अरुणा सबाने

राजकुमारी गौतमीचा एक बौद्ध भिक्खूनी होण्यापर्यंतचा प्रवास हा स्त्रीचा मुक्तीच्या दिशेने झालेला प्रवास होता. धम्मात येऊन बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी भिक्खू होण्याची परवानगी स्त्री असल्याने नाकारणाऱ्या गौतम बुद्धांना स्त्री हे काम करू शकते हे पटवून देणाऱ्या त्यांच्या माता गौतमीच होत्या. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र भिक्षुणी संघ स्थापन केला. या स्त्रियांनी लिहिलेल्या अनुभवांतून भारतीय वाङ्मयात स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या पहिल्या साहित्यकृतीची, ‘थेरगाथा’ची निर्मिती झाली. सहाव्या शतकात स्त्रियांची चळवळ गौतमींच्या माध्यमातून सुरूच नव्हे तर गतिमान झाली. येत्या सोमवारच्या (१६ मे) गौतम बुद्ध जयंती वा बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने महाप्रजापती गौतमी यांच्या कर्तृत्वाचा आठव.

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
pm modi launches infrastructure projects in tamil nadu
मोदींच्या हस्ते तामिळनाडूत १७,३०० कोटींच्या नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन; काँग्रेस आणि द्रमुकवर टीकास्त्र
Loksatta anvyarth Two years The war in Ukraine began Russia numerical superiority
अन्वयार्थ: नुसते लढ म्हणा..?

भारताच्या इतिहासात गौतम बुद्ध आणि बौद्ध साहित्य संस्कृतीचा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे. मनातील उदात्त भावना सतत जागृत ठेवण्याचे काम ही संस्कृती करते. कुणाही विचारशील माणसाला बुद्ध संस्कृतीची भुरळ पडावी असेच हे तत्त्वज्ञान आहे. सोमवार १६ मे रोजी गौतम बुद्धांची जयंती. गौतम बुद्धांची शिकवण, त्यांचे कार्य, आणि त्यांचे अनुसरण केल्यामुळे घडलेले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी निर्माण केलेला नवसमाज हे सारे अद्भुत आहे. याबद्दल आपण नेहमी बोलतो. पण जिथे जिथे गौतम बुद्ध हा शब्द उच्चारला जातो, तिथे तिथे मला महाप्रजापती गौतमींची, त्यांच्या कार्याची आठवण येते. एक विचार असाही मनात येऊन जातो की गौतमी नसती तर बाळ गौतमाचे काय झाले असते?

सिद्धार्थचा जन्म झाला आणि हे बाळ अवघे ७ दिवसांचे असताना त्यांची आई राणी महामाया यांचा मृत्यू झाला. पण या सात दिवसांच्या बाळाला पोरके होऊ न देता राणी महामाया यांची धाकटी बहीण- कोशाल राज्याची राजकुमारी गौतमी यांनी त्या बाळाला हृदयाशी कवटाळले, ते आजन्म. पुढे त्यांनाही मुले झाली, पण त्यांचे पहिले आणि लाडके अपत्य राहिले ते सिद्धार्थच. गौतमी यांनी सिद्धार्थना आपले बाळ म्हणूनच वाढवले. त्या अतिशय प्रेमळ जरी असल्या, तरी योग्य ठिकाणी कडक शिस्त बाळगण्यात कचरल्या नाहीत. पुढे जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धत्वास पोहोचले आणि त्यांनी बुद्धधम्माचा स्वीकार करून प्रचार आणि प्रसार सुरू केला, तेव्हा त्या अरहंत पद प्राप्त करणाऱ्या एक भिक्खूनी होत्या. राजकुमारी गौतमींची एक भिक्खूनी होण्याचा हा प्रवास काही एका दिवसातला नाही. त्यामागे त्यांचे दीर्घ चिंतन होते. विचार होता. त्या अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धीच्या होत्या. शाक्य संघात झालेल्या घडामोडींवर त्या त्यांचे पती राजा शुद्धोदन आणि तरुण सिद्धार्थ यांच्याबरोबर संवाद करीत असत. राज्यकारभारात जरी त्या हस्तक्षेप करीत नसल्या, तरी महालात राजा शुद्धोदन आणि राजपुत्र सिद्धार्थाच्या चर्चेत त्या भाग घेत आणि योग्य ठिकाणी आपली मतेही ठामपणे सांगत. या चर्चेतूनच त्यांना कपिलवस्तूचे शाक्य आणि देवदह रामग्रामचे कोलीय या दोन गणराज्यांत रोहिणी नदीच्या पाण्यावरून चालत असलेल्या वादाची पूर्ण कल्पना होती. सिध्दार्थ यांच्याबरोबर त्यांच्या या विषयावर नियमित चर्चा होत असत. हळूहळू या वादाने उग्र रूप धारण केले. रोहिणी नदीच्या पाण्यासाठी युद्ध अटळ आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. सिद्धार्थ यांनी या युद्धाला कडाडून विरोध केला. मात्र सभागृहाच्या नियमाप्रमाणे, ‘युद्धाला विरोध केला म्हणून मी गृहत्याग करतो,’ असे त्यांनी जाहीर केले. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. ती राजा शुद्धोदन आणि महाराणी गौतमी व गौतमाची पत्नी यशोधरेपर्यंत पोचली. सगळा राजवाडाच दु:खसागरात बुडाला. कोण कुणाला समजावणार?

राजा शुद्धोदन त्यांना प्रेमाने रागावू लागले. निर्णय बदलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करू लागले. आईची मायाही अश्रूंवाटे वाहू लागली. ‘‘इतका कठोर निर्णय तू आमच्याशी चर्चा न करता कसा घेऊ शकतोस?’’ म्हणून गौतमी यांनी सिद्धार्थला कवटाळले. गौतमाची पत्नी यशोधरेचे दु:ख बघवत नव्हते. कुणीच कुणाचे सांत्वन करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पण काही वेळाने माता गौतमीच भानावर आल्या आणि राजा शुद्धोदनाला व यशोधरेला समजावत त्या म्हणाल्या, ‘‘महाराज, आपण तिथे असतो, तर आपणही पाण्यासाठी होणाऱ्या युद्धाला विरोधच केला असता. युद्धात काय होते, किती रक्तपात होतो, किती घरे उजाड होतात, कित्येकांच्या आयुष्यात अंधार पसरतो, हे आपण जाणतोच. गौतमाचा निर्णय मानवजातीच्या आणि शाक्यांच्या कल्याणाचा आहे. आपल्या शोकाने त्याचे पाय मागे खेचणे बरोबर नाही. तो एका उदात्त हेतूसाठी परिव्रजक (संन्यासी) होतो आहे.’’ गौतमी यांचे बोलणे ऐकून सारेच अवाक झाले. एवढे धारिष्टय़, इतका मनाचा मोठेपणा कुठून आला असेल गौतमींमध्ये? यातूनच आपल्याला गौतमी यांच्या मोठय़ा मनाची, उदात्त विचारांची कल्पना येते. प्रचंड दु:ख झालेले असतानाही मानवकल्याणासाठी परिव्रजक होण्यासाठी निघालेल्या आपल्या लाडक्या पुत्राला ती पाठिंबा देते. अशी ही जगावेगळी आई गौतमी. आणि तिच्याच संस्कारातून घडलेला सर्वश्रेष्ठ तथागत गौतम बुद्ध.

या देशात स्त्री, शूद्रातिशूद्रांच्या मुक्तीचे आणि म्हणूनच भारतीय स्त्रीवादी साहित्याचे पहिले प्रणेते आणि ऊर्जाकेंद्र तथागत गौतम बुद्ध आहेत, असे म्हणायला काहीच हरकत नाही; पण त्यांच्याच बरोबरीने, किंबहुना एक पाऊल पुढे महाप्रजापती गौतमी आणि खुद्द यशोधरा आहे. भगवान बुद्धाने आपल्या प्रगतिशील आणि क्रांतिकारी विचारांतून मानवाच्या विकासाला गतिशील केले. बुद्ध धम्माचा इतिहास हा बुद्धिमत्तेचा, तत्त्वज्ञानाचा, स्त्रीसुधारणेचा इतिहास आहे. बुद्ध हे जगातील पहिले तत्त्वज्ञानी मानले जातात, ज्यांनी स्त्रियांचा अधिकार मान्य केला. यात महाप्रजापती गौतमींचा सहभाग महत्त्वाचा आहे. गौतम बुद्धांनी भिक्षु संघ स्थापन केल्यावर धम्मप्रसारासाठी ते सतत फिरत असत. हळूहळू त्यांचे शिष्यही भरपूर वाढले. मात्र त्यावेळी फक्त पुरुषांनाच धम्मात प्रवेश होता. गौतमींना ही गोष्ट खटकत होती. एकदा बुद्ध आपल्या धम्माचा प्रसार करीत करीत कपिलवस्तूला आले असताना आणि शाक्यांनी बांधलेल्या निग्रोधारा विश्रांतीगृहात विश्रांती करीत असताना महाप्रजापती बुद्धाकडे गेल्या आणि म्हणाल्या, ‘मला बुद्ध धम्मात येण्याची व तुमच्या ज्ञानाची विद्यार्थी उपासक होण्याची इच्छा आहे.’’ गौतमी यांनी बुद्ध धम्मात प्रवेश परवानगी मागताच बुद्ध म्हणाले, ‘‘भिक्खूंचे जीवन हे गृहहीन जीवन असते. तो कुठेही झाडाखाली राहतो. अरण्यात झोपडी बांधून जगतो. पाच घरे भिक्षा मागून खातो. नदी किंवा विहिरीवर स्नान करतो. एकटाच फिरतो आणि माझ्या ज्ञानाचा प्रसार करतो. पुरुषप्रधान समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. आधी मला स्त्रीकडे समान दृष्टीने पाहणारे सामाजिक वातावरण निर्माण केले पाहिजे.’’ असे म्हणून ते पुढल्या वाटेने निघून गेले. गौतमींचे मात्र या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांच्या मनात तर बुद्ध धम्मात येऊन त्या धम्माचा प्रचार करण्याचा विचार ठाण मांडून बसला होता. त्यांनी बराच विचार केला. यशोधरा आणि इतर सहकारी स्त्रियांसोबत चर्चा केली. आणि प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. त्या वेगवेगळय़ा गावी जाऊन स्त्रियांना भेटत होत्या, त्यांच्याशी चर्चा करत होत्या, त्यांना बुद्ध धम्माचे महत्त्व पटवून देत होत्या. ‘पुरुषांना जशी भिक्खू होण्याची संधी तथागतांनी दिली, तशी आम्हाला का नको, याबद्दल आपणास काय वाटते?’ असे विचारून त्या स्त्रियांना बोलते करीत होत्या. हळूहळू अनेक स्त्रिया बोलायला लागल्या. ‘‘बुद्धाच्या विचारांमध्ये माणसाचे आणि समाजाचे मानसिक परिवर्तन चांगल्या दिशेने व्हावे, ही तळमळ आहे. जुना विषमतावादी समाज बदलून समतावादी समाज घडावा, ही दृष्टी आहे. या विचारात आपणही सहभागी झाले पाहिजे.’’ असे गौतमी सभांमध्ये सांगत होत्या. स्त्रिया तयार होत होत्या. गावागावांतून स्त्रिया एकत्र करणे, त्यांना आपला मुद्दा पटवून देणे आणि स्वेच्छेने येणाऱ्या स्त्रियांना आपल्या समुदायात सामावून घेणे हे क्रांतिकारी कार्य गौतमी यांनी केले. आणि शेवटी सर्वानी मिळून एक दिवस निश्चित करून यशोधरा व इतर शाक्य स्त्रियांना बरोबर घेऊन त्या वैशालीला जिथे बुद्ध मुक्कामी होते, तिथे निघाल्या. वैशालीला पोहोचल्यावर सर्वप्रथम त्यांनी बुद्धाचा आवडता शिष्य आनंद याच्याशी चर्चा केली. आपली मते त्याला पटवून दिली आणि आनंदच्याच मदतीने स्त्रियांचा भिक्षुणी संघ स्थापन करण्याची परवानगी गौतम बुद्धांकडून मिळवली. जगातील स्त्रियांचे पहिले संघटन हे महाप्रजापती गौतमींचेच आहे. कपिलवस्तू ते वैशाली हा प्रवास केवळ स्त्रियांना, तोही ५०० स्त्रियांना घेऊन करणे सोपे नव्हतेच. पण हा प्रवास करण्याचे अचाट साहस आणि भिक्षुणी संघ स्थापन करण्याचे प्रयत्न दोन्ही त्यांनी यशस्वी करून दाखवले.

गौतमी यांचे हे कर्तृत्व वाचल्या-ऐकल्यावर माझ्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो, बुद्धासारख्या समान वागणूक देणाऱ्या महान तत्त्ववेत्त्याच्याही मनात स्त्री सामर्थ्यांबद्दल शंका का यावी? गौतमीवर, आपल्या मायमावशीवर त्यांनी लगेच विश्वास का टाकू नये? त्यासाठी आनंदच्या मध्यस्थीची गरज का भासावी? ते म्हणतात, ‘सध्याची सामाजिक परिस्थिती स्त्रियांसाठी अनुकूल नाही.’ पण गौतमी, यशोधरा आणि इतर स्त्रियांनी ती शक्य करून दाखवलीच. निवडलेला मार्ग त्यांनी चोखपणे पुढे हाताळला आणि यशस्वीही करून दाखवला. महाप्रजापतीने ज्ञानप्रक्रियेत, समाजनिर्मिती प्रक्रियेत स्वत: सामील होण्याचे आणि इतर स्त्रियांना सामील करण्याचे शिक्षण दिले. एक स्वतंत्र भिक्षुणी संघ स्थापन केला. पुढे या स्त्रियांनी हे नवे आयुष्य जगत असताना आलेले अनुभव लिहून काढले आणि त्यातूनच ‘थेरगाथा’ या स्त्रीवादी वाङ्मयाची निर्मिती झाली. भारतीय वाङ्मयात स्त्रीवादाची मांडणी करणारी पहिली साहित्यकृती ही ‘थेरगाथा’च मानली जाते. सहाव्या शतकात ही स्त्रियांची चळवळ गौतमींच्या माध्यमातून सुरूच नव्हे तर गतिमान झाली, यशोधरेमुळे ती विकसित झाली. त्यातून अनेक स्त्रिया पुढे गुरुपदी पोचल्या. विचारवंत, कवयित्री झाल्या. सम्राट अशोकाने आपली मुलगी संघमित्रा हिला श्रीलंकेत बौद्धभिक्षुणी म्हणून पाठवले. ती जागतिक पातळीवर पहिली स्त्री गुरू उपदेशक म्हणून इतिहासात प्रसिद्ध झालेली आहे, हे आपण पाहतोच. म्हणूनच मी म्हणते, की आजच्या स्त्रीवादी चळवळीला महाप्रजापती गौतमी आणि यशोधरेच्या प्रयत्नांचे योगदान आहे. ते अनन्यसाधारण आहे. हे आपण विसरता कामा नये. यात यशोधरेचे नाव घेण्यास सबळ पुरावा आहे. ती स्वयंभू स्त्री होती, हे तिने सिद्ध करून दाखवले. ती जेव्हा बुद्धाला भेटायला येते तेव्हा बुद्धाला म्हणते, ‘मीच माझे आश्रयस्थान आहे’. (संदर्भ, ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, लेखक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर) हे यशोधरेचे वाक्य म्हणजे, ‘स्त्रियांनी स्वत:च स्वत:च्या जीवनाच्या शिल्पकार झाले पाहिजे. आपणच आपले आश्रयस्थान असले पाहिजे, दुसऱ्यांवर अवलंबून राहणे योग्य नव्हे.’ हे बोधवाक्य आजच्या अनेक सुशिक्षित, बुद्धिवादी विचारसरणी स्वीकारणाऱ्यांनी घेण्यासारखे आहे. ‘थेरगाथा’ या पुस्तकात अनेक स्त्रियांच्या दु:खमुक्तीची साक्ष सापडते. हा स्त्रीसुधारणेचा इतिहास कालपर्यंत पडद्याआड होता. तो आता आता पुढे आला.

गौतमी यांनी अनेक स्त्रियांना स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखवला. त्या काळात यशोधरा, गोपी, भड्डा, कच्छना अशा विदुषी होऊन गेल्या. गौतमी तर या श्रेष्ठ संस्कृतीच्या जडणघडणीसाठी झटणारी एक सांस्कृतिक स्त्री म्हणून दया, क्षमा, शांती, संघर्ष आणि संयम या तत्त्वांची साक्षात मूर्तिमंत मूर्ती म्हणून माझ्या डोळय़ासमोर उभी राहते. आज एकविसाव्या शतकातही ‘माझा-तुझा’ हा भेद संपायला आणखी किती काळ जावा लागेल, कुणास ठाऊक.

  महाप्रजापती, यशोधरा, संघमित्रा किंवा बुद्धाने हा विचार केला असता, तर ‘थेरगाथा’ निर्माणच झाली नसती. भिक्षुणी संघही निर्माण झाला नसता. कोण कोणत्या जातीत जन्माला येतो, हे महत्त्वाचे नाही, तर तो कोणते विचार आयुष्यात पेरतो, हे महत्त्वाचे आहे. मनाची एवढी उंची गाठणे आज आमच्यापैकी कुणाला जमेल? गौतमीचा थोडा तरी आदर्श आपण ठेवू शकू का?

arunasabane123@gmail.com