scorecardresearch

Premium

प्रजननक्षमतेची जपणूक!

काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक जोडपे ‘आय.व्ही.एफ.’ पूर्व उपचारांसाठी आले होते.

प्रजननक्षमतेची जपणूक!

डॉ. अवंतिका वझे (परब)
स्त्रीबीजदान, शुक्राणूदान, भ्रूण गोठवणूक, स्त्रीबीज गोठवणूक, सरोगसी, गर्भारपणापूर्वीच्या चाचण्या आदी आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे यशस्वी गर्भधारणेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. फक्त भारतातच दरवर्षी दोन ते अडीच लाख आय.व्ही.एफ. उपचारप्रक्रिया होतात. याशिवाय वयापरत्वे स्त्रीबीजांचा ऱ्हास होणं, रजोनिवृत्ती लवकर येणं, शिक्षण-नोकरीला प्राधान्य देणं, सुयोग्य जोडीदार न मिळणं या कारणांमुळे स्त्रीबीजांची गोठवणूक अर्थात प्रजननक्षमतेची जपणूक करण्याचे प्रमाण स्त्रियांमध्येही वाढू लागले आहे. मात्र हा निर्णय घेताना सर्वंकष विचार करणं किती गरजेचं आहे ते सांगणारा हा खास लेख २५ जुलैच्या ‘आय.व्ही.एफ. डे’च्या निमित्ताने..

काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक जोडपे ‘आय.व्ही.एफ.’ पूर्व उपचारांसाठी आले होते. स्त्रीचे वय ३४ वर्षे आणि तिच्या नवऱ्याचे ४० वर्षे. लहान वयातच स्त्रीबीजे संपल्याने त्या स्त्रीला ‘डोनर आय.व्ही.एफ.’चा सल्ला दिला होता. (म्हणजे दात्याची स्त्रीबीजे व नवऱ्याचे शुक्राणू वापरून गर्भ तयार करून तिच्या गर्भाशयात सोडणे) त्यासाठी तिच्या नवऱ्याचे शुक्राणू आमच्याकडे गोठवून ठेवलेले होते. नंतर मात्र घडले ते वेगळेच. नवऱ्याचे अचानक करोनामुळे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांतच ही स्त्री माझ्याकडे आली, पतीचे शुक्राणू वापरून आय.व्ही.एफ.द्वारा लवकरात लवकर बाळ व्हावे याची मागणी करत! कायद्यानुसार तिच्या आणि तिच्या माहेर अन् सासरच्या सज्ञान व्यक्तीच्या संमतीने जर ती निर्णय घेत असेल, तर मी उपचार नाकारू शकत नव्हते. पण मी विचार करत होते, की ती व तिचे कुटुंब आता दु:खाच्या भरात आहेत. काही महिन्यांनी ते सावरतील. तिचे वय तरुण आहे. मग तिला आताच का एकटीने एका मुलाची जबाबदारी घ्यायची आहे? काही महिन्यांनी वा वर्षांनी तिला जर दुसरे लग्न करायची इच्छा झाली, तर ही गोष्ट नक्कीच अडचणीची ठरू शकेल. त्यापेक्षा तिने सारासार विचार करून दु:खातून सावरल्यावर हा निर्णय घेतला असता तर नंतरही करता आलेच असते की उपचार! पण तिच्या बोलण्यातून जाणवले ते समाजाचे भय. नवरा नसताना गर्भवती झाल्यास ‘लोक काय म्हणतील’ याची चिंता! गोठवलेल्या शुक्राणूंचा वापर करत आधुनिक तंत्रज्ञान अवलंबताना तिला मात्र बुरसटलेल्या समाजाचा विचारच जास्त त्रास देत होता. आय.व्ही.एफ. उपचारांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या सुधारणांबरोबरच त्याच्या बरोबरीने बदललेल्या अनेक सामाजिक बाबीही या निमित्ताने समोर आल्या.

letter to Prime Minister narendra modi
क्षयरुग्णांसाठी जगभरातील मान्यवरांचे पंतप्रधानांना पत्र, तातडीने औषधे उपलब्ध करून देण्यासाठी विनंती
Pitru Paksha Shradhh Dates Tithi Never Make These 5 Living Things Go Empty Hand From Home Pinddan Rules Tarpan Mahiti
पितृपक्षात कावळ्यासह ‘या’ ५ जीवांना रिकाम्या पोटी पाठवू नका; पूर्वजांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभू शकते
india's retail inflation rate, india's retail inflation rate declined
महागाईतून काही अंशी दिलासा; जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दरात घट
Byju’s Layoff
बायजू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; कर्जदारांना ९९४७ कोटी देण्यास तयार, नेमकी योजना काय?

अर्धशतकाहून जास्त काळापूर्वी ‘आय.व्ही.एफ.’ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) वा ‘टेस्ट टय़ूब बेबी’संबंधी माणसाचे संशोधन सुरू झाले. १९७८ पूर्वी जरी गर्भारोपण करण्यात यश आले असले, तरी गर्भधारणा होऊन पहिल्या बालिकेचा जन्म मात्र २५ जुलै १९७८ रोजी झाला. म्हणूनच २५ जुलै हा दिवस ‘आय.व्ही.एफ. डे’ म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मात्र या तंत्रज्ञानानं झपाटय़ाने प्रगती केली. भ्रूण गोठवणूक (अगदीच प्राथमिक अवस्थेतील) (Embryo freezing),स्त्री बीज गोठवणूक (Egg freezing), ICSI (Intracytoplasmic sperm injection), स्त्री बीजदान, शुक्राणूदान, वृषणातून शुक्राणू काढण्याची प्रक्रिया ( TESE- Testicular sperm extraction), सरोगसी, गर्भारपणापूर्वीच्या जनुकीय चाचण्या, यामुळे यशस्वी गर्भधारणेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आणि अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर मात करता आली. फक्त भारतातच दरवर्षी दोन ते अडीच लाख आय.व्ही.एफ. उपचारप्रक्रिया होतात. एवढेच नव्हे, तर या उपचारपद्धतीसाठी भारतात लागणारा खर्च इतर प्रगत देशांपेक्षा कमी असल्याने यासाठी भारतात येणाऱ्या परदेशी जोडप्यांची संख्यांही मोठी आहे.


गेली काही वर्षे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून काम करताना त्याच्याशी निगडित वेगवेगळय़ा सामाजिक आणि मानसिक बाबी समोर आल्या. त्यातील काही गोष्टी गेल्या काही वर्षांत प्रकर्षांने बदललेल्या दिसतात. या उपचार पद्धतीमधील सामाजिक, मानसिक, आर्थिक ताण जरी आजही कायम असला, तरी बदललेल्या समाजात या गोष्टी सहजपणे मान्य करून ‘प्रॅक्टिकल’ निर्णय घेणारी बरीचशी जोडपी हल्ली दिसतात. त्यांचे थेट आणि ठाम निर्णय मनाला सुखवून जातात. बऱ्याच जोडप्यांमध्ये हल्ली वेळेच्या अभावामुळे शरीरसंबंध कमी होतात. त्यातल्या प्रत्येकाला आपले शिक्षण, नोकरी याला प्राधान्य द्यावे लागते. अर्थात कुणी कोणत्या गोष्टीस प्राधान्य द्यावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे, परंतु कौतुक याचे, की आपल्या निर्णयांमुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी ही जोडपी ठोस पावले उचलतात. एवढेच नव्हे, तर त्यातून येणारे यशापयश पचवण्यास ती समर्थ असतात. नवराबायकोंच्या एकत्र असण्याच्या वेगवेगळय़ा वेळा, वेगवेगळय़ा शहरातील नोकऱ्या, कामातील ताणतणाव यामुळे बऱ्याच जणांना नैसर्गिक वा साध्या उपायांनी गर्भधारणा कठीण वाटते. आय.व्ही.एफ.पूर्वी सुचवल्या जाणाऱ्या साध्या पद्धतीत वेळ आणि पैसा घालवणे त्यांना सयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे ते आय.व्ही.एफ.ची मागणी करतात. अर्थात त्यातही यशस्वी गर्भधारणेची शक्यता साधारपणे ३० ते ७० टक्के असते. तर त्या आधीच्या सोप्या उपायांत जेमतेम १२ ते १५ टक्के असते. त्यामुळे ही जोडपी व्यावहारिक निर्णय घेऊन झटकन पुढे निघून जातात. ‘माझ्याकडे प्रेग्नन्सीसाठी अमुक महिन्यापर्यंतच वेळ आहे. त्यानंतर माझ्यासाठी नोकरी-व्यवसायात इतर देशात वा इतर शहरात प्रोजेक्ट आहे,’ असे गणित करूनही काही जण येतात आणि आम्हाला ‘टार्गेट’ पूर्ण करण्याची विनंती (मागणी) करतात. अर्थात तेही त्यांच्या दृष्टीने विचार केल्यास काही अयोग्य नसते.

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान तसेच समाजमनात विकसित झालेली एक गोष्ट म्हणजे फर्टिलिटी प्रिझव्र्हेशन अथवा प्रजननक्षमतेची जपणूक वा संरक्षण. पूर्वी अगदी गरज असेल तेव्हा किंवा शेवटचा पर्याय म्हणून स्वीकारली जाणारी आय.व्ही.एफ. उपचारपद्धती आता या जपणुकीसाठी पहिली पायरी म्हणून निवडली जाते. प्रजननक्षमतेची जपणूक म्हणजे प्रजननक्षमतेच्या दृष्टीने उतारवयात वापरता यावी यासाठी तरुण वयात केलेली शुक्राणू, स्त्रीबीज वा भ्रूण गोठवणूक. थोडक्यात ‘प्रजननक्षमतेचे बॅकअप’.

प्रजननक्षमतेची जपणूक करण्यात प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक म्हणजे वैद्यकीय कारणांसाठी अथवा दुसरे- सामाजिक कारणांसाठी. कर्करोगासारख्या काही दुर्धर आजारांमध्ये दिल्या जाणाऱ्या केमोथेरपी व रेडिओथेरपी अशा उपचारांमुळे जननपेशींवर (स्त्रीबीजे व शुक्राणू यावर) नकारात्मक परिणाम होतो. त्यांची संख्या, गुणवत्ता कमी होते. अशा वेळी ते उपचार सुरू करण्यापूर्वी या पेशी गोठवल्यास पुढे अपत्यप्राप्तीची संधी उपलब्ध राहाते. शुक्राणूंची गोठवणूक ही सोपी व कमी खर्चीक असल्यामुळे रोगनिदानानंतर शुक्राणू गोठवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र स्त्रीबीजे आणि भ्रूण गोठवण्याच्या प्रक्रियेत हार्मोन्सची इंजेक्शने, खर्च, कालावधी अन् प्रक्रिया जास्त असल्यामुळे स्त्रीबीजे व भ्रूण गोठवण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. खासकरून काही कर्करोग तरुण वयातही होतात- उदा. स्तनांचा कर्करोग व बऱ्याच स्त्रियांमध्ये उपचारांनी त्याच्यावर पूर्णपणे मातही करता येते. अशांमध्ये कर्करोगाचे निदान झाल्यावर लगेच स्त्रीबीजे (अविवाहित स्त्रियांमध्ये) वा भ्रूण (विवाहित स्त्रियांमध्ये) गोठवण्याचा निर्णय घेता येतो. साधारणत: या प्रक्रियेसाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो.

प्रक्रियेनंतर कर्करोगाचे उपचार लगेच सुरू करता येतात. कर्करोगावरील आधुनिक उपचारपद्धतींमुळे या स्त्रिया कर्करोगातून पूर्णपणे बऱ्या होऊन सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. अशा वेळी गोठवलेल्या स्त्रीबीजांचा वापर करून ती स्त्री स्वत:च्याच स्त्रीबीजांनी आई होऊ शकते. कर्करोगानंतर जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी या प्रक्रियेचा मोठा हातभार आहे. अर्थात त्यासाठी योग्य मार्गदर्शन, समुपदेशन व कर्करोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारणतज्ज्ञ यांचा एकत्रित सल्ला घेणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.

या बाबतीतही काही सामाजिक बाबी आड येऊ शकतात. स्त्रीबीज काढण्याची प्रक्रिया ही योनीमार्गाद्वारे होते. त्यामुळे अविवाहित (किंवा शरीरसंबंध न आलेल्या) स्त्रियांमध्ये त्याविषयी योग्य समुपदेशन करणे महत्त्वाचे ठरते. खर्च ही तर आणखी मोठी बाब. या उपचारप्रक्रियेचा खर्च जास्त असल्याने कर्करोगाच्या उपचारांव्यतिरिक्त हा अतिरिक्त खर्च बऱ्याचजणींना परवडणारा नसतो. मात्र आर्थिकदृष्टय़ा सक्षम स्त्रियांसाठी आपली प्रजननक्षमता जपण्याची ही एक मोठी संधी असते. एवढेच नव्हे, तर आनुवंशिक उत्पत्ती ( Genetic origin) असलेल्या कर्करोगांमध्ये या गर्भाची जनुकीय चाचणी करून ( Pre- implantation genetic diagnosis) कर्करोगाचे जनुकीय घटक नसलेले गर्भ निवडून त्यांचे रोपण केल्यास होणाऱ्या अपत्यांमध्ये संभाव्य धोक्याची शक्यता कमी होऊ शकते.

वैद्यकीय कारणांव्यतिरिक्त केलेली भ्रूणाची वा स्त्रीबीजांची गोठवणूक म्हणजे स्वेच्छेने सामाजिक कारणांसाठी केलेली प्रजननक्षमतेची जपणूक. आधुनिक वैद्यकशास्त्रात गर्भ गोठवणे, स्त्रीबीज गोठवणे, हे सुलभ झाल्याने बऱ्याच स्त्रियांना ही एक ‘गुंतवणूक’ वाटते. वयापरत्वे स्त्रियांच्या शरीरात स्त्रीबीजांचा ऱ्हास होत जातो. खासकरून वयाच्या ३५ वर्षांनंतर हे बदल झपाटय़ाने होतात. तरुण वयात शिक्षण व नोकरीला प्राधान्य देणे ही काळाची गरज होत चालली आहे. बऱ्याच स्त्रियांना योग्य वयात सुयोग्य जोडीदार मिळत नाही. अशा स्त्रियांनी जर योग्य वयात स्त्रीबीजे गोठवून ठेवण्याचा निर्णय घेतला, तर पुढे योग्य जोडीदार मिळाल्यावर, स्थैर्य आल्यावर स्वत:च्याच स्त्रीबीजांनी उतारवयात अपत्यप्राप्ती शक्य होऊ शकते. हल्ली अनेक स्त्रियांमध्ये लहान वयातच स्त्रीबीजांची संख्या कमी झालेली दिसून येते. काहींमध्ये जनुकीय कारणांमुळे रजोनिवृत्ती लवकर येते. अशा स्त्रियांमध्ये लवकरात लवकर स्त्रीबीजे गोठवून ठेवणे फायद्याचे ठरते. परंतु या बाबतीतही योग्य माहिती व मार्गदर्शनाची गरज असते. वयाच्या ३५ वर्षांच्या आत जर स्त्रीबीजे गोठवली, तर त्यांची संख्या व गुणवत्ता अधिक असते. मात्र आपल्याकडे माहितीच्या अभावामुळे बऱ्याच स्त्रिया ३५ वर्षांनंतर या उपचाराकडे वळलेल्या दिसतात. जर या विषयाची माहिती योग्य वयात मिळाली, तर स्त्रिया काही ठोस पावले समर्थपणे उचलू शकतील. मात्र त्यापूर्वी स्त्रीबीजे वा भ्रूण गोठवून ठेवले, तरी त्याद्वारे १०० टक्के गर्भधारणेची खात्री देता येत नाही. या प्रक्रियेद्वारा यशाची शक्यता कमी (जास्तीत जास्त ४५ टक्के) असते. याची माहिती असणे आवश्यक असते. दुसरे म्हणजे जरी भ्रूण गोठवले, तरी भविष्यात गर्भाशयात काही बदल घडू शकतात. शारीरिक व्याधी जडू शकतात. त्यामुळे गर्भधारणा कठीणच नाही, जटिलही होऊ शकते. त्यामुळे जरी भ्रूण गोठवले तरी गर्भधारणा कधीपर्यंत लांबवायची हा निर्णय सावधपणे घ्यावा लागतो.

गेल्या काही वर्षांत सामाजिक कारणांमुळे वा स्वेच्छेने होणारी स्त्रीबीजांची गोठवणूक ही पाश्चात्त्य देशांतच नव्हे, तर आपल्याकडेही वाढू लागली आहे. एवढेच नव्हे, तर काही मोठय़ा कंपन्यांनी आपल्या स्त्री कर्मचाऱ्यांना स्त्रीबीज गोठवण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यास सुरुवात केली आहे. ‘गूगल’, ‘फेसबुक’ सारख्या मोठय़ा कंपन्यांनी ही सुरुवात केली. आता भारतातील काही मोजक्या कंपन्यादेखील हे आर्थिक सहाय्य करतात. यामुळे स्त्रियांना नोकरीला प्राधान्य देताना, जबाबदाऱ्या पेलताना मानसिक आधार व शांती मिळते असे या संस्थांचे मत आहे. मात्र स्वेच्छेने स्त्रीबीज गोठवणूक (Elective social egg freezing)ही एक संधी असली, तरी सामाजिक दृष्टिकोनातूनही त्याचा विचार करणे गरजेचे आहे. उतारवयात होणारी मुले, त्यांचे संगोपन करण्यासाठी या वयातील पालकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता, एका पालकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्यावर ओढवणारी परिस्थिती, या सगळय़ाचा सारासार विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

नुकत्याच चर्चेत आलेल्या ए.आर.टी.
(Assisted reproductive technology) आणि सरोगसी विधेयकांमुळे प्रजननक्षमतेच्या जपणुकीचे महत्त्व वाढले आहे. आतापर्यंत स्त्रीबीजे संपलेल्या वा कमी झालेल्या स्त्रीसाठी डोनर एग (स्त्री बीजदान ) उपचारपद्धती सहज केली जायची. आता त्याच्यावर बरेच निर्बंध आणले गेले आहेत, त्यामुळे ती तेवढी सुलभ राहिलेली नाही. या उपचारपद्धतींचा अनिर्बंध वा कधी अयोग्य वापर केला गेल्याने सरकारला या बाबतीत नियम कडक करावे लागले. त्यामुळे अयोग्य वागणुकीला कदाचित आळा बसेलही, परंतु खरोखरच शारीरिक व्याधींमुळे या उपचारपद्धतींची निकड असलेल्या काही स्त्रिया आता अपत्यप्राप्तीला मुकतील अशी शक्यताही आहे.

गेल्या अर्धशतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज खूप गोष्टी सुकर झाल्या आहेत. ५० वर्षांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपल्या कवेत आल्या. थोडय़ाफार प्रमाणात निसर्गनियमांशी संघर्ष करता आला. परंतु अजूनही विज्ञानाला साऱ्या गोष्टींची उत्तरे अवगत नाहीत. साऱ्याच गोष्टींवर आपण मातही करू शकलेलो नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे आपण अनेक समस्यांना आमंत्रित केले आहे. तेव्हा निसर्गनियम मान्य करून, तंत्रज्ञानाची मदत घेऊन दोघांत समतोल साधूनच नवीन पिढीला निर्णय घ्यावे लागतील. यातच माणसाचे वैयक्तिक व सामाजिक हित असेल.
(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारणतज्ज्ञ आहेत.)
vazeavantika@yahoo.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Protection of fertility egg donation sperm donation embryo freezing sperm freezing surrogacy medicine amy

First published on: 23-07-2022 at 00:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×