‘‘जायबंदी घारीला बरं झाल्यावर निसर्गात सोडलं, तरी ती माणसाची ओळख ठेवून ठरावीक वेळी खांद्यावर येऊन बसते.. जखमी मगर बरी झाल्यावर जणू ‘थँक्यू’ म्हणण्यासाठी माणसाभोवती गोल गोल फिरत राहाते.. पुरात वाहून गेलेली बदकं रस्ता शोधत बरोबर घरी परततात.. वाचायला अनोखी वाटणारी ही वर्णनं आमच्या बाबतीत प्रत्यक्ष घडली आहेत. आम्ही पाळीव आणि जंगली प्राण्यांना प्रेमाचा स्पर्श दिला आणि तेही दोन्ही हातांनी भरभरून आमच्यावर अधिक प्रेमाची उधळण करत राहिले..’’ सांगताहेत ‘पाणवठा’ या अपंग प्राणी आश्रमाचे संस्थापक गणराज जैन.

गोजिरवाणी, गोंडस पिल्लं बघितली की अनेकांना प्रेमाचं भरतं येतं! पण बेवारस, जखमी, हडकुळय़ा, चिडखोर प्राण्यांना अनेकदा लोक हाडतुड करतात. माझा जीव मात्र लहानपणापासूनच अशा दीनवाण्या पिल्लांसाठी कळवळे. शाळेतून येताना एखादं जखमी किंवा गारठून आडोशाला बसलेलं पिल्लू लगेच माझ्या नजरेत येई. मग त्याला उचलून घरी आण, गरम पाण्यानं पुसून, औषधोपचार करून त्याला खाऊपिऊ घाल, मग मऊ बिछाना करून त्यावर झोपव, असे माझे उद्योग चालायचे. यासाठी घरच्यांचा मारही खूप खाल्लाय मी, पण मी आजही तेच काम करतो..

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?
When a leopard came in front of Karkare couple who were giving nature education to students
पाऊलखुणा दिसताच ‘ते’ थांबले; समोर गेल्यानंतर ‘तो’ पुढ्यात उभा ठाकला; निसर्ग शिक्षणाचे धडे देणाऱ्या दाम्पत्याला…

कोकणातलं महाड हे माझं गाव. २६ जुलै २००५ च्या महापुरात निवारा गमावलेल्या बेवारस भटक्या प्राण्यांना पाण्यात बुडताना पाहून मी त्या पुरात उडी घेतली. सुदैवानं पोहण्यात तरबेज असल्यानं घरगुती साहित्याच्या आधारे दिवसभरात ६७ प्राण्यांना वाचवण्यात मला यश आलं. तेव्हा मी वीस वर्षांचा असेन. त्यातून मला अनाथ, अपंग प्राण्यांकरिता काम करण्यासाठी नवी उमेद मिळाली आणि मी शिक्षण, छोटेमोठे व्यवसाय सांभाळत प्राणिप्रेमी आणि सर्पमित्र म्हणून काम करू लागलो. दरम्यान, २००७ मध्ये माझा प्रेमविवाह झाला. पत्नी, डॉ. अर्चनाही महाडचीच. व्यवसायानं डॉक्टर. लग्नानंतर तिनं तिची प्रॅक्टिस सुरू केली आणि आमचा चारचौघांसारखा संसार सुरू झाला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं! २ सप्टेंबर २०१३ हा माझ्या आयुष्यातला मला आमूलाग्र बदलून टाकणारा दिवस. एका ‘रेस्क्यू’दरम्यान ‘इंडियन कोब्रा’ हा विषारी नाग मला चावला. मला वाटतं, माझी पूर्वपुण्याई आणि डॉक्टरांची पराकाष्ठा म्हणून मी वाचलो. मात्र डोळे उघडताच मी निश्चय केला, की हा जो पुनर्जन्म मिळालाय तो अपंग, जखमी प्राण्यांच्या सेवेसाठीच कारणी लावायचा. या निर्णयाला अर्चनानं साथ दिली आणि हे व्रत आपलं मानून स्वीकारलं हे माझं भाग्य!

आमच्या या निश्चयाची परीक्षा पाहणारा क्षणही लगेच आला. १६ सप्टेंबरला- म्हणजे दंश झाल्याच्या चौदाव्या दिवशी, ‘अमुक अमुक ठिकाणी एक अजगर सापडलाय,’ असा एका पत्रकार मित्राचा फोन आला. मी निघाल्याक्षणी मला एका शब्दानंही विरोध न करता अर्चना माझ्या स्कूटरवर मागे बसली आणि म्हणाली, ‘‘जे काही तुझ्या बाबतीत घडलं ते पाहाता तुला एकटय़ाला सोडून मी घरी शांत बसूच शकत नाही. त्यामुळे मला जमेल त्या प्रत्येक वेळी मी तुझ्याबरोबर येणार.’’ हा सोबतीचा धर्म ती गेली दहा वर्ष निभावतेय.

आमच्या कामाची सुरुवात अपघातात जखमी झालेले अनाथ प्राणी-पक्षी यांच्या मोफत उपचारांसाठी स्थापन केलेल्या ‘सफर’ या केंद्रापासून झाली. त्याच्या उभारणीसाठी मी गाडी, सर्व सोनंनाणं विकलं आणि ‘सफर’ या मोफत उपचार केंद्राची स्थापना केली. वरच्या मजल्यावर घर आणि तळमजला प्राण्यांच्या उपचारासाठी मोकळा! या केंद्राच्या माध्यमातून केवळ पाळीवच नव्हे, तर जंगली प्राणी-पक्षी यांचंही प्रेम आम्ही अनुभवलं. एकदा एक घार आमच्याकडे उपचारांसाठी दाखल केली गेली. आम्ही तिला ‘राधा’ म्हणायचो. कसल्याशा अपघातात तिचा एक पंख तुटला होता. ती सात-आठ महिने आमच्याकडे होती. हळूहळू ती बऱ्यापैकी पूर्ववत झाली, तिला उडता येऊ लागलं. पण ती दूर गेलीच नाही. आसपासच्या झाडांवरच राहायची. हाक मारली की झपकन झेप घेत माझ्या खांद्यांवर बसायची! हा तिचा प्रतिसाद पाहाण्यासाठी गावातून अनेक जण येत. इतकंच नव्हे, तर आम्ही स्कूटरवरून निघालो की ती वर उडत उडत आम्हाला सोबत करत असे! या अनोख्या दृश्याचेही अनेक साक्षीदार आहेत. तिचा एक नेम होता. सकाळी साडेसहा-सातला ती चोचीनं स्वयंपाकघराच्या दारावर टकटक करे. त्या वेळी अर्चना मुलांचे डबे करण्यात मग्न असे. मग पोहे, उपमा जे काही असेल ते थाळीत ठेवून तिला नैवेद्य दाखवावाच लागे! दुर्दैवानं आम्ही एका कार्यक्रमाला दिल्लीला गेलो असताना एका माणसाच्या बेचकीतल्या दगडानं तिचा वेध घेतला. पण माझ्या आणि अर्चनाच्याही खांद्यावरच्या तिच्या पकडीचे व्रण तिच्या अबोल प्रेमाची साक्ष आहेत, जे आम्ही आजही मिरवत असतो.

एकदा महाडच्या सावित्री नदीतला गाळ उपसण्याचं काम सुरू असताना ‘जेसीबी’च्या पुढच्या दात्यात जबडा अडकून एक मगर जखमी झाली. ती उपचारासाठी आमच्याकडे आणण्यात आली. तिला ठेवता येईल इतका मोठा पिंजरा आमच्याकडे नसल्यानं आम्ही तिला आमच्या बेडरूममध्ये ठेवलं आणि त्या खोलीचं दार लावून आम्ही हॉलमध्ये झोपू लागलो. बाकी दिवसभर ती मोकळी असायची. काही दिवसांनी आमचा अंदाज आल्यावर ती सौम्य झाली. आम्हाला ओळखू लागली. प्रतिसाद देऊ लागली. हळूहळू आमच्यातलं अंतर कमी कमी होत गेलं. ३२ दिवस ती आमच्याकडे होती. शेवटचे सात-आठ दिवस तर ती एवढी माणसाळली की आम्ही जेवायला बसलो की ती आमच्याभोवती गोल गोल फिरत राहायची. हे दृश्यही अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवलंय. मला राहून राहून वाटतं, की आमच्या सभोवताली फिरण्यातून ती ‘थँक्यू’ म्हणण्याचा प्रयत्न करत असावी!

पायात किडे पडलेल्या अवस्थेतलं ‘गोल्डन रीट्रिव्हर’ जातीच्या कुत्र्याचं एक पिल्लू एके दिवशी कुणी तरी जंगलात सोडून दिलं. हा गोल्डी आमच्याकडे आला तेव्हा जेमतेम वर्षभराचा होता. त्याचा एक पाय पूर्ण सडला होता. किडे पडलेल्या पायाच्या दरुगधीमुळे कुणीही त्याला जवळ करणं शक्य नव्हतं. मात्र उपचारानंतर त्यानं आमचं आयुष्य सुगंधी बनवलं! आला त्या वेळी त्याला होणाऱ्या वेदना सहनशक्तीपलीकडच्या होत्या. तो कुणाला जवळ येऊ देत नसे. मी त्याला चुचकारून, आंजारून-गोंजारून हळुवारपणे त्याच्या पायातले सर्व किडे काढले. मलमपट्टी करून त्याला दोन महिन्यांत बरा केला. पुढची १४-१५ वर्ष तो आमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून राहिला. अर्चनाचं तर ते तिसरं बाळ होतं! तिच्यावर दुसऱ्या कुणी हक्क दाखवलेला गोल्डीला चालायचा नाही. त्याला रागावलं तर तो जेवत नसे. नाना प्रकारे त्याची समजूत काढावी, तेव्हा कुठे साहेब चार घास खात! वार्धक्यानं तो गेला त्या दिवशी आम्ही कुणीही (आमच्या मुलांसह) जेवलो नाही. त्याची आठवण काढताच आजही काळजात कढ येतात. तो आजही आश्रमातल्या मातीत आहे आणि त्यावर लावलेलं बकुळीचं झाड त्याच्याप्रमाणेच सर्वाना सुखावत आहे.

गाडीनं उडवल्यामुळे एक पाय आणि एक डोळा गमावलेली अवनी (कुत्री) आमच्याकडे आली तेव्हा भयंकर चिडखोर झाली होती. आल्यागेल्याच्या अंगावर धावून जायची. पण आमच्या प्रेमानं ती सावरली, शांत झाली. आता तर ती कमालीची स्थिरावलीय.काही काळापूर्वी आमच्याकडे रस्त्यावर भटकणाऱ्या अशक्त, जखमी गायी येऊ लागल्या. त्यांना सांभाळलं नाही तर त्या कत्तलखान्यात पोहोचतील अशी भीती होती. गेल्या काही वर्षांत या गायींची संख्या वाढत वाढत ४५ झाली. आमची ही ‘सावली गोशाळा’ ‘सफर’ केंद्रातच होती. पण बाजूनं आडोसा नसल्यामुळे पावसाची झड येताच गायी भिजत. बांधकाम करण्यासाठी पैसे नव्हते. एक दिवस मी तिरमिरीत घरातलं फर्निचर, कपाट, सोफा विकून पैसे उभे केले आणि भिंत बांधली. यावर अर्चनानं ‘का?’ असा शब्दही उच्चारला नाही! उलट ही माऊली ४५ गायींचं शेण तीन वेळा काढून, तसंच त्यांना तीनदा खाणं-पाणी देऊन आपला दवाखाना सांभाळे.

गायींची संख्या वाढत जात असल्यानं उपचारांनंतर बऱ्या झालेल्या गाई गरजू शेतकऱ्यांना विनामूल्य देण्याचा उपक्रम सुरू केला. एकूण १६७ गायी दान करण्याचं पुण्य मिळालं. आमच्याकडे गाई, घोडे, गाढव, कुत्रे, मांजर, मोर, माकड, भेकर, सांबर, नीलगाय, घुबड, खार अशा एकूण साडेचार हजार प्राण्यांना नवजीवन प्राप्त झालं.हे सर्व सुरू असताना एक विचार मनात सारखा घुमत होता, की उपचारानंतर बऱ्या झालेल्या प्राण्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडून देणं योग्य आहे, पण ज्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आलंय त्यांचं काय? ते बाहेर कसा तग धरू शकतील?.. याच मंथनातून अपंग प्राण्यांच्या कायमस्वरूपी आश्रमाची संकल्पना मनात पक्की झाली. मुंबईच्या जवळ गेलं तर प्रकल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या मित्राच्या सल्ल्यामुळे २०१७ मध्ये बदलापूरजवळ चामटोली गावात ५० गुंठे जमीन घेऊन ‘पाणवठा’ हा अपंग प्राण्यांचा आश्रम सुरू केला. अर्चना’नं तर न बोलता महाडमधली जम बसलेली आपली प्रॅक्टिस गुंडाळली आणि बदलापूरजवळ वांगणी इथल्या आदिवासी भागात नव्यानं डाव मांडला.

आश्रम स्थिरस्थावर होत असताना २०१९ च्या पावसाळय़ात उल्हास नदीला आलेल्या पुरानं पुन्हा होत्याचं नव्हतं केलं. या महापुरात पाच हजार लिटर पाण्याच्या तीन टाक्या, बायो गॅस युनिट, दोन शेड्स, पस्तीस पिंजरे, बावीस प्राणी आणि या सगळय़ांबरोबर आमची इच्छाशक्ती, सर्वच वाहून गेलं! माझ्या तर हातापायातलं सगळं त्राणच निघून गेलं. दोन दिवस सुन्न मन:स्थितीत गेले. तिसऱ्या दिवशी वाहून गेलेल्या प्राण्यांपैकी दोन बदकं रेल्वे ट्रॅकवरून चालत चालत, शोध घेत ‘पाणवठय़ा’पर्यंत पोहोचली आणि जिथे त्यांचा पिंजरा होता त्या जागेवर जाऊन उभी राहिली! ते पाहून मात्र अर्चनाला उभारी आली. ती म्हणाली, ‘‘ती विश्वासाने इथवर आली आहेत. आता त्यांचं आणि उर्वरित प्राण्यांचं हरवलेलं घर बांधण्याची जबाबदारी आपली आहे.’’ आमच्या इच्छेला तेव्हा ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमानं बळ दिलं आणि निराशा झटकून आम्ही प्रकल्प पुन्हा उभा केला.

आज इथं शंभरहून अधिक अपंग, अनाथ प्राणी आहेत. यातल्या काही पिल्लांना दोन पाय नाहीत, तर कुणाला चारही पाय नाहीत. काहींना अंधूक दिसतं, तर काहींना अजिबात दिसत नाही. माझा पूर्ण वेळ त्यांच्या संगोपनात जातो. अर्चनाची कमाई आणि हितचिंतकांची मदत यावर ‘पाणवठा’ जगतो आहे. आमच्याबरोबर हेमश्वेता पांचाळ या उच्चशिक्षित तरुणीनं दरमहा पन्नास हजार रुपये पगाराची नोकरी सोडून या कामाला वाहून घेतलंय. गेली चार वर्ष विनामोबदला ती आश्रमात राहून सेवा देत आहे. हाक मारताच धावून येणारे काही युवकही जोडले गेले आहेत. मुख्य म्हणजे पुष्कर आणि मानस या आमच्या दोन मुलांना (वय अनुक्रमे १२ व ९) आता समज आल्यानं तीही आपल्या परीनं आम्हाला मदत करतात. कोणताही हट्ट करत नाहीत. पुराचं पाणी जेव्हा रात्री अडीच वाजता आश्रमात घुसलं होतं, तेव्हा मुलांनी न सांगताच छोटी छोटी पिल्लं आणि त्यांची फूड पॅकेट्स उचलून वरच्या मजल्यावर नेऊन ठेवली होती. आपल्या घराचं वेगळेपण त्यांना कळू लागलंय ही आमच्यासाठी मोलाची गोष्ट आहे. अजूनही वीज, पाणी, रस्ता यांसारखे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. आम्हाला स्वत:चं विजेचं कनेक्शन अजूनही मिळालेलं नाही. गावकऱ्यांच्या मेहेरबानीनं साधारणत: पाचशे मीटर अंतरावरून जोडलेली तात्पुरती केबल जळाली. त्यामुळे गेल्या महिन्यात चौदा दिवस वीज आणि पाणी नव्हतं. विजेशिवाय आम्ही राहू शकतो, पण सर्वाना पिण्यासाठी आणि पिंजरे धुण्यासाठी पाणी हवंच. ते आम्ही रेल्वेपलीकडच्या फार्महाऊसमधून बादल्यांनी आणलं. संकटं येतात पण त्यातून मार्गही निघतो हे पुन्हा अनुभवलं!

संत तुकाराम म्हणतात, ‘भूतदया ज्याचे मनी, त्याचे घरी चक्रपाणी’! मला खात्री आहे, की तुमच्या मनातली भूतदया तुम्हाला ‘पाणवठय़ा’मध्ये घेऊन येईल. आमच्या प्राणीसंसारातले सदस्य वाढत आहेत, तशी त्याची व्याप्ती वाढते आहे. प्राण्यांचं प्रेम असलेली मंडळी आपल्याकडे पुष्कळ आहेत. त्यांच्यापैकी काहींची जरी मदत मिळाली, तर ते या प्राण्यांसाठी वरदानच ठरेल, एवढं नक्की!

मोबाइल क्रमांक – ९५४५४९५०५१.
ganraj. panvatha@gmail. com
शब्दांकन – संपदा वागळे