तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ
टाळेबंदीनंतर बहुसंख्य विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय सुटलीय आणि त्यांच्यात प्रचंड सैलावणं आलंय असं पालक आणि शिक्षकांचं म्हणणं आहे. एका ठिकाणी बसणं, एकाग्रतेनं तासभर शिक्षकांचं ऐकणं, नोटस् लिहिणं, स्व-अभ्यास, उजळणी आणि शिकलेल्याची परीक्षेत मांडणी हा प्रवास मुलांसाठी आता कठीण झाला आहे. पालक आणि शिक्षकांना अशा वेळी काही युक्त्या वापरून मुलांचं शिक्षण पूर्वपदावर आणायला मदत करावी लागेल.
अभ्यासाच्या विविध पद्धती वापरणं, शिकवणी लावणं, अशा विविध मार्गानी पालक-विद्यार्थी अभ्यासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण अचानक करोना आपल्या आयुष्यात येऊन पोहोचला आणि शिक्षण, शाळा, शिकवणी, विद्यार्थी आणि अभ्यास या सगळय़ाचीच गाडी रुळावरून घसरली.

करोनाची साथ बऱ्यापैकी प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर शिक्षण व्यवस्था-शाळा-शिकवणी हे रुळावर आलं असलं, तरी आपल्या पाल्याचा अभ्यास अजूनही पूर्वीसारखा नियमित आणि शिस्तीत होत नाहीये, असं अनेक पालकांना वाटत आहे. करोनामुळे मार्च २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर झाली आणि बाहेर-वातावरणात कितीही तणाव असला तरी या टाळेबंदीमुळे शाळेला सुट्टी मिळालेल्या मुलांना आनंदच झाला. कोणत्याही पिढीतल्या मुलांना असंच वाटलं असतं. ऐन परीक्षेचा काळ, अभ्यासाचा ताण आणि त्यात अनिश्चित सुट्टी. परीक्षा होईल की नाही माहिती नाही, पण शाळेला तर बरेच दिवस सुट्टी मिळाली. नंतर सरकारनं जाहीर केल्यानुसार अनेक संस्थांनी परीक्षाच रद्द केल्या. परीक्षा न देता मुलं अलगद पुढच्या वर्गात गेली.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

अभ्यासाची सवय सुटणं आणि सैलावणं हा तो टप्पा होता. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावरही करोनाचं सावट होतं. त्यामुळे ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आणि अभ्यासविषयक नवे प्रश्न निर्माण झाले. हे सर्व आपल्या सर्वाना माहिती आहे. पण आजचा प्रश्न आणि त्यावर संभाव्य उपायाचा विचार करताना तो प्रश्न निर्माण कसा झाला हे आपल्याला ऑलनाइनच्या भाषेत‘झूम इन’ करून पुन्हा पाहावं लागतं. वर्गात बसून एकानंतर एक तास सुरू राहाणं, विविध विषयांचा अभ्यास, हे त्या वेळी इतिहासजमा झालं.

पार्थची शाळा ऑनलाइन असायची. शाळा सुरू होईपर्यंत अनेकदा तो नीट आवरून बसलेलाही नसायचा. हजेरी लावल्यानंतर काही ना काही निमित्तानं त्याची ऊठबस सुरू असायची आणि पलीकडे शिक्षक शिकवत असायचे. त्यातून अनेकदा ‘पूर्णपणे शिकण्यात लक्ष’ हा प्रकार बंद झाला. प्राथमिक-माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांची ही तऱ्हा, तर कॉलेजचे वेध लागलेल्या मोठय़ा मुलांना ऑनलाइन शिकवणं सुरू असताना व्हिडीओ बंद करून टाइमपास करण्याचं तंत्र अंगवळणी पडलं. कित्येक महिने हे असंच सुरू राहिलं. त्यामुळे साहजिकच जेव्हा प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालयं सुरू झाली, तेव्हा वर्गात सलग बसण्याची सवय मोडलेली असल्यानं विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटणं साहजिकच होतं. सलग काही तास वर्गात बसून पाठ दुखू लागली. दांडय़ा मारण्यासाठी निमित्त सुरू झालं. त्यातून अभ्यासाची बैठक मोडली. वर्गात अचानक शिक्षकांनी उभं करून प्रश्न विचारल्यावर उत्तर देता यावं यासाठी आवश्यक असणारी एकाग्रता कमी होणं आणि त्यातून शिक्षकांचा धाक कमी होणं, असे सर्व प्रश्न निर्माण झाले.

मुलांचं हे वागणं चुकीचं होतं, पण म्हणून मुलं दोषी होती असं मात्र नाही. परिस्थितीमधून तयार झालेल्या त्या समस्या होत्या. त्यामुळे मुलांवर केवळ वैतागून किंवा त्यांच्यावर दोषारोप करून प्रश्न सुटणार नाही. आपल्याला पालक म्हणून थोडा वेगळा विचार करावा लागेल. मुलांना पलंगावर किंवा सोफ्यावर बसू न देता खुर्चीवर किंवा खाली जमिनीवर बसवून काही अभ्यास देऊन तो करून घेणं, त्याची वेळ हळूहळू वाढवत नेणं, हे तंत्र अशा वेळी उपयोगी पडतं. त्यातून बैठक मारून अभ्यास करायची सवय हळूहळू पुन्हा अंगवळणी पडण्यास मदत होते. शिवाय हे करताना आपण मुलांकडून हे करवून घेत आहोत असं वातावरण ठेवू नये. म्हणजे आपल्याला पुन्हा सलग बसून अभ्यास करणं जमू लागलं आहे याचा आत्मविश्वास मुलांमध्ये येतो.
शिक्षक गृहपाठ देतात आणि तो आपल्याला वेळेवर करण्याचं आणि दाखवण्याचं बंधन नाही आणि त्यानंतर शिक्षाही नाही, अशी परिस्थिती करोनाकाळातल्या ऑनलाइन शिक्षणात जवळपास सर्वत्र होती. त्यातून मुलांची रोज गृहपाठ करण्याची सवय मोडली. शिवाय अभ्यास केला नाही तर वर्गात सर्वासमोर शिक्षक काय बोलतील, ही मनातली भीतीही निघून गेली. त्यातून शिक्षकांबद्दलचा धाक कमी झाला. पुन्हा सर्व काही रुळावर आल्यावर गृहपाठ वेळेवर करणं हा मुलांना जाच वाटू लागला आहे.

एका शाळेनं मुलांच्या परीक्षेतल्या उत्तरपत्रिका तपासून असा निष्कर्ष काढला, की बहुतांश मुलांचा लिखाणाचा वेग आणि दर्जा कमी झाला आहे. अनेक मुलांना १०० गुणांचा पेपर नेहमीप्रमाणे तीन तासांत सोडवताना वेळ कमी पडत आहे. आता हा प्रश्न केवळ लिखाणाच्या सरावानं सोडवता येईल असं वाटत असेल तर ते अर्धसत्यच आहे. लिखाणाच्या सरावाबरोबरच अंगातला आळस-शिथिलता दूर करावी लागेल.

करोनाच्या काळात निनादमध्ये आलेली शिथिलता त्याच्या आईनं हेरली होती. त्यामुळे सर्व काही सुरळीत झाल्यावर तिनं निनादला त्याचा आवडता क्रिकेट खेळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिलं. त्यातून टीव्ही, मोबाइल, लॅपटॉपमध्ये अडकलेला निनाद पुन्हा शारीरिक व्यायाम होईल अशा खेळाकडे वळला. त्यातून आळस दूर झाला आणि चपळता येऊ लागली. आळसावलेलं शरीर लिखाणही संथ करतं आणि एकदा शरीर सुदृढ आणि चपळ झालं, की त्याचा परिणाम आपल्या बाकीच्या कामांवरही होतो. निनादच्या आईनं वापरलेल्या या युक्तीमुळे त्याचं लिखाण पुन्हा पूर्वपदावर येण्यास मदत झाली.

यंदाच्या शैक्षणिक वर्षांत ऑनलाइन शिक्षण हा प्रकार उरलेला नाही. पहिल्या दिवसापासून शाळा-कॉलेज नीट सुरू झाले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांतल्या सवयी अचानक बदलणार नाहीत. दृकश्राव्य माध्यमाचा अधिक वापर ते पुन्हा थेट शिकवणं आणि कागद-पेन यांचा संबंध हे सर्व रुळायला वेळ लागत आहे.

मृणाललाही याच कारणामुळे शाळेचा वैताग येतो. शाळेतून घरी आली की ‘शाळेत कसं बोअर होतं’ याचा पाढा सुरू होतो. सतत किंवा बराच वेळ ऑनलाइन असण्याची सवय लागल्यावर ते सोडून थेट लोकांशी संपर्क-संवाद प्रस्थापित करणं काहींना जड जात आहे. अभ्यास रंजक पद्धतीनं करणं आणि अभ्यासाकडून मनोरंजनाची अपेक्षा ठेवणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. पाठय़पुस्तकातल्या धडय़ांचं नाटय़रूपांतर किंवा ॲनिमेशन करून ते ऑनलाइन बघण्याचा काही फायदा निश्चितच आहे, पण म्हणून तो पुस्तकातले धडे वाचून काढायला पर्याय असू शकत नाही. विषयाचं आकलन नीट होण्यासाठी पाठय़पुस्तकातले धडे पूर्ण वाचणं आवश्यकच ठरतं. त्यामुळे मुलं पुन्हा धडे नीट वाचण्याकडे वळतील याची काळजी पालकांना घ्यावी लागेल. त्यातून मुलांचा अभ्यास चांगला होईलच, शिवाय एकाग्रता वाढण्यात आणि त्याचा परिणाम परीक्षेत चांगले गुण मिळण्यातही होतो.

काही मुलांना वर्गात उभं राहून उत्तर देणं याची भीती असते. त्यात करोनाकाळात तो प्रकार बंदच झाला. आता शाळा पुन्हा सुरू झाल्यावर अशा मुलांना खूप ताण येत आहे. वेदांत आता आठवीत गेलाय. त्याच्या वर्गात ४० मुलं-मुली आहेत. तो अभ्यासात हुशार आहे. वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याला येत असतात. पण तरीही तो हात वर करत नाही. कारण त्या विचारानंच त्याच्या छातीत धडधड वाढते. शिक्षकांनी थेट उभं केल्यावर उत्तर येत असूनही तो दडपणात असल्याचं इतिहासाच्या शिक्षकांना जाणवलं. मग त्यांनी इतरांचे हात वर असतानाही अधूनमधून वेदांतलाच उत्तर विचारायला सुरुवात केली. हळूहळू वेदांतची भीड चेपली आणि नंतर तो स्वत: हात वर करू लागला. शाळा म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर पुढच्या आयुष्यात विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व कसं असेल याचा पायाही शाळेत घातला जातो. त्यामुळे अनेकदा मुलांच्या सर्वागीण विकासासाठी पालकांपेक्षा शिक्षकांनी केलेले प्रयत्न अधिक महत्त्वाचे ठरतात. ‘वर्गात उभं राहून उत्तर नाही देता आलं तर काय झालं? परीक्षेत तर चांगले गुण मिळतात.’ असा विचार पालकांनी करू नये. कारण पुढच्या आयुष्यात नोकरीची मुलाखत असो, की ‘ग्रुप डिस्कशन’, यात ही मुलं मागे पडण्याचा धोका असतो. कार्यालयात काही सादरीकरणाची वेळ आली, की त्यातही त्यांची भंबेरी उडू शकते. ‘पेप्सी’सारख्या बलाढय़ आंतरराष्ट्रीय कंपनीत सर्वोच्च पदावर गेलेल्या इंद्रा नूयी यांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांची आई त्यांना आणि त्यांच्या भावंडांना ऐनवेळी भाषणाचा विषय देऊन त्यावर बोलायला लावायच्या, अशी एक आठवण सांगितली आहे. त्याच्या भविष्यात झालेल्या उपयोगाबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. पालकांनी अशा व्यक्तींची पुस्तकं आवर्जून वाचावीत आणि त्यापासून बोधही घ्यावा.

टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नक्कीच परिणाम झाला आहे, मात्र तो दुरुस्त करण्यासारखा आहे. मुलांना संवेदनशील मदतीची गरज आहे. दोन र्वष घरात बसून आपलं मूल पार बदललं (खरं तर आपल्याला बिघडलं असं वाटत असतं) अशी हतबलता आपल्या मनात येत असते. करोनामुळे त्यांच्यात झालेले बदल, त्यांच्या अभ्यासात झालेले बदल हे परिस्थितीचे परिणाम आहेत हे एकदा स्वीकारलं की समस्या परिस्थितीमध्ये आहे, मुलांमध्ये नाही हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे मुलं ही समस्या नाहीत तर ते त्या परिस्थितीचे बळी (व्हिक्टिम) आहेत हा दृष्टिकोन ठेवून मुलांना केलेली मदत जास्त सकारात्मक असते हे पालकांनी लक्षात घ्यावे.

अशा युक्त्या वाचून तुम्हाला स्वत:लाही काही युक्त्या नक्की सुचतील. कदाचित कितीतरी पालक अशा युक्त्या वापरून टाळेबंदी आणि नंतरही मुलांना अभ्यास करण्याची गोडी पुन्हा लागावी यासाठी प्रयत्न करत असतील. तुमचे हे प्रयत्न, त्याचा झालेला परिणाम, ते इतर पालकांबरोबर नक्की ‘शेअर’ करा. आपल्या मुलांनी चांगलं शिकावं अशी आपली इच्छा असेल, तर त्यासाठी एकमेकांच्या अनुभवांतून आपल्यालाही शिकावं लागेल.
पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांमध्ये शाळेची आणि नियमित अभ्यासाची गोडी लावण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले असतील वा काही युक्त्या वापरल्या असतील तर आम्हालाही जरूर लिहा..
trupti.kulshreshtha@gmail.com