दुष्काळाच्या सावटाखाली पाणीटंचाईचे संकट गडद असताना रब्बी हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत, जमिनीतील ओलाव्याचे योग्य व्यवस्थापन करत पीकपेरणी कशी करता येईल याविषयीचा ज्येष्ठ कृषी अभ्यासक आणि संशोधक डॉ. उषा डोंगरवार-काशीवार यांचा मार्गदर्शनपर लेख.
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झालेली असल्याने राज्य शासनाने ३२ जिल्ह्यांमधील एकूण ३०४ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. यावर उपाय काय, हा सर्वांत मोठा प्रश्न आज सगळ्यांसमोर उभा आहे. गेली काही वर्षे भातशेती आणि कृषी क्षेत्रात संशोधन करत असताना जी माहिती हाती लागली त्यातून काही निरीक्षणे आणि सूचना मांडण्याचा हा प्रयत्न. गेल्या काही वर्षांच्या माझ्या अभ्यासाचा उपयोग शेतकरी तसेच त्यांना मदत करणार्या शेतकरी संस्थांना त्यानिमित्ताने होऊ शकेल.
दुष्काळासह पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणार्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यासाठी पिकांची योग्य निवड करणे, गहू पिकाऐवजी हरभरा, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, मका, करडई, कारळे, जवस, मसूर, मोहरी, मूग, उडीद व सनबोरू यांसारख्या पिकांची निवड करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करायला हवा. रब्बी, ज्वारी हे जमिनीतील ओलाव्यावर आधारित शेतीचे पर्याय असून हे पीक, चारा आणि धान्य या दोन्ही गरजांसाठी उपयोगी आहे.
यासाठी कमी मशागत तंत्रज्ञान उपयोगी पडू शकेल. हे तंत्रज्ञान म्हणजे कमीत कमी मशागतीत पीक घेण्याची पद्धत. दुष्काळी परिस्थितीत या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश जमिनीतील ओलावा टिकवणे, मशागतीचा खर्च कमी करणे आणि पिकाची वेळेवर पेरणी करणे हा आहे. खरीप पीक काढणीनंतर जमीन नांगरल्यास माती उघडी पडते व जमिनीतील अवशिष्ट ओलाव्याचा (Residual Moisture) नाश होतो हे टाळण्यासाठी कमी मशागत, शून्य मशागत किंवा उतेरा पीक घेणे फायद्याचे ठरते. या पद्धतीने जवस, मोहरी, करडई, हरभरा, सूर्यफूल, ताग, कारळ, मसूर ही पिके घेता येतात.
धान कापणीनंतर उरलेल्या धसकटांमध्ये सरळ ‘झिरो टिल’ (शून्य मशागत यंत्र) किंवा पारंपरिक नांगर याद्वारे रब्बी पिकांची पेरणी कमी मशागत तंत्रज्ञानाने करता येते. या वेळी शेतात खरीप पिकाची धसकटे किंवा अवशेष आच्छादनाचे काम करतात. ती कुजल्यानंतर सेंद्रिय खत जमिनीला मिळते. मशागतीचा खर्च कमी होतो. पिकांच्या अवशेषांचे आच्छादन असल्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि तेच
पाणी पिकाला उपलब्ध होते. ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला’ यांनी पूर्व विदर्भासाठी धान (भात शेती) कापणीनंतर कमी
मशागत पद्धतीने हरभरा पीक पेरणीची शिफारस केलेली आहे. धान कापणीनंतर जमिनीची नांगरटी न करता हरभर्याची थेट पेरणी केल्यास त्याचा फायदा होतो. तसेच रब्बी हंगामामध्ये कमी पाणी लागणारी, कमी कालावधीत येणारी आणि जमिनीतील ओलाव्याचा चांगला उपयोग करणारी मूग, उडीद, हरभरा व मसूर या सारखी कडधान्य पिके, करडई, मोहरी ,जवस, तीळ, सूर्यफूल यांसारख्या तेलबिया, चारा पिके निवडणे फायदेशीर ठरते. या पिकांचे ‘सोटमुळ’ असल्यामुळे (Taproot- ही पिके जमिनीच्या खालच्या थरातून पाणी शोषून घेतात. त्यामुळे जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा पुरेपुर आणि चांगला फायदा होतो. याशिवाय पूर्वीच्या पिकाचे अवशेष न जाळता शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष उदा. सोयाबीनचे काड किंवा भुसा, उसाचे पाचट, तांदळाचा पेंढा, वाळलेले गवत आणि पालापाचोळा यांचा सेंद्रिय आच्छादनासाठी वापर करता येतो. सेंद्रिय आच्छादनासाठी वापरलेले घटक हळूहळू कुजतात आणि त्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होते. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे (Soil Organic Carbon) प्रमाण वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो. सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची आणि गांडुळांची वाढ होण्यास पोषक वातावरण मिळते. आच्छादनामुळे जमीन आणि वातावरण यांच्यामध्ये एक जैविक अडथळा निर्माण होतो, जो बाष्पीभवनाचा वेग ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.
ठिबक सिंचन आणि आच्छादन यांचा एकत्रित वापर केल्यास उत्पादनात आणि जलवापर कार्यक्षमतेत वाढ होऊ शकते. प्रवाही सिंचनापेक्षा आच्छादनयुक्त ठिबक सिंचनामुळे पाण्याची ३८ ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. आच्छादनामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे संरक्षण होते. झाडांना दिलेली खते ही मुळाच्या कार्यक्षेत्रात दीर्घकाळ उपलब्ध राहतात, त्यामुळे खतांच्या कार्यक्षमतेतही वाढ होते.
याशिवाय अन्नद्रव्य व तण व्यवस्थापन गरजेचे आहे. दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वनस्पतींना पोषण देतात तर सोबतच दुष्काळ, अति तापमान, क्षारता आणि थंडी यांसारख्या अजैविक ताणांना तोंड देण्याची पिकांची क्षमताही वाढवतात. पिकांचे नुकसान कमी करण्यात संतुलित पोषण महत्त्वाची भूमिका बजावते. पिकांमध्ये ‘तण’ व्यवस्थापन वेळीच करावे म्हणजे मूळ पिकांशी पाण्यासाठी तण स्पर्धा करणार नाही. ओलावा टिकवणार्या मध्यम ते भारी जमिनी पिकासाठी योग्य ठरतात. जमिनीत पुरेसा ओलावा असल्यावरच पेरणी करायला हवी. पावसाचे पाणी शेतात मुरवून घेतल्यामुळे किंवा खरीप हंगामात जमिनीत मुरल्यामुळे ते पाणी रब्बी पिकांसाठी वापरता येते. रब्बी पिकांची पाण्याची गरज ही पीक, जमिनीचा प्रकार, तापमान आणि पाऊस यावर अवलंबून असते. जमिनीत साठलेला ओलावा व हिवाळ्यातील पाऊस यामुळे सिंचनाची गरज कमी होऊ शकते. पूर्व विदर्भामध्ये असा अनुभव आहे की, सरासरी ४० मिलिमीटर पाऊस रब्बी हंगामात आल्यामुळे रब्बी पिकांना त्याची मदत मिळते.
खरीप पिकाची काढणी केल्यानंतर शेतातील उपलब्ध ओलावा तपासून जमिनीत वापसा असताना शून्य मशागत पेरणी व खत यंत्राचा वापर करत पेरणी करायला हवी. शिफारस केलेली बुरशीनाशक किंवा जैविक बीज प्रक्रिया आणि ‘रायझोबियम’(नत्र स्थिर करण्याचा जिवाणू) वापरल्यास फायदा होतो. माती परीक्षण व विद्यापीठाच्या पीक शिफारशीनुसारच पेरणीच्या वेळी खते द्यायला हवीत. पेरणीनंतर तणांचे व्यवस्थापन करायला हवे. कारण पेरणीसाठी पुरेसा ओलावा आवश्यक असतो.
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी पिके अनेक शारीरिक, जैव रासायनिक आणि आकारात्मक बदल करतात. यांना बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठीची ‘अनुकलने’ असे म्हणतात. पाण्याची कमतरता जाणवल्यावर पिके पानांतील पर्णरंध्रे बंद करतात. यामुळे पानांतून पाण्याची वाफ बाहेर जाण्याचा वेग कमी होतो. काही पिकांमध्ये नवीन पाने लहान होतात किंवा पानांची वाढ कमी होते. त्यामुळे पाण्याचे उत्सर्जन होणारे एकूण क्षेत्र कमी होते. मका व ज्वारी यांसारख्या पिकांमध्ये पाण्याची कमतरता असताना पाने गुंडाळली जातात. त्यामुळे पानांचा उघडा पृष्ठभाग आणि सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम कमी होऊ शकतो. काही पिकांच्या पानावरील जाड मेणाचा थर (क्युटिकल) पाण्याचे नुकसान कमी करतो. मुळांची खोल वाढ झाल्यामुळे पिकांची मुळे खोलवर जाऊन जमिनीतील खोल थरांमध्ये पाणी शोषून घेतात. त्यामुळे दुष्काळ सहन करण्यास मदत होऊ शकते.
पाण्याच्या ताणामुळे काही पिकांची वाढ मंदावते आणि पानांचे एकूण क्षेत्र कमी राहते. यामुळे पाण्याची मागणी कमी होऊन पीक वाढू शकते, मात्र त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बाष्पीभवनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचे वाफेत रूपांतर होते तर बाष्पोत्सर्जनमध्ये पिकांच्या पानांतील पर्णरंध्रांद्वारे पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर जाते. दुष्काळी शेतीमध्ये जमिनीवरील आच्छादन, पीक अवशेष आणि कमी मशागत यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करता येते.
पूर्व विदर्भात धान पीक कापणीपूर्वी, पीक उभे असताना कापणीच्या पंधरा दिवस आधी लाखोरी (lathyrus ), जवस यांसारखी पिके उभ्या पिकात पेरली जातात. यालाच ‘उत्तेरा पीक पद्धती’ असेही म्हटले जाते. या पद्धतीमुळे जमिनीतील उपलब्ध ओलावा व आधीच्या पिकाच्या खताचे अवशेष नंतरच्या पिकाला उपयोगी पडते. उत्तेरा पीक पद्धतीमुळे मशागतीचा खर्च कमी होतो आणि लाखोरीसारखे पीक उत्तम येते. वाटाणा, मसूर, मोहरी यांसारखी पिके उत्तेरा पद्धतीमध्ये घेतली जातात. पूर्व विदर्भात खरीप हंगामामध्ये पेरीव धान (भात लागवडीची आधुनिक पद्धत, ज्यामध्ये रोपे तयार न करता थेट शेतात बियाण्यांची पेरणी केली जाते) मोठ्या प्रमाणात घेण्यात आले.
पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे आणि चिखलणीकरीता पावसाची बरीच मोठी मात्रा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीपेक्षा पेरीव धान घ्यावे, असे संशोधन ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला’ अंतर्गत करण्यात आले आहे. यामुळे भातासाठी पाण्याची गरज कमी होते. खर्चात बचत होते. मजुरीच्या खर्चात बचत होऊन पीक पंधरा दिवस लवकर तयार होते. त्यामुळे रब्बी पीक वेळेत पेरता येते. रब्बी पिकाला योग्य वातावरण मिळाल्यामुळे रब्बी पिकाचे उत्पन्न चांगले येते.
दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी त्यानुसार नियोजन केले तर काही प्रमाणात तरी आपल्याला दुष्काळावर मात करता येऊ शकेलच.
udongarwar@gmail.com
(या लेखासाठी पल्लवी सुमेध काशीवार यांचेही सहकार्य लाभले आहे.)
