मंदार भारदे
आजकाल प्रत्येकाच्या प्रत्येक व्यवहाराला पासवर्डशिवाय मोक्ष नाही. या पासवर्डमुळे कोणाकोणाचं काय काय सुरक्षित राहातं ते राहो बापडं, पण त्यामुळे त्या कर्त्यांधर्त्यांच्या मनाचा वेध घेणं सोपं होतं ना राव. जसं ‘जालीम जमाना १२३’ हा ज्याचा पासवर्ड असेल त्याला आता कोणीही उधार देत नाही हे समजून जावं, तर प्रेमात असणारी ‘यू आर माय डार्लिग जिगर’ भांडण झाल्यावर ‘गेला उडत @तू कौन मै कौन’ करतेच. पण खरी ग्यानबाची मेख आहे ती ‘डर’ वा ‘भय’मध्ये. भेदरलेला माणूस जसा दिसेल त्या देवाच्या पाया पडतो, तसे हे बिथरलेले ग्लोबलायझेशन जिकडेतिकडे पासवर्ड टाकत सुटले आहे. यंदा ४ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक पासवर्ड डे’ आणि उद्याच्या (१ मे) च्या ‘जागतिक हास्यदिना’निमित्ताने ही कोपरखळी..
मला स्विस बँकेत खाते उघडायचे होते. माझ्या स्टेट बँकेतून साडेएकोणीस हजार रुपये मी काढून आणले आणि गादीखाली ठेवून दिले, माझे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक अशा दोन बँकांत खाते आहेच, पण खूप सारे सिनेमे आणि चॅनेल पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले, की जोपर्यंत स्विस बँकेत तुम्ही खाते उघडत नाही तोपर्यंत मजा नाही.
दर थोडय़ा थोडय़ा महिन्यांनी स्विस बँकेत खाते असणाऱ्यांची नावे कुठे ना कुठे छापून येतात. जिल्हा बँकेत माझे गेली २० वर्षे खाते आहे, पण आजवर त्यामुळे माझेच काय, कोणत्याही खातेदाराचे नाव कधी छापून आले नाही. मी फार बारकाईने पनामा पेपर किंवा स्विस बँकेतले खातेदार अशा लोकांची यादी वाचत असतो. जवळजवळ कधीही यात मराठी लोकांची नावे आढळत नाहीत. मराठी माणसाने कोणत्याही क्षेत्रात मागे राहूच नये, असे माझे मत असल्याने मी ही जबाबदारी माझ्यावरच घेतली आणि साडेएकोणीस हजारात जर इतक्या साऱ्या वर्तमानपत्रांत आपले नाव छापून येणार असेल, तर हा काही फार धोक्याचा सौदा नाही असेच माझे मत झाले.
स्विस बँक ही संशयास्पद व्यवहार करायला सोयीची बँक असल्याचे मला सांगितले गेल्याने तिची शाखा एखाद्या पायपात किंवा भुयारात असेल, बहुतेक तिची कामकाजाची वेळ रात्री
१२ ते सकाळी साडेतीन असेल, काळय़ा पैशांचा संबंध येत असल्याने बँकेत अंधारच असेल आणि बॅटरी हातात घेऊन चाचपडत चालावे लागत असेल, सगळे कुजबुजत एकमेकांशी बोलत असतील अशा माझ्या काही कल्पना होत्या. तिथे फॉर्मवर चिकटवायला डोळय़ांवर पट्टी बांधूनच पासपोर्ट साइज फोटो काढावा की काय, असाही माझा विचार होता. कोणी तरी मला म्हणाले, की तिथे एका लॉकरमध्ये पैसे ठेवतात. तुम्हाला जेव्हा पैसे काढायचे असतात तेव्हा तुम्हाला एक पासवर्ड देतात आणि तिथल्या कर्मचाऱ्यांकडे एक पासवर्ड असतो. दोघांचे पासवर्ड जुळले की दार उघडते आणि ते पैसे देऊन टाकतात. पासवर्ड ही फक्त ओळख, कोण आले, कधी आले याच्याशी त्यांना काहीही घेणेदेणे नाही जो पासवर्ड घेऊन येईल त्याला ते पैसे देऊन टाकतात. पण पासवर्ड म्हटले की माझ्या पायातले बळच जाते. माझ्या खात्यातून लोकांनी पैसे काढून नेले तर मला कमी त्रास होईल, पण पासवर्ड लक्षात ठेवणे हा मोठा ताप आहे. पासवर्ड हा शब्द आल्याआल्या मी स्विस बँकेत साडेएकोणीस हजार ठेवून प्रसिद्ध व्हायचा माझा बेत रहित केला.
मागे एकदा लोकांच्या नादी लागून मी अगदी अवघड पासवर्ड ठेवले.‘नारोशंकराची घंटा @ MH १५’, त्यात घंटेतला जी कॅपिटल आणि ‘गोदेचे झुळझुळ पाणी होऊ दे खर्च १२%’ असे दोन पासवर्ड आपण लक्षात ठेवायचे असे ठरवले, रातोरात सगळय़ा ईमेल, ऑनलाइन बँक खाती, प्रवासासाठीची पोर्टल, सगळय़ा मेम्बरशिप्स इथे फक्त दोनच पासवर्ड ‘नारोशंकराची घंटा @ MH 15 , त्यात घंटेतला जी कॅपिटल आणि ‘गोदेचे झुळझुळ पाणी होऊ दे खर्च १२%’. पण, दोनच दिवसांत घंटेतला जी कॅपिटल आणि झुळझुळचा झू हा jhoo की jhu हे मी विसरलो (इतर अक्षरेही विसरलोच बहुधा) आणि माझ्यावर आभाळ कोसळले, हाहाकार झाला, सगळय़ा ईमेल, बँक अकाऊंट ब्लॉक झाले. ईमेलमध्ये जे काही होते त्यातल्या कशाचाही कोणताही बॅकअप नव्हता, कोणताही दुसरा रिकव्हरी नंबर किंवा ईमेल नव्हता. सगळेच्या सगळे ईमेल पुन्हा नवीन बनवायला लागले आणि सगळय़ांना ते कळवत बसावे लागले.
आज हे सगळे आठवायचे कारण म्हणजे, मे महिन्याचा पहिला गुरुवार हा ‘जागतिक पासवर्ड डे’ म्हणून गेली काही वर्षे साजरा केला जातोय. लोकांनी या दिवशी आपल्या पासवर्डबद्दल अधिक जागरूक व्हावे, अधिक सजग व्हावे असे अपेक्षित आहे. जगातले अनेक जण या दिवशी आपला पासवर्ड बदलून हा दिवस साजरा करतात. लोक वर्षोनुवर्षे आपला पासवर्ड बदलत नाहीत आणि त्यामुळे अकाऊंट हॅक करणाऱ्यांचे फावते असा अनुभव आहे. त्यामुळे लोकांना पासवर्ड बदलायला प्रोत्साहन मिळावे म्हणूनही या दिवसाचे औचित्य आहे.
हे विविध ‘डेज्’ साजरे करण्याचे मोठेच फॅड आजकाल आलेले आहे. लोकांना काय साजरे करायला काही तरी निमित्त हवे असते. पूर्वी कोणता तरी सत्पुरुष जन्माला आला किंवा कोणत्या तरी लढाईत मारला गेला, एखाद्या खलपुरुषाचा वध झाला तर साधारण ते ‘डे’ साजरे करायची पद्धत जगभर होती. पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये वगैरे बघितले तर हे ‘डेज्’ कळायचे. आजकाल अचानकच कुठून तरी आता अमुक दिवसाला तमुक ‘डे’ म्हणायचे असे कळते. ‘कच्चा बदाम डे’ ,‘गंजका पत्रा डे’ किंवा ‘मसाला छास डे’ हे एव्हाना कुठे तरी सुरू झाले असतीलच. ‘गंजका पत्रा डे’ला घरातील सगळय़ात गंजक्या पत्राच्या समोर उभे राहायचे, पान खाऊन रंगलेली जीभ घरादाराने बाहेर काढायची आणि एक सेल्फी काढायचा, असा काही तरी विधी असणार. युरोपमध्ये इसवी सनपूर्व तीनशे वर्षांपूर्वी एक प्रेमी जोडपे नदीकिनारी हातात हात गुंफून बसलेले होते, प्रेमिकेने आपली मान जोडीदाराच्या खांद्यावर ठेवलेली होती, अचानक सोसाटय़ाचा वारा सुटला आणि दूरच्या एका घरावरचा गंजका पत्रा उडाला आणि त्या उडत्या पत्र्याने प्रियकराचे डोके उडवले. आपल्या प्रेयसीचा आपल्या खांद्यावर डोळा लागला आहे आणि आता आपले शिर उडाल्याने आपले धड जर धाडकन पडले तर प्रेयसीची धडकन थांबू शकते आणि मग आपली काही धडगत नाही असा विचार बाकी शेष धडाने केला आणि धड उडालेल्या अवस्थेतही स्वत:च्या हृदयाची धडधड तोपर्यंत सुरूच ठेवली जोपर्यंत प्रेयसी धड डोळा उघडत नाही, प्रियकराच्या या धडपडीचे प्रतीक म्हणून आणि भविष्यात कोणीही आपल्या घरावरच्या पत्र्याला गंजक्या अवस्थेत ठेवू नये म्हणून लोकांनी खूप धडपड केली, शासनदरबारी धडका मारल्या आणि त्यातूनच ‘गंजका पत्रा डे’ जन्माला आला. हल्ली ‘सेमी इंग्लिश’च्या जमान्यात तर या ‘डेज्’नी फारच धमाल उडवली आहे. निशाला लग्नानंतर सहाच महिन्यात ‘डेज्’ राहिले, किंवा दहावा, बारावा, तेरावा डे हल्ली एकाच डेला करतात त्यामुळे कसली सोय झालीये नाही? मागे एकदा आप्पांच्या तेराव्या डेला कावळय़ाने फारच अडवून पाहिले होते. एका सेमी गब्रूने आईला नागपंचमी म्हणजे ‘नाग’ डे का, असे विचारून घाम फोडला होता. तर ते असो..
या ‘पासवर्ड डे’च्या निमित्ताने पासवर्डसक्तीने उडवलेल्या हाहाकाराच्या कथा आज आठवताहेत. आधी तुम्ही बँकेत जायचे, विथड्रॉव्हल स्लिप भरून द्यायची, बँक कर्मचारी सही तपासणार, शिल्लक तपासणार आणि पैसे देऊन टाकणार. सगळा सोपा मामला! वर्षांनुवर्षे रजिस्टर आणि फायलीत करोडो रुपयांचे हिशोब सुरक्षितपणे सांभाळल्यावर आता व्यवहार ऑनलाइन का करायचे आणि त्याने काय सुरक्षित होणार आहे हेच त्यांना कळले नाही. एका राष्ट्रीयीकृत बँकेत माझ्या जवळचे अधिकारी होते. त्यांनी मला सांगितले, की ऑनलाइन व्यवहार करायला जेव्हा बँक आपल्या कर्मचाऱ्यांना सांगत होती तेव्हा अनेक कर्मचाऱ्यांनी आपले ऑनलाइन व्यवहारांचे पासवर्ड लक्षात राहावे म्हणून बँकेच्या भिंतीवर लिहून ठेवले होते किंवा समोर टेबलावरच चिकटवले होते. वरिष्ठांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या या ‘पारदर्शकते’बद्दल कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हादरली होती.
पेन्शन येण्याच्या आठ-दहा दिवस पूर्वीपासून आले का पेन्शन, हे विचारायला बँकेत जाणे, आल्यानंतर ते एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर करणे, नंतर एका बँक खात्याचे पासबुक भरून आणणे, मग दुसऱ्याचे भरून आणणे, परत कधी येणार पेन्शन हे विचारायला टोळक्याने बँकेत जाणे आणि तिथे बसून राष्ट्रीय राजकारणाच्या गप्पा मारणे, हे ‘सीनियर सिटिझन’चे राष्ट्रीय कर्तव्य. ही सगळी कामे ऑनलाइन होऊ शकतात असे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर ‘सीनियर सिटिझन’ लोकांत संतापाची लाट पसरली. बँकेच्या कर्मचाऱ्यांना काम करायचा आणि आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा आळस आहे, म्हणून त्यांनी ऑनलाइन बँकिंग आणि पासवर्ड ही भानगड शोधून काढली असेच त्यांना वाटले. आम्हाला पासवर्ड लक्षात ठेवायला लावून बँकेतले लोक स्वत:ची कामे टाळतात, असाच त्यांचा समज झाला. माझ्या माहितीतल्या एका पेन्शनर ग्रुपने बँकेने पाठवलेले पासवर्ड सगळय़ांनी एकत्र जाऊन बँक मॅनेजरच्या टेबलवर आदळले आणि ‘तुमचा काम करायचा आळस म्हणून आम्हाला कामाला लावू नका. हे घ्या आमचे पासवर्ड आणि आम्ही आलो की आम्ही जितक्या वेळेला विचारू तितक्या वेळेला आम्हाला बॅलन्स सांगत जा,’ म्हणून ठणकावून सांगितले. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात विनाकारण पैसे ट्रान्स्फर करणे हा पेन्शनर लोकांचा राष्ट्रीय छंद आहे. याचा अतिरिक्त ताण बँकिंगवर पडायला लागला म्हणूनच हे पासवर्ड आधारित वैयक्तिक बँकिंग आले असावे असे मला वाटते. आजही किती तरी ‘सीनियर सिटिझन’ विसरू नये म्हणून ‘कालनिर्णय’वर पासवर्ड मोठय़ा अक्षरात लिहून ठेवतात. माझ्या एका मित्राने मला एकदा सांगितले, की तो दिवसातून दोनदा आपल्या बँक खात्याचा पासवर्ड बदलतो. सकाळी उठल्यानंतर एकदा आणि दुपारी जेवण झाल्यानंतर एकदा. सतत पासवर्ड बदलत राहिल्याने आपले खाते कोणी ‘हॅक’ करू शकत नाही, असे त्याला कोणी तरी सांगितले आहे. ही चिकाटी आणि सुरक्षिततेचा त्याचा ध्यास अनाकलनीय आहे. मिनिमम बॅलन्स ठेवता न आल्याने दर महिन्याला त्याला बँक दंड लावते. आता असल्या अकाऊंटला कोण कशाला ‘हॅक’ करेल? पण त्याला किमान बॅलन्स राखता येत नसला तरी आपल्या खात्याची सुरक्षितता राखण्याची त्याची चिकाटी कौतुकास्पद आहे.
कोणी एखाद्याची सही पाहून त्याच्या स्वभावाचा अंदाज लावतो, कोणी कपाळावरच्या रेषा किंवा देहबोली पाहून स्वभावाचा अंदाज लावतो, पण आता त्यापेक्षा जास्त नेमकी पद्धत म्हणजे एखाद्याचा पासवर्ड जर कळला तर त्याच्या मनात काय सुरू आहे याचा नेमका अंदाज लावता येऊ शकतो. ‘जालीम जमाना १२३’ हा ज्याचा पासवर्ड असेल त्याला आता कोणीही उधार देत नाही हे समजून घ्यावे, ‘जानू @ माय सोलमेट’ पासवर्ड असणाऱ्या कन्यकेबरोबर सोलमेट कोण आहे हे बघायला जावे हे उत्तम. एक संशोधन असे सांगते, की बहुतांश लोक आपल्या जवळच्या लोकांच्या नावाचा उपयोग किंवा आपली जन्मतारीख याचा उपयोग आपल्या पासवर्डमध्ये करतात. त्यामुळे हे सगळेच पासवर्ड क्रॅक करायला फारच सोपे असतात. बहुतांश स्त्रिया आपले माहेरचे आडनाव हे जणू काही कोणाला माहीत नसलेले गुपित आहे अशा आविर्भावात त्याचाच पासवर्ड म्हणून उपयोग करतात. ‘लव्ह यू गुड्डी पप्पू’, ‘लाडके पूर्ती अर्णव’ अशा प्रकारचे पासवर्ड तर ढिगाने आहेत. अगदी सामान्य वकुबाचा हॅकरही सहज त्यांना शोधून काढू शकतो. प्रेमात पडलेल्या किंवा लग्न ठरलेल्या जवळजवळ सगळय़ा मुली आपल्या प्रियकराचे किंवा होणाऱ्या नवऱ्याचे नावच पासवर्ड म्हणून ठेवतात. त्यांना वाटते आता कोणालाच ओळखता येणार नाही. भांडण झाले की पासवर्ड बदलून टाकतात. ‘यू आर माय डार्लिग जिगर’चे भांडण झाल्यावर ‘गेला उडत @ तू कौन मै कौन’ होते, ईसीजी पाहिल्यावर जसे हृदयाचे काय चालले आहे याचा अंदाज येतो, तसे काही तरी करून गेल्या सहा-आठ महिन्यातले तरुणांचे पासवर्ड कळले तर पाणी कुठून कुठे वाहत निघाले आहे याचा अंदाज लावता येऊ शकेल. माझ्या परिचयातल्या एका काकांनी शेजारच्या इमारतीतल्या एका काकूंच्या नावाचाच पासवर्ड ठेवला. दोनचार वर्षे बरे चालले, पण नंतर त्यांच्या स्वपत्नीच्या लक्षात आले तेव्हा तिने धुमाकूळ घातला. काकांनी शांतपणे सांगितले, ‘कोणालाही सहज ओळखता येणार नाही आणि तुम्ही मात्र कधीही विसरणार नाही असा पासवर्ड ठेवायचा होता म्हणून शेजारच्या इमारतीतल्या काकूंच्या नावाचा पासवर्ड ठेवला.’ आता बोला!
पुढच्या आठवडय़ात ‘जागतिक पासवर्ड दिन’ आहे. या अनुषंगाने खोलवर रुजत चाललेल्या पासवर्ड संस्कृतीचा विचार मनात येत राहतो. घराच्या दरवाजापासून, कॉम्प्युटपर्यंत, ईमेल अकाऊंटपासून बँक अकाऊंटपर्यंत, सिनेमाची तिकिटे काढण्यापासून ते विमानाची तिकिटे काढण्यापर्यंत सगळीकडे पासवर्ड आहेत. कोणी तरी चोरी करेल हे मुख्य भय, मग ते पैसे असोत किंवा गुपित, त्यामुळे पासवर्डच्या कडीकुलपात सतत काही तरी लपवून ठेवण्याची सारी लगबग. कोणालाच प्रश्न पडत नाही की या फुटकळ आयुष्यात सांभाळून ठेवावी अशी संपत्ती तरी कोणती आहे आणि जिवाच्या कराराने जगापासून लपवून ठेवावे असे लांच्छन तरी कोणते आहे? जिथे जिथे शक्य आहे तिथे माणूस पासवर्ड टाकत चालला आहे, कोणाला घाबरता आहात? कोणापासून काय लपवता आहात? काय चोरीला जाणार आहे? प्रश्न कोणाला विचारणार आणि उत्तरं कोण देणार? भाजी मागवायच्या ॲपला पासवर्ड, पोरांच्या शाळेचा होमवर्क जिथे येतो त्या ॲपला पासवर्ड, लाँड्रीची ऑर्डर द्यायच्या ॲपला, सोसायटीची तक्रार करायच्या ॲपला, औषधं मागवायच्या ॲपला, मांजराच्या हेल्थ चेकअपच्या ॲपला, कटिंगची अपॉइंटमेंट घ्यायच्या ॲपला, सगळय़ाला पासवर्ड आहेत. कोण कोणाला घाबरतंय काहीच कळत नाही. म्हणजे भाजी मागवायच्या ॲपपने जास्तीत जास्त काय धोका होऊ शकतो? माझ्या ॲपवरून शेजाऱ्याने चोरून कांदे मागवले तर काय होईल? पोरांनी होमवर्कमध्ये काय बोंब पाडली आहे हे काय राष्ट्रीय महत्त्वाचे गुपित आहे काय, की ते लपवायला पासवर्ड टाकला आहे? सारखे सारखे माणसाला पासवर्ड टाकायला लावणे हे मानवजात सभ्य आहे, सज्जन आहे, या गृहीतकाला आव्हान आहे, पण असे कोणाला वाटतच नाही. भेदरलेला एखादा माणूस कसा दिसेल त्या देवाच्या पाया पडत जातो तसे हे बिथरलेले ग्लोबलायझेशन जिकडेतिकडे पासवर्ड टाकत सुटले आहे. गावभर सगळीकडे पासवर्ड टाकून दरवाजे बंद केल्यावर जगाची कवाडं कशी उघडणार आहेत? मेंदूला कडेकोट पासवर्ड टाकून बंद केल्यावर मागच्या दाराने अक्कल पळून गेली ना भाऊ!
येडय़ाचा बाजार अंडर स्कोअर खुळय़ाचा ग्लोबल शेजार @ २०२२
Mandar.bharde@gmail.com



