समाजमाध्यमावर एक सदस्य एक नोंद टाकतो; ‘एका अमुक मुलीने तमुक मुलासोबत केले पलायन.’ पुढे जाणूनबुजून दिलेले दोघांच्या जाती-धर्माचे संदर्भ आणि संतुलित भाष्य करीत असल्याचा आव आणीत केलेले आनुषंगिक विश्लेषण. नोंद टाकणाऱ्याला अपेक्षा असते, प्रतिक्रियेपेक्षा वादविवादाची. आणि खरेच भाष्यकारांची झड लागते. विखारी वाक्यांचे बाण, हिंसक टोमणे, शिव्यांची लाखोली, पातळी सोडून व्यक्त केलेला क्रोध. ती नोंद जणू लोकांच्या भावना भडकवण्यासाठी मुद्दाम पेटवलेली काडी.

एक ज्येष्ठ अभिनेत्री एका मुलाखतीत सहज मत व्यक्त करते, लग्न ही स्त्रियांच्या विकसित होण्यातली बाधा, तेव्हा त्या बेडीत मुलींनी न अडकणे बरे! हे विधान मागचे-पुढचे संदर्भ गाळून, तोडमोड करून ‘मुखग्रंथा’वर पेरले जाते. मग भडकण्याच्या शोधात असलेले समाजमाध्यमी अपेक्षेप्रमाणे भडकतात, एकच राळ उठते, पेटलेल्या रानात सुक्याबरोबर ओलेही जळू लागते. अखिल स्त्रीजातीचा उद्धार होतो, आपल्या उदात्त परंपरेची उजळणी होते. मुद्द्यांची पातळी तळ गाठते. भाषेची पातळी मळ ओकते. एकच वादंग माजतो. शब्दांची धार काढली जाते, शस्त्रे परजली जातात. प्रसंगी आभासी जगातील भांडणे वास्तवाला जखमा करून जातात.

त्यांचा उद्देशही तोच असतो. भडकावू नोंदीचे प्रलोभन, त्या प्रलोभनाच्या गळाला लागलेले, थोडक्यात संमोहित झालेले नेटकरी आणि त्यांची क्रोधात झालेली परिणती. झालेली नव्हे, जाणीवपूर्वक घडवून आणलेली परिणती. रेज बेट!

या वर्षीच्या अखेरीस दरवर्षीप्रमाणे ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘वर्षाचा शब्द’ जाहीर केला आहे; ‘रेज बेट’. ‘रेज’ म्हणजे क्रोधाचा भडका आणि ‘बेट’ हे गळाला लावलेले आमिष. प्रलोभन. सामान्य लोकांच्या तोंडी या वर्षभरात कुठला शब्द सगळ्यात जास्त वेळा आला? या पिढीने कुठल्या शब्दाचा उपयोग भावना व्यक्त करण्यासाठी प्रामुख्याने केला? कुठला शब्द ‘ट्रेंडी’, ‘इन फॅशन’ किंवा बहुप्रचलित आहे? ‘ऑक्सफर्ड शब्दकोश समिती’ दरवर्षी अशा शब्दाचा शोध घेत आपली शब्दसंपदा समृद्ध करीत असते. भाषा मुळात एखाद्या नदीसारखी प्रवाही आहे, वर्षानुवर्षे वाहताना ती भोवतालचे शब्द, वाक्प्रचार, त्याला जोडून समाजात घडत असलेले सांस्कृतिक बदल आपल्या कवेत घेत असते. हे सारे तांत्रिक शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरी आनंदाने, कुतूहलाने, उत्साहाने कवेत घेते.

दरवर्षी त्यातील एका नव्या शब्दाचा उत्सव करते. त्यात इतर भाषांचे छोटे प्रवाहदेखील सामावून घेते. भाषा ही संस्कृतीचे वहन करीत असते. त्या त्या संस्कृतीचे प्रगटन ज्या शब्दांत होते, ते इंग्रजीला नवे असणे स्वाभाविक. अशा नवनव्या संज्ञा आपल्या भाषेला समृद्ध करतात यावर ऑक्सफर्डचा विश्वास. ती भेसळ नव्हे, तर नवोन्मेश. स्वच्छ झरे नदीला दूषित करीत नाहीत, विशाल करतात. अनेक घटकांचे हातभार लागल्याशिवाय शुद्ध बीजांची रसाळ गोमटी फळे होऊ शकत नाहीत!

‘रेज बेट’- क्रोध, प्रलोभन हा या वर्षीचा शब्द. लोक कोणत्या संज्ञेचा वापर अधिकाधिक करतात, कुठला शब्द त्यांच्या संभाषणात, चिंतनात आणि वादविवादात वारंवार येतो याचा शोध तज्ज्ञ समितीने घेतला. तब्बल ३०,००० लोकांनी मतदान केले, जे तीन दिवस चालले. शेवटच्या फेरीत तीन शब्द स्पर्धेत होते, ‘ऑरा फार्मिंग’, ‘बायो हॅक’ आणि ‘रेज बेट’. अखेरीस ‘रेज बेट’ जिंकला!

२००२ पासून ‘रेज बेट’ शब्द वापरात होता, मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याचा वापर अचानक वाढला. सुरुवातीला ‘रेज बेट’चा अर्थ अगदी शब्दाला जागणारा होता. एखादा वाहक वाहन चालवताना दुसऱ्या वाहनाच्या पुढे आपली गाडी रेटण्याच्या प्रयत्नात समोरील दिव्यांची (हेडलाइट) झकमक करतो. पुढल्या वाहकाचे डोळे दिपून त्याचा वेग कमी व्हावा हा हेतू. अशा कृतीला ‘रेज बेट’ म्हणतात. प्रतिस्पर्धी वाहकाला उद्याुक्त करणे अशासाठी एकाने समाजमाध्यमावर ही नोंद टाकली होती. पुढे त्याचा अर्थ बदलत जाऊन आजचा अर्थ प्राप्त झाला.

‘रेज बेट’चा समाजमाध्यमे चालवणाऱ्यांना काय फायदा? तर एखाद्या ‘कंटेंट’कडे जास्तीत जास्त ग्राहक खेचून आणणे. समाजाचे जाहिरातीकरण आणि व्यक्तींचे वस्तूकरण हा या युगाचा अर्थमंत्र. त्यासाठी लोकांना उचकवणारा, समाजात दुही माजवणारा आणि माणसांचा भावनिक उद्रेक घडवून आणणारा मजकूर स्वागतार्ह.

भावनिकता हा माणसांचा ‘डिफॉल्ट मोड’. विचारी मन:स्थिती मागाहून येते. कारण भावनिक मेंदू म्हणजे ‘लिंबिक सिस्टीम’ ३० कोटी वर्षांपूर्वीची, तर विचारी मेंदू म्हणजे पूर्व-प्रमस्तिष्क अगदी अलीकडचे. आपला भावनिक मेंदू प्राणिज, तर विचारी मेंदू आधुनिक, सुसंकृत मनाचा भाग. मेंदूची मूळ आदिम प्रतिक्रिया वरभीती या भावनेची. जगण्या-तगण्याच्या प्रयत्नात भीती हे निसर्गाने दिलेले सजीवांचे प्रथम कवच. भीती आहे म्हणून सावधगिरी आहे, सावधगिरी आहे म्हणून अस्तित्व आहे. भीतीतून क्रोधाचा जन्म होतो. प्राणी घाबरतात म्हणून ते आक्रमक होतात.

माणसाची ही अंगभूत व्यवस्था आजही तशीच कार्यरत आहे. किंबहुना, तीन लाख वर्षांत माणसाच्या मेंदूत कणभरही बदल झालेला नाही. संस्कृतीने प्राणिज प्रेरणांवर एक तलम मुलामा पसरला असेल, तो वितळायला क्षणभरही लागत नाही. ‘रेज बेट’ला माणसे बळी पडतात याचे आणखी एक कारण म्हणजे मेंदूने शिकून घेतलेले पूर्वग्रह. बायस. एखाद्या गोष्टीविषयी, माणसांविषयी किंवा समूहाविषयी आपल्या मनात पक्के झालेले मत. खोल रुजलेल्या धारणा. त्या केव्हा निर्माण होतात? का खोल रुजतात? माणूस अशा पूर्वग्रहांचा रहिवासी का होतो? माणूस हा समूहात राहणारा समाजप्राणी. त्यात परस्पर नातेसंबंध आला. त्या नातेसंबंधात वावरताना अनेक प्रसंगी निर्णय घेणे आले. किंबहुना, माणसाचे आयुष्य ही एक निर्णयांची मालिका. अशा परिस्थितीत आपला मेंदू ठोकताळे शोधतो. ‘शॉर्टकट’ घेतो. चार लोक काय सांगतात ते ऐकतो. परंपरा, जनसामान्य संमत रूढी, आणि रुळलेली वहिवाट शोधतो. जगण्याच्या धडपडीत माणसाला कित्येकदा चटकन निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळी बायस कामात येतात.

माहितीच्या प्रचंड भडिमाराने दबलेल्या युगात हे पूर्वग्रह मनाला काही क्षण उसंत देतात. पन्नास वर्षांपूर्वी जेवढी माहिती आपल्या मेंदूवर येऊन पडत होती, त्याच्या दोनशे पट माहितीचा लोंढा आज आपल्या मेंदूवर येऊन कोसळतो आहे. यातली बहुतांश माहिती ही अजिबात कामाची नाही. ना जगण्या-तगण्याच्या ना गती-प्रगतीच्या.

अतिमाहिती वाईट तसा माहितीचा अभावही घातक. उत्क्रांतीच्या वाटचालीत कधीतरी माहितीच्या अभावामुळे पूर्वग्रहांची उपयुक्तता जगण्या-तगण्याच्या कामात आली असणार. माणसाची स्मरणशक्ती पूर्वग्रहांना हातभार लावताना दिसते. जेव्हा पटकन एखादी वाट ठरवायची असते तेव्हा नेहमीचे निवडक ठोकताळे आपल्या स्मरणात पटकन पृष्ठभागावर येतात. कारण तेच मेंदूवर कोरलेले असतात.

संकटकाळी किंवा पुरेसा कालावधी नसताना पूर्वग्रहाचा आधार घेणे ही त्या परिस्थितीची गरज, मात्र पुढे हीच वहिवाट पडून मेंदू एरवी कुठलीही आपत्ती नसताना तेच ठोकताळे गिरवू लागतो तेव्हा ते ‘वैचारिक बायस’ त्याला कोत्या मनोवृत्तीचे बनवून टाकतात. त्याच्या प्रगतीच्या आड येताना दिसतात. त्याचे निर्णय चुकत जातात. पूर्वग्रह माणसामाणसांत भेदभावाचे कारण ठरतात. आजच्या ‘रेज बेट’ची ही पाळेमुळे.

असे ‘बायस’ अनेक प्रकारचे, त्यात एक ‘रेज बेट’ घडवून आणणारा पूर्वग्रह म्हणजे ‘नांगर पूर्वग्रह; अॅन्करिंग बायस’. प्रथमदर्शनी जे मत झालं ते पक्कं झालं. तोच आमचा मूळ संदर्भ होऊन जातो. त्यानंतर मिळणारी प्रत्येक नवी माहिती ही पहिल्या संदर्भाशी जोडून पाहिली जाते. ‘अॅपल’ने पहिल्यांदा आपला मोबाइल बाजारात आणला तेव्हा त्याची किंमत जाहीर केली ६०० डॉलर्स. काही दिवसांत दुसरी जाहिरात झळकली; सवलतीची किंमत ४०० डॉलर्स. लोकांच्या उड्या पडल्या. कारण ४००ची तुलना आधीच्या ६०० डॉलर्ससोबत झाली आणि लोकांना ते स्वस्त वाटू लागले. समाजमाध्यमावर येणारा पहिला संदेश मनात घर करतो. मग हा फेक, फसवा, भ्रामक होता, तो केवळ तुमच्या भावना भडकवण्यासाठी होता असे कितीही ओरडून सांगितले, तरी लोकांना ते पचनी पडत नाही. लोक तोच एकमेकांना अग्रेषित (फॉर्वर्ड) करीत राहतात. प्रतिक्रिया देत राहतात.

यावर विवेकी मार्ग कोणता? खरं तर पूर्वग्रह ही मनाची एक प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया. ती आपोआप घडून येते. मात्र, विचारपूर्वक ठरवलं, तर ती रोखता येते. प्रतिक्रिया प्राणिज प्रवृत्ती आहे, प्रतिसाद मानवी वृत्ती. प्रतिक्रियेत फक्त क्रिया आहे, प्रतिसादात साद आहे. आलेली ‘पोस्ट’ खरी आहे का? तिचा हेतू काय? ती गांभीर्याने घेण्याजोगी आहे काय? तिची उपयुक्तता काय? माझ्या प्रतिक्रियेने समाजात दुही माजेल का? मुळात प्रतिक्रिया व्यक्त केलीच पाहिजे का? हे प्रश्न पडतील तर समाजमाध्यमांचा बाजारू हेतू उघडकीला येईल, आणि आपोआपच प्रतिक्रियेचे रूपांतर प्रतिसादात, प्रतिसादाचे संवादात आणि वेळप्रसंगी संयमी मौनात होईल!

nmmulmule@gmail.com