गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात यंदाही बाप्पांचे आगमन झालं. गणपती म्हटलं की, ढोल-ताशांबरोबरच आठवतो तो लेझीमचा ताल, फुलांची आरास, सुंदर देखावे आणि अर्थातच घराघरांतून दरवळणारा नैवेद्याचा सुगंध. उकडीचे मोदक, पुरणपोळी, लाडू, विविध फळं आणि असंख्य पदार्थ गणरायाच्या ताटाची शोभा वाढवतात. मोदकां- सोबतच बाप्पांचा अजून एक प्रिय पदार्थ म्हणजे पंचामृत. दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच घटकांपासून तयार होणार्‍या पंचामृताला आपल्या संस्कृतीत विशेष स्थान आहे.

बाप्पांना अभिषेक करताना अर्पण केले जाणारे पंचामृत नंतर तीर्थ म्हणून ग्रहण केले जाते. पंचामृतातील प्रत्येक घटक आपली वेगळी चव आणि वैशिष्ट्य घेऊन येतो. पंचामृतातील या पाच घटकांचा उल्लेख या श्लोकातही आढळतो.

‘‘पञ्चामृतं मयानीतं पयो

दधि घृतं मधु।

शर्करया समायुक्तं स्नानार्थं

प्रतिगृह्यताम् ॥’’

म्हणजेच, दूध, दही, तूप, मध आणि साखर यांनी युक्त असलेले पंचामृत बाप्पांनी स्वीकारावे, अशी या श्लोकातून प्रार्थना केली जाते. पंचामृतातील प्रत्येक घटकाला आपल्या परंपरेत एक प्रतीकात्मक अर्थही दिला गेला आहे. दूध हे सा्त्विवकतेचे प्रतीक मानले जाते. दही हे वाढ, समृद्धी आणि पोषणाशी जोडले जाते. तूप हे तेज, पोषण आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. साखर किंवा खडीसाखर जीवनातील गोडवा, आनंद आणि सुखाचे प्रतिनिधित्व करते, तर मध एकात्मता, संतुलन आणि सुसंवादाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पंचामृत हे केवळ पाच पदार्थांचे मिश्रण नसून, विविध शुभ गुणांचे प्रतीकात्मक रूप मानले जाते. पाच घटक, पाच वेगळ्या चवी… पण त्यातील पोषणाचा विचार केला तर प्रत्येकाची भूमिका काय? चला जाणून घेऊया!

दूध : पंचामृतातील पहिला घटक म्हणजे दूध. सर्वांना माहीत आहे, दूध हे प्रथिनं, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्व बी १२ यासारख्या पोषक घटकांचा स्रोत असते. दुधातील प्रथिनं शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या देखभालीसाठी महत्त्वाची असतात. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. दुधात ‘लॅक्टोज’ नावाची नैसर्गिक साखर असते. त्यामुळे दुधातून आपल्याला काही प्रमाणात ऊर्जा देखील मिळते. पण हे लॅक्टोज सर्वांना सहज पचत नाही. ‘लॅक्टोज इन्टॉलरन्स’ असलेल्या लोकांमध्ये लॅक्टोजचे पचन नीट न झाल्यामुळे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ घेतल्यानंतर पोट फुगणे, गॅस होणे, पोटात कळ येणे किंवा जुलाब यासारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी पंचामृत बनवताना आपल्या सहनशीलतेनुसार दुधाचे प्रमाण ठरवावे. पंचामृतात वापरले जाणारे दूध एकूण मिश्रणातील केवळ एक घटक आहे. त्यामुळे पंचामृतातून मिळणार्‍या दुधातील पोषक घटकांचे प्रमाणही मर्यादित असते.

दही : दुधानंतर पंचामृतात येते दही. दही जरी दुधापासून बनवले असले तरी, त्याच्या तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्या गुणधर्मांमध्ये काही बदल होतात. दह्यामध्येही प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी १२ यासारखी पोषकतत्त्वं असतात. त्याबरोबरच शरीरासाठी फायदेशीर असलेले ‘चांगले जीवाणू’सुद्धा दह्यामध्ये असतात. अशा प्रकारे, दही पंचामृताला चव, पोत आणि काही महत्त्वाचे पोषक घटक मिळवून देते.

तूप : पंचामृतातील पुढचा घटक म्हणजे तूप. भारतीय संस्कृतीत तुपाला आहारातील घटकाबरोबरच औषधी महत्त्वही दिले गेले आहे. अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये तुपाचा वापर चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. पोषणशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर तूप हा एक स्निग्ध पदार्थ आहे आणि शरीराला ऊर्जा देतो. जसे मी वारंवार सांगते, तुपामध्ये ‘सॅच्युरेटेड फॅट्स’ असतात, त्यामुळे हृदयाच्या आरोग्याचा विचार करता आहारातील तुपाचे प्रमाण महत्त्वाचे ठरते. पंचामृत हे प्रामुख्याने तीर्थ म्हणून अल्प प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे त्यातील तुपाचे प्रमाणही मर्यादितच असते. पंचामृताचा एक-दोन चमचा घेताना त्यातील तुपाचे प्रमाण हा फार मोठा चिंतेचा विषय नसला, तरी रोजच्या आहारात तुपाचे प्रमाण मात्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दूध, दही, तूप झाले आता जरा गोडाकडे वळूया!

मध : मधाला आपल्या आहारात आणि पारंपरिक वापरात विशेष स्थान आहे. जरी तो नैसर्गिक स्रोतापासून मिळत असला तरी पोषणाच्या दृष्टीने पाहिले तर मध आणि साखर हे दोन्ही जवळपास सारखेच आहेत. दोन्ही मुख्यत: साखरेचे स्रोत असून शरीराला ऊर्जा देतात.

साखर : पंचामृतातील पाचवा आणि शेवटचा घटक म्हणजे साखर. साखर हा आपल्या रोजच्या आहारातील परिचित गोड पदार्थ आहे. साखर मुख्यत: शरीराला ऊर्जा देते. मात्र साखरेमधून प्रथिनं, जीवनसत्त्वं, खनिजं किंवा तंतू यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक मिळत नाहीत.

पंचामृत किती घ्यावे?

पंचामृतात तूप आहे, मध आहे, साखर आहे. हे वाचून घाबरू नका. मी पोषणतज्ज्ञ आहे म्हणून लगेच ‘पंचामृत खाऊ नका’ असे सांगणार नाही. सणाच्या एखाद्या दिवशी आपण एक-दोन चमचेच पंचामृत तीर्थ म्हणून घेतो. तर तेवढे एक-दोन चमचे अपराधीपणाची भावना न ठेवता नक्कीच घेता येते. अर्थात, मधुमेह किंवा वाढलेले कोलेस्टेरॉल असलेल्या वाचकांच्या मनात ‘‘आम्ही काय करायचं?’’ असा प्रश्न येईल. मधुमेह आणि कोलेस्टेरॉल असणार्‍यांनी देखील तीर्थाचा एखादा चमचा खाण्यास हरकत नाही.

खरं सांगायचं तर पंचामृतापेक्षा सणाच्या दिवशी आपण इतर आहार कसा घेतोय हे महत्त्वाचे आहे. सकाळी पंचामृत घेतल्यावर मधल्या वेळेत मोदक, दुपारी पुरणपोळी, संध्याकाळी लाडू आणि मध्ये कुणीतरी आणलेली मिठाई खात असाल तर सावध. प्रत्येक पदार्थ स्वतंत्रपणे छोटा वाटला तरी दिवसाच्या शेवटी त्यांची बेरीज मोठी होऊ शकते. ‘‘आज सण आहे म्हणून काहीही चालेल’’ आणि ‘‘माझं डाएट आहे म्हणून काहीच खायचे नाही,’’ या दोन्ही टोकांच्या मधला समतोल साधा. म्हणून उत्सवाच्या दिवशी एखादा पदार्थ पूर्णपणे टाळण्यापेक्षा काय खायचं, किती खायचं आणि एकाच वेळी किती गोड पदार्थ घ्यायचे, याचं भान ठेवणं अधिक उपयोगी ठरतं. जरी गणेशोत्सव दहा दिवसांचा असला, तरी दहा दिवस सतत प्रत्येक गोड पदार्थ खाण्यापेक्षा आवडता पदार्थ निवडा, छोट्या प्रमाणात घ्या आणि त्याचा मनापासून आस्वाद घ्या.

साखरेऐवजी गूळ घातला तर?

आजकाल अनेक घरांमध्ये पंचामृतात साखरेऐवजी गूळ वापरण्याची पद्धत दिसते. त्यामुळे पंचामृत अधिक आरोग्यदायी होते का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. गुळामध्ये काही खनिजे आढळतात हे खरे असले, तरी पोषणशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर गूळ आणि साखर यांचे पोषणमूल्य बर्‍याच प्रमाणात सारखेच आहे. दोन्ही मुख्यत: कर्बोदकांचे स्रोत आहेत आणि दोन्ही शरीराला जवळपास समान प्रमाणात ऊर्जा (कॅलरी) देतात.

अनेकदा ‘पदार्थात साखर घातली तर चालत नाही, पण गूळ घातला तर मधुमेह असणारेसुद्धा तो भरपूर खाऊ शकतात,’असा समज आढळतो. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. गूळ असो किंवा साखर, दोन्ही रक्तातील साखरेवर सारखाच परिणाम करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी गूळ वापरला आहे म्हणून प्रमाणाचे बंधन विसरू नये. याचसाठी पंचामृतात साखर वापरायची की गूळ, हा निर्णय चव, परंपरा आणि वैयक्तिक पसंतीनुसार घेतला जाऊ शकतो. मात्र कोणताही पर्याय निवडला तरी प्रमाणाचे भान ठेवणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
हातावर चमचाभर पंचामृत, पण का? पंचामृताचे तीर्थ म्हटलं की, डोळ्यासमोर येते ते पूजा झाल्यानंतर हातावर दिले जाणारे अगदी चमचाभर तीर्थ. वाटीभर पंचामृत घेण्याची पद्धत नाही. आपल्या पूर्वजांनी यामागे नेमका कोणता विचार केला होता, हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी आज पोषणशास्त्राच्या दृष्टीने या अल्प प्रमाणाकडे पाहिले, तर त्यामागची उपयुक्तता नक्कीच लक्षात येते. पंचामृतामध्ये दूध आणि दही यांच्याबरोबर तूप, मध आणि साखर हे घटक असतात. म्हणजेच एकाच मिश्रणातून फॅट्स (चरबी) आणि साखरेचेही सेवन होते. हे प्रमाण वाढवत गेल्यास त्यातून मिळणारी ऊर्जा आणि साखरेचे प्रमाणही वाढत जाते. त्यामुळे पंचामृताचे तीर्थ अल्प प्रमाणात घेणे, हा त्याचा आस्वाद घेण्यासाठी पुरेसा आहे.

विशेष म्हणजे, तीर्थ म्हणून दिल्या जाणार्‍या या छोट्या प्रमाणामुळे पंचामृताचा आनंदही घेता येतो आणि त्याचे सेवनही मर्यादित राहते. म्हणून हातावर पडणारं चमचाभर पंचामृत केवळ तीर्थ नसून आजच्या भाषेत सांगायचे तर ‘‘थोडे, पण पुरेसे’’ याचे एक सुंदर उदाहरण आहे.

पंचामृताच्या या पाच घटकांमागे चव, पोषण आणि परंपरा अशा तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम दिसून येतो. बाप्पाच्या चरणी अर्पण होणार्‍या या छोट्याशा तीर्थातून आपल्या खाद्यपरंपरेची समृद्धीही अनुभवायला मिळते. यंदाच्या गणेशोत्सवात या पंचामृताचा गोडवा आणि त्यामागची परंपरा मनापासून अनुभवूया.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
amita@amitagadre.com