scorecardresearch

पालकत्व आधुनिक विश्वातलं!

काळ बदलला तसं इतर गोष्टींप्रमाणे पालकत्वही बदललं, अधिक अवघड झालं. ‘एकत्र कुटुंबातल्या इतर मुलांमध्ये आपलंही मूल आपोआप वाढेल,’ असं म्हणण्याची सोय राहिली नाही.

उमा बापट

काळ बदलला तसं इतर गोष्टींप्रमाणे पालकत्वही बदललं, अधिक अवघड झालं. ‘एकत्र कुटुंबातल्या इतर मुलांमध्ये आपलंही मूल आपोआप वाढेल,’ असं म्हणण्याची सोय राहिली नाही. कुटुंबं लहान झाली, सामाजिक, आर्थिक स्तरात फरक पडला आणि त्याबरोबर अनेक प्राधान्यक्रम बदलले. पण आजच्या पालकत्वाच्या बदललेल्या रूपाचा बाऊ न करता नवीन मार्ग शोधून ते निभावणारे सजग पालकही आजूबाजूला दिसताहेत. १ जूनला ‘वैश्विक पालक दिन’ साजरा केला जातो. त्या निमित्तानं नव्या जगातल्या पालकत्वाचे विविध पैलू..

‘पालकत्व’ म्हटलं की काय आठवतं? असं कार्यशाळा घेत असताना पालकांना विचारलं, की साधारणपणे सांभाळ, संगोपन, प्रेम, जबाबदारी, काळजी आणि याला जोडून बरंच काही, अशी शब्दसाखळी तयार होते. जन्मणं, वाढणं, स्वत: बाळाला जन्म देणं, हा नैसर्गिक क्रम आहे. जैविक बाजूंबरोबर भावनिक, सामाजिक, वैचारिक जोड हे मनुष्याचं वेगळेपण पालकत्वातही वर्षांनुवर्ष सामावलेलं दिसतं.

 आज माणूस आधुनिक प्रगतीच्या टप्प्यावर पोहोचल्यावर पालकत्वाला अनेक कंगोरे आहेत. दिवसेंदिवस बदलत्या वातावरणामुळे पालकत्वाचे गुंतागुंतीचे, कधी जुन्या धारणांना छेद देऊ पाहणारे असे काही नवे पैलूही जाणवत आहेत. त्याचबरोबर जीवन-गुणवत्तेला प्रोत्साहन देणारं, काळाच्या गतीबरोबर मोकळय़ा नात्यांची गुंफण आनंदानं जगणारं, विविधरंगी पालकत्वाचं रूप आज साकारत आहे.  

गरोदरपण, बाळंतपणापासून सुरू होणाऱ्या नव्या भूमिकेची ओळख पूर्वी घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या प्राधान्यानं, अनुभवी स्त्रियांच्या सूचनांप्रमाणे वागत जाण्यानं व्हायची. मोठय़ा, एकत्र कुटुंबात नव्यानं झालेल्या आई-बाबांच्या अंगावर पालकपणाची जबाबदारी थेट येत नव्हती. याउलट परदेशात आजची भारतीय पिढी समवयस्क मित्रमंडळींच्या सोबतीनं आणि बाबा मंडळींच्या सक्रिय सहभागानं करत असलेलं बालसंगोपन, असा वैविध्यपूर्ण वाटचालीचा पट डोळय़ासमोर येतो.

 आपल्याला मूल व्हावं का? कधी व्हावं? हा पर्याय असू शकतो, याचं भानही नसलेलं पालकत्व जुन्या पिढय़ांनी अनुभवलं. ‘मूल होण्याबाबतचा जाणीवपूर्वक विचार करायची पद्धत नव्हती आमच्या वेळी’ असं आता मोकळेपणानं बोलणारे ज्येष्ठ नागरिक भेटतात. तर आर्थिक स्थिरता, शारीरिक सज्जता, व्यवसाय-नोकरीत करावी लागणारी तडजोड, याला प्राधान्य देत सध्याचे भावी पालक वेळ घेऊन निर्णय घेतात. तीन-चार मुलांवरून दोन मुलं असा प्रवाह बराच काळ साधारण मध्यमवर्गीय पालकांमध्ये रूढ होता. अजूनही काही प्रमाणात तो टिकून आहे.

मी गेली वीस वर्ष मानसतज्ज्ञ, समुपदेशक, प्रशिक्षक, मानसशास्त्रावर आधारित लेखक, या भूमिकांतून विविध वयोगटांतल्या पालकांशी सातत्यानं संवाद साधत आले. अमेरिकेतल्या वास्तव्यात पालक-शिक्षक म्हणून कामाची संधीही मिळाली. यावेळी मिळालेल्या अनुभवांतून काही गोष्टी लक्षात आल्या. गेल्या दहा वर्षांत जाणवलेली बाब म्हणजे काहींची गोंधळलेली अवस्था. नवरा-बायकोंपैकी एकाला एक मूल, तर दुसऱ्याला दोन मुलं हवी असं वाटणं. हा पेच सोडवताना ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’प्रमाणे तो सोडवला जातो. पूर्वी ज्या गोष्टी केवळ कुटुंबात कदाचित बोलल्या जायच्या, असे खासगी निर्णय घेताना विशेषत: स्त्रियांना जाणकारांची मदत घ्यावीशी वाटते आहे, हे अनुभवास येतं आहे. हा महत्त्वाचा आणि जागरूक बदल वाटतो. ‘मुलात मूल वाढतं, एकाला दुसरं असलं की भावंडं मोठी होऊन जातात’ या सामान्य समजुतीहून वेगळय़ा शंका घेऊनही पालक येतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दोन मुलांचं पालकत्व निभावण्यासाठी जे पालक सजगतेनं पूर्वतयारी करतात, त्यांच्या मानसिकतेचं स्वागत करायला हवं. विचारपूर्वक, स्वेच्छेनं मूल दत्तक घेतलेले काही जण, मुलं आणि पालकांनी एकत्र खेळायच्या आमच्या शिबिरांना आवर्जून आलेले आहेत. दत्तक मुलाशी नातं जोडायचा प्रयत्न ते तळमळीनं करत असतात. त्याच जोडीला मुलाच्या वाढीबाबत जाणून घेण्यास अभ्यासपूर्वक उत्सुक असतात. स्वत: जन्माला घातलेलं मूल आणि एक मूल दत्तक घेणारेही पालक आहेत. समत्वानं अशा दोन मुलांचं पालकत्व ते सहजभावानं अंगीकारतात. वैवाहिक नात्याशी जोडलेलं पालकत्व ते अविवाहित असताना काही मित्रांनी मिळून निराधार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलणं, असं सामाजिक जाणीव व्यक्त करणारं पालकत्वही आज बघायला मिळतं.

मुलांच्या पालनपोषणासाठी लागणारी भौतिक साधनं, सोबतीला असलेली कुटुंब रचना आणि समाजमान्य चालीरीती या सगळय़ात होत जाणाऱ्या बदलांचा परिणाम पालकांच्या मानसिकतेवर ओघानं होत राहतो. भौतिक साधनांकडे साधन म्हणून न पाहता साधनंच साध्य वाटायला लागली आहेत की काय? शिशु वयातल्या मुलांचे चप्पल-बूट कसले आहेत, यापासून तरुण मुलाला पहिली गाडी कोणती घेऊन दिली, इथपर्यंत रोजच्या वापरायच्या साधनांकडे सामाजिक स्तरातली अव्यक्त, पण सर्वमान्य चढाओढ म्हणून बघितलं जातं. ‘आजकाल स्पर्धा किती वाढली आहे. आपलं मूल मागे पडायला नको’ हे पालुपद असतं! या सगळय़ातून जीवनमान उंचावायचं दडपण न आलं तर नवल. ही आर्थिक गणितं जुळवताना पालक म्हणून दिला जाणारा नेमका, गुणवत्तापूर्ण वेळ, कुटुंबाबरोबर आनंदाचे क्षण टिपणं, हे निसरडं होणं स्वाभाविक नाही का? बालवयात दर वेळी आकर्षक खेळणीच हवी असतात असं नाही, पण हक्काचे खेळगडी मात्र हवे ही भावनिक गरज असते. तसंच कुमार वयातही मुलांना नि:शंकपणे ऐकणारा कान घरात हवा असतो.

 काळाबरोबर जीवनपद्धती, समाजातल्या चालीरीती बदलत गेल्या. व्यक्तिकेंद्री जीवनशैली समाजमान्य होऊ लागली, की एकमेकांना सामावून घेण्याचे संस्कार बदलणं स्वाभाविक आहे. आधी एक व्यक्ती ते पालक असा प्रत्येकाचा भावनिक प्रवास व्हावा लागतो. स्त्रीची आई आणि पुरुषाचा बाबा होत असला, तरी त्या दोघांना मिळून ‘पालक’ ही एकच उपाधी आणि सामायिक जबाबदारी समंजसपणे, एकमेकाला पूरक राहून बदलत्या अवस्थांसाठी पेलायची असते. ‘मी का दरवेळी रजा घ्यायची?’, ‘आज तू का नाही आंघोळ घालणार त्याला?’ या असमंजस वाटणाऱ्या वादविवादांची पाळंमुळं पालकांच्या स्वत:च्या घडणीतही दडलेली असण्याची शक्यता असते. लहान असताना एकत्र कुटुंबात वाढलेली पिढी स्वत:ची कुटुंबं घडवताना वेगवेगळय़ा कारणांमुळे विभक्त राहिली. लहान गावांतून शहरात येण्याचं प्रमाण वाढलं. त्याच गावात आधुनिक सोयी असलेल्या भागात स्थलांतरित होण्याकडे कल वाढला. आपल्यावर झालेले संस्कार पुढे देताना प्राधान्यक्रम बदलले आणि काय निसटतं आहे याचं भान अनावधानानं सुटत गेलं. मुलांच्या व्यावसायिक शिक्षणाची पूर्वतयारी माध्यमिक शाळेपासूनच जागरूकतेनं केली जाऊ लागली, पण माणूस म्हणून घडण्याची सामाजिक प्रक्रिया, भावनिक कौशल्य घडवणारे साधे-साधे प्रसंग अनुभवायचे राहून जाऊ लागले. सहलींसाठी पर्यटनस्थळांना जाणं वाढलं, पण नातेवाईकांच्या घरी राहणं कमी झालं. लहानपणी नातेवाईकांबरोबर काही काळापुरतंही स्वत:च्या खोलीत जुळवून घेण्याची वेळ न आलेल्या मुलांना, ती प्रौढ झाल्यावर ‘स्व’च्या पलीकडे पाहून संसारात जुळवून घेत भावी पिढीला सहकार्य शिकवत वाढवणं ओघानं अवघड झालं आहे. त्यांची जीवनशैली व्यक्तिवादाभोवती फिरू लागली आहे. त्याचबरोबर लहानपणी कडक शिस्तीत वाढलेल्या मुलांना पालक म्हणून आपल्या मुलांना धाकात ठेवायचं नाही असं वाटतं. अति जरब आणि जीवनावश्यक शिस्त यातला तोल साधता न आल्यामुळे यात मनमानीकडे झुकतं माप होण्याची शक्यता जास्त झाली आहे.       

‘कुटुंबातल्या देवाणघेवाणीतून सगळय़ांची वाढ’ याची ताकद जाणून या मूल्यांची समाज म्हणून आपण कास सोडून चालणार नाही. आजच्या काळात या मूल्यांचं स्वीकारशील नवं रूपही आकारत आहे. नव्या पिढीवर विश्वास ठेवत सकारात्मक वाटचाल करणाऱ्या समाजातल्या आशादायी वृत्तीचीही आपण दखल घ्यायला हवी. अजून तरी एकदा पालक झालेला भारतीय पालक हा बहुतेक वेळा ‘पालक’ म्हणूनच जगतो. जावई, सुनांचं पालकत्वही तो नकळत घेतो. नातवंडं झाली तरी पालक झालेल्या आपल्या मुलांची काळजी करत राहतो. वाढलेल्या आयुर्मानामुळे आपल्या आई-वडिलांचं पालकत्वही घेतो. असा पालकपणाचा विस्तीर्ण आवाका होऊन जातो. पूर्वीच्या तुलनेत ही नाती अधिक खुली झाली आहेत. दीर्घकालीन आजारपण, वृद्ध माता-पित्यांपैकी एकाचा मृत्यू, या टप्प्याटप्प्यानं येणाऱ्या अवस्थांना सामोरं जाणं चुकत नाही. अशा वेळी संपूर्ण कुटुंबाचं मन:स्वास्थ्य टिकवत मुलांचा सकस विकास हा मेळ साधताना आजच्या पिढीला विविध प्रकारे मदतीची आवश्यकता भासते आहे. पूर्वी कुटुंबातून मिळणाऱ्या मनुष्यबळाची जागा व्यावसायिक सेवा, स्वमदत गट, मित्रपरिवार घेत आहे. सामाजिक जाणिवेनं आपल्या आई-वडिलांपलीकडे वृद्ध लोकांना मदत करणारे अनेक जण करोनाकाळातही आपण आजूबाजूला पाहिले. 

 पूर्वीही एकेरी पालकत्व निभावलेली कुटुंबं होती, आजही आहेत. हे शब्दप्रयोग कदाचित रूढ नव्हते आणि त्यामागची कारणं वेगवेगळी होती. कुटुंबांची आर्थिक जबाबदारी पेलायला पूर्वीही पुरुष वर्गाला घरापासून दूर अंतरावर राहावं लागलेलं आहे. सैन्यदलासारख्या काही कामांच्या आवश्यकतांमुळे एकापेक्षा जास्त ठिकाणी पसरलेले सदस्य अशीच काही घरांची रचना असणं अपरिहार्य आहे. समाजासाठी, देशासाठी आपली कुटुंबं मागे ठेवणाऱ्या अनेकांच्या पालकत्वात मदत करणं, वेगवेगळय़ा परिस्थितींमुळे नाइलाजानं दुभंगलेल्या कुटुंबांना आपलंसं करणं, हे सधन, सजग कुटुंबांच्या पालकपणातलं एक अविभाज्य अंग बनणं ही भारतीय संस्कृती आहे. त्याचं कालसुसंगत प्रकटीकरण आजचे पालक विविध प्रकारे करताना दिसतात. आदिवासी मुलांसाठी निधी संकलन करतात. घरकामाला मदतीला येणाऱ्या मावशींचा पालकपणातला भार हलका करायला हातभार लावतात. निमशहरी, ग्रामीण भागातही पूर्वीच्या तुलनेत बालशिक्षण, मातांचं आरोग्य, याविषयी जाणीव तयार करणं आणि सोयीसुविधा उपलब्ध होतील यासाठी संस्थांनी एखाद्या गावाचं पालकत्व घेणं, असे सामाजिक उपक्रम सुरू आहेत. त्यात शहरी पालक जोडले जात आहेत. गावांना दत्तक घेण्यात विदेशातले भारतीय भरीव वाटा उचलत आहेत. ‘वैश्विक पालक दिन’ साजरा करताना असे पालक-सेतू हे उद्याच्या सामाजिक पालकपणाची नांदी ठरतील.        

‘म्हातारपणाची काठी’, ‘आम्ही तुमच्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या..’ या धारणांतून अलिप्त होण्याची सुरूवात आजच्या पालकांनी केलेली आहे. परस्पर अपेक्षांच्या ओझ्यातून मोकळं होणं सगळय़ांना सर्वार्थानं संपन्न करू शकतं, याचा अनुभव घेण्याच्या प्रयत्नात आजचे पालक आहेत. मुलांच्या वाढीत पालकांच्या डोळस प्रयत्नांचा वाटा लक्षात घेऊन पालक विवेकनिष्ठ होताना दिसत आहेत. त्यासाठी उपलब्ध वाचनसाहित्य, संस्थात्मक उपक्रम, या सगळय़ाची पूरक जोड देत आहेत. अंध प्रेमाच्या मर्यादा जाणवून वस्तूंच्या पलीकडलं निस्सीम प्रेम प्रत्यक्षात व्यक्त करताना कधी धडपडतही आहेत. कुटुंब-संस्कृतीतून मिळालेली आणि स्वत:ही जपलेली काही शाश्वत मूल्यं मुलांपर्यंत कशी रुजतील याचा गांभीर्यानं विचार करत आहेत. त्यात काहीसा संघर्ष अटळ आहे. ‘नव्या पिढीला शिकवण्यासारखं काही उरलं नाही. कुणी ऐकून घेत नाही’ असं म्हणत केव्हातरी हताशही होत आहेत. वरवर तत्काल, दृश्य स्वरूपात मुलांच्या वागण्यात बदल दिसला नाही, तरी ‘पालकपण म्हणजे निस्पृह देणं आहे’ याची आठवण पालक मंडळी परत परत करून घेत आहेत. स्वत: आई झाल्याशिवाय आईची ओरडण्यामागची तळमळ जाणवत नाही. आपली मुलं तरुण झाल्यावर आपलंही त्या वयातलं बिनधास्त वागणं आठवल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोजच्या दिनक्रमातलं सातत्य, तडजोड करावी लागली तरी नाती जपणं, क्षणिक सुखाच्या पलीकडचं दूरवरचं हित उमगणं, हे संस्कार पालक स्वत:च्या वागण्यातून न कंटाळता करत आहेत. पालकांसाठीही हा प्रवासच आहे. पालकत्व हा एक ‘प्रकल्प’, ‘उपक्रम’ किंवा ‘कामगिरी’ असल्याचा देखावा करण्यापासून लांब राहून चुकत-माकत प्रयोगशील प्रक्रियेतून प्रवाहीपणे अनेक पालक जगत आहेत.  तंत्रज्ञानानं जग जवळ आलं. पाश्चिमात्य वारं आपल्या घरापर्यंत पोहोचलं. बाहेरच्या जगातलं आपण नेमकं काय घ्यायचं, हा सारासार विचार देणं हा कळीचा मुद्दा आहे हे आजच्या काही पालकांना उमगलं आहे. स्वीकारशीलतेत पारंपरिकता आणि नवता यातला योग्य समन्वय त्यांना साधता आला आहे. ही नवी पिढी वारं येईल तशी भरकटत नाही. तरूण मुलामुलींच्या मोकळय़ा मैत्रीबाबत पालक पूर्वग्रह आड आणत नाहीत. तर विवाहसंस्थेचं महत्त्व जाणणारी नवी पिढी आजही टिकून आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, समता आणि परस्परपूरकता या त्रिवेणी गुंफणीतून आपापल्या कुवतीनं आजचे पालक आपलं कुटुंब साजरं करत आहेत. मुलींना शिक्षणाच्या, कार्यक्षेत्राच्या मर्यादा न घालणारे पालक, मुलगेही परस्परपूरकता रोजच्या जीवनात उतरवू शकतील याचं भान ठेवत आहेत. 

कुटुंबव्यवस्थेला हादरे बसत असतानाच्या भयावह परिस्थितीतही माणूसपण अबाधित ठेवणाऱ्या पालकपणाला ओझं न मानता ते आनंददायी आव्हान म्हणून जगणाऱ्या अनेक पालकांना सलाम! बदलत्या संस्कृतीतली संदिग्धता, समाजातल्या अपप्रवाहांचा रेटा झेलत, त्याला पुरून उरणारी विधायक शक्ती अंगी मुरवणारे हे पालक आहेत. पालकपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या पालकांचा वैश्विक प्रवास पुढच्या पिढीला आश्वासकता देत, जगण्याची ऊर्मी वाढवण्याच्या दिशेनं चालू आहे.

umaajitbapat@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parenting modern world time changed guardianship changed family families social financial ysh

ताज्या बातम्या