scorecardresearch

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा

पण भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर गांधींचा सहज प्रभाव बराच काळ राहिला.

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा
(संग्रहित छायाचित्र)

परंपरा आणि आधुनिकता या संघर्षांत गांधीजींनी अतिशय महत्त्वाच्या चिंता उपस्थित केल्या आहेत. त्यांचं ‘हिंद स्वराज’ हे गाजलेलं पुस्तक, त्यात त्यांनी भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं माहात्म्य अधोरेखित करत पाश्चात्त्य आधुनिकतेवर कठोर टीका केली आहे. ते मुळातूनच वाचायला हवं.. ‘गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा’

या लेखाचा हा भाग १.

महात्मा गांधी – हे दोन शब्द समस्त भारतीयांच्या मनात काहीएक हालचाल निर्माण करतात. ही हालचाल बहुस्तरीय असते. ही हालचाल होते कारण या नावाबरोबर मनात जे काही उलट-सुलट उमटतं ते टाळून आपल्याला पुढे जाता येत नाही. आज राजकीय पटलावर जवाहरलाल नेहरूंची छाया गडद झालेली (केलेली) दिसते, पण भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर गांधींचा सहज प्रभाव बराच काळ राहिला. आज त्याची तीव्रता कमी-जास्त होत असली तरी गांधीजींची आठवण होत नाही असं होत नाही.

‘गांधी’ हा माणूस आणि विचार भारतीय जाणिवेत आहेच. बदलत्या काळाच्या ओघात ‘गांधी’ विचार काय होता, त्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक बाजू काय होत्या हे सर्वसामान्यांच्या स्मृतीतून पुसलं जात ‘गांधी’ हे साधारणपणे चांगुलपणा मोजण्याचं एक ‘स्टँडर्ड’ म्हणून उरलं आहे. मात्र भारतात आणि जगातदेखील गांधीजींविषयी आजवर इतकं लिहिलं आणि बोललं गेलं आहे की त्या प्रसिद्ध ‘हत्ती आणि सात आंधळे’ या गोष्टीतील हत्तीच्या जागी गांधीजींना सहज ठेवता येईल!

गांधीजी हा माझ्या कुतूहलाचा विषय आहे. त्यांचे काही मूलभूत विचार काळ बदलला तरी सुसंगत ठरतात. गांधीजींनी असे विचार दिले आहेत आणि स्वत:च्या कृतीतून त्यांची परिणामकारकता सिद्ध केली आहे. शिवाय माझ्यासारख्या माणसाला तर ‘कर के देखो’ म्हणणारे गांधी जवळच्या मित्रासारखेच वाटतात. ‘परंपरा आणि आधुनिकता’ या संघर्षांत गांधीजींनी अतिशय महत्त्वाच्या चिंता उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे आपल्या चर्चेत गांधीजी येणं अगदी अपरिहार्यच होतं.

‘हिंद स्वराज’ हे गांधीजींचं एक गाजलेलं पुस्तक. १९०९ मध्ये लंडन ते दक्षिण आफ्रिका या प्रवासात दहा दिवसांत त्यांनी हे पुस्तक लिहिलं. लंडनमध्ये त्यांना जे स्वराज्यप्रेमी भारतीय तरुण भेटले त्यांच्याशी झालेल्या संवादाचं सार या पुस्तकात आहे. ‘संपादक आणि वाचक’ अशा दोघांमधील संवादातून गांधीजी आपले विचार मांडतात. मूळ गुजराती पुस्तकाचा त्यांनी स्वत:च इंग्लिश अनुवाद केला. दोन्ही पुस्तकांवर सरकारने बंदी घातली होती. १९१५ मध्ये गांधीजी भारतात आले. आल्यावर त्यांनी पुन्हा इंग्लिश अनुवाद प्रसिद्ध केला. या वेळी मात्र सरकारने त्याचा विरोध केला नाही. गांधीजी आफ्रिकेत असताना गोपाळ कृष्ण गोखले यांनी हे पुस्तक वाचलं होतं. त्यांना ते आवडलं नाही आणि गांधीजी हे पुस्तक स्वत:च रद्द करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु गांधीजींनी तसं केलं नाही. ते म्हणाले की, ‘हे पुस्तक मी पुन्हा लिहिलं असतं तर त्याच्या भाषेत मी सुधारणा केली असती, पण माझे मूळ विचार तेच आहेत.’ पुढे तीस वर्षांनंतर, १९३८ मध्ये ‘आर्यन पाथ’ या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्लिश मासिकाने ‘हिंद स्वराज अंक’ प्रकाशित केला होता. या मासिकाला पाठवलेल्या लहानशा पत्रात गांधीजींनी हेच म्हटलं आहे. या पत्रात आणखी एक गंमत आहे. पत्राच्या शेवटी गांधीजी लिहितात – ‘दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना मार्गदर्शन करण्याचं मोलाचं काम या पुस्तकाने केलं हे मी  सांगू इच्छितो. याच्या विरुद्ध बाजूने विचार करण्यासाठी वाचकांनी माझ्या एका स्वर्गीय मित्राचे मतही लक्षात घ्यावे. ‘हे पुस्तक एका मूर्ख माणसाने लिहिलं आहे’ असं तो म्हणाला होता.’

एका मूर्ख माणसाने बऱ्याच शहाण्यांना विचारात पाडलं असं या पुस्तकात काय आहे? ‘हिंद स्वराज’ ज्यांनी वाचलं आहे ते त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतीलच, पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांनी ते जरूर वाचावं. थोडे धक्के बसतील, पण तरी वाचावं. ‘हिंद स्वराज’मध्ये गांधीजींनी भारतीय परंपरा व संस्कृतीचं माहात्म्य अधोरेखित करत पाश्चात्त्य आधुनिकतेवर कठोर टीका केली आहे. आपण ज्याला सहजपणे प्रगतीचं लक्षण म्हणतो अशा अनेक गोष्टी त्यांनी कुचकामाच्या ठरवल्या आहेत. उदाहरणार्थ रेल्वे, डॉक्टर आणि वकील यांनी भारताला कंगाल केलं आहे, असं ते म्हणतात. सुधारणा, विकास हा एक प्रकारचा आजार आहे असं ते सांगतात. आणि मौज अशी आहे की, आपल्या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ ते जे मुद्दे मांडतात ते वाचून आपण त्याक्षणी तरी नकळत होकारार्थी मान डोलावतो. आपल्याला ते व्यावहारिकदृष्टय़ा पटत नाही, पण त्या म्हणण्यात सत्यांश आहे असं वाटतं. पुस्तकातील मांडणी धक्कादायक वाटली तरी १९२४ मध्ये या पुस्तकाच्या संदर्भाने झालेल्या एका चर्चेतील गांधीजींचं म्हणणं अधिक आश्वासक वाटतं. या चर्चेत ते म्हणतात की, मी यंत्रांच्या विरोधात नाही. आपलं शरीर हे एक नाजूक यंत्रच आहे. चरखा हे यंत्रच आहे. परंतु अडचण अशी आहे की आपण आज यंत्रांच्या मागे वेडय़ासारखे धावत आहोत. यंत्रांचा वापर करण्यामागे जे प्रेरक कारण आहे ते ‘श्रमाची बचत’ हे नसून ‘संपत्तीचा लोभ’ हे आहे. हे विधान खोलात विचार करण्यासारखं आहे.

यंत्र, आधुनिकता याबाबत गांधीजींचा जो ‘डिनायल मोड’ दिसतो त्याचा संबंध त्यांना जो ‘नीतिमान माणूस’ निर्माण व्हावासा वाटत होता त्याच्याशी आहे. माणसाची भौतिक प्रगती, सुखसुविधायुक्त जीवन आणि माणसाची नैतिक उन्नती या झगडय़ात त्यांची निवड स्पष्ट होती. खरं तर नैतिक उन्नतीला पर्यायच असू शकत नाही, पण भौतिक प्रगती जेव्हा हळूहळू समाजमनाचा कब्जा घेते तेव्हा नैतिकता ‘बॅक सीट’ला जाऊ लागते आणि मग निवडीचीच वेळ येते. माणूस हा परंपरानिष्ठ, आधुनिकतावादी असा काही असण्यापेक्षा ‘माणूस’ म्हणून उन्नत असणं गांधीजींना अभिप्रेत होतं आणि त्याच्या आड जे येईल ते नको असं त्यांचं म्हणणं होतं. मग ती परंपरा असो की आधुनिकता. गांधीजींची ‘फंडामेंटल’ मांडणी तात्त्विक संघर्षांला जन्म देणारी आहे. आज आपण यंत्रांनी घेरले गेलो आहोत. आपलं आयुष्य सोपं झालं आहे. पण आपण जर यंत्र उत्पादनाची पूर्ण साखळी (कच्चा माल – त्यावरील प्रक्रिया – उत्पादन – वितरण) जवळून पाहिली तर तिथे सगळं आलबेल आहे असं आपण म्हणू शकू का? मॉलमध्ये किंवा दुकानात वस्तूंच्या अवतीभवती जी प्रसन्नता आणि चकचकीतपणा दिसतो तो या उत्पादन साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर आणि मुख्य म्हणजे त्यात गुंतलेल्या माणसांच्या जगण्यात आणि अंतरंगात दिसेल का? भौतिक प्रगती झाली, पण त्याबरोबर वाढलेलं प्रदूषण, शहरातील बेसुमार गर्दी आणि बकाल जगणं, गुन्हेगारी, आर्थिक विषमता या गोष्टी भौतिक प्रगतीच्या कुठल्या अकाउंटला टाकायच्या हा प्रश्न आहे. ‘प्यासा’ चित्रपटात साहिर लुधियानवीसारखा कवी वेश्यावस्ती पाहणाऱ्या नायकाच्या मनात ‘जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है?’ हा प्रश्न उभा करतो. माझं लहानपण भिवंडीत गेलं. तिथल्या यंत्रमाग चालवणाऱ्या कामगारांची राहायची जागा आणि कामाची जागा दोन्ही बघताना अगदी हाच प्रश्न मनात येतो. अनेक ठिकाणी फिरताना हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.

आज आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट या गोष्टी वापरतो, पण त्यांचे दुष्परिणाम लपून राहिलेले नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप हे संवादाचं माध्यम म्हणून चांगलं आहे, पण जर त्यावरून अफवा पसरून काही निर्दोष लोकांचे जीव जात असतील तर काय करायचं? इथे गांधीजींच्या ‘माणसाची’ आठवण होतेच. माणूसच जर घडायचा बाकी आहे तर त्याच्या हाती यंत्र देऊन काय उपयोग?

आधुनिकतेने माणसासमोर टाकलेले काही पेच गहन आहेत. एक गोष्ट खरी की तंत्रज्ञान विरुद्ध माणूस असा मूळ झगडा नाही. मूळ झगडा माणूस विरुद्ध माणूस असाच आहे. नैसर्गिक संसाधनं आणि उत्पादन साधनांवरील केंद्रितमालकी, काही मोजक्या लोकांच्या बुद्धीमुळे शक्य झालेली आणि मोजक्या लोकांच्या नियंत्रणात राहणारी तंत्रज्ञानाची झेप, मात्र त्यातून प्रभावित होणारं असंख्यांचं जगणं आणि या सगळ्या गतिशील वास्तवात शासनयंत्रणेचा सहभाग आणि नियंत्रण असे विविध मुद्दे इथे विचारात घ्यावे लागतात. गांधीजींचं वैशिष्टय़ हे की माणसाची स्वतंत्र, स्वावलंबी, आत्मबलयुक्त आणि सामाजिक दृष्टी असलेली घडण डोळयासमोर ठेवून ते समाजनिर्मितीचा विचार करतात. प्रत्यक्षात ते शक्य झालं का, होईल का हा मुद्दा वेगळा,पण विवेक जागा ठेवायचं, मूलभूत प्रश्न विचारायचं काम गांधीजी करतात. ‘थांबा आणि विचार करा’ हे सांगतात आणि म्हणूनच ते आपल्यासाठी ‘गाइडिंग लाइट’ ठरतात!

पुढील लेखात आपण हीच चर्चा पुढे नेणार आहोत. दरम्यान प्रस्तुत विषयासंदर्भात हे तीन लेख जरूर वाचावेत –  १) ‘महात्मा गांधी’ (मिलिंद बोकील, दीपावली – दिवाळी २०१७) २) हिंद स्वराज – ‘समाजसापेक्ष विकासाच्या प्रतिमानाचा आराखडा’ (चैत्रा रेडकर, आंदोलन – जानेवारी-फेब्रुवारी २०११)  ३) ‘हिंद स्वराज आणि आधुनिकता’ (विश्राम गुप्ते, मुक्त शब्द – दिवाळी २०१७- या लेखांसाठी माझ्याशी संपर्क साधता येईल.)

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व परंपरा आणि नवता ( Parampara-ani-navata ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या