रूथ क्यून, त्यांच्या आई फ्रीडल, सावत्र वडील ओटो कुहन, भाऊ हॅन्स, एबरहार्ड आणि लिओपोल्ड हे सहा जणांचं कुटुंब. यातील देखण्या रूथ यांनी आपल्या चतुर आणि सहज गप्पांतून अमेरिकेची अनेक गुपितं हस्तगत गेली. नंतर रात्रीच्या अंधारात दिव्याच्या उघड-झापेतून या कुटुंबाकडून जपानकडे अनेक संदेश पाठवले गेले. पुढे अर्थातच हे कुटुंब पकडलं गेलंच. काय होता या गुप्तहेर कुटुंबाचा इतिहास, जो रूथ यांच्या भाचीने, ख्रिस्तीन क्यून यांनी तीस वर्षांच्या प्रयत्नात खणून काढला?

१९९४ मधील नेहमीसारखा एक दिवस. अमेरिकेतील मेरीलँड इथल्या रेडिओ केंद्रातून आपलं काम आटोपून ख्रिस्तीन क्यून घरी पोहोचल्या. घरी एका लेखकाकडून त्यांच्या नावानं एक पत्र आलं होतं. पत्र वाचून त्यांना जबरदस्त धक्का बसला. कारण त्या पत्रात ख्रिस्तीन यांच्या आत्या आणि आजोबांवर अमेरिकेच्या विरोधात जपानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता.   

जी घटना त्यात नमूद केली होती, ती इतिहासाच्या दृष्टीनं फारच मोठी होती. जपाननं अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर केलेला हल्ला! या हल्ल्याच्या संदर्भात आपल्या आजोबा आणि इतर कुटुंबावर हेरगिरीचे आरोप आहेत! त्यांच्या क्यून कुटुंबाबद्दल इतकी खळबळजनक माहिती वाचून त्या झपाटून गेल्या. स्वत: एक पत्रकारही असल्यानं त्यांनी या विषयाच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं. तब्बल तीस वर्षं त्यांनी पुरावे गोळा केले, अभ्यास केला, आणि गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर २०२५ ला त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं, ‘फॅमिली ऑफ स्पाइज’. आता त्यांच्या आजोबांच्या घरातून नेमकी कोणती हेरगिरी झाली असावी?        

अमेरिकेतील पर्ल हार्बरजवळील कलामा परिसरातील एक आटोपशीर ब्युटी पार्लर… दुपारच्या निवांत वेळी तिथं अमेरिकी नौदल अधिकार्‍याच्या घरातला स्त्रीवर्ग नेहमी येत असे. पार्लरच्या मालकीण रूथ क्यून आणि त्यांच्या आई फ्रीडल क्यून या केशरचना, सौंदर्यप्रसाधन करता करता त्यांच्याशी निवांत गप्पा मारीत असत. अगदी सहज बोलता बोलता प्रश्न विचारत, ‘‘आजकाल बंदरावर जास्त जहाजं दिसत नाहीत?’’, ‘‘ते मोठं जहाज दुरुस्तीसाठी पाठवलं आहे का?’’ ,‘‘साहेब कुठं मोहिमेवर जाणार आहेत का?’’ किंवा ‘‘आजकाल वरून सारखी विमानं दिसतात… काय गडबड सुरू आहे?’’ साहेबांच्या या मंडळीदेखील नि:संकोचपणे सगळी माहिती देत असत. समोरच्यावर एकदम छाप पडेल असं रूथचं व्यक्तिमत्त्व आणि बोलण्याचं कसब होतं. 

सध्या समुद्रात कुठं आणि किती जहाजं आहेत, कशा कारवाया सुरू आहेत, याची माहिती अगदी सहज मिळायची. मग रात्री समुद्रावर सगळीकडे काळोख असताना पर्ल हार्बरजवळील क्यून कुटुंबाच्या घरात, वरच्या मजल्यावर जबरदस्त हालचाली सुरू होत. वरच्या खिडकीतून एक बारीक दिवा विशिष्ट पद्धतीनं चालू-बंद केला जाई. त्याची तीव्रताही कमी-जास्त असे. कधी कंदील तर कधी विजेरी वापरल्या जात. एखादा कोड असावा, या पद्धतीनं ते काम सराईतपणे पार पाडलं जाई. भर दुपारच्या लख्ख प्रकाशात क्यून कुटुंबाच्या गच्चीवर दोरी बांधून चादर वाळत घातल्या जात असत. चादरीचा रंग, वाळत घालण्याची वेळ, उतरवून घेण्याची वेळ यामध्येही गुपित दडलेलं होतं. नेमकं काय होतं ते? हे समजण्यासाठी आपल्याला संपूर्ण क्यून कुटुंब समजून घ्यावं लागेल.

जर्मनीत रूथ क्यून, त्यांची आई फ्रीडल, वडील (सावत्र) ओटो कुहन (Otto Kuehn), मोठा भाऊ लिओपोल्ड  आणि दोन लहान भाऊ हॅन्स व एबरहार्ड असं सहा जणांचं कुटुंब होतं. लिओपोल्ड हा जर्मनीचे प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स यांचा स्वीय सचिव होता. त्यानंच एका पार्टीत रूथ यांची ओळख गोबेल्स यांच्याशी करून दिली. जोसेफ गोबेल्स अधिकार्‍याला रूथ आवडत असत. लवकरच त्यांचे एकमेकांशी संबंध प्रस्थापित झाले. रूथशी आपले संबंध असणं नाझी सरकारच्या नियमांच्या आड येत आहेत हे लक्षात आल्यावर गोबेल्स यानं त्यांना कुठं तरी दूर पाठवण्याचा विचार केला. क्यून कुटुंबालादेखील जर्मनीतून बाहेर जाण्याची इच्छा होतीच. गोबेल्सच्या संपर्काचा वापर करून १९३५ च्या सुमारास क्यून कुटुंबास संयुक्त अमेरिकेतील हवाई इथं पाठवण्यात आलं. तेव्हा छोटा एबरहार्ड जेमतेम आठ वर्षांचा होता. या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांमधील चतुरपणा, रूथ यांचं सौंदर्य आणि चटपटीतपणा पाहून लवकरच त्यांना जपानी गुप्तचर संघटनेनं गाठलं. जपानसाठी हेरगिरी करण्याचा प्रस्ताव मांडला गेलाआणि महाप्रचंड रक्कम देऊ केली गेली.     

क्यून कुटुंबीयांनी पर्ल हार्बर तळ असणार्‍या ‘ओआहू’ या बेटावरील एका बंगल्यात आपलं बस्तान बसवलं. देखण्या रूथ संध्याकाळी बंदरावर फिरायला जात. तरुण नौदल अधिकारी यांच्याशी खेळीमेळीनं वावरत, गप्पा मारत असत. अनेकदा मेजवान्यांमध्ये सामील होत. त्यांच्या बोलण्याची समोरच्या व्यक्तीवर लगेच छाप पडत असे. अर्थातच त्यातून मिळेल तशी माहिती गोळा करणं हाच उद्देश असायचा. रणांगणावर न जाता, रक्तपात न घडवता अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवली जात होती.

क्यून कुटुंबाचा स्वतंत्र असा वेगळा व्यवसाय नव्हता किंवा कमाईचं ठोस साधन नव्हतं, पण त्यांचं राहणीमान मात्र फार उच्चभ्रू प्रकारातलं होतं. तो सगळा पैसा जपानी गुप्तचर संस्थेकडून येत होता. रूथ यांच्या संपर्कातून, पार्लरमधून माहिती मिळाली की, रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या खिडक्यांमधून विशिष्ट प्रकारे दिव्यांचा प्रकाश वापरून तो संदेश जपानी पाणबुड्यांपर्यंत पोहोचवला जाई. रूथ आणि त्यांचे सावत्र वडील ओटो यांनी दिव्यांची उघडझाप करून एक सांकेतिक भाषा बनवली होती.

‘आत्ता अमेरिकी युद्धनौका नेमकी कुठं आहे?’, ‘बंदरात किती जहाज संख्या आहे?’, ‘नजर ठेवण्याचा सुरक्षित काळ कोणता?’, ‘नौदल सैनिकांच्या तुकड्या कुठं सराव करत आहेत?’, ‘नवीन कुमक आली आहे का?’, ‘सध्या दूर राहा कारण पाणबुड्यांना धोका आहे’ असे सगळे संदेश दिव्यांच्या मार्फत पोचले जात. त्याशिवाय गच्चीवरील वाळत घातलेल्या चादरीचे रंग, चादर टाकण्याची आणि काढण्याची वेळ, यातूनही सांकेतिक भाषा निर्माण करण्यात आली होती. अमेरिकेच्या ‘पॅसिफिक फ्लीट’मधील जहाजांची संख्याही कळवण्यात आली होती. जपानी दूतावासातील अधिकारीदेखील असे संदेश जपान लष्करापर्यंत पोहोचवण्यास मदत करत असत.

बेटावरील अधिकारी वर्गातील कुणी तरी एखाद्या वेळी चौकशी करत असे की, क्यून कुटुंबीय तिथं नेमका कोणता व्यवसाय करतात? उपजीविका काय आहे, पण ते तेवढ्यापुरतंच. पुढे हळूहळू दुसर्‍या महायुद्धाला तोंड फुटलं. हे सगळं सुरू असताना एक दिवस जपानच्या वाणिज्य दूतावासात हालचाली सुरू झाल्या. लष्करी हवाई दल सक्रिय झालं, आणि अचानक ७ डिसेंबर १९४१ रोजी जपाननं अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर जबरदस्त हवाई हल्ला केला. बॉम्बस्फोट झाले, अमेरिकी ॲरिझोना युद्धनौका उद्ध्वस्त झाली,  इतर जहाजांनाही आग लागली. अकराशेहून अधिक नौसैनिक आणि मोठ्या संखेने नागरिकही मारले गेले. नौकेवरील विमानं उद्ध्वस्त झाली, आणि सगळीकडे हाहाकार माजला होता. अमेरिकेची मोठी हानी झाली होती. 

ती जपानच्या लष्कराची तयारीनिशी केलेली कारवाई होती. या हल्ल्यासाठी जपाननं जी तयारी केली, माहिती मिळवली, त्यातील काही अंश माहिती पुरवण्यात रूथ आणि कुटुंबाचा मोठा वाटा होता हे नक्कीच. जेव्हा त्यांच्या हेरगिरीबद्दल इतरांना समजलं त्यानंतर त्यांना त्या भागात ‘हेर कुटुंब’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं. हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकी सैन्याचं तपास दल एकदम सतर्क आणि सक्रिय झालं. होनोलुलु आणि जवळपासच्या परिसरात चौकशी सत्र सुरू झालं. (हवाई राज्य म्हणजे युनायटेड स्टेट्सचं बेट समूहाचं प्रवेशद्वार म्हणवलं जातं. होनोलुलु ही हवाईची राजधानी आहे) एफ.बी.आय.च्या (अमेरिकी तपास संस्था) काही अधिकार्‍यांना १९३९ पासून रूथ आणि कुटुंबावर संशय होताच, त्यांनी ताबडतोब क्यून यांच्या घरावर छापा मारला. पूर्ण घराची झडती घेण्यात आली.

आतल्या खोल्यांमध्ये रेडिओ संदेशवहन यंत्र सापडलं. अमेरिकी नौदलाची माहिती असणारी कागदपत्रं, नकाशे, आणि सामग्री सापडली. ठिकठिकाणी लपवून ठेवलेली रोख रक्कम मिळाली. १९३५ पासून डिसेंबर १९४१ पर्यंत एकूण १,००,००० पेक्षा जास्त डॉलर देऊन झाले होते. तपासात त्यांच्या घराच्या पडद्याच्या घड्यांच्या आत २००० डॉलरच्या नोटा लपवलेल्या आढळल्या. चित्र स्पष्ट झालं होतं.

८ डिसेंबर १९४१ ला, हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी कुटुंबप्रमुख म्हणून ओटो क्यून यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांनीही वैयक्तिकरीत्या अमेरिकी लष्कराची बरीच माहिती मिळवली होती. (त्या वेळी लगेचच रूथ यांच्यावर कारवाई झाली नव्हती.)

पुढील तपासात रूथ यांनी केलेली हेरगिरी उघडकीस आली, त्यात त्यांची आई फ्रीडल यांची साथ होती हेही सिद्ध झालं. ओटो क्यून यांना ताब्यात घेतल्यानंतर काही महिन्यांतच दोघींना अटक झाली. छोटा भाऊ हॅन्स हा काही कागदपत्रं जाळण्याचा प्रयत्न करताना सापडला, पण त्याच्या अटकेसंदर्भात स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. ओटो क्यून यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, पण नंतर ती ५० वर्षांच्या जन्मठेपेत बदलली गेली. रूथ आणि फ्रीडल यांना सँड आयलंडमध्ये  लष्करी कैदेत ठेवण्यात आलं.

१९४२ ते १९४५ या काळात साधारण तीन वर्षं दोघी कैदेत होत्या. रूथ यांनी त्यांच्या हेरगिरीची सगळी तपशीलवार माहिती अमेरिकी तपास अधिकार्‍यांना दिली.

रूथ यांचा भाऊ एबरहार्ड याला घरातील लोकांची काय गडबड सुरू आहे हे कधी लक्षात आलं नाही. तो हेरगिरीपासून अनभिज्ञ होता. वडिलांना अटक झाल्यावरच त्याला सत्य समजलं. मात्र हॅन्स आणि एबरहार्ड यांनाही काही काळ चौकशीसाठी अडकवून ठेवलं होतं, पण एबरहार्ड त्यातून सुटला. त्यानं हवाई मध्येच हायस्कूल शिक्षण पूर्ण केलं आणि अमेरिकेच्या सैन्यात भरती झाला. युद्ध शांततेनंतरही तो बाकी कुटुंबीयांसोबत जर्मनीस न जाता अमेरिकी सैनिक म्हणून तिथंच राहिला. विशेष म्हणजे युद्धसमाप्तीनंतर मायलेकींना जर्मनीला परत पाठवण्यात आलं. रूथ यांचा भाऊ हॅन्सदेखील जर्मनीत पोहोचला होता. त्याहूनही अचंबित करणारी बाब म्हणजे ओटो कुहन यांनाही पूर्ण ५० वर्षं शिक्षा भोगावी लागली नाही. साधारण १९४८ मध्ये त्यांची रवानगी ब्युनोस आयर्न्स इथल्या तुरुंगात झाली. त्यानंतर काही काळातच त्यांना मुक्त करण्यात आलं. त्यांच्या मृत्यूपूर्वी पुन्हा संपूर्ण कुटुंब एकत्र आलं हे त्यांचं विलक्षण भाग्यच म्हणावं लागेल.

१९६४ मध्ये आईच्या मृत्यूनंतर रूथनं आईची सगळी कागदपत्रं जाळून टाकली. पुन्हा एफ.बी.आय. आपल्या मागं लागू नये याची त्यांना चिंता होती. ख्रिस्तीन यांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला की, रूथ भूतकाळाबद्दल बोलण्यास टाळत असत.

ख्रिस्तीन ही रूथ यांचा भाऊ एबरहार्ड यांची मुलगी होती. मोठी होऊन तिने रूथ यांच्या कामगिरीचा इतिहास खणून जगापुढे आणला. १९४९ मध्ये रूथ पुन्हा अमेरिकेत पोहोचल्या तेव्हा त्यांनी लग्न केलं आणि पुढील आयुष्य शांत आणि गुप्ततेत घालवलं. रूथ यांनी भूतकाळाची पानं जाळून नष्ट केली तरी ती उरलेली राख अनेक प्रश्न उभे करून धुरळा उडवून गेलीच.

adaparnadeshpande@gmail.com