डॉ. आशुतोष जावडेकर

वयात येत असताना किती जणांना पुरुषत्वाचा अन्वयार्थ कळतो, हा कळीचा मुद्दा. तो ‘न कळणं’ हेच पुढे अनेक सामाजिक, आर्थिक, मानसिक प्रश्नांना जन्म देतं.  पुरुष असा वागतो किंवा असा वागत नाही, त्यामागे हार्मोन्सचा वाटा किती आणि सामाजिक दडपणांचा किती यातून तुमचं माणूस असणं घडत जातं.  वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बायको, मुलगी, मैत्रीण जगण्याला वेगवेगळे आयाम देत असतातच, परंतु  जिवलग याराचा आणि त्याही पलीकडे वडिलांचा असलेला दृश्य-अदृश्य प्रभाव पौरुषाचं अनघड सुख मिळवून देत असतो..

rajasthan bhilwara murder case
विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणाचे अपहरण करून हत्या अन् मृतदेह…; अंगावर शहारे आणणारी घटना समोर!
Parenting, control, freedom, ideal parenting, parent child relationship, discipline, authority, family dynamics, , communication, conflict, grandparent influence, parental boundaries, chaturang article,
सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा
Shrawan 2024 Rashi Bhavishya
श्रावण सुरु होताच ‘या’ तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार; दुःख- संकट वाटेतून होतील दूर, प्रचंड धनलाभाचा योग
Highly educated youth arrested for murdering his wife due to suspicion of character and filing a false complaint pune print news
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून खोटी तक्रार देणारा उच्चशिक्षित तरुण गजाआड; शिरूरमधील रांजणगाव सांडसमधील घटना
Loksatta kutuhal Artificial intelligence and verbal communication
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाब्दिक संवाद
Loksatta kutuhal Artificial Intelligence for Anomaly Detection in Financial Transactions
कुतूहल: वित्तव्यवहारांत विसंगती शोधक कृत्रिम बुद्धिमत्ता
chatura article on mother marathi news
‘आई, तू ऑफिसमधल्या काकांच्या गाडीवरून घरी का आलीस?…’
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!

पुरुष आणि स्त्री समसमान आहेत वगैरे ऐकलं की मला गोंधळात पडायला होतं. ४१ वर्षांचा पुरुष म्हणून माझा स्वत:चा असा काही व्यक्तिगत अनुभव नाही, तसं निरीक्षणदेखील नाही. वेगळेच आहेत ते, स्त्री आणि पुरुष.

गौरी देशपांडे यांच्या एका कथेत तिचं एक पात्र,‘दोन पायांच्या मध्ये फक्त फरक आहे एवढंच’,अशा आशयाचं वाक्य म्हणतं.  पण तेव्हा अगदी विशीतदेखील (आणि गौरीचा ‘पंखा’ असतानाही) ते वाक्य वाचल्यावर मी मोठय़ानं स्वत:शीच म्हणालो होतो, ‘‘छे! केवढे अजून महत्त्वाचे फरक आहेत!’’ जगण्याची अनेक अंगानं समज वाढत गेली तेव्हा मला स्त्री आणि पुरुष या दोन घटितांचं स्वतंत्रपण आणि साहचर्य जाणवत गेलं. ते माझ्या लेखनात उतरत राहिलं. माझ्या गाण्यांमध्ये निनादत राहिलं. आणि तो गौरीचा धागा पूर्ण करायचा तर लिहीन की, आजही मी तिचा ‘पंखा’ आहेच, आणि तिच्या स्त्री पात्रांना डोक्यावर घेऊन नाचावं, असं मला वाटतं, पण तरीही तिला पुरुष कळला आहे, असं मात्र मला अजिबात वाटत नाही. पण खुद्द किती पुरुषांना मुळात आपण पुरुष असण्याचा अन्वयार्थ कळतो? काही ठरावीक ठाशीव मूल्यं पौरुषत्वाची लक्षणं म्हणून स्वीकारावी अशी समाजानं व्यवस्था केलेली आहे. ती व्यवस्था अनेक पुरुषांच्या सोयीची देखील आहेच, कारण सगळ्यात अवघड असतं स्वत:विषयी स्वत:ला नि:संदेह प्रश्न विचारणं आणि येतील त्या उत्तरांना धाडसानं स्वीकारणं. त्यात खरं पौरुष आहे. सहसा पौरुषाच्या व्याख्या काय असतात?  जोरदार दारू पचवणं, मित्रांसोबत गल्लीत, डोंगरात राडा घालणं, कचकचीत शिव्या फेकत राहाणं, पैसे किती मिळतात यावरून आपलं आणि दुसऱ्याचं यश ठरवणं, आपली दु:खं कुणाशी ‘शेअर’ न करता घुसमट सहन करणं, ‘बायसेप्स’चे फोटो इन्स्टाग्रामवरती टाकत राहाणं, किती पोरींसोबत खरे-खोटे संग केले याच्या गप्पा, बढाया मारत राहाणं आणि मुख्य म्हणजे आपण काहीतरी भयानक सशक्त हिरो आहोत असं दुसऱ्यांना आणि स्वत:ला पटवत राहाणं, शिकवत राहाणं. अगदी उघड आहे, की यातल्या काही गोष्टी या अगदी ‘टेस्टोस्टेरॉन’मुळे पुरुषी संप्रेरकांमुळे- नैसर्गिकरीत्या होत असल्या, तरी बव्हंशी गोष्टी या सामाजिक संकेतांमुळेच आहेत.

या वरच्या ज्या गोष्टी आहेत, त्यातल्या मी दारू, पैसे-बढाई आणि दु:ख शेअर न करणं या गोष्टी वगळता उर्वरित अनेक गोष्टी स्वत: पुरुष म्हणून अनुभवल्या आहेत. त्यामागे सामाजिक संकेत फार असतील असं वाटत नाही. कारण मी खरोखर वेगळ्या, मोकळ्या वातावरणात वाढलो. इथे मला त्या प्रवासाविषयी लिहायचं नाही.  लेखाच्या ओघात येतीलच काही गोष्टी. पण मुद्दा असा, की ज्या गोष्टी अनुभवल्या त्यात सामाजिक दडपणापेक्षा पुरुषाच्या आतल्या ‘हॉर्मोन्स’चा नैसर्गिक वाटाच अधिक असावा असं वाटतं. अगदी ताजी गंमत- मी इतकी वर्ष साधी मिशी ठेवलेली आणि नुकती दाढी वाढवली. लोकांना ते नवं रूप आवडलं याचा आनंद झालाच (ते का नाकारा!) पण एक दिवस सहज ती दाढी सिंहाची आयाळ असावी तशा प्रेमानं कुरवाळत असताना एकदम जाणीव झाली, की अरे, आपलाच चेहरा एका गोष्टीनं किती वेगळा दिसतो, भासतो, स्पर्शतो आणि महत्वाचं म्हणजे बोलतो! नुसत्या चेहऱ्याची ही  गोष्ट आहे, तर पुरुषाच्या शरीराच्या अन्य अवयवांची बात काय करावी! पाळी येणं, गर्भारपण आणि रजोनिवृत्ती या सगळ्या टप्प्यांत बाईच्या शरीराची जशी आणि जेवढी झीज होते तशी पुरुषाच्या शरीराची होत नाही. पण पुरुषाचे दैहिक अनुभवदेखील विलक्षण झगमगते, दुखऱ्या- सुखावहाच्या टोकाच्या सीमेवरचे, बेक्कार कळ लावणारे, असे असतात. आमची पिढी ‘रंगीला’ चित्रपटातल्या ऊर्मिलाचं

‘तनहा तनहा’ हे गाणं बघता बघता खऱ्या अर्थानं रातोरात वयात आली, असं मी नेहमी म्हणतो. तुमचं पुरुष म्हणून असलेलं शरीराचं मशीन जेव्हा पहिल्यांदा काम करतं तेव्हा आनंद, कुतूहल, समाधान असतंच, पण भयदेखील असतं. शक्तीचा प्रत्यय आल्यानंतर त्या नव्या शक्तीचं काय करायचं, हे अनेकदा पुरुषांना कळत नाही. त्या भयाचं काय करायचं हेही कळत नाही. मला वाटतं, हे ‘न कळणं’ हेच पुढे अनेक सामाजिक, आर्थिक, मानसिक प्रश्नांना जन्म देतं- मग युद्ध असो, बलात्कार, नाहीतर नैराश्य! अर्थात, अनेक पुरुष ते आवर्त कमी अधिक प्रमाणात ओलांडून पुढे जात राहातात. नवनवे अनुभव घेत राहातात.

आणि मग वाढणारा पुरुष हळूहळू स्त्रीला बघतो, भेटतो, न्याहाळतो.. बाईच्या संदर्भात माझे पुरुष समजून घेण्याचे अनेक प्रवास हे माझ्या लेखनातल्या पात्रांसोबत झाले. ‘मुळारंभ’ या माझ्या कादंबरीमध्ये नायक ओम आणि त्याची आई यांचं नातं विशेष आहे. १८ वर्षांच्या ओमच्या घरातलं जे मोकळं वातावरण आहे त्यामुळे त्याची आई त्याला मैत्रीण अधिक वाटू लागते. म्हणजे आई असतेच ती, पण त्या आईपणात अजून एक छटा शोधतो तो वाढणाऱ्या वयातला पुरुष. स्वयंपाकघरात ओटय़ावर बसून ओम आईशी गप्पा मारतो, हे चित्र थेट माझ्या कॉलेजच्या दिवसांमधलंच. असाच मी आईशी तासन्तास आनंदानं गप्पा मारत असे, असतो. माझे मित्रही तशा गप्पा मारत असत त्यांच्या आयांशी. पण आता सध्या ते मोठे झालेले पुरुष आणि त्यांची नव-वृद्ध आई यांच्यात ताण येताना बघतो. माझ्या पिढीमधले काही मित्र सरळ सांगतात, ‘‘आशुतोष, माझं आणि आईचं अजिबात पटत नाही.’’ अशा वेळी मला वाटतं, की आपण सौहार्दाची पाच पावलं पुढे टाकली की आई दहा पावलं पुढे टाकते, कारण ती अखेर आई असते!

पुरुषाचे अहंकार हे फार प्रबळ असतात. त्या तुलनेत बायकोशी मात्र माझ्या पिढीतल्या अनेकांचं बरं जमतं. पुरुषाची लैंगिक प्रेरणा ही नुसती प्रबळ नसते, तर जवळजवळ अहोरात्र त्याच्या मनात कधी सुस्पष्ट, तर कधी अंधूकपणे कार्यरत असते. ती प्रेरणा अनुभवण्याचं, जोखण्याचं, त्याला दिशा देण्याचं आणि त्याचे कधी चटके सहन करण्याचं महत्त्वपूर्ण काम पत्नी करते. जेव्हा ती पत्नी आई होते, तेव्हा पुरुष तिचं नवं रूप बघतो आणि मनोमन शरण जातो. आणि या पुरुषाला जेव्हा मुलगी होते तेव्हा त्याला स्त्री अधिक कळत असावी, कारण त्या नात्यात एक वेगळीच गंमत आहे. तो मुलीचा रक्षणकर्ता तर असतोच, पण आजच्या काळात मित्रही बनताना दिसतो. आणि शेवटी, अर्थात.. मैत्रीण! ती त्याला असते. नसली तर तो मिळवतो. आता ऑनलाइन मिळवतो. त्यात कधी बारीक, कधी सुस्पष्ट लैंगिक आकर्षण असतं, पण मुळात भावनिक ओढदेखील अधिक असते. माझ्या ‘विशी तिशी चाळिशी’ सदरामधला तेजस त्याच्या माही या मैत्रिणीचं लग्न ठरल्यावर शेवटी तिचा हात हातात घेऊन चुंबन घेतो आणि म्हणतो, ‘‘हा माझा पहिला आणि शेवटचा किस!’’..

पण अजून एका महत्त्वाच्या नात्यानं पुरुष प्रगल्भ होतो, ते नातं असतं जिवलग मित्राचं, याराचं. बॉलीवूडचा बॉक्स ऑफिसवर सगळ्यात गाजलेला चित्रपट ‘शोले’ आहे.  दोन मित्रांचीच ती गोष्ट आहे आणि ती या देशात सर्वाधिक गाजते हेही पुरेसं बोलकं आहे. दोन पुरुष मित्रांच्या नात्यामध्ये जशी आणि जेवढी प्रेम नाटय़ं असतात, तशी प्रियकर-प्रेयसीच्या कथांमध्येही नसतील. समलैंगिकता म्हणत नाही आहे मी. पण अनेकदा दोन पुरुषांच्या मैत्रीचं एक लिंगनिरपेक्ष प्रेम असतं. त्या मैत्रीचं अंतरंग मित्र हा तुमचा सखा असतो, बंधू असतो. माझं ‘वा म्हणताना’ हे सदर ‘लोकसत्ता-लोकरंग’ मधेच सुरू होतं. तेव्हा त्या लेखनामागे माझा सखा आणि भाऊ बनलेला सिद्धार्थ केळकर हा मित्र होता. त्या लेखमालेचं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मी त्यालाच ते अर्पण केलं. त्याला त्या पुस्तकाची प्रत दिली तो क्षण आमच्या दोघांच्याही आयुष्यातला फार महत्त्वाचा क्षण होता. अनेकदा साहित्यात, इतिहासात पुरुषबंधाचे असे उत्कट क्षण मी वाचले. टिळक आणि आगरकर यांच्या भव्य मैत्रीनं मी नेहमी चकित व्हायचो, होतो. केवढी गाढ मैत्री आणि नंतर केवढं भांडण! मी झराझरा त्यावर गाणं गात, लिहीत गेलो. पुढे ते गाणं ‘दोघे’ या शीर्षकानं प्रसिद्ध झालं. आता माझी नवी इंग्रजी कादंबरी येते आहे- त्याच्यामध्ये राजकारण, धर्मकारण आहेच, पण हा ‘मेल बॉण्डिंग’चा, ‘ब्रोमान्स’चा धागा सर्वात प्राबल्याचा आहे. मुंबईतून इराकच्या कुर्दिस्तानात घरी परतलेला अयान आणि मुंबईत त्याच्या आठवणीत थांबलेला अर्जुन आणि त्यांच्या मैत्रिणी! चेष्टेत मी म्हणतो तसं, माझी तिसरी कादंबरी  बहुदा फक्त स्त्री पात्रांचीच असेल आणि त्यातून बाई समजून घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. माझ्या सुदैवानं जोडीदार म्हणून माझ्या आयुष्यात आलेली बाई- म्हणजे मानसी- ही खंबीर तर आहेच, पण मुळात विचारी आहे. भांडणं होतातच आमची कुठल्याही नवरा-बायकोसारखी, पण एकेकदा मी खचलो तेव्हा हिनं नेट लावून मला उभं केलं आणि झगडण्यासाठी पुन्हा सज्ज केलं. आणि स्वत:ही सोबत उभी राहिली. ‘मुळारंभ’ मी तिलाच अर्पण केली आणि त्यात लिहिलं, ‘मानसी भावे जावडेकर  या माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीस..’

माझा पुरुषत्वाचा प्रवास इथे अख्खा मांडायचा नाही. पण पुरुष म्हणून जडणघडण होत असतानाचा  एक महत्त्वाचा धागा इथे सांगायला हवा. माझे बाबा (प्रकाश जावडेकर) मी जन्मल्यापासून राजकारणात आहेत. मुलग्याला ‘रोल मॉडेल’ म्हणून वयात येताना जसे वडील समोर हवे असतात तसे काही ते सतत समोर नसायचे, कारण राजकारण म्हणजे काही बँकेमधली आठ तासांची नोकरी नाही! त्या वयात मी त्यांना ‘मिस’ केलं का नाही हेही खरं मला आठवत नाही. पण पुढे अनेकदा केलं. बुद्धीला अपरिहार्यपणे सगळं समजलं तरी मिस केलं आणि करतोही अनेकदा आजही.  यावरून मला असं वाटतं, बाप आणि मुलगा या दोन पुरुषांमध्ये एक अदृश्य ‘पॉवर डिस्कोर्स’ असतो. स्वाभिमानी मुलग्याला स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवण्याची आस असते, पण चांगल्या नात्यात प्रेम बलवत्तर ठरतं. त्या मुलग्यामधल्या पुरुषाला त्याचा ‘बाप-पुरुष’ अंतिम प्रेरणा देत असतो. कधी राजस्थानच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उन्हाळ्यात पंचेचाळीस डिग्रीत तर कधी जागतिक पर्यावरण परिषदेसाठी गेलो असताना माद्रिदच्या दोनेक डिग्री थंडीत दिवसभर डोंगराएवढी कामं उपसताना मी जेव्हा माझ्या बाबांना जवळून बघतो, तेव्हा मनात म्हणतो, ‘आशु, तुला थांबता येणार नाही. अजून खूप काही करायचं आहे.’ ते चित्र मला मनोमन बरंच शिकवतं आणि कार्यमग्न पौरुषाची संथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना माझ्यातलाच छोटा कोवळा मुलगा स्तिमित होऊन बघतो.

तसंही, बाप समोर ताकदीनं उभा राहातो तेव्हा कुठल्याही पुरुषाचा मनोमन- मिसरूडही न फुटलेला मुलगा होत असतो! तिथे पुरुष असण्याचे सगळे ताण विसर्जित होतात आणि पौरुषाचं अनघड सुख अबाधित राहातं!

ashuwriter23@gmail.com