scorecardresearch

पालकत्वाचे धडे

‘आपण मुलांचे आई-बाबा झालो म्हणजे ‘पालक’ झालो असं नाही,’ असं म्हणतात. मूल जसजसं मोठं होत जातं आणि त्यांच्या लहानपणी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींच्या सल्ल्यानं सुटणाऱ्या समस्या प्रसंगी सुटेनाशा होतात, तेव्हा याची प्रकर्षांनं जाणीव होते.

तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

‘आपण मुलांचे आई-बाबा झालो म्हणजे ‘पालक’ झालो असं नाही,’ असं म्हणतात. मूल जसजसं मोठं होत जातं आणि त्यांच्या लहानपणी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींच्या सल्ल्यानं सुटणाऱ्या समस्या प्रसंगी सुटेनाशा होतात, तेव्हा याची प्रकर्षांनं जाणीव होते. अशा वेळी वाटतं, पालकत्व शिकता येतं का? तर हो, पालकत्व हे थोडं जाणीवपूर्वक घेतलेलं प्रशिक्षण, योग्य व्यक्तींचा सल्ला, स्वत:चा पूर्वानुभव, खूप सारं प्रेम आणि संयम यांच्या सहाय्यानं शिकता येतं. ते शिकायलाच हवं, कसं ते सांगणारा हा लेख १ जूनच्या ‘वैश्विक  पालकत्व दिना’च्या निमित्तानं..

किशोरवयीन कस्तुरी आरशात बघून एकटीच हसायची. आताशा आईशी ती फार गप्पाही मारत नसे. अभ्यासही करताना दिसत नव्हती. ती आणि तिचा मोबाइल यातच गुंग असायची. हे सगळं रोज बघताना आई वरवर शांत असल्याचं दाखवत असली, तरी आतून ती खूप अस्वस्थ होती. हे वय, वयासह येणारं विरुद्धिलगी व्यक्तीचं आकर्षण, हे सारं तिलाही समजत होतं. पण आजूबाजूची प्रलोभनं, सोशल मीडियामुळे निर्माण झालेले धोके, यांना तोंड देण्यासाठी तिला तिची कस्तुरी लहानच वाटत होती. पण तिच्याशी काय आणि कसं बोलावं हे मात्र तिच्यातल्या आईला कळत नव्हतं..

 टाळेबंदी लागल्यापासून धवल सुट्टी लागल्यासारखाच वागत होता. पहिल्या वर्षी परीक्षा न घेताच पास केल्यानं चालून गेलं. पुढे शाळा सुरू झाली, तरी अभ्यासातला रस गेला तो गेलाच. धवलच्या आईनं स्वत:च्या आईला काय करावं असं विचारलं, तर ती म्हणाली, ‘‘तुझ्या वेळी ही टाळेबंदीही नव्हती आणि असा अभ्यासही नव्हता. प्रश्न आहे खरा.’’ म्हणजे प्रश्न शेवटी अनुत्तरितच..

या दोन्ही उदाहरणांत कस्तुरी आणि धवलच्या आईंना अपराधी वाटायला लागलं. ‘अशी कशी आई आहे मी? आपल्याच मुलांना नीट सांभाळू शकत नाही.’ परिस्थिती हाताबाहेर जात असतानाही आपण काहीच करू शकत नाही, ही हतबलता दाटून येत होती. खरं तर या परिस्थितीमधून आपल्यापैकी बहुतांश पालक जातात आणि मग मनात विचार येतो, की कोणी शिकवलं का या आई-बाबांना आपल्या मुलांना कसं सांभाळायचं ते? मुळात पालकत्व हे शिकवून येईल का? आणि शिकवणारा आपल्याबद्दल काय विचार करेल? ‘पाण्यात पडलं की पोहता येतं’ अशी एक म्हण आहे. पण तसं ते खरंच येतं का? तसं असतं तर मग लोक बुडाले का असते? संसारात पडलं की संसार येतो, असं म्हणतात. मग अनेकांचा संसार हा विस्कटलेला का असतो? तसंच, मूल जन्माला आलं की पालकत्व आपोआप येतं का? अंधारात चाचपडत, चुका करत, अनुभव घेत आपण पालक म्हणून मोठे होत राहतो. पण विचार करा, की असं करण्यापेक्षा कोणीतरी अंधारात बॅटरीनं प्रकाश दाखवला, पुढे येणारे खाचखळगे आधीच सांगितले, तर हा प्रवास सोपा तर होईलच, शिवाय त्यात ऊर्जा, वेळ वाया जाणार नाही. आता प्रश्न असा आहे, की ही बॅटरी धरणार कोण? पालकत्व शिकवणार कोण? याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. माझी आजी मला सांगायची, की ‘‘आग्रह करकरून मुलांना पोट गच्च भरेपर्यंत खाऊ घालू नये. त्यानं तशीच सवय लागते. त्यातून आहार वाढत जातो. मोठं झाल्यावर त्याचे तोटे समोर येतात.’’ याउलट माझ्या एका मैत्रिणीची सासू मुलांना भरपूर खाऊ घालण्यातच धन्यता मानायची. तिनं माझ्या मैत्रिणीलाही तसंच करायला शिकवलं. आता प्रश्न हा पडतो, की कोण बरोबर? पण आसपास पाहिलं, तर सारखी खा-खा करणारी अनेक मुलं मोठी झाल्यावर स्थूलत्वाकडे वळतात आणि त्यातून आरोग्याचे नवे प्रश्न तयार होताना  दिसतात.  म्हणजेच ‘पोटभर खाऊ घालावं, पण पोट गच्च भरेपर्यंत खाऊ घालू नये’ हाच विचार बरोबर होता हे लक्षात येतं. तिथे अनुभवच उपयोगी पडतो.

  आपण कोणत्या वातावरणात आणि कोणत्या आर्थिक परिस्थितीत वाढलो, आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवांचे अर्थ काय लावले, यावरच आपले समज आणि धारणा तयार होतात. त्या धारणा सापेक्ष असू शकतात. त्या पूर्णपणे चुकीच्या किंवा बरोबर असू शकत नाहीत. त्यामुळेच अनुभवावर आधारित पालकत्वाचे सल्ले घेताना या सापेक्षतेचा विचारही करणं आवश्यक ठरतं. खरं तर रूढ आणि पारंपरिक पद्धत ही असा वडिलधाऱ्यांचा, आसपासच्या वयानं मोठय़ा मंडळींचा सल्ला घेणं हीच आहे. ती सहजपणे उपलब्ध होते. अडचण आली की पटकन उपलब्ध होते. पण नाण्याची दुसरी बाजू अशी, की वर सांगितलेल्या गोष्टीमध्ये म्हटलंय तसं, धवलच्या आजीसाठी नवीन पिढीचा प्रश्नच निराळा होता. तिच्या अनुभवाच्या पोतडीत हा प्रश्न आणि त्याचं उत्तर, दोन्ही नव्हतं. नवीन पिढीनुसार नवे प्रश्न तयार होतात. अशा वेळी आधीची पिढी मार्गदर्शनला पुरी पडेलच असं नाही. आभाला बॅडिमटनसाठी संध्याकाळी ७ ते ८.३० ही बॅच मिळाली. संध्याकाळी ६ वाजता शाळेतून आल्यावर तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असल्यामुळे ती सोयीचीही होती. आई आणि आजी दोघींना एकच काळजी होती, ती म्हणजे रात्री ८.३० वाजता ती एकटी सुरक्षितपणे परत यावी. त्यातून आजीनं मार्ग काढला, की नकोच तो बॅडिमटनचा क्लास! पण आईला आभाची आवड, खेळातून अंगी येणारे गुण आणि त्यातून होणारा व्यायाम, या सगळय़ाचं महत्त्व समजत होतं. त्यामुळे आभानं क्लासला जाणं तिच्या आईसाठी महत्त्वाचं होतं. म्हणजेच मागच्या पिढीचा सल्ला दर वेळी उपयोगाचा असतोच असं नव्हे.     

अर्जुन अभ्यासात विशेषत: गणितात हुशार होता. तो गणिताच्या विविध स्पर्धा परीक्षा देत राहायचा. मानवच्या आईला हे बघून वाटायला लागलं, की आपण तर मानवला या परीक्षांना बसवतच नाही. पण मुळात गणितात फारशी गती नसलेल्या मानवला या स्पर्धामध्ये यश मिळालं नाहीच, शिवाय परीक्षांचा ताण येऊन त्याच्या आत्मविश्वासावर मात्र परिणाम झाला. हीच बाब थोडय़ा फार फरकानं विविध कला, उन्हाळी शिबिरं, खेळ, सगळीकडे लागू होते. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं. मुलांच्या आवडीनिवडी, क्षमता यानुसार त्यांना वाव द्यावा लागतो. पण त्याऐवजी पालक आजबाजूच्या वातावरणाला, इतर पालकांच्या दबावाला बळी पडतात. त्यात कुचंबणा मुलांची होते.

 अवनीचे दोन्ही पालक नोकरी करणारे होते आणि घरात भरपूर पैसा होता. अवनीला गाण्याचा महागडा क्लास लावला होता, जाण्यायेण्याला वेगळी रिक्षा लावली होती. तरीही अवनी तिच्या बाजूनं फारसे कष्ट घेत नव्हती. मानवच्या आईला आणि अवनीच्या पालकांना आपण कुठे कमी पडलो, हा प्रश्न पडतो. पण ते प्रयत्न किंवा खर्च यात कुठे कमी पडले नव्हते, तर दोन्ही गोष्टी चुकीच्या ठिकाणी खर्ची पडल्या होत्या. अवनीला तिच्या पालकांनी उत्तम गायकांचे कार्यक्रम दाखवले असते, त्यासाठी वेळ दिला असता, तर तिला उत्तम गाणं आणि त्यामागचे कष्ट काय असू शकतात याची जाणीव होण्यास मदत झाली असती.

 ‘स्क्रीन अ‍ॅडिक्शन’ हा सर्व वयांत पुरून उरणारा विषय झाला आहे. टाळेबंदी, ऑनलाइन शिक्षण आणि कार्यालयीन काम यामुळे त्याला हातभार लागला. पालकांना डोळय़ांसमोर धोके दिसत असतात, पण पर्याय सापडत नाहीत. ‘स्क्रीनवर जास्त वेळ घालवू नकोस,’ असं आपल्या मुलांना सांगितलं जातं. पण मग त्यांनी काय करावं, हा पर्याय योग्य वेळी त्यांना दिला जात नाही. नंतर उशीर झालेला असतो. आसपासच्या घरात छोटी मुलं मोबाईलवर खेळत असताना किंवा सतत मुलांसाठीच्या खास  वाहिन्या बघत असताना तन्वीची आजी तिला रोज न कंटाळता चिंटूचं पुस्तक वाचून दाखवायची, त्यातली चित्रं दाखवायची. त्यातून पुस्तक ही एक चांगली सोबत आहे, त्यात मोठी गंमत आहे, याची जाणीव नकळत तन्वीमध्ये रुजली आणि स्क्रीन अ‍ॅडिक्शनचा धोका आपोआप टळला. समस्येची नुसतीच चर्चा करण्यापेक्षा त्यावर आपल्या पातळीवर उत्तर शोधणं महत्त्वाचं असतं. ते उत्तर दरवेळी आपलं आपल्याला सापडेल असं नाही. आपल्या आजूबाजूला डोळसपणे बघूनही आपण एकलव्यासारखे काही शिकू शकतो.

 पालकत्व म्हणजे केवळ ‘हे कर’, ‘ते करू नको’ असं सांगणं किंवा मुलांना शिस्त लावणं, वेगवेगळे क्लास लावणं एवढंच नव्हे. तर मुलांमध्ये काही मूल्यं रूजवणं, त्यांच्यामध्ये एक सामाजिक भान तयार करणं, हाही पालकत्वाचा मोठा भाग आहे. ‘युअर चाईल्ड विल नॉट फॉलो युअर इन्स्ट्रक्शन्स, युअर चाइल्ड विल फॉलो यू’ असं एक सुंदर वचन आहे. गरिमा ही एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी. राजस्थानमध्ये मोठय़ा झालेल्या गरिमाला मुलींच्या शिक्षणाविषयी तळमळ असल्यामुळे तिनं आपल्या घरी घरकाम करणाऱ्या स्त्रीच्या मुलीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला. गेली पाच वर्ष ती हे सातत्यानं करत आहे. अशी ही गरिमा एका समुपदेशकाकडे ‘माझा मुलगा संवेदनशील नाही’ ही समस्या घेऊन आली होती. खरं तर ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ असाच हा प्रकार. संवेदनशीलता आणि सामाजिक भान कसं बाळगावं याचं ती स्वत: एक चांगलं उदाहरण होती. आपल्याकडच्या पैशांचा सदुपयोग करण्याची मानसिकताही तिच्यात होती. पण आपल्या वागण्या-बोलण्यातून कशा रीतीनं मुलांमध्ये त्याची जाणीव निर्माण करता येते, हे तिला ठाऊक नव्हतं. ‘तू इतकं चांगलं काम करतेस. त्याविषयी कधी मुलाशी बोललीस का?’ असं विचारल्यावर ‘त्याला काय सांगायचं?’ असा तिचा प्रश्न होता. अनेकांना समानुभूती (एम्पथी) या मूल्याचं आणि ते आपल्या मुलांमध्ये रुजवण्याचे महत्त्वच समजत नाही. ‘तू त्या मुलीच्या शिक्षणासाठी किती खर्च करतेस, त्यामागची भावना-विचार काय, याबद्दल सहजपणे मुलाशी बोललं पाहिजे. त्यातून अप्रत्यक्षपणे इतरांबद्दल संवेदनशीलता, सामाजिक भान या गोष्टींचं महत्त्व तुझ्या मुलाला समजू लागेल. त्यातूनच त्याचं व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होईल,’ असं समुपदेशकानं सांगितल्यावर गरिमाला सहजसंवादाचं आणि त्यातून होणाऱ्या संस्कारांचं महत्त्व लक्षात आलं.

पूर्वी पालकत्वाचे धडे हे घरातल्या किंवा आसपासच्या आधीच्या पिढीकडूनच मिळायचे. त्यात त्यांच्या अनुभवाची श्रीमंतीही असायची आणि मर्यादाही. सुदैवानं आताच्या काळात पालक प्रशिक्षण कार्यशाळा, समुपदेशन असे इतर विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. या आधुनिक पर्यायांमध्ये केवळ अनुभवाचे बोल नसतात, तर शास्त्रीय पातळीवर मनोविज्ञानाचा अभ्यास, संशोधन यातून कसोटीवर उतरलेले उपाय असतात. त्यामुळेच आजकाल मोठय़ा प्रमाणात पालकांसाठी त्रासदायक असलेल्या मुलांच्या वर्तनविषयक समस्यांमध्ये (बीहेवियरल प्रॉब्लेम्स) मनोविकारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांचं मार्गदर्शन उपयोगाचं ठरतं. काही वेळा आपल्याला माहिती असलेल्या युक्ती असतात, पण त्या कोणी तज्ज्ञानं नेमकेपणानं कशा वापरायच्या याचं मार्गदर्शन केल्यानंतर त्या चांगल्या उपयोगी पडतात. माझ्या मुलीच्या शाळेनं ज्युनियर केजीच्या पालकांसाठी एक कार्यशाळा घेतली. त्यात ‘यापुढे तुमची मुलं ही आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आमचे विद्यार्थी सुरक्षित राहिले पाहिजेत. यासाठी रस्त्यावरून चालताना मुलांना वाहनांच्या बाजूला बाहेर ठेवू नका. त्यांना आतल्या बाजूला चालायला लावून तुम्ही बाहेरच्या बाजूनं चाला,’ असा एक वरकरणी प्राथमिक सल्ला दिला गेला. पण तो खूप मूलभूत होता. आपल्याला एरवी ते कळत असलं तरी वळतंच असं नाही. पण या कार्यशाळेनंतर मी जाणीवपूर्वक कायम मुलीला रस्त्याच्या आतल्या बाजूला ठेवते.

उत्तम पालक म्हणजे रोजच्या जगण्यात उपयोगी पडतील अशी जीवनकौशल्यं त्या-त्या वयात त्याला सहजपणे शिकवणं हेही पालकांचं काम आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला-मुलीला साधा चहाही करता येत नाही किंवा वरण-भाताचा कुकरदेखील लावता येत नाही हे काही चांगलं लक्षण नाही. ‘आम्ही आमच्या मुलाची खूप काळजी घेतो. त्याला एकटय़ानं कुठेच पाठवत नाही,’ असं सांगणाऱ्या पालकांना आपल्या १३-१४ वर्षांच्या मुलाला रस्ता ओलांडून ५-१० मिनिटांवर असलेल्या भाजी बाजारातून साधी भाजी आणता येत नाही, हा त्या मुलाचा दोष नसून पालक म्हणून तुमचा दोष आहे हे सांगावं लागतं. लहानपणापासूनच तुम्ही मुलांना तुमच्याबरोबर बाजारात घेऊन गेलात तर ताजी भाजी कशी निवडावी इथपासून हिशेब कसा करावा याचं ज्ञान त्यांना आपसूक मिळतंच. याशिवाय ओळखीची माणसं भेटणं, त्यांच्याशी दोन मिनिटं बोलणं यातूनही खूप गोष्टी मुलांना नकळतपणे शिकता येतात.

 प्रत्येक जोडप्याला आयुष्यभर पालकत्व हे वेगवेगळय़ा टप्प्यांवर भेटत राहतं. हा एक असा ‘पूर्णवेळ जॉब’ असतो जिथे आपण प्रत्येक वेळेस अननुभवी राहतो. पूर्वीपेक्षा आई-बाबा होण्याचं वय आता पुढे गेलं आहे आणि पर्यायानं तो निर्णय आता अधिक विचारपूर्वक घेतला जातो. आपल्या स्वत:व्यतिरिक्त जोडीदाराबरोबर आणखी एका जीवाची पूर्ण जबाबदारी घ्यायची म्हटल्यावर थोडासा ताण हा येणारच. या ताणाला बाजूला सारून आपण तयारीला लागतो. गर्भवती राहिल्यावर घरातल्या वयस्क बायका तिला ‘आनंदी राहात जा, आवडीचं खा, चांगलं वाच’ हे पूर्वीपासून सांगत आल्याच. पण त्यात आता अनेक शिबिरं किंवा त्या विषयावरच्या पुस्तकांची भर पडली. आपलं मूल सर्वार्थानं चांगलं असावं यासाठी पालक वाट्टेल ते करायला तयार असतात. पण म्हणजे काय करावं, हे बऱ्याचदा कळत नाही. बाळ झालं की फक्त एक टप्पा पार पडतो. मग त्याच्या विकासाचे टप्पे नीट पार पडत आहेत का, लसीकरण वेळेवर होत आहे का, चांगली शाळा मिळेल का, त्यानंतर अभ्यास, नीट खाणं, एक ना दोन असंख्य गोष्टी.. मग मूल किशोरवयीन झालं की त्याचं अवलंबून राहणं कमी होतं आणि आपल्याला वाटतं की आपण मोकळे झालो.

  चूक! साफ चूक. इथे त्यांच्या वयाचा वादळी कालखंड सुरू होतो आणि ते वादळ घरात घोंघावायला सुरू होतं. आणि आपल्या लक्षात येतं, की आपल्याला नव्यानं मार्गदर्शनाची गरज आहे. मुलांचं वयात येणं, त्यांचे मूड, स्वत:ला आजमावणं, बाहेरच्या जगातली प्रलोभनं, यात पालकांना आपली भूमिका निश्चित करता येत नाही, पण ‘टीन एज’ आणि त्यांचे प्रश्न जरा समजावून घेतले, तर मित्र बनून आरामात जमू शकतं या वयाचं पालकत्व निभावणं. या काळात मुलांचं ऐकून घेणं आणि फक्त गरज असेल तिथेच सुधारणा सांगणं आवश्यक असतं. एका लांब केसांच्या मुलीची आई एकदा ‘सेशन’मध्ये ‘मुलगी माझ्याशी बोलतच नाही, सारखी मोबाइलमध्ये असते,’ अशी तक्रार करत होती. अकबर-बिरबलाच्या गोष्टींमधला न्हावी आठवतो का? तो राजाला तेलाची मालिश करता करता त्याचे कान भरायचा. त्यातून मी घेतलेला बोध एवढाच होता, की डोक्याला मालिश करताना जास्त छान संवाद होऊ शकतो! तीच युक्ती मी त्या मुलीच्या आईला सांगितली.

श्वास घेणं ही जशी आपोआप येणारी गोष्ट आहे, तसं पालकत्वाचं नाही. काही गोष्टी आपोआप येतीलही, पण अनेक गोष्टी कोणाकडून तरी शिकाव्या लागतीलच. त्यात कसलाही कमीपणा वाटू देता कामा नये. शेवटी पालक म्हणून आपल्याला आपलं मूल कायम समाधानी, आनंदी राहावं, असं वाटत असेल तर काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतीलच ना, त्यानं तुमचंही उत्तर आयुष्य आनंदी आणि समाधानी होईल यात शंका नाही..

trupti.kulshreshtha@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parenting lessons parents children case problem awareness conscious training advice right people ysh

ताज्या बातम्या