डॉ. तारा भवाळकर
पंढरीला जाणं हे विठ्ठलाच्या आणि रखुमाईच्या भक्तांच्या दृष्टीने जीवनातली इतिकर्तव्यता असते. सबंध वारकरी संप्रदाय विठ्ठल आणि रखुमाईच्या भोवती फिरतो आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘पंढरीसी जावे आल्यानो संसारा…’’ जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीला जावं त्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही.

आषाढातला पाऊस सुरू झाला आहे. अशा वेळेला विठुरायाचे भक्त म्हणतात,
‘‘जीवाला वाटतं
पंढरीला जावं जावं,
आई-बापा भेटू यावं,
पुंडलिकाला लुटावं.’’

आई-बाप म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. पुंडलिक हा भाऊ. कारण पुंडलिकामुळे विठ्ठल तिथे आला, अशी लोकधारणा आहे. किंबहुना पंढरी हे जे नाव पुंडलिकावरून पडले त्यातला मूळ कानडी शब्द पंडरीगे. आणि तो पुंडलिक त्या पंडरीगेमधला आहे. त्यातला लोककथांचा भाग आपण बाजूला ठेवू, परंतु विठ्ठल, रखुमाई आणि भक्त यांच्यामधलं जे नातं आहे त्याबद्दल लोकपरंपरा काय म्हणते ते पाहाण्यासारखं आहे.

पंढरीला जाणं हे विठ्ठलाच्या आणि रखुमाईच्या भक्तांच्या दृष्टीने जीवनातली इति कर्तव्यता असते. सबंध वारकरी संप्रदाय विठ्ठल आणि रखुमाईच्या भोवती फिरतो आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘पंढरीसी जावे आल्यानो संसारा…’’ जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीला जावं त्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही.

हा पंढरीचा विठ्ठल इथे केव्हापासून आहे? लोकपरंपरा, विशेषत: आमच्या ्त्रिरया काय सांगतात हे पाहायला हवं.
‘‘पंढरीचा विठ्ठल तिथे आहे
कवाच्यानं?
‘‘नव्हती पंढरी तवाच्यानं…’’ म्हणजे पंढरपूर हे गाव वसलेलं नव्हतं तेव्हापासून विठ्ठल तिथे आहे. पंढरीच्या वारीबद्दल संशोधकांचं मत असं आहे, की दहाव्या- अकराव्या शतकापासून पंढरीची वारी सुरू झाली असावी. पंढरीच्या वारीची घाटामधून जाणारी जी वाट आहे, त्याच्या खाणाखुणा संशोधकांनी शोधून काढलेल्या आहेत.
ही पंढरीची वारी संपल्यानंतर भक्तांना काय वाटतं? आई-बापाला भेटून यावं, असं ्त्रिरयांना वाटतं ते ठीक आहे, पण पुरुष भक्तांनासुद्धा पंढरपूर हे माहेर असल्यासारखं वाटतं आणि म्हणून पंढरपूरहून परत जाताना संत तुकाराम म्हणतात, ‘‘कन्या सासुराशी जाये
मागे परतुनी पाहे,
तैसे झाले माझ्या जीवा,
केव्हा भेटसी केशवा,’’

विठ्ठलाची जी अनेक नावं आहेत त्यातलं केशव हे एक नाव. विठ्ठल हा माझा पिता, रखुमाई माता, पुंडलिक भाऊ, बहीण चंद्रभागा, असं भक्त मंडळी म्हणतात तेव्हा चंद्रभागा नदीला इथे सजीव केलेलं दिसतं. भक्तांचं वैशिष्ट्य असं, की तिथे सजीव-निर्जीव या सीमा नाहीशा होतात. पंढरीच्या वेशीमधल्या सगळ्या वस्तू जिवंत होतात. आपण महाविद्यालयात आणि उच्च शिक्षणाच्या काळात अलंकारांची लक्षणे शिकत असताना ‘चेतनगुणोक्ती’ अलंकार शिकलो. असं म्हटलं जातं की, अचेतनाला चेतन रूप देणं म्हणजे चेतनगुणोक्ती अलंकार. खरं म्हणजे, लोकपरंपरेमध्ये सगळ्याच कवींनी आणि कवयित्रींनी म्हणजेच लोकपरंपरेतल्या ्त्रिरयांनी निर्जीवाला सजीव केलेलं आहे. तसं नदी चंद्रभागेला बहीण म्हटलेलं आहे.

पंढरीच्या दोन महत्त्वाच्या वार्‍या एक आषाढी आणि दुसरी पाठोपाठ येणारी कार्तिकी, म्हणजे ज्याला आपण ‘चातुर्मास’ म्हणतो. चातुर्मासाचा मध्य आणि चातुर्मासाचा शेवट हा काळ. पुष्कळदा प्रापंचिक अडचणीमुळे आषाढीला जाणं होत नाही म्हणून तिथे स्त्री म्हणते, ‘‘आषाढीला नाही गेले कार्तिकीला गं जाईन… देव पंढरीचा विठू विटे उभा मी पाहीन…’’

पंढरीचा विठू ज्या विटेवर उभा आहे, त्या विटेचंही फार माहात्म्य आहे. तिच्याविषयी ही पारंपरिक संवेदनशील स्त्री म्हणते, ‘काय गं पुण्य केलं तू कुंभाराच्या विटे, विठूरायाचे पाय तुला गवसले कसे? ’ फार काय, विठ्ठलाच्या महत्त्वाच्या एकादशीलाही या कवयित्रीने सचेतन केले आहे. ‘‘एकादशीबाई, पंधरा दिवसाची पाहुणी, विठुरायाची मेहुणी।।’’ विठ्ठलाशी संबंधी सर्व वस्तू, संत, स्थाने यांना चेतनरुप दिलं आहे, त्याची ही उदाहरणे. मात्र जास्त विस्ताराला येथे अवसर नाही.

आणखी एका महत्त्वाची गोष्ट, विठ्ठल भक्ताने स्वकष्टावर जगावे. भीक मागू नये. म्हणून सर्व जातीजमातीचे भक्त गावागाड्यातील आपली कामे करीत आहेत. संत तुकाराम म्हणतात,
‘‘भिक्षापात्र अवलंबणे।
जळो जिणे लाजिरवाणे।।’’
विठ्ठलाच्या दिसण्यापासून असण्यापर्यंत तो सर्वसामान्य कष्टकर्‍यांचा प्रतिनिधी आहे.
‘‘माझ्या विठ्ठलाला नाही
लागत पैसा रुका
त्याला पैशाचा माळबुक्का।।
हाती काठी, खांद्यावर घोंगडं घेणारा हा खरा श्रमकर्‍यांचा देव म्हणून कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा या सीमा ओलांडून सर्व भक्त त्याच्या वारीला येण्यात सार्थक मानतात.

ती वीट आणि त्या विटेवर उभा राहिलेला विठ्ठल. तो तिथे का उभा राहिला? त्या विठ्ठलाला बाप का म्हणायचं? नुसतं बापच म्हटलेलं नाही तर त्या विठ्ठलामध्ये भक्तांनी सर्व देवता पाहिलेल्या आहेत. म्हणजे तो वैष्णव आहे. शैव आहे. त्याला विठू माऊलीही म्हटलेलं आहे. त्याला ‘बुधाई’ म्हटलंय म्हणजे बुद्धाचा अवतारही म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्व पक्ष, पंथ हे त्या विठ्ठलाशी एकत्र आलेले आहेत, म्हणून विठ्ठलाजवळ कुठलाही दुजाभाव नाही. सर्व विचारधारेची मंडळी तिथे आहेत. ग्रामीण भागातला शेतकरी तर आहेच आहे, परंतु अतिशय उच्च विद्याविभूषित अशा मंडळींनीसुद्धा विठ्ठलाला आपला सखा मानलेला आहे.

वारकरी भक्ती संप्रदायाचे अभ्यासक, तत्त्वज्ञ सोनोपंत दांडेकर आणि मानववंशशास्त्राच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासक विदुषी इरावती कर्वे स्वत: पायी वारीला गेले होते. विठ्ठलाला पाहिल्यावर इरावतींनी म्हटलं, ‘‘विठ्ठल हा माझा बॉयफ्रेंड आहे…’’ म्हणजे इतक्या उच्च विद्याविभूषित मंडळींपासून ते ग्रामीण भागातल्या साध्या शेतकरी, गवळ्यापर्यंतची सगळी मंडळी ही विठ्ठलाची भक्त आहेत आणि अतिशय ओढीने ती वारीला जातात. आषाढी, कार्तिकीला जाताना ‘अमुक ठिकाणी या’ असा कोणी आदेश काढत नाही. पंढरीच्या ठिकाणी आंतरिक ओढीने ते जातात आणि म्हणून ‘आषाढीला नाही गेले कार्तिकीला गं जाईन…’ असं म्हणताना ही विठ्ठलाची भक्त आपल्या शेजारच्या सयांना विचारते, ‘‘मी पंढरीला जाते, संग सयानु कोन कोन?’’(माझ्या सोबत कोण कोण येतंय?) माझ्या गं विठ्ठलाची पत्र आल्याती मला दोन…’’ इथे विठ्ठल पत्र पाठवतो ही जी कल्पनाशक्ती आहे, तिची जी कवित्वशक्ती आहे तिला आपण तथाकथित शिक्षितांनी जरा बारकाईनं पाहिलं पाहिजे, की ही संवेदनशीलता किती मोठी आहे. इतकंच नाही तर कोणी संगे नाही म्हटल्यानंतर ती म्हणते,

‘‘पंढरीला जाते सोबत नको कोणी,
पुढे विठ्ठल मागे जनी…’’
जनाबाई ही सबंध लोकपरंपरेतल्या या गाण्यामध्ये महत्त्वाचं पात्र आहे. प्रत्यक्षात त्या जनाबाईला कधी विठ्ठलाच्या गाभार्‍यात जाऊन दर्शन घेता आलं नाही. ज्यांना तथाकथित अंत्यज म्हणता येतील अशा जातीची जनाबाई किंवा चोखोबा ही भक्त मंडळी आहेत, म्हणून त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत की,
‘बडवे मज मारीताती,
काय करी अपराध.’
चोखोबांची आणि जनाबाईची तक्रार अशी आहे की, विठ्ठलाच्या गाभार्‍यात नामदेवाच्या कुटुंबामधल्या नामदेवाची आई, बहीण, बायको यांना प्रवेश मिळत होता परंतु स्वत:ला नामयाची दासी म्हणणार्‍या जनीला मात्र प्रवेश मिळत नव्हता. म्हणून ती म्हणते,
‘‘राजाई गोणाई अखंडित तुझे पायी,
मज ठेविलें बाहेरी…’’
राजाई गोणाई म्हणजे नामदेवाच्या कुटुंबातल्या ्त्रिरया. जनाबाईची ही तक्रार जरी असली तरी ती बाहेर जाऊन अनन्य भावाने पंढरीच्या देवाची भक्ती करते. इतकंच नव्हे तर जेव्हा लोक तिला नावं ठेवू लागले त्यावेळी ती म्हणू लागली, ‘‘मी पंढरीच्या वाटेने चाललेली आहे, त्यामुळे मला कोणी काहीही म्हटलं तरी हरकत नाही’’
‘‘डोईचा पदर आला खांद्यावरी,
भरल्या बाजारी जाईन मी,
हाती घेईन टाळ, खांद्यावरी वीणा
आता मज मना कोण करी’’
डोक्यावरचा पदर खांद्यावर येणं, हे लोकपरंपरेत अनैतिक स्त्रीचं लक्षण समजलं जातं. मात्र टाळ आणि वीणा ही परमेश्वराच्या उपासनेची जी साधनं आहेत. ती ज्याच्या जवळ आहेत त्याला कशाचंही भय नाहीये. ती म्हणते,
‘‘पंढरीच्या पेठे मांडीयले पाल…
आता मनगटावर तेल घाला तुम्ही.
पाल घालणं म्हणजे वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रीचं स्थान, अशी परंपरेमध्ये धारणा आहे. आणि मनगटावर तेल घालणं, हा शब्द उच्चारणं म्हणजे, माझी कितीही बदनामी करा, मी पंढरीच्या वाटेला चाललेली आहे, त्यामुळे मला कुणाचीही भीती नाहीये.
पंढरीची वाट कशी आहे? हे सांगताना ती म्हणते,
‘‘पंढरीला जाता वाट लागे कुसळाची, बोटं नाजूक मासोळीची…’’
एखादी श्रीमंत घरातली बाई पंढरीला जाते आणि म्हणते, ‘‘माझी बोटं फार नाजूक आहेत आणि वाटही खडतर आहे, कारण ती दगडा धोंड्याची वाट आहे. त्याकाळी काही चांगल्या वाटा नव्हत्या. डोंगरातली वाट आहे, पण तरीसुद्धा ती वाट चालताना मला समाधान वाटतं.
‘‘पंढरीची वाट चालता हलकी केली,
संग साधुनी कथा केली.’’
पंढरीला जायची वाट कुठे आणि कशी आहे तो भूगोल जर लक्षात घेतला तर आळंदीहून म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या दारातून पालखी निघते आणि ती पंढरपुरापर्यंत जाते. ज्ञानदेवाची पालखी आळंदीमार्गे बरोबर येते आणि तिच्याबरोबर मी जाते.
पहिला मुक्काम आळंदी मार्गे पुणा, देवा ज्ञानदेवाच्या पालखीच्या संगे जाणा
आळंदीची वाट देहूला वाकडी, इंद्रायणीच्या काठाला तुकोबाची झोपडी.
देहू तुकाराम बाबाचं गाव. म्हणजे देहूला ही पालखी येऊन मिळते. देहूला इंद्रायणी नदी आहे. तिथल्या तुकोबाच्या झोपडीतून त्यांची पालखी निघते.
‘‘ज्ञानोबाची पालखी
सासवडाला थांबली,
बहीण मुक्ताबाई
गुज बोलाया गुंतली…’’
पुणे जिल्ह्यातलं सासवड येतं. बहीण मुक्ताबाई तिथे थांबलेली आहे. तिलाही घेऊन जायचंय पुढे. देहू आणि सासवडच्या मध्ये सोपानदेवांची समाधी आहे, त्या सोपानदेवांनाही घेऊन जायचंय. सबंध वारकरी संतांची नामावली या ्त्रिरयांना पाठ आहे आणि आपल्या कवितेमध्ये त्या गुंफत चाललेल्या आहेत.
‘‘पहिला माझा नमस्कार
पादुकावरी माळ,
देवा माझ्या विठ्ठलाचा कळस
देतो सोनियाचा ढाळ’’
त्यामुळे आता पंढरी जवळ यायला लागली आहे. देवाचा कळस दिसायला लागलाय आणि त्या कळसाचं दर्शन घेतलं तरी माझं मन उचंबळून येतं, कारण मला चंद्रभागेचंही दर्शन होतं.
‘‘माझा नमस्कार चंद्रभागा बाई,
देवा दावा तुमचे पाय
आलोया भेटीलागी…
माझा नमस्कार नामदेवाच्या पायरी,
विठ्ठल रुक्मिणी आले राऊळा बाहेरी…’’

नामदेवाची पायरी ही पहिली पायरी. मंदिर चढताना नामदेवांनी त्या ठिकाणी समाधी घेतली. नामदेवाच्या सर्व कुटुंबीयांनी तिथे समाधी घेतली अशा प्रकारचा लोकसमज आहे. रुक्मिणी आणि विठ्ठल जणू काही या भक्त स्त्रीला नेण्यासाठी नामदेवाच्या या पायरीपर्यंत गाभार्‍यातून उठून आलेले आहेत. म्हणून देवाला भक्त ऐवढे प्रिय आहेत. म्हणून संत म्हणतात, ‘‘पंढरीला जावे आल्यानो संसारा…’’

chaturang@expressindia.co