माणसाचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे, याचा साक्षात्कार गंभीर आजारी पडल्यावर किंवा रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागल्यावरच अनेकांना होतो. प्रत्यक्षात आरोग्य जपणं तितकंसं कठीण नसतं. त्याला आपण कधी प्राधान्यच न देणं किंवा ते द्यावंसं न वाटणं, ही पुष्कळांची खरी समस्या! सजग राहून जगायचं असेल, तर मात्र शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आवश्यक आहे. तरच प्रत्येक क्षण पूर्ण क्षमतेनं अनुभवता येईल.

मानवतेबद्दल भाष्य करताना दलाई लामा माणसाच्या अल्प काळापुरताच विचार करण्याच्या स्वभावाबद्दल सांगतात. संपत्तीच्या मागे धावताना माणूस स्वत:च्या स्वास्थ्याचा विचार बाजूला सारतो आणि नंतर तो पैसा गमावलेलं आरोग्य पुन्हा मिळवण्यात खर्च होतो! यात अधोरेखित काय होतं, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या जर माणूस आरोग्यसंपन्न नसेल, तर भौतिक यशाला काही अर्थ उरत नाही.

मागील काही लेखांमध्ये आपण नातेसंबंधांविषयी बोलतोय. पण त्याबरोबर आरोग्य, आपलं एकूणच स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. संपत्ती आणि यश मिळवण्याच्या नादात आपण आरोग्याची किंमत ओळखायला चुकतो. आधुनिक जगात आर्थिक फायदा, स्थावर-जंगम मालमत्ता, प्रसिद्धी, या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं, मात्र त्या धकाधकीत अनेकदा स्वास्थ्याचा बळी जातो. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या जाहिराती सध्या जोमात आहेत. त्या बहुतेक जाहिरातींमध्ये ‘गतवर्षी आमच्याकडे शिकलेल्या अमुक इतक्या विद्यार्थ्यांना लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या,’ अशी आकडेवारी रंगवून दिलेली असते. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्यासमोर ध्येय काय असतं?… तर आयुष्यात भरपूर पैसा मिळेल असा नोकरीधंदा!

आधुनिक जीवनशैलीत ताण पुष्कळ आहेत. त्यात नोकरीत त्या व्यक्तीकडून सातत्यानं उत्तम कामगिरीची अपेक्षा असते. कुटुंबाची जबाबदारी आणि सामाजिक जीवन यांचाही तोल साधायचा असतो. या कसरतीत आरोग्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष होतं. ते जणू गृहीतच आहे. रोजच्या संघर्षातून वाट काढताना तब्येतीचा विचार करायला वेळ नसतो. पण ‘सजगतेनं जगणं’ या संकल्पनेत आपला दैनंदिन जगण्याचा वेग थोडा कमी करत व्यक्तीनं आरोग्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. ही ‘निवड’ नाहीये, ‘गरज’च आहे.

हेही वाचा >>> पाळी सुरूच झाली नाही तर?

सर्वांगीण स्वास्थ्याच्या पायावर आयुष्याची इमारत उभी आहे. जेव्हा तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा आयुष्यातल्या अनुभवांशी पूर्णपणे समरस होऊन त्यांची मजा घेता येत नाही. त्यामुळे आरोग्याचा विचार सर्वांत शेवटी करण्याची मानसिकता आधी बदलायला हवी. मौल्यवान संपत्ती म्हणून त्याला अग्रक्रम हवा.

आपण सतत व्यग्र का असतो? घाईत का असतो? आपण करतोय ते काम कितीही समाधान देणारं असलं, तरी न संपणारी धावपळ, अवास्तव अपेक्षा, सारखा तणाव, या चक्रात ते समाधान हिरावून घेतलं जाईल, हे आपल्यालाही खरं तर माहिती असतं. कारण या प्रकारात कामातली मजा हरवते. तरी आपलं लक्ष कुठे? तर सतत पुढे काय करायचं? सगळ्या गोष्टी दिनक्रमात ‘कट टू कट’ कशा बसवायच्या? प्रत्येक विनंतीला ‘हो’च म्हणायचं… याकडे! पण त्यामुळे आता जे समोर आहे, त्याचा आनंद घेता येत नाही.

सिल्व्हिया बेलेझा या कोलंबिया बिझनेस स्कूलमधल्या एक संशोधक. त्या सांगतात, की माणूस सारखा व्यग्र आहे, म्हणजे ती कुणी तरी उच्चभ्रू व्यक्ती असणार, असा समज असतो. ‘मी सतत काम करतोय,’ हे माणूस सारखा दुसऱ्याला दाखवून देत असतो. याचा कंसातला अर्थ ‘मी फार महत्त्वाची व्यक्ती आहे’ किंवा ‘मला बघा किती मागणी असते!’ असा असतो. बेलेझा यांच्या मते माणूस व्यग्र असणं आणि तो महत्त्वाचा असणं, याची बरोबरी केली जात असल्यामुळे ‘सतत काम करा, तरच तुमची योग्यता सिद्ध होईल,’ असा संदेश आपल्याला मिळतो.

व्यग्रता हा माणसाच्या यातनांवरचा वेदनाशामक उपाय आहे, असंही म्हणतात आणि या पैलूवर काही संशोधनंही झाली आहेत. स्वत:ला सतत काही ना काही कामात गुंतवून घेण्यात आपण जगण्यातल्या वेदनेच्या जाणिवा बधिर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रूढ अर्थानं अशा व्यक्तीची प्रगती होताना दिसते, पण खरं तर त्याचे मूळ प्रश्न त्यानं उत्तरांशिवाय गाडून टाकलेले असतात. अस्वस्थ करणारं सत्य दूर सारण्यासाठी किंवा आपणच आपल्याला खोदून खोदून प्रश्न विचारणं टाळण्यासाठी व्यग्रता ढालीसारखी वापरली जाते. थोडक्यात, सारखं कामात का राहायचं? तर, वास्तवापासून दूर पळण्यासाठी! तुमच्या सततच्या व्यग्रतेची कारणं काहीही असोत, पण शेवटी तिचं पर्यवसान दुष्टचक्रात होतं. आपल्या हातात सगळं नियंत्रण असल्याची हवीहवीशी जाणीव आणि त्या क्षणी काय चकचकीत, झगझगीत दिसतंय, या दोन गोष्टींमध्ये आपलं मानसिक आणि भावनिक आरोग्य मागे राहतं. सारखं कामात राहायचंय, ही खूणगाठ मनानं बांधली, की दिवसभर आपण अनेक अगदी बिनमहत्त्वाची कामंही करत राहतो; केवळ कामात राहण्यासाठी! अशा वेळी आपला दृष्टिकोन बदलायला हवा. आपण सहसा यांत्रिकपणे कामं करत राहतो. एक प्रयोग करून बघा- नोकरी-व्यवसायातलं तुमचं नेहमीचंच काम करताना याचा इतरांना किंवा समाजाला कसा उपयोग होणार आहे, असा विचार करून पाहा. म्हणजे समजा, तुम्ही सिग्नलच्या दिव्यांचे सुटे भाग बनवणाऱ्या कारखान्यात काम करताय… आता वरवर पाहता हे काम एकसुरीच. पण असा विचार करून बघा, की सिग्नलच्या लाल-हिरव्या-पिवळ्या दिव्यांमुळे वाहतुकीचं नियंत्रण होतं, अपघात टळतात आणि लोकांचा जीव वाचतो. इतक्या महत्त्वाच्या कार्यात आपला खारीचा वाटा आहे, असा जर दृष्टिकोन ठेवला, तर नेहमीच्याच कामाबद्दल तुमच्या मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होईल. काम केल्यावर समाधान वाटू लागेल. दृष्टिकोनातल्या अशा बदलामुळे अंतिमत: व्यक्तीला एकूणच अधिक बरं वाटायला लागतं.

हेही वाचा >>> सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!

लोकांशी होणाऱ्या संवादातून मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली, की आनुवंशिकतेनं जे आजार आपल्याकडे येतात ते येणारच, हे अनेकांनी गृहीत धरलेलं असतं. ‘माझं आरोग्य चांगलं का नाही?… तर आनुवंशिकता! त्यापुढे काय करणार?’ असा सूर असतो. त्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी काही करायला हवं, याचं गांभीर्यच लोकांच्या लक्षात येत नाही. खरं तर जीवनशैलीत काही चांगले बदल केले, तर आरोग्यावर उत्तम नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे आनुवंशिकतेनं येणारे विकार हेच आपलं नशीब, असं नसतं! आपण कशा प्रकारची जीवनशैली स्वीकारतो, त्यावरही आरोग्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदी जीवनाकडे टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वत:वर आहे, हे समजून आचरण करणं. मी चाळिशी ओलांडली, तेव्हा एखाद्या फोनची बॅटरी जशी झरझर उतरते, तशी माझ्या शरीरातली ऊर्जा दिवसभर वेगानं कमी कमी होतेय, हे मला जाणवलं. दिवसभर मला थकवा, निरुत्साह जाणवायचा. कंबर वारंवार दुखत असे. मी वारंवार आजारी पडत असे. शनिवार-रविवार पुणे-मुंबई प्रवास झाला, की लगेच मला सर्दी-खोकला झालाच! कामात ऊर्जा राहावी म्हणून मी रोज तीन-चार कप कडक ब्लॅक कॉफी प्यायचो. या काळात मी रात्री सात-आठ तास झोपत होतो आणि किमान आठवड्यात तीन दिवस जिमला जात होतो. तरी मला ताजतवानं वाटण्याऐवजी मलूल आणि आजारी वाटायचं. नंतर माझी भेट एका आहार-मानसतज्ज्ञांशी झाली. आहाराबद्दल आपल्या मनात किती गैरसमज आहेत, याविषयी त्यांनी छान मार्गदर्शन केलं. त्यांनी माझ्या हेही लक्षात आणून दिलं, की आरोग्योचा विचार सर्वांच्या बाबतीत सरसकट सारखा करता येत नाही. आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं, त्याचं म्हणणं ऐकता आलं पाहिजे. आपण काय खातो, ते जाणीवपूर्वक निवडणं आपल्या हातात असतं. जीवनशैलीत संतुलन आवश्यक आहे. शिवाय कठीण परिस्थितीत तग धरून राहणं जमवावं लागतं. माझं आरोग्य आणि ऊर्जा माझ्याच हाती आहे, हे हळूहळू माझ्या लक्षात आलं.

आधुनिक जीवनातली गुंतागुंत वाढतच राहणार. पण त्यातून मार्ग काढताना केवळ बाह्य गोष्टींवर माणसाचं यश अवलंबून नाही, तर आतून आपण किती सुदृढ आहोत हे तपासणं लक्षात ठेवायला लागतं. तेव्हा आपले प्राधान्यक्रम पुन्हा नव्यानं ठरवू या, कारण आरोग्य हा समृद्ध अस्तित्वाचा पाया आहे. पट्टीच्या धावपटूलाही क्षणभर विश्रांती लागतेच! दलाई लामांच्या ज्या विचारानं आपण या लेखाची सुरुवात केली होती, त्याचा अर्थ आता उलगडला का?…

आणखी एक गोष्ट अशी, की आरोग्याशी असलेलं आपलं नातं सुधारणं केव्हाही सुरू करता येतं. अगदी प्रत्येकजण ते करू शकतो. विशिष्ट काळानंतर त्याची वेळ उलटून गेलीय, असं काही नसतं! सजगतेनं जगण्यातला तो महत्त्वाचा टप्पा आहे…

sanket@sanketpai.com