हेमा होनवाड
मी सोनदऱ्याच्या शाळेत प्रवेश केला आणि उजव्या बाजूच्या वर्गातून जोरदार हशा ऐकू आला. डोकावून पाहिल्यावर दिसलं की, शिक्षक समोर उभं राहून प्रात्यक्षिक करून दाखवत होते. सगळे विद्यार्थी अगदी शंभर टक्के लक्ष देऊन त्यांचं ऐकत होते. आणि एक मुलगा, प्रफुल्ल, मात्र मागे बसून जोरदार हसून काहीबाही सूचना देत होता. ती प्रफुल्लशी झालेली पहिली भेट.
अंबाजोगाईच्या एका गरीब, दलित कुटुंबात जन्मलेला प्रफुल्ल आज ‘वोपा’(VOPA) या संस्थेचा संस्थापक म्हणून हजारो मुलं आणि शेकडो शिक्षकासाठी प्रभावशाली काम करतो आहे. पाटोदा तालुक्यामधील आरवी हे त्याच्या आईचं गाव. नदीपलीकडे एका डोंगरावर वडीलांची झोपडी. तीन भावंडांपैकी फक्त वडीलच बी.कॉम. झाले आणि तलाठी म्हणून अंबाजोगाईला कामावर रूजू होऊन त्याच परिसरात कार्यरत राहिले. चंद्रकांत गणपतराव वडमारे हे त्यांचं आणि आईचं नाव शशिकला जोगदंड. आपल्या समाजात केवळ वडिलांचंच नाव लावण्याची प्रथा आहे, पण प्रफुल्ल शशिकांत (शशिकला आणि चंद्रकांत) असं नाव तो जाणीवपूर्वक लावतो. आईची माया त्या नावातून लाभते अशी त्याची भावना आहे.
प्रफुल्लला दोन मोठ्या बहिणी आणि एक धाकटा भाऊ आहे. आई आणि दोन बहिणींबरोबर वाढल्यामुळे समता, सह-अनुभूति, घरातील कामात समान जबाबदारी घेणं ही मूल्यं आपोआप प्रफुल्ल आणि त्याच्या भावामध्ये रूजत गेली. आज दोन्ही भावांच्या जाणिवा तरल, व्यक्तिमत्व संवेदनाक्षम घडलं आहे. सगळी अंबाजोगाईत शाळेत जात. आईवडीलांनी त्यांचं पालकत्व गांभीर्यानं, विचारपूर्वक निभावलं.
त्यांच्या घराला लागून एक ‘गारीगार’चा (आइस्क्रीम) कारखाना होता. तिथले कामगार या छोट्यांनाही अगदी खास आइस्क्रीम द्यायचे. पण जर लांबून वडील येताना दिसले तर तात्काळ या मुलांची तंतरलीच म्हणून समजावं. तत्क्षणी हातातील गारीगार खाली गटारात पडायचं. कारण फुकटचं काही खायचे नाही हा नियम होता. वडीलांचा जबरदस्त धाक होता. तो तिसरीत असताना त्याच्या वर्गातली मुलं मास्तरांना खूष करण्यासाठी फुटपट्ट्या आणून द्यायची- रेघा मारायला आणि मुलांना ठोकायला. एकदा प्रफुल्लनंही एक पट्टी ‘फोटोफ्रेम’च्या दुकानातून चोरून आणली. वडीलांची एक विशेष पद्धत होती.
रोज शाळेतून आल्यावर शाळेत प्रत्येक तासाला काय झालं ते सगळ्या भावंडांना विचारायचे. मुलांना खात्री असायची की ते काही शाळेत येऊन खरं-खोटं करणार नाहीत. त्यामुळे जे सुचेल ते सांगायची. काही तरी गडबड आहे अशी शंका आली तर वडील अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारायचे. अर्थातच ती पट्टी पहिल्यावर त्यांनी चौकशी केली. ती चोरून आणल्याचं उघडकीला आलंच. ते खूप संतापले. ती पट्टी दुकानदाराला दुसर्या दिवशी जाऊन परत द्यायची आणि देताना, ‘‘मी न विचारता नेली होती. माझी चूक झाली. क्षमा करा.’’ असं सांगून मगच घरी यायला असंही वर सांगीतलं.
वडील त्यांची नोकरी सांभाळून दलित चळवळीत सहभागी व्हायचे. कारण शिकलेले, वाचन करणारे लोक कमी होते. वडिलांना वाचनाची आवड होती. ते समाजसुधारकांची पुस्तकं वाचायचे. गावात जयंती, पुण्यतिथीला पुस्तक प्रदर्शनात पुस्तकांची विक्री व्हायची. प्रफुल्ल चौथीत गेला तेव्हा त्यांनी पुस्तकांच्या दुकानात त्याला स्वत:बरोबर घेऊन जायला सुरुवात केली. ते पुस्तक घ्यायचे आणि हा छोटू पण ‘चंपक’, ‘चांदोबा’सारखी पुस्तकं घ्यायचा. राक्षस, पऱ्यांच्या विश्वात घेऊन जायची ही पुस्तकं त्याला.
तेव्हा ही पुस्तकं फक्त अडीच/तीन रुपयांत मिळायची त्यामुळे परवडायची. याबद्दल तो वडिलांचा ऋणी आहे. त्याला खरेदीचा आनंद मिळायचा आणि नंतर वाचनाचा. मोठ्यांची पुस्तकंही त्यानं वाचली आणि खूप प्रभावित झाला. त्यानं दहावीपर्यंत खूप वाचन केलं. पुस्तक खरेदी आणि वाचनाच्या निमित्तानं त्याचं वडिलांशी एक सुंदर नातं जोडलं गेलं. त्यांचा आग्रह असायचा की सगळ्या गोष्टी शिकून घ्यायलाच पाहिजेत. शाळेत नाट्यलेखन, गायन, निबंध स्पर्धा, चित्रकला, सगळ्यात भाग घेऊन त्यानं यश मिळवलं ते वडिलांच्या आग्रहामुळे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला.
पण आपण उपेक्षित असल्याची भावना त्याला जाणवलीच, तेव्हा तो सातवीमध्ये होता. कारण नेहमी ठरावीक मुलांनाच पुढे येण्याची संधी मिळायची हा त्याचा अनुभव होता. असे अनुभव घेण्याबरोबर त्याचं अवांतर वाचन मात्र चालू होतं. दोन्हींचा परिणाम म्हणजे त्याने सातवीमध्ये असतानाच बंडखोरी करायला सुरुवात केली, पण ती विध्वंसक बंडखोरी नव्हती. स्वत:ला जिद्दीनं सिद्ध करण्यासाठी केलेली विधायक बंडखोरी होती.
अनेकदा अनुभवलेल्या स्वत:वरच्या अन्याय्य वागणुकीची त्याला चीड येऊ लागली होती. त्यामुळे प्रफुल्ल हट्टानं एवढी तयारी करायचा की बक्षीस दुसऱ्या कोणाला मिळणंच अशक्य असायचं. एकदा त्याच्या धाकट्या भावाचे उत्तरपत्रिकेवरील चांगले गुण खोडून ते शिक्षकांनी कमी करून दुसऱ्या मुलाला पहिला क्रमांक दिला असं कळल्यावर त्याच्या वडिलांनी स्वत: शाळेत जाऊन तो पेपर गठ्ठ्यातून काढायला लावला. भावाचं उत्तर बरोबर असूनही त्याचे कमी केलेले गुण प्रफुल्लने दुरुस्त करायला लावले होते.
सातवीत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेनंतर मुलाखतीसाठी त्याची आणि एका मुलाची निवड झाली. मुलाखतीत काडेपेटीच्या काड्यांनी रचलेला आकडा दोन काड्या हलवून बदलायला प्रफुल्लला सांगितलं. तो सोडवण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्या मुलाखतकारानं त्याला तीन/चार वेळा टोकलं आणि म्हणाला, ‘‘हं, हे तुला नाही जमणार!’’ त्याचा आत्मविश्वास ढळेल असंच ते वर्तन होतं. परतीच्या प्रवासात त्या दुसऱ्या मुलानं त्याला सांगितलं की, ‘‘त्याला चुका दुरुस्त करायला अनेक संधी दिल्या.’’ हा अन्यायाचा सल त्याला आजही खुपतो आणि ते चित्र डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं.
अशाच प्रसंगांमुळे प्रफुल्ल जिद्दीला पेटला. ‘‘मी इतकं उत्तम काम करेन की, मला पहिलं बक्षीस कोणी नाकारूच शकणार नाही.’’ हा निश्चय त्यानं अमलात आणून दाखवला. मोठ्या शाळेत गेल्यावर डाव्या विचारसरणीवर आधारित वैचारिक पुस्तकं, अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्या वाचण्याचा सपाटा त्यानं लावला. भाषण कसं करायचं हे पुस्तक वाचून दीड-दीड तासात तो रसपूर्ण भाषण करायचा.
अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना प्रफुल्ल आणि त्याच्या काही मित्रांनी मिळून ‘जाणीव’ हा एक गट स्थापन करून त्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये विविध सामाजिक उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. त्याच काळात आयोजित केलेल्या एका स्पर्धेत शिल्पा, जी त्याची आता जीवनसंगिनी आहे, पहिली आली. तेव्हा त्यांची पहिली भेट झाली.
शिल्पा महाविद्यालयामध्ये नेहमी पहिली यायची. अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि स्वत:च्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणारी. तिचा जन्म गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. पाच बहिणींमध्ये शिल्पा सर्वांत मोठी. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही तिने जबाबदारीने सर्व बहिणींची काळजी घेत शिक्षण पूर्ण केलं. तिचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास अतिशय प्रेरणादायी होता. ‘नवोदय विद्यालया’त शिक्षण घेताना प्रत्येक परीक्षेत ती पहिली येत असे.
एका वर्षी महाविद्यालयात झालेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर जयंती’निमित्त आयोजित स्पर्धेत शिल्पा विजेती ठरली. त्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक कृतींमधून तिच्यातल्या पुरोगामी मूल्यांशी आणि संपन्न व्यक्तिमत्त्वाशी प्रफुल्लची ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री दृढ झाली आणि स्वाभाविकपणे दोघं प्रेमात पडले. प्रफुल्लची आई कर्करोगाने आजारी असतानाच्या कठीण काळात शिल्पाने दिलेल्या भावनिक आधारामुळे तो सावरला आणि आईची शुश्रूषा योग्य प्रकारे करू शकला.
त्या काळात त्याच्या आईचा आणि शिल्पाचा खूप छान भावनिक बंध तयार झाला, आणि हाच बंध पुढे त्यांच्या आंतरजातीय विवाहाला प्रेरणा देणारा ठरला. त्यांचा विवाह हा एक मूल्यांवर आधारित निर्णय होता. २०१६ मध्ये दोघांनी कोणतेही धार्मिक विधी न करता, संविधानाला साक्षी ठेवून एकमेकांसाठी स्वत: लिहिलेल्या वचनांचा स्वीकार करून अगदी साधेपणाने, कुटुंबीय व मित्रांसमक्ष विवाह सोहळा पार पाडला. शिल्पाच्या प्रगत, विवेकी विचारांमुळे हे साध्य झालं.
महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर शिल्पावरच्या आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्या. तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. प्रफुल्लनं सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा मार्ग निवडला असल्याने त्याचं उत्पन्न बेताचंच होतं. त्या काळात शिल्पाने तिच्या पाचही बहिणींना शिक्षण दिल्याने आज त्या स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत. कुटुंबाची जबाबदारी पार पडल्यानंतर तिने ‘कॉर्पोरेट’ जगातील नोकरी सोडली व सामाजिक काम करायला सुरुवात केली. तरुण वयात दहा वर्षं वरिष्ठ व्यवस्थापक पदावरील प्रतिष्ठेची नोकरी केल्यानंतर सामाजिक क्षेत्राकडे वळणं सोपं नव्हतं. पण तिला तिच्या स्वप्नांशी प्रामाणिक राहायचं होतं. मागील चार वर्षांपासून ती सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
२०१८ मध्ये प्रफुल्लनं ‘वोपा’ ही सामाजिक संस्था स्थापन केली. ‘ Vowels of the People Association’ ही संस्था उभी करताना प्रफुल्ल दिवस-रात्र कामात व्यग्र असायचा. या काळात शिल्पाने केवळ घरच्यांचीच काळजी नाही घेतली, तर आर्थिक आणि भावनिक दोन्ही स्तरांवर प्रफुल्लला खंबीर आधार दिला. संस्थेला पूर्ण वेळ देणं गरजेचं होतं म्हणून दोघांनी मिळून बाळाचा विचार पुढे ढकलला. या निर्णयात तिची साथ महत्त्वाची होती. तिला प्रफुल्लचे वडील, कुटुंबीय आणि सामाजिक काम या सर्वांमध्ये संतुलन राखण्याची कला उत्तमरीत्या साध्य होती. स्वत:च्या पुढाकाराने विविध सामाजिक संस्थांना, गरजूंना मदत करत तिचं सामाजिक उत्तरदायित्वही निभावलं.
२०१८ ते २०२० हा ‘वोपा’च्या प्रवासाचा प्रारंभिक काळ होता. या काळात त्यांनी मराठवाड्यातील दुर्गम भागांतील शाळांसोबत काम, शिक्षकांचं प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. ‘करोना’पासून मात्र शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर हा कामाचा केंद्रबिंदू बनला. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना ‘डिजिटल’ माध्यमातून मदत करून शिक्षणाचं लोकशाहीकरण घडवणं हा ‘वोपा’चा हेतू होता. आज ‘वोपा’च्या कार्याचा विस्तार महाराष्ट्रातील ४० लाख विद्यार्थी, दोन लाख शिक्षक आणि ६५ हजार शाळांपर्यंत झाला आहे.
Maharashtra Education Mission Nipun ‘मिशन निपुण महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ‘महाराष्ट्र शालेय शिक्षण’ विभागाचा अधिकृत सहकारी म्हणून संस्था कार्यरत आहे. ‘वोपा’च्या तंत्रज्ञान शोधांमुळे प्रशासनाचे कोट्यवधी रुपये वाचत आहेत. शैक्षणिक अॅप ‘ V- School’’ महाराष्ट्रातील ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभदायी ठरलं आहे. ‘व्ही-स्कूल’ मुळे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध, सुलभ आणि न्याय्य बनलं आहे.
सातत्याने डावललं जाण्याचे अनुभव येऊनही प्रफुल्लने कटू न होता उलट प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे या न्यायाने अनेकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणलं. हेच असतं शिक्षणानं परिपक्व होत जाणं.
hemahonwad@gmail.com

