इंद्रजित भालेरावinbhalerao@gmail.com

‘‘निसर्गानं सर्जनाची व्यवस्था म्हणून स्त्री-पुरुषांत केलेल्या नैसर्गिक बदलाचा पुरुषानं गैरफायदा घेतला, अशी रास्त जाणीव माझ्या संस्कारक्षम वयात माझ्याभोवतीच्या स्त्रियांमध्ये होती. ती त्या जात्यावर दळताना प्रकट करीत होत्या. हे सर्व पाहिलेल्या मला स्त्री कळत गेली आणि तीच माझ्या कवितांमध्ये उतरली. ‘बळी जाणारे’ आणि ‘बळी घेणारे’ या रूपांमधून बाहेर पडून स्त्री-पुरुषांचं समतोल सहजीवन असलं पाहिजे, असं मला म्हणूनच वाटत आलं आहे.’’  

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

पुरुष आणि स्त्रीचं हृदय वेगळं असतं, असं काही जीवशास्त्र सांगत नाही. स्त्री आणि पुरुषांचे इतर काही अवयव वेगवेगळे असले तरी हृदय मात्र वेगळं नसतं. तरी आपण म्हणतो, ‘कठीण कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई’. का म्हणतो आपण असं? कारण आपण गृहीत धरलेलं आहे, की पुरुष हृदय कठोर असतं आणि स्त्री हृदय कोमल असतं. म्हणूनच एखादा पुरुष कोमल हृदयाचा असेल तर त्याला आपण ‘मातृहृदयी’ म्हणतो. उदाहरणार्थ, साने गुरुजी.

हृदय हा शरीरातला एक अवयव असला तरी आपण हा शब्द मनासाठीच वापरतो. कारण शरीरातले सगळे भाव हृदयात स्पंदित होतात आणि त्यालाच आपण मनाची स्पंदनं म्हणतो. मन कसं घडतं हे आपणाला माहीत आहेच. समाजच माणसाचं मन घडवत असतो. रीतिरिवाज, परंपरा, धर्म हे समाज घडवतात. त्यामुळे आपलं मन, आपलं हृदय आपल्या हातात कितपत असतं, हा प्रश्नच आहे. पुष्कळ वेळा मनाला न पटणाऱ्या गोष्टीही माणसं करत राहतात, कारण आपलं मन परंपरेनं घडवलेलं असतं. सामान्य माणूस परंपरा मोडू शकत नाही. त्यासाठी कुणी तरी क्रांतिकारक यावा लागतो. तो जुन्या गोष्टी मोडून नव्या घडवतो. त्याचे समकालीन त्याला त्रास देतात, पण पुढच्या पिढय़ा त्याला स्वीकारतात.

महात्मा जोतिबा फुले यांनी ताराबाईंना घडवलं आणि ताराबाई शिंदे यांनी महात्मा फुले यांचा स्त्री-पुरुष समतेचा विचार आणखी खोलात जाऊन मांडला. महात्मा फुले यांच्या तत्त्वाला त्यांनी स्वानुभवाची जोड दिली आणि ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ऐतिहासिक निबंध लिहिला, जो दीडशे वर्षांनंतर अजूनही आपल्या डोळ्यांत अंजन घालतो आहे. ते अंजन इतकं झगमगीत आहे की अजूनही आपले डोळे चुरचुरताहेत. त्या विचारांच्या सावलीत आता नवं पुरुष हृदय घडत आहे. जाणिवेच्या माणसांना पूर्वजांच्या वागण्यानं अपराधी वाटू लागलंय. आपण तसं वागलं नाही पाहिजे याची जाणीव होऊ लागली.

जगभरातून आलेल्या नव्या विचारांचा रेटाही त्यात सहभागी आहे. बदललेल्या जीवनशैलीचाही त्यात वाटा आहे. घटनेतल्या समता तत्त्वानं त्यात भरच घातली आहे. अनेक पुरुषांना घर सांभाळावं लागत आहे. अपरिहार्यतेचा भाग म्हणून पुरुषांनी ते स्वीकारलं आहे. हळूहळू त्यांच्या ते अंगवळणी पडू लागलं आहे. पचनी पडायला वेळ लागेल. सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या पचनी कधीच पडत नसतात. अर्थात मी हे शहरापुरतं बोलतो आहे. गावाकडे अजून बराच अंधार आहे. काही कायदे स्त्रियांच्या बाजूनं भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे अंधार थोडा किलकिला होतो आहे. हळूहळू तिथेही उजाडेल. या सगळ्या प्रक्रियेत जाणिवेचं पुरुष हृदय बावरलेलं आहे आणि जाणीव नसलेलं बिथरलेलं आहे. अर्थात कुठलीच जुनी व्यवस्था शंभर टक्के वाईट आणि नवी शंभर टक्के चांगली नसते. नव्या व्यवस्थेतले गुणदोष कळायला आणखी वेळ जावा लागतो. नव्या व्यवस्थेतही नवे पेच कालांतरानं निर्माण होतच असतात. तेव्हा ती व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न होतात. सुरू असलेल्या व्यवस्थेतले दोष दिसत असतात, पण भविष्यातल्या व्यवस्थेचे दोष दिसत नसतात. म्हणूनच मातृसत्ताक आणि पितृसत्ताक या व्यवस्था समाजात अदलून बदलून आलेल्या आहेत. शेवटी सगळे खेळ सत्तेसाठी असतात. सत्ता हातात आली की दमनाचे नवे खेळ सुरू होतात.

बाईचा जलम जसा, काही चुकून झालेला

घडवता घडवता, देह लहान केलेला

काही खाचा उंचवटे, दिले तसेच ठेवून

एक पिशवी गर्भाची, दिली खाचेत खोऊन

देवा तुझी चूक  अशी, आज आम्हाला भोवली

लोक म्हणतात कशी, नार नाजूक ठेवली

तरी सारा भार आम्ही, कुशीमधीच पेलतो

नामानिराळा पुरुष, कांदे नाकानं सोलतो

निसर्गानं सर्जनाची व्यवस्था म्हणून स्त्री-पुरुषांत केलेल्या नैसर्गिक बदलाचा पुरुषानं गैरफायदा घेतला, अशी रास्त जाणीव माझ्या संस्कारक्षम वयात माझ्याभोवतीच्या स्त्रियांमध्ये होतीच. त्या निरक्षर होत्या, पण तरी अन्यायाची उपजत जाणीव माणसाला होतेच. तशी ती त्यांनाही होतीच. या स्त्रिया उठता-बसता स्त्री जन्माचं दु:ख आणि पुरुषाविषयीचा परकेपणा याविषयी बोलत असायच्या. जात्यावर दळतानाही त्या आपलं जगणं मांडायच्या.

लेकीचा जलम, जसा गाजराचा वाफा

येडय़ा तुम्ही मायबापा, जन्मा घालून काय नफा

लेकीचा जलम, कोण्या घातल्या येडय़ानं

परायांच्या घरी, बैल राबतो भाडय़ानं

अवतीभवतीच्या पुरुषांना हे कळत होतं की नाही ते माहीत नाही. की कळूनही दुर्लक्ष करायचे तेही माहीत नाही; पण मला मात्र बायकांचे हे शब्द आतून हलवायचे. तरी आमचं घर महानुभावांचं. चक्रधर स्वामींनी स्त्री-पुरुषांत भेद करणाऱ्या आपल्या शिष्याला विचारलं होतं की, ‘तुम्ही काई जिवू अन् त्या काई जिऊल्या?’ जीव तर सगळ्यांचा सारखाच असतो ना? सर्वत्र विटाळ न मानणाऱ्या चक्रधर स्वामींनी स्त्रियांचाही विटाळ मानला नाही. स्त्रियांना येणारी मासिक पाळी म्हणजे देहशुद्धीकरणाचा एक भाग आहे. बाहेर मळ टाकणाऱ्या देहाच्या नऊ द्वारांपैकी ते एक द्वार. त्याचा काय विटाळ मानायचा? असा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वैज्ञानिक होता. त्यामुळे ‘पालथा तांब्या’ हा प्रकार आमच्या घरात नव्हता. तरी आजूबाजूला मी ते पाहात होतोच. म्हणूनच तर मला लिहिता आलं.

आलं नहान पहिला ऋतू, माईचं दूध चाललं ऊतू

बापाला जेव्हा कळाली मास,

चाफ्याला आला जाईचा वास

भाऊ म्हणितो बहिनबाई

घराबाहेर जायचं नाही

झाला नाराज लहान भाऊ

तुला कसा शिवतो काऊ

वहिनी म्हणे न्हावू घालिते

साय साखर खावू घालिते

फूल झालेली पाहून कळी

त्याच्या गालावर खुलली खळी

तिची जखम सोन्याची झाली

ओली जमीन पुण्याची झाली

लग्न झालेल्या बहिणी नांदायला जात तेव्हा खूप रडत असत. मला प्रश्न पडे, की त्यांनाच घर सोडून का जावं लागतं? माझा लळा असल्यामुळे सासरी करमावं म्हणून बहिणी मला सोबत न्यायच्या. त्यामुळे त्यांचा विरह कमी व्हायचा; पण घर, गाव सोडून गेल्यामुळे मलाही विरहाचा अनुभव यायचा. पुढे तेच कवितेत उतरलं.

काय म्हणून बाईनं, घरादाराला सोडावं

परक्याच्या दारामधी, कया म्हणून पडावं

भाऊ भाऊ बापाजीच्या, शेतावरले मालक

आम्ही लेकी झालो कशा, अधांतरिचा लोलक

लेकीचा जलम, जणू फुटणारी लाही

खाणारा म्हणतो, कशी भाजलीच नाही

लेकी जलम, लेकीला कळतो

आत आत कसा, आतमा जळतो

मला हा लेकीचा जन्म समजलेला होता, कारण या अनुभवांनी माझं हृदय पुरुषाऐवजी स्त्रीच्या अधिक जवळ गेलं होतं. लोक मला विचारतात, ‘तुम्हाला मुलगी नाही, तरी तुम्ही स्त्रियांवर इतक्या कविता कशा काय लिहिता? बाईचं जगणं तुम्हाला इतकं कसं समजलं?’ त्याचं उत्तर वरील अनुभवात आहे. माझ्या चारही बहिणी माझ्यावर जिवापाड प्रेम करायच्या. त्यामुळे लहानपणी मी मुलींबरोबरच जास्त खेळायचो, मुलींत रमायचो. त्यामुळे स्त्रियांचे भोग मला जरा जास्त समजत गेले.

मुलं-मुलं एकत्र बसलेली असली, की मुलींविषयी शेरेबाजी करायची. काही तरी अश्लील, चावट बोलायची. मला तो प्रकार घृणास्पद वाटायचा. अशा बोलण्याची मला किळस यायची. मी त्यात रस दाखवायचो नाही, सहभागी व्हायचो नाही. फार तर तिथून उठून जायचो. स्त्रियांविषयी असं खालच्या पातळीवरचं बोलणं त्या वयातही मला आवडत नसे. मुलीच्या नावाला आई हा शब्द जोडूनच मी तिला हाक मारायचो. उदाहरणार्थ- फुलाई, सुमाई, मंगलाई इत्यादी. यावरूनही मुलं मला चिडवायची. ‘सगळ्याच आया, तर मग आपली बायको कोण?’ असंही मुलं मला विचारायची. मी म्हणायचो, ‘ते पाहू लग्न झाल्यावर.’ पुढे लग्न झालं आणि मला स्त्री आणखीच समजत गेली. बायकोला मी कायम सोबतीनं समजलं. माझ्या जगण्याला नवं परिमाण मिळालं. विवाह झाला आणि मला नोकरीनिमित्त शहरात राहायला यावं लागलं. गावाकडचा स्त्रीस्वभाव माहीत होताच, आता शहरी शिक्षित वर्गातला स्त्रीस्वभावही अनुभवता येऊ लागला. वाचनातून स्त्री-पुरुष समतेविषयी पुष्कळ समजही आली. शहरी स्त्रीचं वेगळं रूपही पाहायला मिळालं. पुरुषांना छळणाऱ्या बायकाही पाहायला मिळाल्या. मला लक्षात आलं, की हे स्त्रीस्वातंत्र्य नाही. पराभूताशी सुडाचं वागणं म्हणजे मुक्ती नव्हे. मला स्त्रीचं बळी जाणारं जुनं रूप जसं नको होतं, तसंच बळी घेणारं नवं रूपही नको होतं.

मी नोकरीला लागलो त्याच वर्षी ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक विद्या बाळ यांनी सुरू केलं होतं. मी त्याचा वर्गणीदार झालो. सोबतीणीलाही ते मासिक वाचायला लावायचो. माझे एक विद्वान मित्र म्हणाले, ‘असली बायका बिघडवणारी मासिकं घरी कशाला लावता?’ मला त्यांच्या विद्वत्तेची कीव आली. त्यांच्याकडे ज्ञान खूप होतं, पण तरी त्यांना समज आली नाही, असा त्याचा अर्थ होता. पुढे मी ‘मिळून साऱ्याजणी’चा लेखक झालो. अनेकदा

विद्या बाळ परभणीला माझ्याकडे आल्या. त्यांच्या सहवासानं आणि वाचनानं माझी स्त्रीजाणीव आणखी सखोल होत गेली. ज्या विचारांमुळे मी गावाकडे वेगळा पडलो होतो त्याला इथे भोवताल मिळाला. या टप्प्यावर पुन्हा मला माझे आई-वडील आठवले. एकमेकांवर गाढ विश्वास असणारे आणि एकमेकांसाठी प्राण पणाला लावणारे. मला तो पुरुष आदर्श वाटला आणि ती स्त्रीही. पुढे ‘मिळून साऱ्याजणी’नंही  स्त्रीस्वातंत्र्याचं आपलं घोषवाक्य बदलून ते अशाच अर्थाचं केलं. हे समतोल सहजीवन मला महत्त्वाचं वाटलं.

नको होवूस वाघीण, हरिणही नको राहू

पहा टाकला मी बाण, तुझी भीती टाक पाहू

पुढं एका आदिवासी महाविद्यालयात शिकवायला असताना आदिवासी मुलींची शक्तीही प्रत्ययाला आली. पुरुषाला न घाबरणारी आदिवासी स्त्री आणि बायकोला घाबरणारा शहरी पुरुष पाहिला. या आदिवासी स्त्रीविषयीचा त्याचा चवचालपणा पाहिला आणि सणक आली.

बाभळीची फुलं कानात घालून डुलणाऱ्या

पोरीला भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस

बोरीच्या वाकडय़ा काटय़ालाही नथनी करून

नाकात खोवणारी ही पोर तुला कुठं खोवील

याचा पत्ताही लागणार नाही.

मला पुरुषापेक्षा नेहमीच स्त्रीचं हृदय जास्त कळत आलेलं आहे. म्हणूनच मला ‘कुळंबिणीची कहाणी’ लिहिता आली. माझ्या कवितेत सर्वाधिक स्त्री आहे आणि गद्यातही. मी पुरुष असूनही मला कायम माहेराचीच ओढ वाटत आलेली आहे. शहर माझं सासर, तर गाव माझं माहेर वाटत आलेलं आहे.

माझं तुटलं माहेर,माय माहेराला गेली

जोतं चढायला गेलो, ठेच पायरी लागली

माझं काळीज मासोळी, होतं पाण्यात झाकलं

माझं तुटलं माहेर, पाणी तळाचं फाकलं

स्त्री-पुरुष हृदयाचं पुढचं रूप कसं असेल ते कवी नाही सांगू शकत; पण ते कसं असावं ते सांगू शकतो.

ऊन वारा माती पाणी, आभाळाच्या आकारात

पक्षी पाखराच्या कुडी, दोघं जाऊ साकारात

अर्धनारी नटेश्वर, शिव होवूया शेवटी

नरनारीपणाची या, टाकू मोडून पावटी