रवीन थत्ते rlthatte@gmail.com
सृष्टीसमान स्त्रीशी तुलना करता पुरुष हा नंतर आलेला आणि उपटसुंभच म्हणावा लागेल. त्याच्यातील संप्रेरकांनी त्याला आक्रमक, अस्थिर, आगाऊ, उतावळा आणि अहंकारी बनवलं. त्याने जसा घराबाहेर वसाहतवाद के ला, तसाच स्त्रियांच्या बाबतीत अंतर्गत वसाहतवाद के ला. पण सतत वाईट वागणूक मिळूनही डार्विनच्या नियमाला आव्हान देत स्त्री तगली. शिक्षण आणि स्वत:च्या प्रजोत्पादनावर बऱ्याच अंशी मिळालेले नियंत्रण, यांसह स्वातंत्र्य अनुभवू लागली. एकीकडे स्वायत्ततेची आकांक्षा बाळगताना ‘आपण मिळून काहीतरी घडवूया’ असे ती पुरुषाला म्हणू लागली.. 

‘पुरुष हृदय बाई ..’ या जुन्या नाटय़गीतात ‘पुरुष फसवतात’ असा एक आरोप आहे आणि त्या गाण्याला लडिवाळपणाचा स्पर्शही आहे. ‘इथे आकर्षण आहे, पण समाधान नाही. इथे काम आहे, म्हणून क्रोध आहे. हीच ती माया, भले भले पडले तिच्या पाया’ अशा अर्थाची (हुबेहूब नाही) एक ओवी आहे. हे पद ऐकून ती ओवी मला आठवली.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

माझे लग्न झाले, तेव्हा ‘वाघ आणि वाघीण, कोंबडा आणि कोंबडी यांच्या जोडय़ा जमतात तसे माणसांमध्ये नसते. आपल्यात दोन निरनिराळ्या प्राण्यांचे लग्न लागते हे लक्षात घ्या, म्हणजे संसार सुखाचा होईल.’ असे माझ्या सासऱ्यांनी मला सांगितले होते. त्याला ५७ वर्षे झाली. त्या संसाराबद्दल अर्थात मी लिहिणे योग्य नाही. कारण संसार केला माझ्या बायकोने. मी केवळ उपस्थित होतो एवढेच.

हा पुरुष नावाचा प्राणी एक अपघात आहे. आपल्यात ब्रह्म नावाची एक कल्पना आहे. त्यातून सृष्टी निर्माण झाली. या सृष्टीची या पृथ्वीवरची ही चौथी खेप आहे. तिच्या पहिल्या तीन खेपांत पुरुषच मुळी नव्हता. ती स्वयंसिद्ध होती. पृथ्वीवरच्या उत्पातांमुळे त्या सृष्टय़ा नाहीशा झाल्या. चौथ्या वेळी एकंदर ४६ गुणसूत्रांच्या २३ जोडय़ांमध्ये फक्त एका गुणसूत्रात उत्परिवर्तन झाले. एक लहान, तकलादू, पण निराळे गुणसूत्र जन्माला आले आणि पुरुष जन्माला आला. सृष्टी आणि स्त्री या गोष्टी सारख्या आहेत, कारण पुरुषांच्या तुलनेत त्या आदिम आहेत. या रचनेत पुरुष उपटसुंभ आणि पाहुणा आहे. पुढे तो कानामागून येऊन तिखट झाला ही गोष्ट निराळी. आपल्या इथल्या सांख्य तत्त्वज्ञानात ३६ गुण  असून त्यातला फक्त एक गुण पुरुष आहे. प्रकृतीच सगळे सांभाळते. हा ऊर्जा पुरवतो एवढेच, असे म्हटले आहे. हाच तो पुरुष नावाचा प्राणी. जो सरळसोट बाणाने दाखवतात. स्त्रीचे चिन्ह गोलाकाराने दाखवतात आणि त्यात अधिक चिन्ह असते. कारण ती सर्वसमावेशक आहे. हा पुरुष आडदांड असला तरी त्याच्या लहान, नाजूक गुणसूत्रामुळे स्त्रीच्या तुलनेत अल्पायुषी आहे.

स्त्री संतती आणि संगोपनात अडकल्यामुळे हा पुरुष शिकार करून अन्न मिळवण्यासाठी गुहेतून बाहेर पडलेला सशक्त  प्राणी आहे आणि तो त्याच्या संप्रेरकांमुळे आक्रमक, अस्थिर, आगाऊ, उतावळा आणि आपलेच खरे करणारा, वरचढ आणि अहंकारी आहे. तो त्याच्या गुणसूत्रांमुळे जसा बलवान आहे, तसाच तो त्याच्या गुणसूत्रांचा बळी आहे. आणि म्हणूनच आपल्या स्त्रियांना घेऊन, त्यांची संमती असो अगर नसो, पोटापाण्यासाठी आणि कुतूहलामुळे मजल दरमजल करत याने पृथ्वी पालथी घालत सृष्टीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न जारी ठेवला आहे. अर्थात यात स्त्रीजातीचा पाठिंबा अगदीच नव्हता असे नसणार. शेवटी जे मिळाले ते तीदेखील भोगत होती. हे लक्षावधी वर्षे चालले होते. मग दहा हजार वर्षांपूर्वी शेती आली आणि माणसे थोडीफार स्थिरावली.

गेल्या पाच-सहा हजार वर्षांतले पुरावे असे सांगतात की काही अपवाद वगळले तर सगळ्या संस्कृती पुरुषप्रधान होत्या. सृष्टीवर अंमल बजावणारे राजे पुरुष होते आणि मन आणि त्याच्या पलीकडे डोकावणारे धर्मगुरूही पुरुषच होते. देव, त्याचा अवतार, त्याचा मुलगा आणि त्याचा प्रेषित, सगळेच पुरूष होते. स्त्री सृष्टीसदृश मानली गेली होती आणि म्हणून तिच्यावरही पुरुषांचाच हक्क होता. जमीन, गुरेढोरे, इतर प्राणी आणि स्त्रिया हे सगळे पुरुषांना अंकित होते. या व्यवस्थेतले सगळे पुरुष क्रूरकर्मा होते आणि स्त्रिया केविलवाण्या होत्या की कसे, हा प्रश्न माझ्या मनात अनुत्तरित आहे. महाभारतात सहदेव वगळता कृष्णासकट सगळे समेटाला तयार असताना द्रौपदी आणि कुंती यांनी पांडवांना षंढ म्हणून हिणवले आणि म्हणून युद्ध झाले अशी कथा आहे. युद्ध होते, कारण दुसऱ्याच्या हक्काच्या सृष्टीवर कब्जा करायचा मानस असतो. त्याला वसाहतवाद म्हणतात. त्यात वर्ण, वंश, जात, वर्ग, हे जसे कंगोरे असतात, तसेच लिंगही असते. स्त्रीवर्गाच्या बाबतीत पुरुषांनी अंतर्गत पद्धतीने वसाहतवाद केला आहे असे म्हणता येईल. ही व्यवस्था अन्यायकारक होती का, हा प्रश्न आजमितीला विचारला आणि त्याचे उत्तर ‘होय’ असे असेल, तर मग आपल्याला आपल्या बऱ्याच पुरुष पूर्वजांच्या तसबिरी आणि पुतळे भिंतीवरून उतरवावे लागतील किंवा तोडावे लागतील, हे ध्यानात घेतलेले बरे. ज्याने सूर्य बघितला (सूर्य पाहिलेला माणूस) तो सॉक्रेटिसदेखील गुलाम बाळगून होता. डार्विनने ‘तगडे असते तेच तगते’ असे सांगितले आणि वर पुरुष स्त्रियांच्या तुलनेत सर्व बाबतीत सरस असतात, असे लिहून ठेवले आहे. स्त्रियांना वाईट वागणूक देऊनही त्या तगल्या, हे त्याच्या लक्षातच आले नाही. तो  वैज्ञानिक असूनही त्याच्या गुणसूत्रांचा आणि सामाजिक मानसिकतेचा बळी होता.

आधी काम आणि क्रोध हे शब्द येऊन गेले आहेत, त्याची पुढची पायरी स्मृतिभ्रंश अशी गीतेत दिली आहे. स्मृती म्हणजे इतिहास. त्यातून शिकायचे असते. तसे होतेच असे नाही. सगळे समृद्ध समाज एक ना एक तऱ्हेच्या दमनावर सिद्ध झाले आहेत, असे आपल्याला इतिहास सांगतो. त्यात बदल करणे हे आजचे उद्दिष्ट असले आणि ते होत आहे असे गृहीत धरले, तरी त्याच वेळी आर्थिक विषमता आपल्या मानगुटीवर बसत आहे हे आता आपल्या लक्षात येऊ लागले आहे. मानवी जीवन ही एक अपूर्ण गाथा आहे.

या स्त्रियांच्या दमनाच्या इतिहासात गेल्या दोन-अडीचशे वर्षांत दोन मोठय़ा घटना घडल्या. त्याला पुरुषच जबाबदार होते. एक तर तिला शिक्षण मिळाले आणि दुसरे म्हणजे तिच्या प्रजोत्पादनाच्या क्रियेवर तिला बऱ्यापैकी कब्जा मिळाला आहे. पूर्वी बाळंत होणारी स्त्री मूल झाल्यावर ‘सुटली’ असे म्हणण्याची प्रथा होती. आता ती नको असलेल्या बाळंतपणापासूनच सुटली आहे. एखादा पिंजऱ्यातला पक्षी उडून फांदीवर जाऊन बसावा, त्याप्रमाणे ती तिथून आता जगाकडे टकमका बघू लागली आहे. कारण ती शिक्षणामुळे सजग झाली आहे आणि तिला अवसर मिळाला आहे. ती थोडी सैरभैर झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ शारीरिक श्रमाचा आणि शक्तीचा जमाना जाऊन काळ लोटला आहे. हल्लीचा काळ  बुद्धी आणि युक्तीचा आहे. त्यात ती पुरुषांपेक्षा कमी नाही, हे तिच्या लक्षात आले आहे. आणि म्हणूनच ती एका भिडूच्या शोधात आहे. ती तिची आदिम वृत्ती आहे. ती नंतर आलेल्या पुरुषासारखी सडेफटिंग नाही. ‘मिळून साऱ्याजणी’ ती पुरुषांना म्हणते आहे, आपण मिळून काहीतरी करू या आणि एकत्र जगू या. भातुकलीच्या खेळाचे स्वरूप बदलूया.

हे स्थित्यंतर किंवा सत्तांतर घडवून आणण्यात पुरुष हिरीरीने सहभागी होतील असे वाटत नाही. एकतर कोणीच सत्ता सोडायला तयार नसते. स्त्रियादेखील याला अपवाद नाहीत. घरातले सत्तेचे संघर्ष बायकांमध्ये घडत असतच. कमावत्या सुना हल्ली सासूला ‘सूनवास’ घडवत आहेत असे ऐकतो. हा खेळ सत्तेचा आहे. गावात शेखी मिरवणारे पुरूषही घरी ताटाखालच्या मांजरासारखे वागतात हेही दृश्य माझ्या तरी परिचयाचे आहे. गावोगावी समाजसेवा करताना अनुभव येतो तो असा, की बायका ऐकतात, पण पुरुष नाही. ‘माझे ऐका नाहीतर मी चाललो’ असा त्याचा स्वभाव आहे. ‘लवकर नक्की ठरव’ असे म्हणणारा पुरुष आणि ‘तू चर्चाच करत नाहीस’ असे म्हणणारी स्त्री, हे उदाहरण खूप काही सांगून जाते. ओझरते नेत्रकटाक्ष टाकणाऱ्या स्त्रीची निर्णयप्रक्रिया जास्त गुंतागुंतीची आहे. संस्कारांमुळे थोडाफार बदल घडेल, पण गुणसूत्रांचा विळखा मोठा जबर असतो. ती

(गुणसूत्रे) अशी बदलायला तो काही विषाणू नाही. आणि हा नियम स्त्रियांनादेखील लागू आहे. सृष्टी आणि तिच्यात आळीपाळीने येणारे ऋतू घाईघाईने येत नाहीत. त्याचे प्रतिबिंब तिच्यात उमटते. तिला पाने-फुले आवडतात ते उगीच नाही. कारण ती त्यात स्वत:ला बघते. ती सृष्टीचे आदिम प्रारूप आहे. आणि म्हणूनच ती थोडीफार नटते थटते.

काळाच्या ओघात स्वत: जबाबदारी झेलत पुरुषांनी केलेल्या विक्रमांची आणि त्यासाठी मोजलेल्या किमतीची जाण तिला नाही असे नाही. तिचे असे म्हणणे आहे, की ‘मला संधी मिळाली तर मीही असे काहीतरी घडवू शकेन. त्यासाठीची किंमत द्यायला मी तयार आहे.’ ही व्यवस्था बदलताना पुरुषांना खाली पाडून ती वरचढ होऊ इच्छिते असे वाटत नाही. तो तिचा स्वभाव नाही आणि नव्हता. त्याच्याकडून ती तिच्या सहजीवनाची, कामजीवनाची, आकांक्षांची स्वायत्तता मिळवू इच्छिते. ते करताना वाटाघाटी होतील, तसाच संघर्ष होईल किंवा होतो आहे. दुभंगलेले संसार, विटलेली मने आणि या विस्कळीतपणाचे मुलांवर झालेले परिणाम आपल्याला माहीत आहेत. त्या गोष्टींचा बाऊ करण्याचे दिवस आता संपले आहेत. या बाबतीत हल्ली सामोपचारावर, समुपदेशनावर भर द्यावा, असे सर्वत्र लिहून येते. हे असले समुपदेशन जगात इतरत्र होत असणारच. परंतु त्याचा दृश्य परिणाम दिसत नाही. पण जुन्या परंपरा हळूहळू बदलत आहेत, बदलणार आहेत. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, असे म्हणण्याचा काळ आता संपला आहे.

यातून कौटुंबिक अराजकता निर्माण होईल, अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. परंतु त्यामुळे समाज पार रसातळाला जाईल, किंवा गेला आहे, असे दिसत नाही. माणसे लवचीक असतात. माणसे त्यांच्या परीने जगायचे काही सोडत नाहीत असेच दिसते. लग्नाचे सोडा, लग्न न करता एकत्र राहणारी जोडपीदेखील विभक्त होतात. एवढेच नव्हे, तर समलिंगी जोडपी- जी ‘नवरा-बायको’ असे म्हणत एकमेकांसोबत राहतात तीदेखील विभक्त होताना दिसतात. स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेचे युग आता अवतरले आहे.

अनेक दृष्टीने पुरुष आणि स्त्री ही जोडी खरेतर विजोड आहे. ती पूर्वी निरनिराळ्या दबावामुळे टिकली तशी ती पुढे टिकेलच असे दिसत नाही. काही टिकतील, काही नाही. म्हणून घाबरण्याजोगे काहीही झालेले नाही. एकत्रितकुटुंबे चौकोनी झाली तेव्हादेखील आपण विव्हळलो  होतो. ते गंडांतर नव्हते, तर ते एक स्थित्यंतर  होते. सृष्टीत इमू आणि सारस पक्षीच फक्त अपवाद आहेत, जे जोडीदार गेल्यावर दुसरे संबंध ठेवत नाहीत (एकनिष्ठ असतात). माणूस नावाचा प्राणी या नियमाला धरून फक्त चार हजार वर्षे चालला आहे. तोही अपवादच होता. तेव्हा स्थिती परत मूळ पदावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सृष्टीचा प्रदीर्घ इतिहास बघता ही चार हजार वर्षे म्हणजे एक पळसुद्धा झालेले नाही.

साक्षीभावाने बघितले तर हे प्रकरण काय आहे याची समजूत पटू शकेल.