आता पूर्वीसारखे घटस्फोट क्वचित घडणारे नाहीत, तर आपल्या दरवाजापर्यंत येऊन ठेपले आहेत, असे असूनही विवाहपूर्व समुपदेशनासाठी येणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य असते. विवाहपूर्व समुपदेशन किती उपयोगाचे? हे सांगणारा लेख.
मेधा आणि अक्षय- दोघांचे लग्न होऊन सात-आठ महिने झाले होते. तेवढय़ात त्यांच्यात कुरबुरीही सुरू झाल्या. छोटय़ा छोटय़ा कारणावरून दोघांमध्ये बरेच मतभेद होते. त्याला व्यवस्थितपणा आवडायचा तर तिला त्याची अजिबातच सवय नव्हती. तिला वाटे, त्याने तिच्या आईला रोज फोन करावा तर तो म्हणे रोज काय करायचा फोन? दर तीन-चार दिवसांनी करीन की. आणि ते तिला पटत नव्हते.
अक्षयला वाटायचे हिने रोज आनंदी असावे. पण तिला रोज काही ना काहीतरी होत असायचे. कधी पाठ दुखते, तर बाईसाहेब कधी सर्दीने हैराण, तर कधी डोकं दुखण्याने त्रस्त. अशा लहान लहान कारणांवरून खटके उडत असत. कालांतराने या लहान लहान भांडणांनी मोठे स्वरूप धारण केले होते.
सुमेधच्या घरी तर निराळीच तऱ्हा. सुमेधची बायको नेहा नोकरी करणारी होती. झाले असतील लग्नाला ८-१० महिने. पण अद्याप तिने त्याला स्वत:चा पगार सांगितला नव्हता. सुमेधने घरासाठी कर्ज काढले होते. कर्जाचा हप्ता बऱ्यापकी बसत होता. त्याला वाटे तिने घरातील खर्चाचा थोडा भार उचलावा. पण नेहाचे म्हणणे घर चालवण्याची जबाबदारी पूर्णपणे त्याचीच आहे. त्याचा डोळा माझ्या पशावर का? माझ्या पशाचं नियोजन मीच करणार. त्याने मला माझ्या पशांबद्दल काहीही विचारता कामा नये. सुमेधने तिला खूप वेळा सांगून पहिले पण नेहा अजिबातच ऐकायला तयार नव्हती. परिणामी त्यांच्या नात्यात खूप अंतर पडले होते.
ही उदाहरणे अगदी प्रातिनिधिक आहेत. अनेकांना वाटेल की या कारणांवरून घटस्फोटापर्यंत वेळ कशी काय येऊ शकते? पण कोणत्याही वादाची सुरुवात एका लहानशा बीजापासूनच होत असते. आणि फॅमिली कोर्टातली आकडेवारी असं सांगते की, बहुतेक घटस्फोट हे अगदी लहानसहान कारणांमुळे आणि नंतर इगो वाढल्यामुळेच झाले आहेत.
विवाहोत्तर समुपदेशनासाठी अनेक जोडपी येतात. त्यातल्या बहुतेक उदाहरणांमध्ये जाणवते की, अरे हे लग्नाआधी आले असते समुपदेशनासाठी तर ही लग्ने वाचवता आली असती. वर दिलेल्या दोन्ही उदाहरणांमध्ये नीट बारकाईने पहिले तर हे जाणवू शकेल. लग्नापूर्वीच आपल्या काही धारणा तपासून पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येऊ शकते.
म्हणूनच विवाहपूर्व समुपदेशनाची सध्याच्या काळात नितांत गरज असल्याचे जाणवते. पण एकूणच समुपदेशनाच्या बाबतीत आपल्याकडे बरेच गरसमज आहेत. काहीतरी बिनसल्यानंतरच समुपदेशनासाठी जायचे असा एक सार्वत्रिक समज आहे. किंबहुना समुपदेशक  काय वेगळं सांगणार आहेत, अशीही एक विचारधारा जाणवते. खरं तर विवाहपूर्व समुपदेशनामुळे वधू-वर दोघांच्याही विचारांना एक दिशा मिळते. नेमका काय विचार करायला पाहिजे, ते लक्षात येतं. लग्नापूर्वीच कोणकोणत्या गोष्टींबद्दल आवर्जून बोललं पाहिजे ते समजतं. विवाहपूर्व समुपदेशन हे प्रतिबंधात्मक आहे, नंतर कदाचित निर्माण होणाऱ्या प्रश्नाचं आधीच निवारण करणारं आहे.
कुटुंब न्यायालयात रोज २५ ते ३० नव्या केसेस घटस्फोटासाठी दखल होतायत. त्यातल्या किमान निम्म्या केसेस पुण्या-मुंबईतल्या आहेत. आणि त्यापकी बरीचशी कारणे ही अगदी क्षुल्लक असल्याचे दिसते. या प्रकारची आकडेवारी अनेकदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असते. आसपास घडणाऱ्या घटस्फोटांची खबर आपल्या कानावरही येत असते. आता पूर्वीसारखे घटस्फोट क्वचित घडणारे नाहीत, तर कदाचित आपल्या दरवाजापर्यंत येऊन ठेपले आहेत, असे असूनही विवाहपूर्व समुपदेशनासाठी येणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य असते. गेल्या काही वर्षांत यात बदल झाला असला तरीही अजून त्याबद्दल गरसमज खूप आहेत. आता मला लग्न करायचे आहे तर त्याबद्दल काहीतरी शिकावं, समजून घ्यावं असं वाटून त्याबद्दल चर्चा करायला येणारे वधू-वर त्या मानाने कमी आहेत.
प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेला विवाह असो जोपर्यंत पती-पत्नी २४ तास एकत्र राहायला सुरुवात करत नाहीत तोपर्यंत एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज येणं तसं कठीणच असतं. लग्नाचं वयही तसं पूर्वीपेक्षा आता पुढे गेलं आहे. साधारणपणे लग्न होईपर्यंत मुलीचं वय २५ ते २८ दरम्यान तर मुलाचं वय २८ ते ३२ झालेलं असतं. त्यामुळे त्यांची मते पक्की झालेली असतात. स्वभावातली लवचिकता त्या मानाने कमी झालेली दिसते. स्वत:चे इगो प्रखर झाल्याचे दिसून येतात. तसेच वधू आणि वर या दोघांच्याही आई-वडिलांची त्यांच्या संसारात असलेली ढवळाढवळ, कामाच्या वाढलेल्या वेळांमुळे एकमेकांना वेळ देता न येणं, लंगिक पूरकता नसणं, जीवनशैलीत झालेला बदल आणि त्यातली तफावत अशी अनेक कारणे घटस्फोटाची सांगता येतील.
यापकी अनेक कारणांवर विवाहपूर्व समुपदेशनाच्या माध्यमातून चर्चा करता येते. स्वत:ची मते तपासता येतात. वर दिलेल्या उदाहरणांमध्ये आíथक बाबींबद्दल लग्नापूर्वीच बोलता आले असते. कर्जाच्या रकमेबद्दलही आधीच चर्चा करता आली असती. प्रत्येक लग्नेच्छू व्यक्तीने स्वत:च्या आणि आपल्या भावी जोडीदाराच्या कल्पना जाणून घ्यायला हव्यात. प्रत्येक मुलाने आणि मुलीने आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्टी तपासून पाहायला हव्यात, आधी त्याबद्दल विस्तृत चर्चा व्हायला हवी.
सुचित्रा अशीच एक दिवस अचानक आली होती. दोन दिवसांपूर्वीच अमोघ नावाच्या एका मुलाला भेटली होती. सुचित्राच्या पायावर घोटय़ाजवळ एक पांढरा डाग होता. सुचित्राने ही गोष्ट अमोघला सांगितली नव्हती. हे सांगितले तर अमोघ नकार देईल अशी तिला भीती वाटत होती. आणि अमोघ तिला फारच आवडला होता. त्याबद्दलच ती बोलायला आली होती. मी तिला म्हटलं, ‘अगं जे नातं विश्वासाच्या पायावर मजबूतपणे उभं राहायला हवं, तिथे खोटय़ाचा आधार घ्यायचा नाही. आणि हे ऐकून जर त्याने नकार दिला तरी चालेल, मग तो आपल्यासाठी नव्हताच असंही लक्षात घे. पण नात्यात प्रामाणिकपणा खूपच महत्त्वाचा ठरतो.’
लग्न ठरण्यापूर्वी आणि लग्न ठरल्यानंतर दोन्ही वेळा विवाहपूर्व समुपदेशन उपयोगाचे ठरते.  एकमेकांमधला मनमोकळा आणि प्रामाणिक संवाद हा नाते मजबूत करायला खूप उपयोगी पडतो. लग्नापूर्वी दोघांनी आपापली स्वप्ने एकमेकांना सांगितली पाहिजेत. पती-पत्नी हे एक युनिट असायला हवे. कोणती गोष्ट घरातल्या मोठय़ा माणसांना सांगायची आणि काय नाही सांगायचं याबद्दलही लग्नापूर्वी बोललं जायला हवं.
प्रायव्हसीच्या कल्पनांबद्दलही आधी बोलले गेले पाहिजे. कारण हासुद्धा  वादाचा मुद्दा होऊ शकतो.
शैला आणि मुकुंद -नुकतेच लग्न झालेले जोडपे. मुकुंदची बहीण लग्न झालेली, बहुतेक दर रविवारी त्यांच्या घरी यायची. आली की दरवेळी शैला आणि मुकुंदच्या खोलीत दुपारी झोपायला यायची. शैलाला ते नाही आवडायचे. त्यांच्या प्रायव्हसीवर गदा यायची.
तसेच दोघांनी आपापल्या घरातल्या माणसांबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल एकमेकांशी बोललं पाहिजे आणि प्रत्येक नात्याला एक भूतकाळ असतो, हे दोघांनी लक्षात घायला हवं. २५ वष्रे ज्या घरात मुलगी राहिली आहे त्या घरातल्या माणसांबद्दल तिला प्रेम वाटणारच हे जाणून घ्यायला हवे, आणि तरीही आपापल्या आई वडिलांना किती अंतरावर ठेवायचं हेही दोघांनी ठरवायला हवं. कारण प्रेमापोटी आई-वडील ढवळाढवळ करत नाहीयेत न हेही लक्षात घ्यायला हवं.
सगळ्या बाबतीतला खुलेपणा, प्रामाणिकपणा, नात्याचे बंध मजबूत करायला उपयोगी पडतो. कोणतीही माहिती लपवून ठेऊ नये. एकमेकांचं लहान लहान गोष्टींबद्दल कौतुक करायला हवं. एकमेकांसाठी छोटय़ा छोटय़ा गोष्टी लक्षात ठेवून करायला हव्यात, म्हणजे त्या माणसाच्या दृष्टिकोनातून आपण स्पेशल आहोत असं वाटतं आणि ही भावना सुखद असते.
सानिका आणि अद्वैत लग्न ठरल्यावर एकदा बाहेर जेवायला गेले होते. त्या दिवशी त्याला कळलं की जिरेपूड घातलेलं ताक तिला खूप आवडतं. त्याने ते लक्षात ठेवलं होतं. एक दिवस ती त्यांच्या घरी जेवायला गेली होती. अद्वैतच्या आईने तिला पानात ताक वाढलं, अद्वैत पटकन आईला म्हणाला, ‘जिरेपूड दे, तिला ताकात जिरेपूड आवडते.’ सानिकाला खूप आनंद झाला. इतकी लहानशी गोष्ट त्याने लक्षात ठेवून केली म्हणून.
अशा लहान लहान गोष्टी लक्षात ठेवून केल्या की नात्यातली गंमत वाढीला लागते.
(उर्वरित भाग २७ जुलैच्या लेखात)

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’