डॉ. अंजली जोशी

बदलती जीवनशैली आता तरुण पिढीच्या आयुष्याचा भाग झाली आहे. नवरा-बायको दोघंही नोकरी करणारे असतील तर ‘पुरुषांची ही कामं, बाईची ती कामं’ ही विभागणी पुसट होत चालली आहे. आवडीनिवडी एकमेकांवर लादण्यापेक्षा हवं ते करण्याचं ते घेत असलेलं स्वातंत्र्य, संसार म्हणजे एकमेकांसाठी तडजोडी करणं, या संकल्पनेत जगलेल्या पालक पिढीला पटणं शक्य नसतं, मग वाद होणं आणि काही वेळा ते शब्द वर्मी लागत नात्यात भरून न येणारी दरी निर्माण होणं अपरिहार्य ठरू शकतं. ते टाळण्यासाठीचा वळणबिंदू वाचकांनीच ओळखायचा..

Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
transgender police recruitment marathi news
एमपीएससी: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवारांसाठीचे नियम निश्चित
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

लग्न झाल्यानंतर आईबाबा पहिल्यांदा घरी महिनाभर मुक्कामासाठी येणार होते म्हणून मी खूश होतो. ईशाचं ऑफिस सुरू झालं होतं, पण माझं ‘वर्क फ्रॉम होम’ कायम होतं.आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आईनं हाक मारली, ‘‘वैभव, तुला आवडतं म्हणून लोणची, चटणी, मुरांबा मुद्दाम हौसेनं करून कुरिअरबरोबर पाठवतो आम्ही. तुम्ही तर हातही लावलेला दिसत नाही. ईशालाही आवडत नाही का? फ्रिजमध्ये तसंच पडलंय बघ.. लोणचं तर बुरशी येऊन खराब झालंय आता!’’ ती दुखावल्या स्वरात म्हणाली. मी चपापलो. आमच्या जेवण्याच्या सवयी आता बदलल्या आहेत. मी गोड बंद केलंय. ईशाचंही डाएट असतं. पण आईबाबांना हे कसं पटणार. तरी मी प्रयत्न केलाच. ‘‘अगं, हल्ली साग्रसंगीत जेवायची वेळच येत नाही आणि डाएटही असतं.’’ मी सारवासारव करत म्हटलं. पण वाटून गेलं, की हे टाळता आलं असतं. ते येण्याच्या आधी फ्रिज आवरून ठेवायला हवा होता. ‘‘अरे, मग सांगायचं की नको पाठवूस म्हणून.’’  खरं तर कित्येक वेळा हे मनात आलंही होतं, पण आईला वाईट वाटेल म्हणून  सांगवलं नाही. कधी तरी खायला होईल म्हणून ठेवत गेलो फ्रिजमध्ये आणि ते पडून राहिलं. पण आता ती चूक भरून निघणार नव्हती.

 ‘‘तुम्ही या वयात खरं तर नेहमीचं जेवण भरपूर जेवलं पाहिजे. कसलं डाएट करत बसता. आमची तब्येत बघ कशी ठणठणीत आहे,’’ बाबांनी पुस्ती जोडली. माझं लग्न झालं तरी आईबाबा मी काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही, याचे सल्ले देणं थांबवत नाहीत. गेली दहा वर्ष बाबांना मधुमेह आहे आणि आईला बीपी. सतत मुरांबा, लोणची, पापड खाल्ले तर काय होणार? पण तरी तब्येत ठणठणीत आहे असं खणखणीतपणे सांगतात. या व्याधी जडू नयेत म्हणून आम्ही खाण्याची आधीपासूनच काळजी घेतो. पण खाण्याच्या विषयावरून ठिणग्या उडतच राहिल्या. ‘‘बाहेरचं किती खाता रे! सारखं मागवत असता. घरात केलेलं चालत नाही आणि बाहेरचं जंक फूड बरं चालतं.’’ आईची टिप्पणी चालूच होती. ‘बाहेरचं म्हणजे जंक फूड’ हे समीकरण आईबाबांच्या डोक्यात इतकं फिट बसलंय की आम्ही सॅलड आणि प्रोटिन फूड मागवलं तरी ते जंक फूडच समजतात. हे सगळं शेवटी ईशापाशी येऊन पोहोचू नये असं मला वाटत होतं, पण नेमकं तेच घडलं.  ‘‘ईशा अजिबातच स्वयंपाक करत नाही का रे?’’ आईनं विचारलंच. ते बहुधा तिच्या डोक्यात बरेच दिवस घोळत होतं.

 ‘‘असं नाही गं! तुम्ही बघता ना, तिला यायला रोज किती उशीर होतो ते. रात्री आल्यावर पण कधी कधी काम करावं लागतं. सुट्टीच्या दिवशी कधी तरी करते ती.’’ बोलता बोलताच ईशा आई-बाबा यायच्या आधीच मला काय म्हणाली होती ते आठवलं. ‘‘हे बघ, स्वयंपाकाचा विषय कधी तरी निघणारच. तुला त्यांनी विचारलं तर स्पष्ट सांगून टाक, की मी नाही करत स्वयंपाक म्हणून. आपण सफाई कशाला देत बसायची. सफाई देणं म्हणजे चूक मान्य करणं. स्वयंपाक न करणं ही गोष्ट म्हणजे चूक किंवा काही कमीपणा आहे असं मी मानत नाही. हा निव्वळ सोयीचा आणि पर्यायांचा प्रश्न आहे. तू सफाई देत बसलास ना, की विषय अजून वाढेल, की ‘हिच्या घरी आईनं हिला कसं शिकवलं नाही’ किंवा ‘स्वत:च्या पोटापुरतं तरी कसं यायला हवं’ वगैरे..’’

आई म्हणालीच पुढे, ‘‘अरे, थोडं तरी यायला पाहिजे ना स्वयंपाकाचं.. आपल्याच पोटासाठी तर करायचं!’’

 मी गप्प बसलो. ईशा शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये होती. पोटापुरतं काय काय करायचं याची तालीम तिला तिथं मिळाली आहे. पण तिचं म्हणणं असतं, मी स्वत:ला सिद्ध का करायचं? मला कुठला स्वयंपाक येतो आणि कुठला नाही, याचा पाढा मी आरोपीच्या पिंजऱ्यात असल्यासारखा इतरांना का वाचून दाखवायचा? हे सगळं आईला कसं समजावता येणार होतं? 

‘‘तू असा गुळमुळीतपणे गप्प बसतोस. थोडं तरी सांगायला हवं की नको?’’ आईचं पालुपद चालूच होतं. गुळमुळीत राहण्याचा प्रश्न नव्हता. मला ईशाचं म्हणणं पटायचं. तरीही तिला समजावण्याचा प्रयत्न मी केला होता. ‘‘काही वेळा प्रॅक्टिकल तडजोडी करायला लागतात. आई-बाबा कायमचे थोडेच आपल्याबरोबर राहणार आहेत. महिन्याभरासाठी तर येतात. थोडं त्यांच्याप्रमाणे वागलं तर काय हरकत आहे?’’  ‘‘मी जशी आहे तशी वागते. उगाच जसं नाही तसं वागण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न कशाला करायचा? त्यांनी माझ्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून तसं दाखवण्याचं दडपण मी का घ्यावं? उलट मी जशी आहे तशी खरीखुरी त्यांना जितक्या लवकर कळेल ते चांगलं नाही का? त्याचा स्वीकार त्यांना करता येत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही.’’ ती फणकाऱ्यानं म्हणाली. ईशा सडेतोड आहे, तिला खोटेपणा अजिबात आवडत नाही. काही झालं तरी ती ‘हरिश्चंद्री बाणा’ सोडणार नाही, हे मला माहीत होतं.

मग तो प्रसंग घडला. या वेळी वादाची नुसती ठिणगीच नव्हती, तर निखाराच पेटला. सुट्टीचा दिवस होता. संध्याकाळी ईशाला सिनेमा पाहण्याची लहर आली. फुटबॉल वर्ल्ड कपची मॅच सोडून ईशाला आवडतो त्यातला प्रायोगिक सिनेमा पाहण्याचा माझा अजिबातच मूड नव्हता. ‘‘तू ये की जाऊन! मी येईन घ्यायला.’’ टीव्हीवरची नजर न हटवताच मी म्हटलं. ती भर्रकन तयार होऊन निघाली. लिव्हिंग रूममध्ये आई-बाबा बसले होते. माझ्या कानांवर संभाषण पडत होतं.

 ‘‘एवढय़ा रात्रीची कुठे निघालीस गं?’’  ‘‘सिनेमा पाहायला.’’ ईशाचं उत्तर ऐकू आलं आणि पुढच्या वादळाची मला कल्पना आली.

 ‘‘एकटीच?’’

 ‘‘वैभवला फुटबॉलची मॅच सोडून सिनेमाला यायचं नाही. पण सिनेमा संपल्यावर तो येईल मला घ्यायला. तुम्ही काळजी करू नका.’’ ती निघताना घाईघाईनं म्हणाली असावी. तिनं बंद करून घेतलेल्या दरवाजाचा आवाज मला ऐकू आला. पाठोपाठ बाबांची उंच आवाजातली हाकही ऐकू आली.

‘‘वैभव, अरे जरा बाहेर ये. बोलायचंय तुझ्याशी.’’ मॅच बंद करून मी नाराजीनंच बाहेर आलो.

‘‘अरे, तुमचं हे काय चाललंय काय? सगळय़ा गोष्टी एकेकटय़ानं करायच्या असतील तर एकत्र राहायचं तरी कशाला? जोडीनं करण्यात आनंद असतो.’’

आता मात्र मला राहावेना. ‘‘आमचं तुमच्या पिढीसारखं नाही. दुसऱ्याचा आनंद तो माझा आनंद, असं मानण्याचं बंधन घालून घ्यायचं आणि स्वत:च्या आनंदाची आहुती देऊन फरपट करून घ्यायची! आम्ही तसं करत नाही. एखादी गोष्ट मला करावीशी वाटली आणि ईशाला नको असेल तर माझ्यासाठी तिनं ते केलंच पाहिजे अशी सक्ती नाही करत.’’

‘‘अरे, पण तडजोडीतूनही आपण अनेक गोष्टी शिकतो. त्यातही आनंद असतो,’’ आई म्हणाली.

 ‘‘तडजोड कुणाला चुकली आहे? पण जिथे पर्याय आहे, तिथे उगाचच्या उगाच तडजोड करण्यात काय हशील आहे? आता जर मी ईशाला फुटबॉलची मॅच बघण्याची जबरदस्ती केली असती, तर तिची चिडचिड नसती का झाली? आणि मी मनाविरुद्ध सिनेमा बघायला गेलो असतो तर तिथं जाऊनही मोबाइलवर मॅचच बघत राहिलो असतो. त्यामुळे ईशा आणखीनच वैतागली असती. मग तडजोडीचा काय उपयोग झाला? सगळय़ा गोष्टी जोडीनं करण्याचं बंधन कशाला? आम्ही एकमेकांना सुटं करतो. थोडक्यात ‘स्पेस’ देतो,’’ मी म्हटलं.

 ‘‘हल्ली तुम्ही स्पेस स्पेस करत असता. पण काय रे, ही स्पेस दोन्ही बाजूंनी मिळायला पाहिजे ना? आल्यापासून बघतोय, कपडय़ांपासून ते खाण्यापर्यंत घरातल्या सगळय़ा गोष्टी तुझ्याच गळय़ात पडताहेत. ही स्पेस ‘इक्वल’ नको का?’’ आईच्या मनात बराच काळ ही खदखद असावी. तिचा रोख ईशावर होता हे उघडच होतं.

आता मात्र माझा पारा चढू लागला. ‘‘सरळ सांग ना, की ईशा घरात काही करत नाही असं म्हणायचंय तुम्हाला म्हणून. ती जी कामं करते- बिलं भरणं, बँकेची कामं, बाहेरून आणण्याच्या सगळय़ा गोष्टी तीच तर येताना आणते, ती तुम्हाला दिसत नाहीत ना! अमुक कामं पुरुषाची, अमुक बाईची अशी विभागणी नाही आमच्यात. जे ज्याला जमतं ते तो करतो.’’

‘‘म्हणजे, सगळं तुझ्याच गळय़ात ना! घरगडी बनवलंय तिनं तुला. आतासुद्धा तिला न्यायला जातो आहेस ते ड्रायव्हर म्हणून!’’

 ‘‘काय वाट्टेल ते बोलताय तुम्ही! तिच्याऐवजी मी बाहेर गेलो असतो, तर बोलला नसतात. पण ती गेली त्यावर इतका तमाशा करताय.’’ 

‘‘आम्ही तमाशा करतोय? अरे, तुला इतक्या लाडाकोडात वाढवलंय ते हे ऐकून घेण्यासाठी? कधी इकडची काडी तिकडे करू दिली नाही तुला.’’

  ‘‘तेच तर चुकलं! लहानपणापासून सगळय़ा गोष्टी करायला शिकवलं असतंत ना, तर मी आता जे करतोय, त्यात वावगं नसतं वाटलं तुम्हाला,’’ मीही इरेला पेटलो.

 ‘‘वा! आता आमच्या चुका काढतोस? का, तर ईशानं डोक्यावर हात ठेवला म्हणून?’’

आता मात्र माझा संयम संपला. ‘आल्यापासून बघतोय, तुम्ही सतत ईशाच्या कागाळय़ा करताय. तुम्हाला दुसरा विषय नाही का? आम्हाला जगू द्या ना आमच्या पद्धतीनं! तुम्हाला इथं राहायचं असेल तर आमच्यात ढवळाढवळ करू नका!’’ माझा स्वर टिपेला गेला असावा.

एकदम सन्नाटा पसरला. सगळे जण आपापल्या खोल्यांत गेले. दोन-तीन दिवस या शांततेचं सावट घरावर पसरलं होतं. मग बाबांनीच विषय काढला.

‘‘वैभव, आम्ही लवकर जायचं म्हणतोय.’’

 ‘‘का? काय झालं?’’ विचारतानाच प्रश्नातला फोलपणा माझ्या लक्षात आला.

‘‘अरे, तिथली कामं उरकायची आहेत. वेळेवर गेलेलं बरं,’’ ते विषय संपवत म्हणाले.   

 मी गप्प बसलो. आमच्यात हे काय चाललं होतं? ते लंगडय़ा सबबी सांगत होते. मी कळूनही न कळल्यासारखं दाखवत होतो. खरी कारणं दोघांनाही माहीत होती. तरीही ती माहीत नसल्याचा आम्ही दोघंही आव आणत होतो. आपली प्रिय माणसंही अशी परकी होतात.

 ‘‘तिकिटं काढायची आहेत का?’’ मी विचारलं.

 ‘‘नको. आम्ही बुक करू. काही अडचण आली तर सांगू.’’    

मग आमचं बोलणंच संपलं..

आईबाबांना विमानतळावर सोडलं तेव्हाही अगदी जुजबी बोलणं झालं. आईबाबांचा उतरलेला चेहरा सारखा डोळय़ांसमोर येत होता. पोटात गलबलून येत होतं. ते प्रवेशद्वारातून थेट आतपर्यंत जाईपर्यंत मी पाहत होतो. आमच्यातलं अंतर झपाटय़ानं वाढत होतं. ते कधी सांधलं जाणार होतं का?..