वृत्ती तितक्या प्रवृत्ती

स्टॉपवर मी आणि मला अनोळखी आणखी दोघी उभ्या होत्या. पेहरावावरून बऱ्यापैकी सुस्थितीतल्या वाटत होत्या.

पूजा सोमण somanpooja@gmail.com
तुम्ही कुठून आला आहात, काय करता, कसे दिसता, यापेक्षाही काहीतरी वेगळे असते, जे तुम्हाला माणूस म्हणून जगताना जास्त उपयोगी असते, ती म्हणजे ‘इंटेग्रिटी’, सचोटी, प्रामाणिकपणा. 

तुमची प्रत्येक कृती बहुतांशी तुमच्या जडणघडणीवर अवलंबून असते. तरीही अपवादात्मक काही कृती, काही घटना घडतातच, त्या, माणूस कुठल्या देशाचा किंवा कुठल्या रंगाचा, याच्याशी अजिबात संबंधित नसतात, तर तुम्ही व्यक्तीमत्त्वाच्या कुठल्या स्तरातील आहात यावर अवलंबून असतात. स्तरातील एवढय़ासाठी म्हटलं, कारण तुमची कृतीच तो स्तर ठरवत असते. हे सगळे विचार मनात येण्याचं मुख्य कारण एक घटना आहे, जी मी इतक्या वर्षांनंतरसुद्धा विसरलेले नाहीये.

काही वर्षांपूर्वी मी इटलीत टोरिनो येथे असतानाची ही गोष्ट. सकाळी आठच्या सुमारास मी बसस्टॉपवर बसची वाट बघत उभी होते. बस यायला वेळ होता. स्टॉपवर मी आणि मला अनोळखी आणखी दोघी उभ्या होत्या. पेहरावावरून बऱ्यापैकी सुस्थितीतल्या वाटत होत्या. दोघीही चाळिशीच्या जवळपासच्या असाव्यात. इतक्यात एक तिसरी स्त्री बसस्टॉपवर आली. मला इटालियन तितकीशी येत नसल्यामुळे त्या तिघी आपापसांत काय बोलत होत्या हे कळत नव्हतं, पण देहबोलीवरून तिघी एकमेकींना बऱ्यापैकी ओळखत असाव्यात असं वाटत होतं. कारण इटलीतील वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षांने माझ्या लक्षात आलेली, की लोक एकमेकांच्या जीवनात जास्त डोकवायला जात नाहीत. मी बरा आणि माझे विश्व बरे, असं असतं.

तर या तिघींना काही नावे हवीत की नको, असा तिऱ्हाईतासारखा किती वेळा उल्लेख करायचा? तर आपण या तिघींना नावे देऊ. पहिल्या दोघी या अनुक्रमे ‘अ’, ‘ब’, आणि तिसरी ‘क’. हं! चला, आता नाटय़ाला झाली  सुरुवात.. तर  ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’, साधारण पाचएक मिनिटे अखंड बोलत होत्या. ‘क’ने एक कॅरीबॅग आणली होती आणि बोलता बोलता तिने ती बॅग स्टॉपवरच्या खुर्चीवर  ठेवली. तितक्यात ‘क’ची बस आल्यामुळे ती घाईत तशीच निघून गेली, आणि तिची कॅरीबॅग तशीच बसस्टॉपवरच्या खुर्चीवरच राहिली. आता मात्र उत्सुकतेपोटी मी पाहू लागले, की या दोघी काय करणार?  माझ्या अपेक्षेप्रमाणे ‘अ’ने ती उचलली, ‘ब’ला काही खाणाखुणा केल्या आणि अगदी अनपेक्षितपणे ती कॅरीबॅग उघडून त्यातल्या गोष्टींचं वाटप दोघींमध्ये सुरू केलं, अक्षरश: ‘ये तेरा, ये मेरा’ टाइप! आता शेवटी उरली ती त्यातली फळांची पिशवी. दोघींच्या आकारमानावरून त्या फारशा ‘हेल्दी’ लाइफस्टाइल जगत असाव्यात असे दिसत नव्हते  किंवा त्यांना ती फळे आवडत नसावीत.. कारण काहीही असो, ती फळांची पिशवी त्यांनी बाजूच्या डस्टबिनमध्ये टाकली.  तिथले डस्टबिनही खूप स्वच्छच.

हं! तर आता गोष्ट इथेच संपायला हवी ना? पण ‘कहानी में ट्विस्ट’ आला. ‘क’ला आपण पिशवी विसरलोय हे बहुतेक लगेच लक्षात आलं असावं, कारण ती चालत चालत बसस्टॉपकडे परत येताना दिसली. आता मात्र मी कमालीच्या उत्सुकतेने ‘अ’ आणि ‘ब’च्या कृती बघू लागले. त्या आता काय करतील? तिला पिशवी नव्हतीच असं सांगतील? की आम्हाला माहीत नाही असे म्हणतील. पण म्हटले ना, त्यांनी मला ‘जोर का झटका’ देण्याचेच ठरवले होते. ‘क’ येताना दिसताच ‘अ’ आणि ‘ब’ यांनी रीतसर फळांची टाकलेली पिशवी डस्टबिनमधून उचलली, ‘क’ ला दिसणार नाही अशा पद्धतीत. अर्थात ती स्वच्छच होती. दोघींनी वाटप करून घेतलेल्या गोष्टी पुन्हा त्या पिशवीत टाकल्या आणि ती जिथे होती तिथे ठेवून दिली. ‘क’ धापा टाकत बसस्टॉपवर पोहोचली तेव्हा तिला ‘आग्गोबाई‘! ( तिथे आग्गोबाईला  ‘मामामिया’ हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला होता पण खरा अर्थ त्या दिवशी कळला!!) असे म्हणून मिठी मारत आम्ही कसे तुझ्या बॅगचे रक्षण केले, असे दाखवत तिला बॅग सुपूर्द केली. तेवढय़ात एक बस आली. त्या तिघी बसमध्ये चढल्या आणि नाटय़ावर पडदा पडला.

माझ्या मताप्रमाणे, खरंच तुम्ही कुठून आला आहात, काय करता, कसे दिसता, यापेक्षाही काहीतरी वेगळे असते, जे तुम्हाला माणूस म्हणून जगताना जास्त उपयोगी असते, ती म्हणजे ‘इंटेग्रिटी’. सचोटी, प्रामाणिकपणा. अर्थात सगळ्याच जणी अशा वागल्या असत्या असे अजिबात नाही. कदाचित एखादीने फोन करून ‘क’ला पिशवी राहिल्याचेही सांगितले असते. कुणी तिच्या घरी जाऊन दिलीही असती. आणि मुख्य म्हणजे हा अनुभव कुठल्याही देशात येऊ शकतो. अगदी आपल्याही. प्रत्येक माणसामाणसावर ते अवलंबून असते कोण कसे जगते ते.

शेवटी काय, वृत्ती तितक्या प्रवृती हेच खरे!

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pooja soman article on integrity honesty sincerity zws

ताज्या बातम्या