डॉ. नीता ताटके
आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना जशी विशेष परिसंस्था असणं महत्त्वाचं असतं तसंच त्यांच्या मागे त्यांच्या पालकांचा भक्कम पाठिंबा असणंही त्यांच्या यशात भर घालणारं ठरतं. मात्र या खेळाडूंचं पालकत्व निभावणं कित्येकदा अत्यंत आव्हानात्मक असू शकतं. खेळाडूंच्या आईचं जगणं तर अनेकदा पाल्याभोवतीच फिरत राहातं. त्यामुळे साहजिकच त्या संपूर्ण प्रवासात येणारे खाचखळगे, आशा-निराशेचे क्षण या सगळ्यांतून पालकांनाही तावून-सुलाखून निघावं लागतं.

‘आयची-नागोया २०२६’, जपान येथील विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ्त्रिरयांनी रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकतालिकेचं खातं उघडलं. महिला क्रिकेट संघाने भारताला पहिलं सांघिक तर नीरु धांडानं ट्रॅप नेमबाजीत पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून दिलं. तुफानी वेगानं पळून ४ ७४०० रिलेचंही सुवर्ण आपल्या स्त्रियांनी जिंकलं. अनाहत सिंग, अँसी सोजन यासारख्या अनेक मुलींची नावं भारताचं नाव उंचावणार्‍या खेळाडूंमध्ये आता प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहेत.

साधारणपणे आई-वडिलांचं बोट धरून मुला-मुलींची ‘बाल पावलं’ खेळायला सुरुवात करतात. खेळाची आवड निर्माण झाल्यावर, खेळामध्ये कामगिरी सुधारायला लागल्यावर व कालांतराने जिंकायला लागल्यावरही या खेळाडूंचे पालक त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतात. खेळाचा प्रशिक्षक तर सुरुवातीपासून असतोच, त्यात आहारतज्ज्ञ, तंदुरुस्ती प्रशिक्षक, क्वचित मानसतज्ज्ञ यांची फळी उभी राहायला सुरुवात होते. राज्य, राष्ट्रीय शिबिरांमध्ये निवड झाल्यावर अभ्यास, परीक्षा, खेळाच्या संघटना या सर्वांचीच एकत्रित मोट बांधून सर्वांना सांभाळणारे पालकच असतात. या लेखमालिकेच्या निमित्ताने खेळामध्ये नव्याने आलेल्या, रुळलेल्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असलेल्या मुलींच्या पालकांशी बोलल्यावर खेळाडूंच्या खेळामध्ये पालकांचाही केवढा महत्त्वाचा सहभाग असतो, तेदेखील या खेळाडूंबरोबर कसे शिकत जातात हे लक्षात आलं. या चर्चांचा हा प्रातिनिधिक गोषवारा.

साधारणपणे खेळाडूंचे पालक विशेषत: आई, सर्व प्रकारची जबाबदारी घेताना दिसून येते. त्यांचे जेवणाचे डबे, आहाराची सर्व व्यवस्था, कपडेलत्ते, बाहेरगावी जायची तयारी, त्यांना सरावासाठी आणणं-सोडणं यासाठीचे हेलपाटे या सगळ्यामध्ये तिची खूप धावपळ दिसून येते. जेव्हा मुलींबरोबर बाहेरगावी जाण्याची वेळ येते, तेव्हाही बर्‍याचदा सोबतीला आईच असते. अर्थात काही वेळ आई-वडील दोघंही जातात, मात्र फक्त वडील सोबतीला आहेत ही बाब तशी अपवादात्मकच असते. अर्थात पूर्वीच्या मानाने आता या सगळ्या कामांमध्ये वडीलही हातभार लावताना दिसायला लागले आहेत. आपल्या मुलींची क्रीडा कारकीर्द सुरळीत सुरू राहावी म्हणून संपूर्ण कुटुंबाने स्थलांतर केल्याची भारतातली कुस्तीगीर अंतिम पंघाल हिची गोष्ट विलक्षणच म्हणावी लागेल.

२० वर्षांखालील गटातील भारताची पहिली सुवर्णपदक विजेती, २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी वयाने सर्वात लहान कुस्तीगीर अंतिम पंघाल हरियाणातील ‘भगना’ या छोट्याशा गावातील सामान्य कुटुंबातील मुलगी. कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण आपल्या दुर्गम गावात उपलब्ध नाही, हे ओळखून तिच्या पालकांनी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून हिसार शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अंतिम आणि तिची आई आखाड्याच्या जवळ एका अत्यंत लहान भाड्याच्या खोलीत राहू लागल्या, यामुळे तिला सकाळ-संध्याकाळ चार-चार तास कसून सराव करणं शक्य झालं. कालांतराने संपूर्ण कुटुंबाचं आणि त्यांच्या म्हशींचंही स्थलांतर झालं. अंतिमच्या पालकांनी त्यांचं आयुष्य, राहण्याचं ठिकाण आणि उपजीविकेची साधनं पूर्णपणे तिच्या कुस्तीच्या कारकीर्दीभोवती केंद्रित केली. शहरातील पालकांसाठी अशा प्रकारे स्थलांतराचा निर्णय फार सोपा नसतो. खेळ शिकवणारी संस्था व चांगली शाळा जवळ असलेलं घर घेणं हे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतं. शाळेतच ‘व्हॉलीबॉल’ खेळाची उच्च दर्जाची सुविधा असलेल्या आपल्या दोन्ही मुली हा खेळ चांगला खेळायला लागल्या आहेत, आवड आहे आणि खेळाबाबत गंभीर आहेत हे पालकांना मुलींच्या गप्पा, त्यांची नियमितता यावरून लक्षात आलं. मात्र खेळण्यासाठी घरून येण्या-जाण्यामध्ये खूप वेळ फुकट जातो, त्यामुळे मुली दमतात, अभ्यासासाठीही वेळ कमी पडतो हे लक्षात आल्यावर त्यांच्या पालकांनी चक्क राहातं घर बदलून शाळेच्या जवळच घर घेतलं. अगदी सर्वांनाच असं करणं शक्य नसलं तरी आपल्या मुलींच्या क्रीडा कारकीर्दीला प्रोत्साहन देण्यासाठी असे मोठे निर्णय पालक घेत आहेत हे बघून मन खरंच हरखून जातं.

शहरात खेळाची कारकीर्द घडवण्याची इच्छा असलेल्या खेळाडूंचा दिवस लवकर उजाडतो. सराव, शिक्षण, शिकवणी वर्ग, पुन्हा सराव असं सर्व सांभाळत तो एकदम रात्रीच मावळतो. मग जेवणा-खाण्याचे डबे, सरावाचे कपडे, पाण्याच्या बाटल्या आदी पोहोचविण्यासाठी पालकांच्या वेगवेगळ्या वेळेला शाळेत, क्रीडा संस्थेत फेर्‍या सुरू होतात. या खेळाडूंच्या भोवती या पालकांचं जग फिरायला लागतं. ‘आम्हाला आमच्या सुट्ट्यांचं कधीच व्यवस्थापन करता आलं नाही’ ही प्रतिक्रिया जवळ जवळ सर्वच पालकांची होती. ‘सुट्ट्यांना बाहेरगावी जाण्यासाठी आवश्यक असलेली किमान महिना दीड-दोन महिना आधी करावी लागणारी आरक्षणं आम्हाला शक्य झालीच नाहीत, कारण कुठली स्पर्धा, कुठलं शिबीर केव्हा जाहीर होईल याबद्दल माहिती नसायची,’ ‘आमच्या लेकीला येणं तर शक्यच नसायचंच, पण कित्येक कौटुंबिक व सामाजिक समारंभांना आम्हीही जाऊ शकलो नाही,’ असंही कित्येक पालकांनी सांगितलं. आमच्या मुलींबरोबर आमचाही आहार सुधारला, आम्हालाही शिस्त लागली, खेळाडूंचे पालक म्हणून आम्ही शोभायला पाहिजे म्हणून आम्हीही नियमित व्यायाम सुरू केला ही पालकांची प्रतिक्रिया खूपच भारी वाटली. अगदी जिल्हा, राज्य स्तरावर नुकत्याच खेळायला लागलेल्या मुलींच्या पालकांनीसुद्धा मुलींचा हा खेळाचा प्रवास खूप समाधान देणारा असल्याचं सांगितलं. आमच्या मुली ‘वेळेचं व्यवस्थापन करतात’, ‘परीक्षेआधी खेळाचा सराव बुडू नये म्हणून नियमित अभ्यास करतात’,  ‘जिंकण्याबरोबरच स्पर्धा हरणंदेखील हाताळणं’, आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याचा दृष्टिकोन आत्मसात करणं याबरोबरच ‘आत्मविश्वास, निर्णयक्षमता, सकारात्मकता ही जीवनकौशल्ये शिकत आहेत’, या मुलींबरोबरच ‘आम्हीही हे सर्व शिकत, घडत आहोत’ हे या पालकांनी खूप अभिमानाने सांगितलं. मुलींच्या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हीही खूप फिरलो, यासाठी आम्ही चांगलं ‘आर्थिक नियोजन’ करायला शिकलो असंही कित्येक पालकांनी सांगितलं.

‘‘भावनिकदृष्ट्या आम्ही आमच्या मुलींच्या जास्त जवळ गेलो आहोत, तिच्या भाव-भावनांमधले चढउतार, तिचा आनंद, दु:ख आम्ही वाटून घेऊ शकतो.’’, ‘‘माझी मुलगी पटकन निराश होते, तिला सतत प्रोत्साहित करावं लागतं’’, ‘‘माझी मुलगी स्वतंत्र बाण्याची आहे, चांगली खेळली नाही की ती तिच्या कोषात जाते, त्यावेळी काही वेळा तिला स्वत:बरोबर राहू देणं गरजेचं असतं, हे आम्हाला आता समजायला लागलं आहे.’’ काही वेळा मुलीला ‘‘तू फक्त छान खेळ, तुझे १०० टक्के दे, प्रतिस्पर्धी कसे जिंकले यापेक्षा मी काय चांगलं केलं, कुठे कमी पडले याचा विचार कर,’’ हे सांगितल्याचा उपयोग होतो हे पालकांनाही समजायला लागलं आहे. आम्ही ताणतणावाचं व्यवस्थापन करायला लागलो आहोत ही सार्वत्रिक भावना आढळली.

खेळाडूंचे पालक असण्यामधलं सर्वात मोठं आव्हान कोणतं? या प्रश्नाचं उत्तर होतं, ‘भावनांचं व्यवस्थापन’. यातला सर्वात कठीण क्षण असतो तो दोन्ही अपत्ये खेळाडू असलेल्या कुटुंबात. यातील एकजण जेव्हा जिंकते आणि त्याच वेळी दुसरी हरते वा एकीची पुढील स्पर्धेसाठी निवड होते, एकीची होत नाही, तेव्हा आनंद आणि निराशा यांचा समतोल कसा साधायचा याची कसोटीच लागते. असं सगळ्यांचं सगळं सांभाळायची मानसिक तयारी आम्हालाही खूप करावी लागली, असं सांगत असतानाच खेळाडूंच्या पालकांसाठीही एखादा प्रशिक्षण वर्ग हवा, ही काही पालकांची अपेक्षाही बरंच काही सांगून गेली.

खेळातील हार, संधी नाकारली जाणं, अपेक्षेप्रमाणे खेळ न होणं, शासकीय नियम, कायदे किंवा अगदी वैयक्तिक आर्थिक प्रश्न या अनुषंगाने येणारी हतबलताही खेळाडूंबरोबर त्यांच्या कित्येक पालकांनी अनुभवलेली आढळली. एकदा एका खेळाच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुलींच्या संघाची निवड झाली, भुवनेश्वरला एक महिन्याचं शिबीरही झालं, संघ विमानतळावर गेला आणि परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेलं भारत सरकारचं ‘ना हरकत प्रमाणपत्र’ संघाला तोपर्यंत मिळालं नसल्यानं या मुलींना विमानतळावरून परत यायला लागलं. वेळ, परिश्रम, पैसा वाया गेल्याची भावना, ‘आपली कुणालाच किंमत नाही’ हा नकारात्मक विचार, इतकंच कशाला ‘नकोच खेळायला, खेळणं सोडू या’ असे टोकाचे विचारही खेळाडू आणि पालक दोघांनाही अनुभवायला आले. यामधून सावरायलाही त्यांना वेळ लागला. आपल्याकडे असे अनेक खेळ आहेत, ज्याच्या विधिवत निवड स्पर्धा होतात, खेळाडूंनी या स्पर्धेसाठी खर्च करायचा या अटीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची क्रीडा खात्याची परवानगीही मिळते. अशीच एका खेळासाठी दोघा बहिणींची निवड झाली, कुटुंबांनी काही लाख रुपयांचा खर्च एका मुलीसाठी मोठ्या कष्टाने जमा केला. अशा वेळी पालकांच्या अनेक अव्यक्त भावना आपल्याही पटकन लक्षात येतील. कोणत्या मुलीला पाठवायचं? जिला पाठवत नाही तिच्यावर अन्याय होत आहे, आपण पालक म्हणून कमी पडत आहोत ही अपराधीपणाची भावना, निराशा, हतबलता पालकही अनुभवतात. सांघिक खेळात हरल्यानंतर ‘एखाद्या विशिष्ट खेळाडूकडे बोट दाखवून तुझ्या चुकीमुळे आपण हरलो,’ हे आपल्या मुलीबाबतचं बोचरं बोलणं सहन करणंही अत्यंत त्रासदायक जातं.

मुलींच्या खेळाच्या आवडीमुळे नवरा- बायकोमध्ये होणारी वादावादी यालाही काही पालकांनी स्पर्श केला. परीक्षेच्या आधी मुलींना स्पर्धा खेळायला पाठवायचं का? एखादी स्पर्धा खेळायची का? मुली अस्वस्थ असल्या की आमची अस्वस्थता, त्यामुळे होणारे वाद, कधीतरी अबोला, आपण मुलींवरती खूपच बंधनं घालतोय का? खेळातल्या त्यांच्या क्षमता कुठे आणि किती आजमवायच्या? याचं तारतम्य कसं सांभाळायचं याबाबतीतली साशंकता असे अनेक वादाचे विषय असल्याचं पालकांनी खुलेपणाने सांगितलं. एकत्र सराव करणार्‍या मुलींमध्ये जेव्हा एकीची मुलगी यशस्वी होते, दुसरीची मुलगी मागे पडते, तेव्हा पालक-पालक यांच्यामध्ये असलेले मैत्रीचे संबंधही काही वेळा ताणले जातात, यावर काय करायचं हे समजत नाही, ही प्रतिक्रिया डोळे उघडवणारी होती. रोजचा सराव असो वा बाहेरगावचा प्रवास, मुलीच्या सुरक्षेची काळजी ही सर्वांमध्येच आढळली. ‘‘आम्ही आता आहोत तर खेळून घे’’ असं मुलींना सांगणारे पालक तर भविष्यात मुलीच्या खेळाची आवड जोपासणारा नवरा व सासर मिळेल ना? असं समाजाच्या बंदिस्त चौकटीचं दडपण पालकांवर मोठ्या प्रमाणात जाणवलं. ‘‘माझा खेळ मला आनंद, समाधान देणारा, जिंकण्या-हरण्यातही माझं मनोबल राखणारा माझा निरंतर प्रवास आहे…’’ ही भावना अनेक मुलींनी व्यक्त केली, त्याचंच प्रतिबिंब पालकांच्या प्रतिक्रियेतही दिसलं. जागतिक स्तरावरही त्याचे पडसाद आपल्या मुलींच्या विजयातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आपल्या मुलींना त्यांच्या उत्कृष्ट क्रीडा कारकीर्दीसाठी पाठिंबा देणार्‍या सर्व क्रीडा पालकांचं अभिनंदन आणि त्यांना विनम्र अभिवादनही!

tatkeneeta6@gmail.com