डॉ. वृषाली किन्हाळकर
नवराबायकोच्या नात्यात संयम आणि विवेकासोबतच व्यक्ती म्हणून एकमेकांना आदर देणं महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला ते सदासर्वकाळ जमू शकतं का? काळानुसार स्त्रीची व्यवधानं बदलली आहेत, तिचं हे बदलतं रूप स्वीकारत, पुरुषानंही तिचा खऱ्या अर्थाने सहचर बनायला हवं. अन्यथा घटस्फोटाचा, टोकाचा मार्ग स्वीकारायला लागू शकतो…
एका गावात एक सत्पुरुष राहत असत. एकदा एक युवक त्यांच्याकडे आला आणि त्यानं विचारलं, ‘‘महाराज, सुखी संसाराचा मंत्र सांगू शकाल काय?’’ ती सकाळची वेळ होती. सर्वत्र सूर्यप्रकाश पसरलेला होता. महाराजांनी पत्नीला हाक मारून, कंदील पेटवून आणायला सांगितलं. थोड्याच वेळात पत्नी कंदील घेऊन आली व निमूटपणे कंदील तेथे ठेवून घरात निघून गेली. तो युवक बुचकळ्यात पडला. त्याला वाटलं, इतका स्वच्छ उजेड असताना कंदिलाची काय गरज असावी बरं?
त्यानं उघडपणे विचारलं, ‘‘महाराज, दिवसा या कंदिलाच्या प्रकाशाची काय गरज होती?’’ महाराज हसत उत्तरले – ‘‘तुझ्या प्रश्नाचं उत्तर यातच तर आहे.’’ संसारात पती-पत्नी दोघांनीही, परक्या व्यक्तीसमोर एकमेकांना प्रतिप्रश्न करणं टाळावं. माझ्या पत्नीला देखील हाच प्रश्न नक्कीच पडलेला असणार. परंतु तिनं तुमच्यासमोर मला प्रति प्रश्न करणं टाळलं. खुलासा तर पुन्हा कधीही, निवांतवेळी करता येऊ शकतो, असा विवेकपूर्ण संयम तिनं दाखवला. मीसुद्धा तिच्याशी असंच वागतो. हेच सुखी संसाराचे सूत्र आहे.
आणखी वाचा-आहे जगायचं तरीही…
अर्थातच कोणत्याही प्रश्नाला असं इतकं सरळ साधं आणि एकच एक उत्तर नसतं, परंतु कोणत्याही नात्यात संयम आणि विवेकासोबतच व्यक्ती म्हणून एकमेकांना आदर देणं महत्त्वाचं आहे. निशा आणि सुशांतच्या लग्नाला एक वर्ष झालं. दोघांचेही पालक आपापल्या गावी राहतात आणि ही दोघं मुंबईत. दोघेही आपापल्या पालकांचे एकुलते एक अपत्य.
सुरुवातीच्या काळात सुशांत रोज आईला फोन करून सविस्तर बोलायचा आणि निशाला देखील सहभागी व्हायला सांगायचा. ती देखील बोलायची. पुढे दोघांचंही ऑफिस सुरळीत सुरू झालं. सुशांत रोज घरी आल्यावर निशाला विचारायचा, ‘‘आईशी बोललीस ना?’’ ती देखील सांगायची, ‘‘हो बोलले ना’’ पुढे पुढे निशाला वाटायचं, रोज रोज काय बोलायचं? काही नवं घडलेलं नाही. मग करू चार-पाच दिवसानंतर फोन. त्यानंतर एक आठवडा होऊन गेला. तिच्या कामाच्या ताणात तिला सवडच झाली नाही फोन करायला. एकदा सहज सुशांतनं चौकशी केली अन् तिने फोन केला नाही म्हणताच तो एकदम चिडला! त्याचा तो आक्रमक आग्रही सूर बघून मग निशाला देखील त्याचा राग आला. ती स्पष्टच म्हणाली, ‘‘तू करत जा ना फोन, मलाच एवढी सक्ती का करतोस? जसे तुझे आईवडील तिथे एकटे असतात तसेच माझे देखील आईवडील एकटेच गावी राहतात ना, मग तू एकदा तरी त्यांच्याशी बोललास का, हे तरी बघ. तुझ्या आईवडिलांची चौकशी मी करीनच की, पण असा हुकूम सोडल्याची भाषा नकोय.’’ दोघेही गप्प झाले! तो शनिवार-रविवार स्तब्ध, मूक गेला. निशाला वाटलं की, आपण देखील फारच स्पष्ट पण तोडून बोललो.
तिने नंतर जरासं नमतं घेऊन संवाद करायचा प्रयत्न केला, परंतु सुशांतचा सूर बदलला नाही. न चुकता रोज आईला फोन करायलाच हवा, ही त्याची इच्छा नव्हे आदेशच होता. निशा रोज कर्तव्य केल्यासारखं सासूशी बोलत राहिली. पुढे पुढे सासूनं, तू इतक्या उशिरा घरी येतेस, त्यापेक्षा दुसरी साधी नोकरी बघ. तू सुशांतच्या आधी घरी यावंस, अशा अपेक्षा बोलून दाखवायला सुरुवात केली. त्यातच निशाला ऑफिसमध्ये आव्हानात्मक काम मिळालं होतं. ती उत्साहात काम करायची. पण निशाच्या करियर बाबत सुशांतदेखील उदासीन असायचा. आईच्या आणि सुशांतच्या बोलण्याचा रोख एकुणात निशाचे पंख कापण्याकडे आहे, असं निशाला जाणवू लागलं तेव्हा तिनं फोन करणं खूपच कमी केलंय आणि त्यामुळे निशा सुशांतमध्ये एक थंड दुरावा येतोय.
आणखी वाचा-आला हिवाळा…
…पासष्टीच्या आसपास असणारे देशपांडे पती-पत्नी. त्यांची मुलगी अमेरिकेत असते. मागच्या वर्षी देशपांडे पती-पत्नी तीन महिने तिच्याकडे होते, कारण तिला मुलगी झाली होती. निवृत्तीनंतरचे सुखासीन आरामशीर आयुष्य व्यतीत करणारे देशपांडे मजेत होते. परंतु देशपांडे बाईंना मात्र नातीचं, मुलीचं अन् नवऱ्याचं देखील सगळं करावं लागायचं. अमेरिका पाहणं वगैरे तर दूरच त्यांना पुरेशी झोपही मिळत नव्हती. निवांतपणा किंवा आराम नव्हताच. त्यांच्या मुलीच्या-श्रुतीच्या हे लक्षात आलं होतं. निवृत्त झाल्यावर देखील आईला मोकळेपणा नाही, याचं तिला वाईट वाटायचं. या वर्षी तिने आईला एकटीलाच स्वत:कडे बोलावून घेतलं. आणि बाबांना म्हणाली, ‘‘तुम्ही आलात की तिला तिच्या मनासारखं निवांतपण मिळत नाही. तुमच्याच तंत्राने, तुमच्याच वेळापत्रकानुसार ती आयुष्यभर जगली. आता तरी तिला थोडं निवांतपण मिळू द्या ना.’’ दोन महिने देशपांडे बाई लेकीसोबत निवांत राहून परतल्या. आता देशपांडेना लक्षात आलं आहे, आपण निवृत्त झालो, ती देखील नोकरीतून निवृत्त झालीय; परंतु तिला आपलं सगळं करावंच लागतंय. हळूहळू आता त्यांनी पत्नीला घरकामात मदत करणं सुरू केलंय. तीदेखील थकते, याची रास्त जाणीव त्यांना झाली आहे आणि छोटयाशा का होईना, मदतीमुळे देशपांडेबाई देखील सुखावल्या आहेत. कोणत्याही वयातल्या पती पत्नीसाठी आवश्यक गोष्ट म्हणजे एकमेकांच्या माणूसपणाचा रास्त आदर करत, सुख-दु:ख आणि कामं वाटून घेणे. कधी कधी एखादी लहानशी कृती देखील मोठा आनंद देऊन जाते. कालपर्यंत, पत्नीला गृहीत धरूनच संसार व्हायचे. आज स्त्रीला आत्मभान आलेलं आहे; त्यामुळे तिची स्वप्नं, तिचं काम, तिचं माणूसपण याचा विचार करून पतीला बदलायचं आहे. स्त्री बदलली आहे, तिचं हे बदलतं रूप स्वीकारत, आपला पुरुषी अहंकार दूर सारून, तिचा सहचर बनायचं, हे प्रत्येक पुरुषाने ठरवायला हवं. शेवटी पुन्हा विवेक आणि संयम यांची सोबत तर हवीच आहे पती-पत्नी दोघांनासुद्धा.
आणखी वाचा-स्वभाव-विभाव : अवलंबित्वाचं जग!
गर्भवती करुणा माहेरी आली होती. तिच्या बाळाचं वजन कमी होतं. तिच्या नवऱ्याला हे कळलं तसं त्यानं तिला दिवसातून चार-पाच वेळा फोन करून काय काय जेवलीस, हे विचारणं सुरू केलं. बाळ सदृढ झालं पाहिजे याविषयी तो फारच आग्रही होता. तशी इच्छा असणं गैर नव्हतं; परंतु तो करुणाला फारच जबरदस्ती करू लागला. किती पोळ्या खाल्ल्या, कोणती फळं घेतली, हे अत्यंत बारकाईने विचारत त्याने पुढे पुढे व्हिडीओ कॉल करून तिचं जेवणाचं ताट, त्यातील पदार्थ पाहणं सुरू केलं. करुणाला या गोष्टीचा ताण येऊ लागला. शेवटी बाळ जेमतेम दोन किलोचं जन्मलं! नवरा प्रचंड नाराज! भांडणं…वाद… करुणाची तब्येतही प्रसूतीनंतर सुधारलीच नाही. तिचं वजन कमी झालं. ती गप्प उदास होऊन गेली. आता प्रसूतीला वर्ष झालंय. ती अजून माहेरीच आहे. दोन्ही घरांतील माणसं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच आहेत.
पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांना जराशी मोकळी देणं आवश्यक आहे. सतत सूचना, काळजी, आस्था याचा अतिरेक, समोरच्या व्यक्तीला गुदमरून टाकू शकतो. एखादी इच्छा असणे ठीक; परंतु आग्रही असू नये. रवींद्रनाथ टागोरांनी सांगितल्याप्रमाणे ‘‘सूर्यप्रकाशाप्रमाणे माझे प्रेम तुला वेढून राहो, तरीही मुक्त ठेवो’’ याचा नेमका अर्थ दोघांनाही कळला, तर किती छान होईल!
vrushaleekinhalkar@yahoo.com