उत्पल व. बा. utpalvb@gmail.com

कामेच्छा हा प्रेमाइतकाच एक महत्त्वाचा विषय असूनही त्यावर खुलेपणाने, विश्लेषणात्मक बोलण्याइतपत आपण ‘सामाजिक मनोभूमिका’ तयार केलेली नाही. ‘संस्कृती’च्या उभारणीत काही गोष्टी नाकारल्या जातात, काही स्वीकारल्या जातात. यात होतं असं की, एका बाजूला सांस्कृतिक रचितं तयार होत असली तरी दुसऱ्या बाजूला त्यांना छेद देणारी ‘वास्तव रचितं’ ही असतात. लैंगिकतेबाबतचं वास्तव, लैंगिक इच्छेचं प्रकटन हा एक चिंताजनक विषय झाला आहे.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
Marriage Astrology
‘या’ राशींच्या लोकांचे नाते फार काळ टिकत नाही? वैवाहिक आयुष्यात येतात अडचणी

अलीकडे चित्रपटगृहात एक अत्यंत प्रभावी (आणि महत्त्वाची) जाहिरात बघण्यात आली. नाव नेमकं आठवत नाही, पण हेल्पलाइनची जाहिरात आहे. एक मध्यमवयीन गृहस्थ लिफ्टमध्ये शिरतो. त्याच्यामागे एक लहान मुलगा फुटबॉलशी खेळत आत शिरतो. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर अस्वस्थ भाव आहेत. लिफ्टचं दार बंद होतं. पुढच्या दृश्यात लिफ्टचं दार उघडतं. मुलगा बाहेर पडतो. पाठोपाठ हा गृहस्थही बाहेर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच आहेत. जाहिरात इथे संपते आणि स्क्रीनवर कॅप्शन झळकते – ‘डू यू लाइक चिल्ड्रन इन अ वे यू शुड नॉट? हेल्प इज अ‍ॅव्हलेबल.’ (लहान मुलं ज्या प्रकारे आवडायला नकोत त्या प्रकारे तुम्हाला आवडतात का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो.)

ही जाहिरात पाहून मला अतिशय बरं वाटलं. एखाद्या प्रश्नाचा केवळ निषेध करण्यापेक्षा तो प्रश्न समजून घेऊन नेमक्या जागी काम करायचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमाची ती जाहिरात होती. आता यानंतर माझ्या मनात आलं की, याच धर्तीवर आणखी एक जाहिरात करता येईल. त्यात लहान मुलाच्या जागी एक स्त्री असेल. पुरुष तोच असला तरी चालेल. जाहिरात संपल्यानंतर कॅप्शन अशी असेल – ‘स्त्रीकडे बघून तुम्हाला सतत उत्तेजित व्हायला होतं का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो!’

मला जे म्हणायचं आहे ते बहुधा तुमच्या लक्षात आलं असेल. गेल्या दोन-तीन लेखांत आपण प्रेमसंबंधांविषयी बोललो होतो. त्यानंतर लैंगिक संबंधांविषयी मला काही सांगायचं होतं आणि ही जाहिरात माझ्या मदतीला धावून आली!

कामेच्छा हा प्रेमासारखाच एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयाबाबत खुलेपणाने, विश्लेषणात्मक बोलण्याइतपत आपण आपली ‘सामाजिक मनोभूमिका’ तयार केलेली नाही. प्रेमाबाबत जे झालं आहे तसंच काहीसं इथेही झालं आहे. ‘संस्कृती’च्या उभारणीत काही गोष्टी नाकारल्या जातात, काही स्वीकारल्या जातात हे आपण मागे एकदा म्हटलं आहे. यात होतं असं की, एका बाजूला सांस्कृतिक रचितं तयार होत असली तरी दुसऱ्या बाजूला त्यांना छेद देणारी ‘वास्तव रचितं’ही असतात. लैंगिकतेबाबतचं वास्तव, लैंगिक इच्छेचं प्रकटन हा एक चिंताजनक विषय झाला आहे हे आपल्याला दिसतंच आहे. बलात्कारांच्या वाढलेल्या घटना, त्यातील हिंसाचार, पुरुषांकडून कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळणूक, लग्नव्यवस्थेअंतर्गत असणारे बलात्कार व लैंगिक असमाधानाशी जोडलेले प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत. लग्नसंस्था, लैंगिक संबंध आणि नैतिकता यावर स्वतंत्रपणे बोलता येईल. या लेखात आपण प्रामुख्याने ‘पुरुषी लैंगिक वर्तन’ यावर चर्चा करू.

‘स्पिनोझा’ या सतराव्या शतकातील डच तत्त्वज्ञाचं एक मननीय विधान आहे – ‘माणसाच्या कृत्यांकडे पाहून रडण्यापेक्षा, हसण्यापेक्षा किंवा त्यांचा तिरस्कार करण्यापेक्षा ती समजून घेण्याचा मी सतत प्रयत्न करतो.’ माणसाची कृत्ये समजून घेणं अशाकरिता महत्त्वाचं, की ते नीट झालं तरच आपण प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने जाऊ शकतो. मला लैंगिकतेच्या क्षेत्रात हा विचार लक्षणीय वाटतो. पुरुषांचं लैंगिक वर्तन अनेक प्रकारांनी विस्कळीत, वाईट आणि स्त्रीसाठी अतीव दु:खदायक असं राहिलेलं आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषाचा अहंकार जोपासला जातो, स्त्रीला दुय्यम स्थान मिळतं आणि तिचं शोषण होतं हे तर आहेच. या व्यवस्थेने पुरुषाचीही गोची केली आहे आणि त्याच्यातला ‘माणूस’ झाकोळला आहे; पण व्यवस्थाजन्य अहंकाराबरोबरच पुरुषाची कामेच्छा हादेखील एक घटक असेल तर त्यावर मात करण्यासाठी आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आज मासिकपाळीसारख्या विषयावर खुलेपणाने बोललं जातं आहे हे अतिशय स्वागतार्ह आहे. त्याच खुलेपणाने पुरुषाच्या ‘इरेक्शन’विषयी, वीर्यस्खलनाविषयीदेखील बोललं जाणं आवश्यक आहे. विशिष्ट वयात मुलींशी आणि मुलांशी त्यांच्या ‘मनातील लैंगिकतेविषयी’ बोललं जाणं आवश्यक आहे. जर पुरुषाचं लैंगिक वर्तन अडचणीचं ठरत असेल तर या विषयासंबंधीच्या विश्लेषणात्मक चच्रेला सामाजिक चर्चाविश्वात स्थान मिळायला हवं.

र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ’ मासिकात स्वत:च्या कामजीवनातील अडचणींबाबत वाचक पत्र लिहीत. वीर्यस्खलन, कामोत्तेजना, शरीरसंबंध, संततिनियमन यांच्याशी संबंधित प्रश्नांबाबत एका मराठी मासिकातून १९३०-१९४० च्या दशकात चर्चा होत असे. तशी चर्चा नंतर होत होती का माहीत नाही. आज अशी चर्चा करणारं मासिक/वृत्तपत्र नाही. माध्यमांचा इतका मारा असताना लैंगिक संबंधांवर नेमकेपणाने बोलणाऱ्या चर्चा, व्हिडीओज बघायला मिळत नाहीत. इंग्लिशमध्ये आहेत, मराठीत नाहीत. २००८ पासून ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचं त्याच नावाने पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न मनीषा सबनीस यांनी केला. त्यात लैंगिक प्रश्नांविषयी चर्चाही होत असे; पण पुढे हे मासिक तग धरू शकलं नाही.

पुरुषाची कामेच्छा आणि स्त्रीची कामेच्छा यात फरक आहेत का? असल्यास का? कोणते? पुरुषाच्या लैंगिक इच्छेचं नेमकं स्वरूप काय आहे? त्याची लैंगिक इच्छा गुन्हेगारी वळण का घेते? लैंगिक इच्छा नियंत्रणाबाहेर जात असेल तर त्यावर उपाय काय? हे या चच्रेतील काही समर्पक प्रश्न आहेत. मुळात सजीवांमध्ये लैंगिक इच्छा असते याचं एक प्रमुख कारण लैंगिक संबंधांतून प्रजोत्पादन होतं हे आहे. आपली गुणसूत्रं टिकवून ठेवणं, त्यासाठी संतती जन्माला घालणं ही सजीवांची एक मुख्य प्रेरणा आहे. भिन्निलगी व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, त्यातून लैंगिक इच्छा चेतवली जाणं याच्या मुळाशी प्रजोत्पादनाचा ‘ड्राइव्ह’ आहे. अर्थात प्रजोत्पादन करायचं नसेल तरी माणसामध्ये लैंगिक इच्छा निर्माण होते. याचं कारण लैंगिक संबंधांतून केवळ प्रजोत्पादनच होत नाही तर ‘प्लेझर’देखील मिळतं आणि प्रजोत्पादन व प्लेझर या दोन गोष्टी वेगळ्या करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्यामुळे ‘प्रजेच्या जबाबदारीचं’ ओझं टाळून ‘निव्वळ आनंद’ ही बाब माणसामध्ये या क्रियेचं आकर्षण वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. याची नोंद घेऊन पुरुषांच्या संदर्भाने विचार करता लैंगिक इच्छा निर्माण होणं, ती वाढणं, नियंत्रणाबाहेर जाणं आणि परिणामी त्यांच्याकडून गुन्हा घडणं या साखळीचा जर नीट अभ्यास केला, त्याबाबत पुरुषांना बोलतं केलं गेलं, तर पुरुषाचा विवेक जागवायला मदत होऊ शकेल. कामेच्छा आणि स्त्रीवर नियंत्रण ठेवण्याची, अहंकाराची पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून मिळालेली ‘देणगी’ या दोन्हीचा प्रभाव पुरुषाच्या मानसिकतेवर आहे. याची उकल करून ती पुरुषांसमोर मांडत राहणं गरजेचं आहे.

पुरुषाच्या बाबतीत लैंगिक तृप्ती हे विरेचनाचं माध्यम आहे. या तृप्तीअभावी, इरेक्शनच्या परिणामी पुरुषांत अवघडलेपण येतं, त्याचं मन:स्वास्थ्य गडबडू शकतं आणि ही इच्छा त्याच्या विवेकावरदेखील मात करू शकते. लैंगिक इच्छेची ही ‘उत्क्रांतिजन्य ताकद’ नोंद घेण्याजोगी आहे. ज्या पुरुषाची स्त्रीबाबतची मानसिकता मध्ययुगीनच आहे त्याला त्याच्या लैंगिक इच्छेबाबत काही प्रश्नच पडणार नाही. कारण त्याच्या दृष्टीने स्त्री ही भोग्य वस्तूच आहे; पण अशी मानसिकता नसणाऱ्या पुरुषांबाबतही लैंगिक इच्छा आपला प्रभाव दाखवते का हे तपासणं आवश्यक आहे. याबाबत एक उदाहरण आठवलं. ‘मी टू’ चळवळीत चित्रपट दिग्दर्शक विकास बहल याच्यावर आरोप झाले. विकास बहलने ‘क्वीन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. जो पुरुष स्त्रीस्वातंत्र्याचा एक सशक्त उद्गार असलेला चित्रपट तयार करतो तो वास्तवात संपूर्णपणे वेगळा, पारंपरिक पुरुषी मानसिकतेचा असू शकतो ही एक शक्यता आहेच; पण तो तसा नसून काही परिस्थितिजन्य कारणांमुळे किंवा मन:स्थिती बिघडून, नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्याकडून काही घडलं का, हेही तपासायला हवं. मुद्दा हा की, केवळ आरोप-प्रत्यारोपात न अडकता, शक्यता विचारात घेत, त्यांचा शोध घेत आपण समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार की नाही?

बलात्काराकडे इव्होल्यूशनरी बायॉलॉजीच्या अंगाने पाहणारं ‘नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायॉलॉजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन’ हे रँडी थॉर्नहिल आणि क्रेग पाल्मर या लेखकद्वयीचं एक पुस्तक आहे. यातील एका परिच्छेदाचा माझ्या एका लेखासाठी मी अनुवाद केला होता. तो इथे देतो आहे –

मनुष्यांमधील बलात्काराची अंतिम कारणे स्त्री-पुरुषांच्या लैंगिक उत्क्रांतीमधील फरकातच सापडतील. स्त्रीच्या लैंगिकतेचं नियमन करणाऱ्या मानसिक यंत्रणा स्त्रीमध्ये उत्क्रांत झाल्या आणि त्याला प्रतिसाद म्हणून बलात्कार ही क्रिया उत्क्रांत झाली असे पुरावे सांगतात. स्त्री तिच्यातील या मानसिक यंत्रणांमुळे आपल्या संभाव्य लैंगिक जोडीदारांमध्ये भेद करू शकली. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी स्त्रीची निवड ‘कुठल्याही नराबरोबर, कुठल्याही परिस्थितीत रत होण्यास तयार’ अशी झाली असती तर बलात्कार घडला नसता. दुसऱ्या बाजूला, नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी पुरुषाची निवड ‘विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट मादीकडे लैंगिकदृष्टय़ा आकर्षति होणे’ अशी झाली असती तर बलात्कारांचं प्रमाण खूपच कमी असतं आणि ‘जी स्त्री समागम करण्यास उत्सुक आहे त्याच स्त्रीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा’ अशा प्रकारे जर मानवी पुरुषाची नैसर्गिक निवड झाली असती तर बलात्काराची शक्यताच नष्ट झाली असती!

लैंगिक इच्छा, तिचं घडणं-बिघडणं आणि त्याचं प्रतिबिंब लैंगिक वर्तनात पडण्यामागे जैविक आणि सामाजिक दोन्ही घटक जबाबदार असतात आणि त्यामुळे लैंगिक गुन्ह्य़ांबाबत या दोन्ही अंगांनी विचार करून उपाय शोधावे लागतील हे नोंदवून आपण थांबू आणि पुढील लेखात उपायांचा विचार करू.

chaturang@expressindia.com