वडील देवेन्द्रनाथ ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळेच रवींद्रनाथांची सर्जनशील जडणघडण झाली. त्यांच्या अनोख्या हाताळणीमुळेच, रवींद्रमधल्या मोकळेपणानं व्यक्त होण्याच्या जाणिवा तीव्र झाल्या. या हाताळणीचा पाठपुरावा केला, रवींद्रचे वडीलबंधू ज्योतिरिंद्रनाथांनी. त्यांच्या सान्निध्यात रवींद्रनाथ वाढले, बहरले,खूप खूप मोठे झाले..
रवींद्रनाथ देवेन्द्रनाथ ठाकूर. प्रत्येक भारतीयाची वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच राष्ट्रगीताच्या माध्यमातून रवींद्रनाथांशी ओळख होते. राष्ट्रगीतामुळे समस्त भारतीयांच्या मनात देशाबरोबरच रवींद्रनाथांबद्दलही अभिमान भरून राहतो.
रवींद्रनाथ ठाकूर(टागोर) म्हणजे, ‘शांतिनिकेतन’, साहित्यातला नोबेल पुरस्कारविजेता काव्यसंग्रह ‘गीतांजली’, रवींद्र संगीत आणि अर्थातच आपलं राष्ट्रगीत ‘जन गण मन’ अशी ओळख आपल्या प्रत्येकाच्या मनात घट्ट रुजून आहे. शिकणाऱ्याच्या मनात निसर्गातला मोकळेपणा झिरपवून, खुल्या मनानं, ताज्या, टवटवीत विचारानं शिक्षणाचा आस्वाद घ्यावा यासाठी, रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनचा वसा घेतला. बंद आवारातलं, साचेबद्ध शिक्षण याचा त्यांना अतिशय तिटकारा होता. निसर्गावर प्रचंड प्रेम, त्यात मग्न राहूनसुद्धा आजूबाजूचं भान राखत काव्यमय शब्दांतून स्वत:ला व्यक्त करत अनेक काव्यसंग्रहांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यादृष्टीनं बंगालीसह इंग्रजी भाषेत काव्यनिर्मिती करत, संपूर्ण जगाला साक्षर करत विश्वकवी म्हणून वाखाणले गेले होते. त्याचबरोबर संपूर्ण देशाला एका गीतात बांधून ठेवण्याचं नेमकं कसब त्यांना राष्ट्रगीताद्वारे साध्य झालं.
या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचं काम त्यांचे वडीलबंधू ज्योतिरिंद्रनाथ त्यांच्यापरीनं  केलंच, पण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे दिवस ठरले ते, त्याही आधीचे, वडील देवेन्द्रनाथांच्या सान्निध्यातले. ७ मे १८६१ रोजी रवींद्रनाथांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ आणि आई शारदादेवी ठाकूर. रवींद्रनाथांची एकूण १२ भावंडं. ते सगळ्यात धाकटे. यांच्या ठाकूरवाडय़ात नव्या-जुन्याची सांगड घालत संस्कार केले जात होते. राजा राममोहन रॉय यांचा प्रभाव देवेन्द्रनाथांवर होता. त्यामुळे लग्न-मुंजी व इतर सणावारांप्रमाणे ब्राह्मो समाजाचा वर्धापनदिन साजरा व्हायचा. त्या वेळी, देवेन्द्रनाथांनी निवडलेल्या धर्मग्रंथातल्या उताऱ्याचं पठण होई. त्यामुळे शब्दोच्चाराप्रमाणेच भाषेचाही संस्कार होई.
देवेन्द्रनाथांच्या सामाजिक उपक्रमांमुळे वाडय़ात सतत साहित्य आणि कला क्षेत्रातल्या दिग्गजांचा वावर असे. त्याचेही संस्कार या मुलांवर होत होते. आई शारदादेवी ठाकूरवाडय़ाच्या देखभालीत मग्न असायची. हळूहळू तब्येत खालावत जाऊन तिचं निधन झालं. त्यामुळे रवींद्रला आईचा म्हणावा तसा सहवास मिळाला नाही.
 देवेन्द्रनाथांनीच हौसेनं त्याचं नाव रवींद्र ठेवलं होतं. वयानुसार रवींद्रची शाळा सुरू झाली. शाळेच्या साचेबद्ध शिक्षणपद्धतीमुळे तसंच घोकंपट्टी वृत्तीमुळे शाळा या प्रकाराबद्दल रवींद्रला तिटकारा आला. त्यानं शाळेत जायला नकार दिला. मग ठाकूरवाडय़ातच रवींद्रचं शिक्षण सुरू झालं. इथे निव्वळ पुस्तकी ज्ञान नव्हतं तर घरातल्या कला, साहित्य यांच्या रसपूर्ण वातावरणाचाही त्याच्यावर प्रभाव पडतच होता. ठाकूरवाडय़ात दिवसाची सुरुवात भल्या पहाटे व्हायची. जवळच्या आखाडय़ात जाऊन कुस्तीचे डावपेच शिकण्याने शिक्षणाची सुरुवात व्हायची. नंतर, संस्कृत, गणित, साहित्य, इतिहास, भूगोल, शरीरशास्त्र, व्याकरण यांचा अभ्यास होई. रवींद्रची ओढ झाडं, फुलं, बाहेरचं मोकळं वातावरण यांकडे असे. साहित्याची आवड होतीच. त्याच्या वेगळेपणामुळे घरातल्यांकडून कधी त्याच्यावर अभ्यासाचा दबाव टाकला गेला नाही. त्यांच्या आवडी-निवडी तसंच त्याच्या प्रगतीच्या बातम्या देवेन्द्रनाथांपर्यंत वेळोवेळी पोचतच होत्या.
रवींद्र वयाच्या आठव्या वर्षांपासून कविता करायला लागला होता. त्याच्या निसर्गप्रेमामुळे देवेन्द्रनाथांनी त्याला घेऊन हिमालयात जाण्याचं ठरवलं. रवींद्रचा मोठा भाऊ  सोमेंद्र, सौदामिनीदीदीचा मुलगा सत्यप्रसाद आणि तो या तिघांच्या मुंजी लावण्यात आल्या. रोज गायत्रीमंत्र म्हणण्याचे काम सोमेंद्र आणि सत्यप्रसाद चोख बजावत. मात्र त्यांचा कल मंत्र फक्त उच्चारण्याकडे असे, तर रवींद्र अतिशय एकाग्र होऊन मंत्र म्हणत असे. ते म्हणताना त्याच्या अंगावर रोमांच उभं राहत. तर काही वेळा डोळ्यातून अश्रू ओघळत. एकदा देवेन्द्रनाथ वर गच्चीवर आले तर त्यांना दिसलं, एका कोपऱ्यात रवींद्र पद्मासन घालून बसला होता. तोंडानं गायत्रीमंत्र म्हणत होता. पूर्णपणे एकाग्र झाला होता. ओठांची थरथर, डोळ्याला धार. रवींद्रचं हे चित्तवेधक ध्यान बघून देवेन्द्रनाथांना रवींद्रची भावनिक एकरूपता अधिक भावली.
रवींद्रच्या जन्माच्या वेळी, देवेन्द्रनाथ एका ठिकाणी जात असताना वाटेतल्या बोलपूरमध्ये त्यांना सप्तपर्णीचा वृक्ष दिसला. पालखी थांबवून, पश्चिमेला तोंड करून पद्मासन घालून ते तेथे बसले. त्या वातावरणाचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. त्या जागेबद्दल त्यांना खूपच आपुलकी वाटायला लागली आणि रायपूरला पोचल्यावर तिथल्या जमीनदाराकडून त्यांनी ती जागा विकत घेतली. तिथे अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्याचा रखरखीतपणा कमी केला आणि हिरवी छटा आणली. तिथेच त्यांनी दोन मजली वास्तू उभी केली आणि त्याला नाव दिलं,  ‘शांतिनिकेतन.’ सप्तपर्णी वृक्षाखाली संगमरवरी दगडावर अक्षरं कोरवली, ‘तिनी आमार प्राणेर आराम, मनेर आनंद, आत्मार शांती’. (तो माझ्या प्राणाची विश्रांती। मनाचा आनंद। आत्म्याची शांती।)
त्या काळी लहान आणि मोठय़ांमध्ये मोकळेपणा नसायचा, त्यामुळे वडिलांशी विशेष बोलण्याचा प्रश्नच नसे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काही दिवसांसाठी बाहेर जायचंय हे जेव्हा कळलं तेव्हा रवींद्र उत्साहाने सळसळत होता. प्रवास सुरू झाला. बोलपूरमधल्या शांतिनिकेतनमधल्या वास्तव्यात त्यानं निसर्ग मनमोकळेपणानं अनुभवला. निसर्गात रममाण होण्याची मौज असली तरी रवींद्रचा अभ्यास चुकला नव्हता. सूर्योदयानंतर देवेन्द्रनाथ रवींद्रला रोज इंग्रजी आणि संस्कृत विषय शिकवत असत. रवींद्रला मिळालेल्या आण्यांचा हिशेब ठेवावा लागे. देवेन्द्रनाथांनी गीतेतल्या त्यांच्या आवडत्या श्लोकांचं बंगालीत भाषांतर केलं होतं. त्याच्या संकलनाची जबाबदारी रवींद्रवर होती. पुढचा मुक्काम होता अमृतसरला. अमृतसरला पोचल्यानंतर देवेन्द्रनाथ रवींद्रला सुवर्णमंदिरात घेऊन गेले. तो परिसर, वातावरण पाहून रवींद्र भारावून गेला. रोज ते दोघं सुवर्णमंदिरात जात. देवाची सेवा करण्यासाठी देवासमोर गायचं असा त्यांचा रिवाज होता. त्या रिवाजाचं पालन देवेन्द्रनाथांनी केलं. तिथल्या लोकांच्यातले एक होऊन ते गात. शिखांचा पोशाख, त्यांची भाषा याचा वेगळेपणा रवींद्रला जाणवला पण तरीही परकेपणा वाटला नाही. हा वेगळेपणा जाणवावा मात्र त्याचबरोबर तो वेगळेपणा ओलांडून पसरलेला सार्वत्रिक बंधुभाव रवींद्रच्या लक्षात यावा हाही देवेन्द्रनाथांचा हेतू होता.
दुपारी देवेन्द्रनाथ भाषा शिकवत, इंग्रजी आणि संस्कृत. संस्कृतमध्ये एखादा विषय देऊन ते त्याला त्याबद्दल लिहायला सांगत. संध्याकाळी व्हरांडय़ात बसून ग्रह-नक्षत्रांची माहिती सांगत. मग, गाणं गाण्याची फर्माईश असे. पुढे अमृतसरहून निघून बेक्रोटा येथील बंगल्यात ते आले. तिथला दिनक्रम म्हणजे, पहाटे उठणं, संस्कृत, इंग्रजीचा अभ्यास, अंघोळ, दूध पिणं, दुपारचं जेवण, त्यानंतर, डोंगर-दऱ्यांतून, देवदाराच्या बनातून मनसोक्त भटकायचं. संध्याकाळी वडिलांबरोबर गप्पा, आलेल्या पत्रांचं वाचन. त्याला उत्तरं देण्याचं काम बऱ्याचवेळा रवींद्रचं असे. दिवसभराच्या इतक्या भरगच्च कार्यक्रमानंतर रात्री जेव्हा त्याची अंथरुणाला पाठ लागे तेव्हा तो क्षणात झोपून जाई.
वडील आणि निसर्ग यांच्या सहवासातून रवींद्र खुलायला लागला, तरतरीत झाला. त्याचबरोबर अभ्यासातही चांगलीच प्रगती झाली. पुढे, काही कामानिमित्त देवेन्द्रनाथांना अचानक दुसरीकडे जावं लागणार होतं. त्यामुळं, रवींद्रही कलकत्त्याला परतला. या मुलांवर लक्ष ठेवायला, ठाकूरवाडय़ातले नोकरचाकर होते. त्यातला एक नोकर शाम, रवींद्रवर जास्त लक्ष ठेवावं लागतं म्हणून कंटाळायचा. त्याने जागेवरून हलू नये म्हणून त्याच्या भोवती एक वर्तुळ आखायचा आणि रामायणातली गोष्ट सांगता सांगता ‘सीताहरण’ प्रसंगाचा धाक दाखवायचा. त्याला घाबरून रवींद्र कधी त्या वर्तुळाबाहेर पडायला धजावायचा नाही. त्यामुळे, वडिलांबरोबरच्या सहवासातले हे दिवस रवींद्रसाठी वेगळ्या अनुभूतीचे ठरले.
निसर्गातल्या या स्वच्छंद वास्तव्याबद्दल रवींद्रनाथांनी लिहिलंय की, ‘या प्रवासात ज्या गोष्टी मी बघू शकलो, त्याबद्दलच्या आनंदापुढे, या प्रवासाच्या आधीच्या बंदिस्त जीवनात मी काही गोष्टी बघू शकलो नाही याचा विषाद अल्पजीवी ठरला. इथे मला नोकरांच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागणार नव्हतं, तसंच, इथं, केवळ क्षितिजावरचं वर्तुळच मला वेढलेलं राहणार होतं. त्याच्या आत मी मुक्तपणे हवा तसा संचार करू शकत होतो.’
वडिलांच्या या अनोख्या हाताळणीमुळे, रवींद्रमधल्या व्यक्त होण्याच्या, मोकळेपणानं व्यक्त होण्याच्या जाणिवा तीव्र झाल्या. या हाताळणीचा पाठपुरावा केला, रवींद्रचे वडीलबंधू ज्योतिरिंद्रनाथांनी. ज्योतिरिंद्रनाथांनी ‘भारती’ हे मासिक चालवलं. त्यांना साहित्य आणि कला यात विशेष रुची. रवींद्र त्यांचा अत्यंत लाडका. ज्योतिरिंद्रनाथ आणि रवींद्रच्या वयांमध्ये १२ वर्षांचं अंतर, पण या अंतरामुळे त्या दोघांमधलं सामंजस्य तसंच ओढ यामध्ये कधी अंतर पडलं नाही. त्याला कुठलाही उपदेश न करता, स्वानुभवावर बऱ्यावाईटाची पारख व्हावी यावर ज्योतिरिंद्रनाथांचा विश्वास होता. रवींद्र त्यांच्याशी निर्भीडपणे कुठल्याही विषयावर चर्चा करत असे. रवींद्रनाथांनी याविषयीचं एक उदाहरण दिलं आहे. शिलाईदहला जंगलात शिकारीसाठी, ज्योतिरिंद्रनाथांबरोबर गेले होते. तिथल्या फुलांच्या रसांनी कविता लिहावी असं रवींद्रच्या मनात आलं. त्यासाठी यंत्र तयार करावं असा विचार आला. फट असलेला एक लाकडी वाडगा, त्याच्यात गोलगोल घोटायला एक वरवंटा. दोरीनं बांधलेल्या एका चाकानं तो फिरवता येईल असा. रवींद्रनं ज्योतीदादांना त्याबाबत सांगितलं. मग सुतार आला, लाकडं घेऊन. यंत्र तयार झालं. पण त्यात रस न निघता केवळ चोथा होत होता. प्रयोग अयशस्वी झाला पण ज्योतीदादा त्याला एका अक्षरानंही बोलले नाहीत.
ज्योतिरिंद्रनाथ आणि त्यांची पत्नी कादंबरीदेवी, हे दोघेही कलोपासक होते. संगीताचे प्राथमिक धडे रवींद्रने या दोघांकडे घेतले. त्यांच्यामुळे रवींद्रनाथांची संगीत, चित्रकला याबद्दलची दृष्टीही विकसित व्हायला लागली.
या कलांच्या ओढीनं रवींद्रनाथ अधिकाधिक निसर्गाजवळ ओढले गेले. या विस्तीर्ण निसर्गाला जर मोकळेपणानं शिक्षणात आणलं गेलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे ओढा वाढेल याची त्यांना खात्री होती, अर्थात स्वानुभवामुळं. परिणामी, शांतिनिकेतन ही वास्तू शैक्षणिक विद्यापीठ म्हणून रूपांतरित करायचा त्यांना ध्यास होता आणि तो त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केला.
‘गीतांजली’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला साहित्यातले नोबेल पारितोषिक मिळाले, तो दिवस होता, १५ नोव्हेंबर, १९१३. रवींद्रनाथ हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय. सगळ्या राष्ट्राभिमानी भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला. अंदमानात कारावासात शिक्षा भोगत असलेल्या सावरकरांनी ‘रवींद्रनाथांचे अभिनंदन’ ही अभिनंदनपर कविता रवींद्रनाथांना पाठवली.
आयुष्य सर्वागानं अनुभवत ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथ ठाकूर अनंतात विलीन झाले, पण जगावर फार मोठी मोहोर उमटवूनच!
निसर्गातला खुलेपणा तेवढय़ाच खुलेपणानं अनुभवण्याची वृत्ती आणि त्याला पूरक शांतिनिकेतन हे अलौकिक देणं देणाऱ्या वडील देवेन्द्रनाथ यांना रवींद्रनाथांनी अतिशय कृतज्ञतेनं आपली भावांजली वाहिली आहे. १९०१ साली प्रकाशित झालेला ‘नैवेद्य’ हा कवितासंग्रह रवींद्रनाथांनी आपल्या वडिलांना अर्पण केला आहे, म्हटलंय,
I bow to him,
who is the father
in my father.    

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले