– वैशाली भांडवलकर
एकेकाळी घराच्या उंबरठ्यापलीकडे जाण्यासाठी संघर्ष करणार्‍या वंचित समूहांतील स्त्रिया आज नामांकित कंपन्यांच्या व्यावसायिक वाहनचालक बनून आर्थिक स्वावलंबनासोबत सामाजिक बदलाचेही नेतृत्व करत आहेत. लिंगसमता, आत्मनिर्भरता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले त्यांचे हे ठोस पाऊल आहे. संधी, प्रशिक्षण आणि पाठबळ मिळाल्यास स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, हेच त्यांचा हा प्रवास दाखवतो. नवरात्र सुरू आहे, आजच्या या ‘दुर्गा’ व्यावसायिक जगात आयुष्याचे चाक स्वत:च्या हाती घेत मुख्य प्रवाहात उतरून आपला मार्ग सुकर करीत आहेत…

पुण्यातील वस्त्यांमध्ये राहणार्‍या बहुसंख्य वंचित समूहांतील भटके-विमुक्त जमाती, अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक वर्गातील त्या स्त्रिया आतापर्यंत घरकाम, कचरा वेचणं तसंच इतर असंघटित क्षेत्रांतील कामांद्वारे आपला उदरनिर्वाह करणार्‍या. रोजगाराच्या संधी मिळाल्या तरी त्या प्रामुख्याने लोणची, पापड, मसालेनिर्मिती किंवा शिवणकाम यासारख्या पारंपरिक व्यवसायांपुरत्याच मर्यादित होत्या, परंतु जेव्हा त्याच्या पलीकडे जात या स्त्रियांच्या हातात चालवण्यासाठी मोटारीचं चाक अर्थात स्टीअरिंग सोपवण्यात आलं तेव्हा सुरुवातीला त्यांनाही ते आव्हानात्मक होतं. मानसिक आणि प्रामुख्याने सामाजिक व कौटुंबिक पातळीवर. पण त्यावर मात करत आज अनेक जणी मोठमोठ्या नामांकित कंपन्यांच्या गाड्यांवर स्वार होत अनेकांना त्यांच्या मुक्कामी पोहोचवत असून त्यातून आपल्या आयुष्याचा वेग आणि दिशाही ठरवीत आहेत. इतकेच नाही तर त्यातल्या काहींनी तर आता ट्रकचं चाक हातात घेतलं असून आणखी मोठं जग पादाक्रांत करायला निघाल्या आहेत.

स्त्रियांना वाहनचालनाशी संबंधित व्यवसायाकडे वळण्यास प्रोत्साहन देऊन परिवहन क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न जागतिक स्तरावर होत आहेत. ‘वर्ल्ड बँक डेव्हलपमेंट’च्या (२०२१) च्या आकडेवारीनुसार, औपचारिक औद्योगिक क्षेत्रामध्ये (Formal Industrial Sector) काम करणार्‍या स्त्रियांचे प्रमाण कमी असून, बहुसंख्य स्त्रिया अजूनही अनौपचारिक आणि कमी मोबदल्याच्या कामांमध्ये कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत परिवहन क्षेत्र हे स्त्रियांसाठी स्थिर उत्पन्न, कौशल्याधारित रोजगार आणि सन्मानजनक उपजीविकेची महत्त्वपूर्ण संधी निर्माण करणारे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. हेच लक्षात घेऊन आम्ही ‘निर्माण’ संस्थेच्या अंतर्गत या स्त्रियांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली तीन ते चार वर्षांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत आणि स्त्रिया त्यात यशस्वी होत आहेत.

अर्थात स्त्रियांचा हा प्रवास सुरुवातीला खाचखळग्यांचा होताच. पहिला अडथळा कुटुंबाकडून, पर्यायाने समाजाकडूनच झाला. घराबाहेर पडणं, स्वतंत्रपणे प्रवास करणं आणि आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करणं या वंचित गटातील स्त्रियांसाठी आजही सहजसोप्या नसलेल्या परिस्थितीत रोजगारासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरील संघर्षांनाही त्यांना सामोरं जावं लागलं. ‘इतर कोणतेही काम कर, पण वाहन चालवू नकोस,’ इथपासून वाहनचालकांसाठी आवश्यक गणवेश परिधान करणं असेल की बूट घालणं, ‘तू नको घालूस लोक नावं ठेवतील.’ अशी बंधने या स्त्रियांसाठी सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत होती. व्यावसायिक वाहनचालक म्हणून काम करताना विविध प्रवाशांशी संपर्क येत असल्याने काही घरात तर पतींकडून संशय आणि अविश्वासाची भावना व्यक्त व्हायची. काही वेळा तर तिला शारीरिक हिंसेलाही सामना करावा लागला. पण प्रशिक्षणाच्या दरम्यान या स्त्रियांच्या आत्मविश्वासात, वर्तनात आणि निर्णयक्षमतेत झालेल्या सकारात्मक बदलामुळे, मुख्य म्हणजे स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं स्वातंत्र्य यात असल्याने स्त्रिया मागे हटल्या नाहीत. अर्थात या आव्हानांचा सामना करण्यासाठी आमच्या संस्थेने स्त्रियांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांशी सातत्यपूर्ण संवाद, समुपदेशन आणि मार्गदर्शनाची प्रक्रिया राबवली. विश्वास निर्माण करण्याच्या खास प्रयत्नांमुळे अनेक गैरसमज दूर झाले आणि स्त्रियांना प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण झाले. आम्ही प्रशिक्षण दिलेल्या १०० स्त्रियांपैकी ७५ जणी नामांकित कंपनीत व्यावसायिक वाहनचालक म्हणून काम करीत आहेत.

या वाहनचालक प्रशिक्षणासाठी अट होती ती १८ ते ३५ वर्षे वयोगट, दहावी उत्तीर्ण आणि वंचित समूहांतील असणं. प्रशिक्षणाची सुरुवात वाहनचालनाशी संबंधित ज्ञानापासून करण्यात येत असे. यामध्ये वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा, वाहनाची प्राथमिक माहिती आणि जबाबदार वाहनचालन यासारख्या विषयांचा समावेश होता. त्यानंतर स्त्रियांना ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर’वर म्हणजेच आभासी वाहनांवर सराव करण्याची संधी दिली जात असल्याने प्रत्यक्ष वाहनचालनापूर्वी विविध परिस्थितींमध्ये वाहनावरील नियंत्रण आणि सुरक्षिततेशी संबंधित कौशल्यांचा सराव करता येत असे. पुढील टप्प्यात अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष रस्त्यावर वाहनचालनाचे प्रशिक्षण दिले जात असे. यामुळे स्त्रियांना व्यावसायिक वाहनचालक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वास प्राप्त झाला.

स्त्रियांचे सक्षमीकरण हे केवळ वाहन चालविण्याचे कौशल्य विकसित करण्यापुरते मर्यादित नसून, त्यांचा वैचारिक, सामाजिक आणि तांत्रिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो, या भूमिकेतून प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. वाहनचालन प्रशिक्षणासोबतच स्त्रियांना लिंगसमभाव, स्त्रियांचे हक्क व कायदे, रस्ता सुरक्षा, प्रभावी संवादकौशल्ये, मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास तसेच डिजिटल साक्षरता आणि गूगल मॅपच्या वापराविषयी प्रशिक्षण दिले गेले. या स्त्रियांना जागतिक रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनविण्यासाठी इंग्रजी संभाषण, मुलाखतीची तयारी, सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, युरोपमध्ये कार्यरत असलेल्या स्त्री वाहनचालकांशी संवाद तसेच पासपोर्ट, परवाने आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यांसारख्या पूरक गोष्टीही शिकवल्या जातात. याशिवाय, वाहनचालक म्हणून काम करण्यापूर्वी सर्व सहभागी स्त्रियांना वाहनविमा आणि वाहनचालक परवाना (Driving Licence) मिळवून देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अर्थात स्त्रियांना नुसते प्रशिक्षण देऊन थांबता येत नाही. त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. प्रशिक्षित होऊन विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत झालेल्या ७५ स्त्रियांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि लिंगसंवेदनशील कार्यस्थळ उपलब्ध करणंही गरजेचं असतं. स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था, कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक समित्यांची स्थापना, तसेच स्त्री कामगारांसाठी लागू असलेल्या कायदेशीर तरतुदी आणि सुविधांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कंपन्यांशी समन्वय साधावा लागतोच. याचमुळे आज या स्त्रिया सुरक्षित आणि अनुकूल कार्यपरिसरात काम करत प्रत्यक्ष व्यावसायिक वाहनचालक झाल्या. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांचा विकास झाला. परिणामी, अनेक स्त्रियांनी पारंपरिक सामाजिक चौकटींच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक वाहनचालक म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

आज जगण्यासाठी आवश्यक आर्थिक गणिते आणि त्याची समीकरणे जुळवणे हे भल्या भल्यांना कठीण जाते अशा वेळी वंचित समुदायाच्या स्त्रियांना स्वत:च्या कष्टाचे पैसे मिळू लागल्याने अनेक गोष्टी त्यांना स्वत:च्या हिमतीवर पूर्ण करता आल्या. कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास हातभार तर लावता आलाच, त्याशिवाय मुलांचे शिक्षण, स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करणेही अनेकांना शक्य झाले आहे. या स्त्रिया आज दरमहा सरासरी २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळवत असून, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या यशकथेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे यातील १० स्त्रियांनी अवजड वाहन (ट्रक) चालवण्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. आवश्यक परवाने मिळाल्यानंतर या स्त्रिया आता युरोपमध्ये व्यावसायिक ट्रकचालक म्हणून करिअर घडविण्याच्या तयारीत आहेत. ‘निर्माण’ संस्थेच्या नेटवर्कमधील दिल्ली आणि गुजरातमधील काही स्त्रिया या आधीच युरोपमध्ये व्यावसायिक ट्रकचालक म्हणून कार्यरत असून स्वबळावर भरगच्च कमाई करीत आहेत.

बहुसंख्य वंचित समूहांतील – भटके विमुक्त जमाती, अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक वर्गातील या स्त्रियांची आज स्टीअरिंगवरची पकड केवळ वाहनाला दिशा देत नाही, तर सामाजिक परिवर्तनाची नवी वाटही दाखवत आहे. एकेकाळी घराच्या उंबरठ्यात मर्यादित ठेवण्यात आलेल्या स्त्रिया आज शहरांच्या रस्त्यांवर आत्मविश्वासाने धावत आहेत. त्यांचे यश हे केवळ आर्थिक सक्षमीकरणाचे उदाहरण नसून, स्त्रियांच्या स्वातंत्र्य, गतिशीलता आणि समान संधींच्या अधिकाराचे जिवंत प्रतीक आहे. प्रत्येक स्त्री वाहनचालक ही समाजातील रूढ कल्पनांना दिलेले उत्तर आहे आणि अधिक समान, सुरक्षित व सर्वसमावेशक भविष्याची आशादायी नांदी आहे.

रिहम मंगरूळ

‘‘मी एकल स्त्री आहे. माझे पती आजारपणामुळे वारले आणि कमी वयातच वैधव्य आले. पतीच्या निधनानंतर मुलाचे संगोपन, शिक्षण आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. परिस्थिती कठीण होती, पण हार मानणे हा पर्याय नव्हता. जगण्यासाठी आणि मुलाचे भविष्य घडवण्यासाठी मी व्यावसायिक वाहनचालकाचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला समाजाकडून खूप विरोध आणि टोमणे सहन करावे लागले. ‘बाईने वाहनचालकाचे काम कशाला करायचे?’ या सारखे प्रश्न वारंवार ऐकावे लागायचे. आजही काही लोक माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहतात. पण मी माझ्या ध्येयावर ठाम राहिले. आज मी एका नामांकित कंपनीमध्ये व्यावसायिक वाहनचालक म्हणून काम करते आहे. रस्त्यावर वाहन चालवताना कित्येक लोक आश्चर्याने माझ्याकडे पाहतात, काही जण कौतुक करतात. एक स्त्री आत्मविश्वासाने वाहन चालवत आहे, हे पाहून मिळणारा सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. सर्वात मोठा आनंद म्हणजे, आज मी माझ्या मुलाचे शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या हिमतीवर सांभाळत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक स्त्री स्वत:चे आयुष्य नव्याने घडवू शकते, हेच माझा प्रवास मला सांगतो. समाजाच्या टोमण्यांनी मला थांबवले नाही; उलट स्टीअरिंग हातात घेऊन मी आयुष्याची दिशा स्वत: ठरवली आहे.’’

ज्योती सोनावले

‘‘करोना साथीमध्ये पतीचे निधन झाल्यानंतर माझ्या तीन मुलींच्या संगोपनाची आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. आर्थिक अडचणींना सामोरे जात अनेक छोटी-मोठी कामे केली, पण स्थिर उत्पन्नाचा मार्ग सापडत नव्हता. याच दरम्यान व्यावसायिक वाहनचालक प्रशिक्षणाची माहिती मिळाली आणि धाडसाने प्रशिक्षण पूर्ण केले. आज मी गेली तीन वर्षे एका नामांकित कंपनीत व्यावसायिक वाहनचालक म्हणून कार्यरत आहे. या व्यवसायामुळे मला आर्थिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सन्मानाने जगण्याची ताकद मिळाली. माझ्या मुलींचे शिक्षण, कुटुंबाच्या गरजा आणि भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी सक्षम झाले आहे. आज माझ्या मुली अभिमानाने सांगतात, ‘‘आमची आई व्यावसायिक वाहनचालक आहे.’’ त्यांच्या डोळ्यांतील अभिमान हाच माझ्या संघर्षाचा आणि यशाचा सर्वात मोठा आनंद आहे.’’

(लेखिका ‘निर्माण’ संस्थेच्या संस्थापक सदस्य आहेत.)

vaishali.b@nirmanindia.org.in