वास सतत दुय्यम लेखू नका. त्यांना या भावना आणि अभ्यास यामध्ये समतोल साधायला शिकवा, तुम्ही जेवढं त्यांना या सगळय़ा गोष्टींपासून दूर न्यायला बघाल, तेवढी मुलं लपूनछपून त्यांना काय पाहिजे तेच करतील. मग त्यांना समतोल साधायला शिकवायची संधी हातून निघून जाईल.

हे झालं त्यांच्या बाह्यरूपाबद्दल थोडसं. त्यांच्या अंतरंगात डोकावू या. प्रचंड खळबळ चालू असते तिथे. मैत्रीला नवीन पंख फुटलेले असतात. दुर्दम्य आत्मविश्वास असतो. आव्हानं स्वीकारायची असतात. मानसशास्त्रात ‘आय अ‍ॅम ओके, यू आर नॉट ओके’ असं एक प्रारूप आहे. यातली एक अवस्था पाहू या. ‘आय अ‍ॅम ओके, यू आर नॉट ओके,’ या अवस्थेमध्ये मुला-मुलीला असं वाटत असतं की माझं सर्व बरोबर आहे, पण तुमचंच सगळं चुकत आहे. या ‘तुम्ही’मध्ये सगळे आले. शिक्षक, पालक, नातेवाईक यांच्याबरोबरच काही ठरावीक मित्र, आदी. या किशोरवयीन मुलांमध्ये एक अहंगंड (सुपीरियॉरिटी कॉम्प्लेक्स) असतो. आपण अभ्यास करत नसलो, तरी ते शिक्षकांच्या चुका दाखवत राहातात. पालकांचं म्हणणं तर अजिबात पटत नसतं त्यांना. या अहंगंडामुळे त्यांना थोडीही सूचना केली तरी लगेच राग येतो. मानसशास्त्रातली आणखी एक संकल्पना समजून घेताना एक प्रयोग बघू या. एका सभागृहात बसलेल्या ५० लोकांना विचारलं, ‘‘इथे वाहन कोण चांगलं चालवतं?’’ ९८ टक्के लोकांनी तेच सर्वोत्तम असल्याचं सांगितलं. या लोकांना आपण सर्वसामान्यांपेक्षा जास्त चांगले (मानसशास्त्रात याला ‘बेटर दॅन अ‍ॅव्हरेज’ म्हणजेच ‘बीटीए’ इफेक्ट) असल्याचा ‘फील’ होता. त्यामुळे त्यांना नेहमीच आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा अधिक पात्र आहोत असं वाटतं. आय अ‍ॅम ओके, यू आर नॉट ओके, या अवस्थेत असणाऱ्या मुलांमध्ये वर सांगितलेला ‘बीटीए इफेक्ट’ जाणवतो. काही पालक मुलांना तू कसा सर्वगुणसंपन्न किंवा इतरांपेक्षा वेगळा आहेस, अशी धारणा देतात. पालकांनी असं खतपाणी घातलं तर मुलांचा स्वत:बद्दलचा गैरसमज अधिकच वाढतो. याउलट ‘आय अ‍ॅम नॉट ओके, यू आर ओके’ अशीही एक अवस्था असते. या अवस्थेतल्या मुलांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. त्यांना त्यांचं दिसणं आवडत नाही, अभ्यास फार आवडत नसतो आणि बाकी सगळय़ांचं ठीक चाललंय, माझं कसं होणार? हा प्रश्न भेडसावत असतो. अशी मुलं बाकीच्यांपासून थोडी फटकूनच वागतात. लांब राहायला लागतात. या दोन्ही अवस्थांमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ज्या मुलांना ‘आय अ‍ॅम ओके, यू आर नॉट ओके’ असं वाटत असतं, त्या मुलांना दुसऱ्यांची स्तुती करणं, स्वत:च्या अपयशाची जबाबदारी घेणं, स्वत:च्या मर्यादांची जाणीव ठेवणं, हे शिकवावं लागेल. आणि हो, मुलाच्या या अवस्थेला आपणही कळत-नकळतपणे जबाबदार आहोत का, याचंही आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. शंतनूला गुण कमी पडले, की त्याचे पालक, ‘तू नको वाईट वाटून घेऊ.. तुला येतं सगळं. तू हुशार आहेस. वर्गात-शिकवणीत नीट शिकवत नाहीत, त्याला तू तरी काय करणार’ असं म्हणत परिस्थिती चिघळवतात. बरं, ‘शंतनू बुद्धिमान आहे’ हे त्यांचं विधान तो मोबाइलमध्ये कसले अफलातून फोटो काढतो, त्याला कसले कसले अ‍ॅप्स माहिती आहेत, यावरून तयार झालेलं असतं. दुसऱ्या अवस्थेतल्या मुलांनी बदललेल्या शरीराला स्वीकारलेलंच नसतं. त्यात अशा मुलांना जर परीक्षेत कमी गुण मिळत असतील, तर ती अजूनच कोषात जातात. ‘बॉडी शेमिंग’ (आपल्या शरीराची लाज वाटणं) हा प्रकार या मुलांमध्ये दिसून येतो. सर्वसामान्यांपेक्षाही आपण सुमार आहोत, ही भावना या मुलांमध्ये असते. चारूची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर शरीराला आलेल्या गोलाईची तिला लाज वाटायची. ती सैलसर कपडे घालायची, गबाळी राहायची.  तिला मैत्रिणींमध्ये मिसळताना लाज वाटायची आणि मैत्रिणी नसल्यामुळे शाळा व क्लासला जावंसं वाटायचं नाही. चारूच्या आईनं तिला तिचे वेगवेगळय़ा ड्रेसमधले फोटो दाखवले आणि तिच्यासारखे तिच्या मैत्रिणींच्या शरीरात झालेले बदलही दाखवून देत हे सर्वाच्याच बाबतीत होतं याची जाणीव करून दिली. गप्पांमध्ये हे सारं पटवून देताना थोडा वेळ लागला, पण हळूहळू चारू कोषातून बाहेर पडली. मुलांना अशी मदत करावी लागते,  मग ती त्यातून बाहेर पडतात.

आताच्या आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलामुलींशी थोडा वेळ काढून गप्पा मारा. त्यांचे विचार, त्यांचे प्रश्न, त्यांनी परिस्थितीतून शोधलेली उत्तरं बघा. आपल्या पौगंडावस्थेत आपण लग्न या विषयावर बोलायचो नाही. अनेक घरांत वयात आलेल्या मुलांना किंवा मुलीला बघण्याच्या कार्यक्रमात समोरच्या मुला-मुलीशी काय बोलायचं हेही पालक ठरवून द्यायचे. व्यक्तींना ओळखण्याची क्षमता, चांगलं-वाईट ठरवायची क्षमताच तेवढी विकसित झाली नव्हती. आताची मुलंमुली आपल्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, त्या पडताळूनही बघतात. एखादी मैत्रीण त्यांना खूप आवडत असते. पण ती आपली ‘बेस्टफ्रेंड’ नाही, कारण ती अमुकतमुक निकषांत बसत नाही, अशारीतीनं त्यांच्या संकल्पना स्पष्ट असतात. आपल्याला पालक म्हणून हे सर्व गोंधळात टाकणारं असू शकतं. कारण पूर्वी भावनांचे काही ठळक मुख्य रंग होते. आताच्या काळात त्या भावनांच्या अनेक छटा- म्हणजेच विविध शेड्स आहेत! आपण कार्यालयात एकत्र काम करायला लागलो तेव्हा समोरच्याशी आपलं थोडंफार जमत असलं तरी त्याला आपण मैत्रीचं लेबल लावतो. पण ही मुलं विद्यार्थिदशेत असतानाही वैयक्तिक आयुष्य वेगळं आणि कामाच्या ठिकाणचे संबंध वेगळे, इतका स्पष्ट विचार मांडतात. त्यामुळे त्यांना समजून घेताना ‘दोन अधिक दोन बरोबर चार’ असं साधंसोपं समीकरण मिळणार नाही. काही या पिढीची, काही या वयाची गुंतागुंत असेल, पण आपली त्यांच्याशी मैत्री झाली, तर चार योग्य सल्ले तेच आपल्याला देऊ शकतात!

बालनिरीक्षणगृहात काम करतानाचा अनुभव आहे. इथली जास्तीत जास्त मुलं ही १६ ते १८ वयोगटातलीच असतात. या वयातल्या मुलांना आपण मोठे झालो आहोत असं वाटत असतं, पण बुद्धीनं ती पूर्णपणे मोठी झालेली नसतात. मेंदूचा पुढचा भाग (फ्रंट लोब) वयाच्या १८ व्या वर्षी पूर्ण विकसित होतो. त्यानंतर प्रगल्भता यायला सुरू होते. त्यामुळे ही मुलं कामं मोठय़ांची करतात, पण त्यांना त्याची जबाबदारी घेता येत नाही. वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे फक्त गाडी चालवता येणं नव्हे, तर रस्त्यावरचे इतर वाहनचालक, पादचारी, यांची आणि स्वत:च्या जिवाची जबाबदारी घेणं आहे. त्यामुळे वाहन परवाना नसताना आपलं मूल रस्त्यावर गाडी चालवत असेल, तर त्याला थांबवणं ही आपली जबाबदारी आहे. आपला पालक असण्याचा अधिकार वापरून नाही, तर संवाद साधून त्यांना समजावून सांगावं लागेल.

 आपलं १४-१५ वर्षांचं मूल शाळेत काय काय चाललंय हे आपल्याला सुरुवातीला सांगत असतं. पण आपल्याला ते ऐकून बसलेले धक्के आणि त्यावर आपण व्यक्त केलेली मतं मुलांनी ऐकली, की ती समजून जातात की यांना सगळं सांगून काही उपयोग नाही. प्रामुख्यानं जेव्हा आपण त्याच्या किंवा तिच्या मित्रमैत्रिणींनी कसं वागावं हे ठरवतो, तेव्हा तर त्यांची पंचाईत होते. आपण ते सगळं समजूतदारपणे ऐकलंच नाही तर हा संवाद संपू शकतो. त्यातून जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट माहिती असणं आवश्यक असेल, ती तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. त्यातून मुलांनाच त्रास होऊ शकतो. आताच्या काळात सातवी-आठवीपासून शाळांमध्ये चिठ्ठय़ा, मेसेज, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हे सुरू झालेलं आहे. हे सगळं थांबवणं मुलांच्या हातात अजिबात नाही. पण जर आपण सतत मुलावर किंवा मुलीवर संशय घेत राहिलो, तर मात्र घरात वादळ येऊ शकतं. त्यापेक्षा याबाबतीतही त्यांच्याशी संवाद सुरू ठेवा. तरच एखाद्या वेळी त्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडल्यास तुम्ही आवश्यक मदत करू शकाल. आपल्या मुलामुलींची सुरक्षितता, शिस्त या नावाखाली किशोरवयीन मुलामुलींमध्ये जी ऊर्जा आहे त्यावर थंडगार पाणी फेकू नका.  ती कुठे आणि कशी वापरायची हे मुलांचे मित्र म्हणून त्यांना शिकवू या. अन्यथा तीच ऊर्जा नको त्या स्वरूपात बाहेर पडू शकते.

trupti.kulshreshtha@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:03 IST
Next Story
सोयरे सहचर : यही इबादत, यही प्रार्थना!