ज्यांना पाल्य नाहीत, अशा वृद्धांच्या पालकत्वाचं काय? हा मुद्दा या सदराला मिळणार्‍या प्रतिसादामध्ये अनेक जण उपस्थित करतात आणि मला पाल्य नसलेल्या माझ्या बाई, पुष्पा भावे आणि त्यांचे पती अनंत भावे यांची आठवण येते. दोघंही आता हयात नाहीत. दोघंही प्राध्यापक. विद्यार्थ्यांशी नातं जुळलेलं. मित्रांचा गोतावळाही मोठा. त्यामुळे त्यांचं, विशेषत: पुष्पाबाईंचं म्हातारपण, दीर्घ आजारपण आम्ही विद्यार्थ्यांनी निभावलं.

घरात देखभाल होण्यासारखी नसल्याने बाईंना अनेक महिने रुग्णालयात काढावे लागले. तिथल्या खर्चाच्या व्यवस्थेपासून आळीपाळीने सोबत करण्यापर्यंत सगळी जबाबदारी आम्ही मुला-मुलींनी, त्यातही माझ्या पिढीनंतरच्या त्यांच्या विद्यार्थिनींनी जास्त पार पाडली. स्वत:चं अपत्य नसणार्‍यांना असं कुणी ना कुणी सांभाळल्याची बरीच उदाहरणं दिसतात. स्वत:ची मुलं असून वेगवेगळ्या कारणांनी सांभाळायला ती नसल्यासारख्या स्थितीतलेही वृद्ध आहेत. एकेकट्या राहाणार्‍या स्त्री-पुरुषांबद्दल, पती-पत्नींबद्दल, ‘एनआरआय’ मुलांच्या पालकांबद्दल मागच्या लेखांमध्ये चर्चा केलीच आहे. जोडप्यापैकी एका व्यक्तीला मोठा आजार होतो, तेव्हा सगळा भार जोडीदारावर येतो. एक जवळचंच उदाहरण देते. अलका गाडगीळ ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी मैत्रीण आणि २०२३ पासून तिच्या ‘अल्झायमर्स’ला सांभाळणारा तिचा नवरा, पत्रकार-लेखक मित्र प्रकाश अकोलकर. ‘‘कर्करोग, टयुमर या गंभीर आजारांहूनही अधिक गंभीर ‘अल्झायमर्स’ आहे’’, असं प्रकाशचं म्हणणं. कारण याला बरं करणारं औषधच नाही. तो सांगतो, ‘‘जर कर्करोग जीवघेणा नसेल, बरा होणारा असल्यास त्यावरच्या उपचारांचं एक वेळापत्रक असतं. शस्त्रक्रियेचा उपायही असतो. तितका काळ गेला की, बरं वाटणार, हे माहीत असतं. खुद्द माझ्या बहिणीला कर्करोग झाला होता. आणि ती कालांतराने बरी झाली. पण अलकाला झालेला आजार खूप ताण देणारा. यात रुग्णाच्या वागण्याचा अंदाज येत नाही. रुग्णाच्या भावनांचा अकल्पित कल्लोळ अनुभवणं, त्यासह आजारी माणसाला सांभाळणं थकवणारं असतं. आणि त्यातही रुग्ण जोडीदार असल्याने त्यात गुंतलेपण अधिक असतं. कधी ती शांत, निवांत असते. क्षणात संशयी होते, अविश्वास दाखवते, हिंसकही होते. बाहेरच्यांना कधी ओळखते, कधी विसरते.’’

ही दोघं निवृत्तीनंतरचा काळ मौजमजेत घालवत जगत असताना अचानक अलकाला हा आजार झाला आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं. वार्धक्यात कधी मोठं दुखणं आलं, तर काय नियोजन असावं, याचा त्यांनी तोवर विचारदेखील केला नव्हता. शेजारच्याच घरात राहाणारी लेक आणि जावई यांची सतत मदत आहे. रुग्णमदतनीस बाईही भल्या आहेत. तरीही अलकाची काळजी घेणारी मुख्य व्यक्ती प्रकाशच. तो म्हणाला, ‘‘चाळीस वर्षांची सोबत असलेल्या जोडीदारीणीला अशा स्थितीत बघण्याचा धक्का आता ओसरला आहे. मीही खूप बदललो आहे. माझं व्यक्तिगत आयुष्य संपुष्टात आलंय. चोवीस तास मी घरी असण्याचा फायदा तिची काळजी घेण्यासाठी होतो. आणि तोटा असा की, माझा ताण वाढतो. सकाळी चालायला जाणं, कधीतरी मित्रांबरोबर नाक्यावर चहाला जाणं ही माझी चैन असते. तेव्हाही, तिला सोडून जातोय, हा अपराधभाव असतो. तेवढ्यातच हिला काही होणार नाही ना, याची काळजी असते. दुसर्‍याला समजून घेणं म्हणजे काय असतं, ते या आजाराने शिकवलं. माझा तडकफडक स्वभाव निवळला. ती आक्रमकपणे वागली-बोलली तरी मी गप्प राहातो.‘‘

अशा आजारपणात खर्‍या मैत्रीचं मोल उमगतं, असं सांगत प्रकाश म्हणाला, ‘‘अलकाच्या रोजच्या संपर्कातल्या जवळच्या मैत्रिणींनी आजवर साधी चौकशीही केली नसली, तरी तिचे जुने शाळासोबती तिला सहलीला घेऊन गेले. नातलगांचेही बरे-वाईट अनुभव आले. मात्र माझ्या घट्ट दोस्तांनी साथ कायम ठेवली. ते रोज मला वेळ देतात. त्यांच्याबरोबरच्या हास्यविनोदाने ताण हलका होतो.

डॉ. सुहास पिंगळे हा मित्र तर आमचा कुटुंबडॉक्टरच आहे. असे मित्र लाभणं ही आयुष्यातली ठेव आहे. त्यांच्यामुळे माझं बळ टिकून राहातं. माझी लेक आणि आमच्या मदतनीस बाई यांच्या मदतीने अलकाचा सांभाळ मी घरातच नीटपणे करेन हे खात्रीने सांगतो.’’

प्रकाशचं हे बळ तगून राहो!


वृद्ध आई-वडील, वृद्ध सासू-सासरे आणि ‘पार्किन्सन्स’ झालेला पन्नाशीतला नवरा असं कुटुंब काही वर्षं नीलिमा कुलकर्णी यांनी खंबीरपणे सांभाळलं. २००२ मध्ये त्यांच्या नवर्‍याला, दत्ता यांना ‘पार्किन्सन्स’चं निदान झालं. तो मोठाच धक्का होता. तेव्हापासून दत्ता-नीलिमा यांचा ‘पार्किन्सन्स’सोबतचा प्रवास सुरू आहे. कंपवात झालेल्या व्यक्तीचं शरीरावरचं नियंत्रण सुटतं, तेव्हा डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या जोरदार हालचाली सुरू होतात. इतक्या की, खुर्चीत बसलेली व्यक्तीदेखील सरकून पडण्याची शक्यता असते. योग्य वैद्यकीय सल्ला, आजाराचं स्वरूप तपशिलात समजून घेणं आणि खास वृद्धांसाठी तयार केलेल्या कामशेत इथल्या वसाहतीत जाऊन राहण्याचा निर्णय यामुळे हा प्रवास झेपवू शकलो, असं नीलिमाने सांगितलं. त्यांच्या मुली परदेशी असतात. गंभीर, निकडीच्या वेळी त्या धावून येतीलच. पण जोवर आमचं आम्ही बघू शकतोय, तोवर दोघींना त्रास द्यायचा नाही, असं ठरवलंय. दत्ता लेखक आहेत. अजूनही ते लिहितात. त्यांनी केलेल्या अनुवादाची, त्यांच्या विज्ञानकथांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. या कथांच्या वाचनाचे कार्यक्रम नीलिमा करतात. त्यांच्या वसाहतीतल्या वातावरणामुळे कधीही एकटं वाटत नाही. कोणत्याही प्रसंगी मदतीची खात्री असते. इथे राहाणारी सगळी ३०० कुटुंबं वार्धक्याच्या एकाच नावेतले यात्रेकरू आहेत. काहीजण तर एकएकटेच. सगळे एकमेकांसाठी धावून जाणारे. दत्ता-नीलिमा यांचं नातं कुणाही जोडप्याला हेवा वाटावा असं आहे. कधीही वाद, भांडण नाही. पराकोटीचा समंजसपणा आणि एकमेकांना सांभाळून घेत राहाणं.
दत्ता यांचा कंपवात या नात्याला वचकून राहो!


माधवी कुलकर्णी यांच्या पतीला ‘ऑर्थोपेडिक’ स्वरूपाचं चिवट म्हणावं, असं दुखणं आहे. त्या सांगतात, ‘‘ज्येष्ठ पालकांचं पालकत्व आणि आपल्याच वृद्ध जोडीदाराचं पालकत्व यात नात्यामुळे बराच फरक पडतो. आपले आई-वडील, सासू-सासरे कितीही प्रिय असले, तरी ते वृद्ध झाल्यावर त्यांची पुढची वाटचाल कशी असणार, हे आपण जाणून असतो. पण तेच जोडीदाराच्या बाबतीत तितकं सहज पचवणं शक्य होत नाही. भावनिक आंदोलनं जास्त असतात. ‘पुढे काय’ हा प्रश्न कुरतडत राहातो.’’

वृद्ध नवरा-बायकोपैकी ज्या व्यक्तीला आजारी जोडीदाराची देखभाल करायची आहे, तो / तीदेखील वृद्धच असते. त्यामुळे धावपळ करण्याला मर्यादा येतात. देखभाल करणारी व्यक्ती साधी आजारी जरी पडली तरी आणखीच अवघड होऊन जातं.

माधवी म्हणाल्या, ‘‘माझ्या पतीला अनेकदा गंभीर आणि अचानक उद्भवणार्‍या आजारांना तोंड द्यावं लागलं. पहिल्या वेळेस तो पंचेचाळिशीचा होता आणि मीही त्याच वयाची. ते अगदी मृत्यूच्या दारातलं आजारपण सुदैवाने निभावलं. साठीतली आणि नंतरची दुखणी जिवावरची नसली तरी गंभीरच होती. वारंवार कराव्या लागणार्‍या शस्त्रक्रियांमुळे शारीरिक मर्यादा आणि चिंता यात भर पडत गेली. माझंही वाढतं वय बोलू लागलं. दीर्घ आजारपणाचा एक झाकोळ घरावर राहातोच. दैनंदिन तारांबळ, उपचाराचं व्यवस्थापन, पैशांची जमवाजमव. आमच्याकडे तरुण वावर नाही. त्यामुळे येणार्‍या अडचणींवर उपाय शोधले गेले, सापडत गेले आहेत. आजारी माणसाचा सकारात्मक, सहकार्याचा दृष्टिकोन असेल तर त्याची काळजी घेणार्‍या जोडीदाराला उलट त्याचा आधारही वाटू लागतो, हा माझा अनुभव आहे.’’ ही सकारात्मकता टिकून राहो!


दहा वर्षांपूर्वी मकरंद यांच्या पत्नी मीना जग सोडून गेल्या. मकरंद आता ८० वर्षांचे आहेत. ‘अल्झायमर्स’ आणि ‘अल्झायमर्स’च्या रुग्णांना क्वचित होणारा ‘मोटर न्यूरॉन’ हे दोन बरे न होणारे मेंदूचे आजार मीनाला झाल्यापासून त्या दोघांनी मिळून आजारपण हाताळलं. मकरंद यांनी सांगितलं: ‘‘साठीनंतर मीनाचा विसराळूपणा सुरू झाला. प्रवास करताना रस्ते चुकणं, फोनवर बोलताना बावचळून तेच तेच शब्द बोलणं. असे प्रकार सुरू झाल्यापासून मी तिची सावली झालो.’’ या आजाराची सुरुवात सहसा स्मृतीविलयापासून होते. सगळे कुटुंबीय आणि मित्रमंडळीचे वाढदिवस तोंडपाठ असणार्‍या मीना यांना शेवटी मात्र कोणाची नावंही आठवेनाशी झाली होती.

निवृत्तीनंतर मीना-मकरंद यांनी अख्खा भारत पालथा घातला होता. अमेरिकेतल्या त्यांच्या मुलांकडेही त्यांचं जाणं व्हायचं. विमानतळावर किंवा अन्यत्र मीना शौचालयात गेल्या की मकरंद बाहेर दरवाजापाशी थांबून राहायचे. कारण बाहेर आल्यावर मीना दिशाहीन होऊन कुठेही चालू पडायच्या. मीना मैत्रिणींसोबत बाजारात गेल्या तरी मकरंद त्यांच्यासोबत जात असत. मकरंद म्हणाले, ‘‘मी तसं केलं नसतं, तर तिला केव्हाच हरवून बसलो असतो. आमचा प्रेमविवाह होता. आणि ती मला फार प्रिय होती.’’

फक्त ‘अलझायमर्स’असता, तर मीना यांना एवढा त्रास झाला नसता. ‘मोटर न्यूरॉन’मुळे क्षमता वेगाने कमी होत गेल्या. मेंदूच्या आज्ञा स्नायूंपर्यंत पोहोचेनाशा झाल्या. म्हणजे, हात उचलायचाय, पण उचलला जात नाही. शब्द बोबडे होत गेले. हळूहळू बोलणंच बंद झालं. अन्न-पाण्याचे कण श्वासनलिकेत जाऊन जीवघेणा ठसका सुरू झाला. नळीवाटे अन्न भरवणं सुरू झालं. शेवटी श्वास घेणारे स्नायूही कमजोर होत गेले. या सगळ्या अवस्थांमध्ये मकरंद पत्नीची शुश्रूषा करत राहिले. खरोखर, मकरंदनी पत्नीला जसं जपलं, सांभाळलं, तसं क्वचितच कुणी करेल. तोंडातून अन्नपाणी बंद करावं लागल्यानंतर तिला चव कळेल इतपत चिमूटभर चॉकलेट, मिठाई, केक वगैरे ओलसर करून ते मीनाच्या जिभेला लावत असे. ‘‘काय गं.. चॉकलेट / केक आवडलं ना?’’ असं विचारल्यावर मीना यांच्या चेहर्‍यावर प्रसन्न हासू उमटत असे. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यासोबत राहाणार, हा त्यांनी पत्नीला दिलेला शब्द होता. शेवटचे दोन महिने त्यांना अंथरुणातून उठणंच शक्य होईना, तेव्हा मात्र त्यांना एकट्याने करणं जमेनासं झालं. मुलांच्या सांगण्यावरून एक मदतनीस बोलावली. डॉक्टरांच्या परवानगीने घरीच रुग्णालयासारखी व्यवस्था केली. काही दिवसांनी मीना शांतपणे मरण पावल्या. त्यानंतरची मकरंद यांची भावावस्था बा.भ. बोरकरांच्या या कवितेसारखी झाली,

तू गेल्यावर,

घरांतदेखील पाऊल माझे अडखळते आणि आटुनी हवा भवतिची,

श्वासास्तव मन तडफडते

तू गेल्यावर,

या वाटेने चिमणीदेखील नच फिरके

कसे अचानक झाले न कळे,

सगळे जग परके परके

kulmedha@gmail.com