काही जणांसाठी पावसाळा म्हणजे पावसाबरोबर मनसोक्त वेळ घालवण्याचा काळ. निसर्ग त्यांना जगण्याचा असा काही अद्भुत ओला अनुभव देतो की, पुन्हा पुन्हा भिजायला जाणं होतंच. पण एखाद वर्षी पाऊस त्यांच्या आयुष्यातून वगळला गेला तर?

हिमालयातील एका शिखर मोहिमेत झालेल्या अपघातामुळे मला त्या वर्षी काही महिने घराबाहेर पडता आले नव्हते. नेमका तो काळ पाऊस काळ होता. भटक्यांना पावसाळ्यात सह्याद्रीत फिरण्याचे सुख काय असते ते मला माहीत होते, आणि त्यापासून वंचित राहण्याच्या, सुखाला पारखे होण्याच्या वेदनाही. एका पावसाळ्यात हे सुख आणि वेदनाही कागदावर उतरल्या.

असाच एक पावसाळा,आषाढ संपता संपता पाऊस लागलाय. दोन दिवस सलग झड लागलीय. संततधारा स्रवतायत. त्यात वळिवाचा धुसमुसळेपणा नाही, श्रावणातला लपंडाव नाही, मातेच्या आचळातून संथपणे थेट पित्या पोराच्या मुखात पोहोचणार्‍या त्या अमृतधारा मातीत खोल खोल मुरत चालल्या आहेत. मातीही त्या धारा रिचवून घेते आहे, भुकेल्या पोरासारखी धारांची स्तने तोंडात घोळवीत. हाही बरसतोय संथपणाने. कुठेही जाण्या-येण्याची घाई नसलेला, निवृत्तीनंतर लेकाबाळांच्या संसारात निवांत पडायला आलेल्या बापासारखा. त्याला सांज, दुपार, सकाळ सगळे सारखेच. उशाला हात देऊन निवांतपणे जग निरखत आभाळात पडून आहे तो.

हा आला आणि माणसांच्याही चेहर्‍यावर टवटवी आली. सुकलेली मनं, पानं, फुलं सगळीच तरारलीत. गुलमोहराची काळसर हिरवी सावली अधिकच गच्च झाली आहे. पानापानांवर साठल्या थेंबांनी आणखी जड झाली आहे. त्यात जडपणाखालीसुद्धा अधिर्‍या मनाने, गात्रांनी कुणीतरी कुणाची तरी वाट पाहतोय. प्रतीक्षेच्या शेवटी, शब्दाशिवायसुद्धा तेथे भाषा उमलतात. त्यात हळवे स्पर्श आहेत, तृणांकुरासारखी ताजी मनं आहेत, फुलपाखरांसारखी भिरभिरती नजर आहे, सशाच्या काळजासारखी पिटपिटणारी स्पंदनं आहेत, आणि हवेतल्या गारव्याला, पावसाच्या ओलेपणाला ओलांडून येणारे उबदार आश्वासक श्वासही आहेत.

श्रावणाच्या आसपास हा लेकीकडे जायला निघतो. आषाढ नावाच्या लेकाकडे किती दिवस मुक्काम टाकायचा आणि श्रावण लेकीकडे किती रात्री काढायच्या याची त्याला पक्की जाण आहे. म्हणून लेकाकडे एखाद्या बशा बैलाप्रमाणे तो बसून असतो. शेपूट पिरगळले, धोपाट्या घातल्या तरी स्वत:ला वाटेल त्याच वेळी उठून चालायला लागणार्‍या बैलासारखा संथपणाने स्वत:च्या मस्तीत उठतो आणि धिमेपणाने चालायला लागतो. लहर असेल तर मग मागे वळून बघेल, नाहीतर निघाला तो निघालाच. लेकीच्या घरच्या याच्या मुक्कामाला एकच नाव, ‘श्रावण सर’ आषाढातला हा बशा (रेंगाळणारा, आळशी) श्रावणात मात्र चपळ असतो. सगळ्या लेकीबाळींच्या घरी थोडा थोडा मुक्काम टाकून तो, स्वत:चा सहवास, अस्तित्व हवेहवेसे करून सोडणारा. अर्थातच याचं मन:पूर्वक स्वागत होत असतं. पोरीबाळींचे संसार व्यवस्थित लावून दिल्यानंतर अधूनमधून आस्थेची पांघरुणं परत एकदा नीटनेटकेपणाने घालत हा फिरतो. म्हणून एका जागी याचा पाय ठरत नाही. काल हळद लावून दिलेल्या-आणलेल्या लेकी, सुना अजूनही हिरव्या चुड्यावरच असतात. हिरवे शालू मिरवीत असतात. नव्याचे नवेपण मनात झुलवत असतात. ते उतरवायला मन राजी होत नाही. पावसाच्या वत्सल स्पर्शाने मधल्या अधल्या भेटीने त्या चुड्यांचे शालूंचे रंग आणखीनच खुलतात, गडद होतात. याचा माहेरचा हात, तर ‘तिकडचा’ हवाहवासा वाटणारा अधिरा स्पर्श गात्रागात्रांतून व्हायला लागतो. हिरवेपणाचा कळस होतो. पोपटी हिरवा, गडद हिरवा, काळसर हिरवा, भुरकट शेवाळी हिरवा, गहिरा हिरवा, उत्सुक हिरवा, तृप्त हिरवा, नजरेतून उसळणार्‍या कृतज्ञतेचा हिरवा, अफाट हिरवा, हिरव्या रंगाचा दंगा नुसता.

गेल्या वर्षी १५ ऑगस्टची सुट्टी धरून वेल्ह्यातून पांड्या दर्‍याने शिवथर घळीकडे उतरलो होतो. घाटावर होतो तोपर्यंत वारा आणि पावसाने, दोघांनी मिळून बडवून काढले होते. आई बापाचं न ऐकता उंडगायला बाहेर पडणार्‍या पोरांना या शिक्षेचं काहीच वाटत नाही, इतकी ती कोडगी झालीत. हे आई-बाबांच्या लक्षातच येत नाही हे बरंच आहे. दे दणादण, बुक्क्या, थापड्यांनी अंग हुळहुळं झालं होतं. धुक्याने वाटा रोखल्या, थंडीने कडकडूनच चावे घेतले. तरीही आम्ही घुसलोच. दरा उतरायला थोडासा खडाच. पावलापावलाखाली सरकत्या पायर्‍या बसवल्यासारखी उतरणारी पाऊलवाट. त्यामुळे सगळा देह नजरेत आणून उतरत होतो. विसाव्यासाठी क्षणभर थांबलो. वारा आता चपकारत नव्हता. खाली नजर फेकली तर थेट शिवथरघळीपर्यंत नजर अडत नव्हती. घाट उतरून आल्यामुळे धुकेही नव्हते. नजर लांबवर तळ्यासारखी पसरत गेली. खाली अफाट भाताच्या कोवळ्या रोपांचा हिरवाकंच पसारा झुलत होता. एक संततधार या टोकापासून त्या टोकापर्यंत सलगपणे धरली होती. कुठे कमी नाही, कुठे जादा नाही. त्याच्या मायेचा हात एकसारखा एका लयीत फिरत होता. त्या वत्सल स्पर्शाचा एक दृष्टिमान पडदा, मायेचा पदर झाला होता. या सृष्टीत फक्त वृष्टीच असल्याची जाण खोलवर रुजत होती. नदी, वारे, झाडे, माणूस काऽऽही नाही. अनादी अनंत काळापासून सुरू असलेला फक्त एकच निसर्ग सर्वकाळ व्यापून राहिल्यासारखा भासत होता. त्याला सुरुवात व शेवट असेल असे वाटतच नव्हते. दृश्य जगात अस्तित्वात असलेली एकच गोष्ट जाणवत होती, ‘पडणारा पाऊस’.

श्रावणातला असूनही त्याने आषाढ झड लावली होती. एक संथ संततधार. वेडा वाकडा, लोळण फुगड्या घेणारा, अवखळ पोरासारखा त्याचा वावर नव्हता. प्रौढ, गंभीरसा निवृत्त म्हातारा शोभत होता तो. खूप वेळ डोळे निववून घेतले. अंगावर काटा फुलायला लागल्यावर नजर पायात आणून उतरायला लागलो. पायवाटेवरच एक लांबलचक सपाट कातळपट्टा लागला. एवढं बदाबदा पाणी वरून पडत होतं, पण कातळावर पाणी थांबणार कुठून? कुठे कुठे बारकी उखळं तयार झालेली. त्यात थोडंसं पाणी अडकून पडलं होतं एवढंच. त्या पट्ट्यातून पार होताना हा धीरगंभीर म्हातारा थोडासा दमल्यासारखा होऊन डोळे मिटून पडल्यासारखा झाल्याचं लक्षात आले. काही चुकार थेंब मधूनअधून पडत होते तेवढेच. झोपेतच नकळत पदराआडच्या पोरावर मायेचा हात पडावा तसे.

आता कातळपट्ट्यातून आणखी खाली उतरलो. भातशेतीचा सलग पट्टा थेट शिवथरघळीच्या पायथ्यापर्यंत पसरला होता. खाचरातून पाणी मावेनासं झालेलं. एका खाचरातून दुसर्‍या, दुसर्‍यातून तिसर्‍या, शेवटी कुठेतरी ओढ्याला नदीला मिळणार. पाण्यातून त्या भातखाचरातून चालताना बुटात पाणी येत होतं. बुटाला करंगळीपाशी पडलेल्या लहान भोकातून पाण्याबरोबर आत येणारे लहान लहान खडे पायाला खुपत होते. सकाळपासून भिजत असलेल्या पावलात ते लहानसे खडे रुतत होते. तीव्रपणाने जाणवणारी, मधूनच दात ओठात रुतवणारी कळ मस्तकात भिडत होती. आतापर्यंत सगळं कसं मस्तपैकी चाललं होतं. आत्ताच या घोट्याएवढ्या पाण्यातून चालायला लागलो आणि या वेदना जडायला लागल्या. एका बांधावरच्या पायवाटेवरून जाताना दिसलं की त्या वावराचा मालक फक्त डोकं भिजणार नाही याची काळजी घेऊन, केवळ अध्र्या बाह्यांचा सदरा घालून अनवाणी पायाने साठल्या पाण्याला वाहतं होण्यासाठी वाट करून देत होता. थोडासा नवलग्रस्त झालो. वावरात तर त्याच्या पायाखाली काय काय येत असेल. तरी मायच्या मांडीवरचं ते लेकरू सहज विनावेदना वावरत होतं. आणि मी? थोड्याशा तिरमिरीतच पायातले बूट उपसले. काय व्हायचंय ते होऊदे. चालायला सुरुवात केल्यावर बुटाने नाजूक केलेल्या तळपायांना खडे आणखीनच बोचायला लागले. पण तसाच चालत राहिलो. पाण्यात चुबुकचुबुक आवाज करीत चालतच राहिलो. पडत्या पावसातही पाणी गार लागत नव्हतं. थोडंसं उबदारच वाटत होतं. बोटाच्या बेचक्यातून गढूळलेलं पाणी, माती वर येत होती. बोटांना त्या मातीचा स्पर्श गोंजारल्यासारखा होत होता. पावलाच्या पुढचं नितळ पाणी, पाऊल पडताच गढूळत होतं. पाऊल उचलताच पुन्हा क्षणभरात पहिल्यासारखं होत होतं. पुन्हा पुढच्या पावलांना बोटांना गुदगुल्या करत माती वर येत होती. आता खडे खुपत नव्हते, कळ नव्हती, वेदना नव्हत्या. होती ती फक्त एक सुखद जाणीव. मी मातीचा झालो आणि त्या मायनं मला आंजारलं- गोंजारलं. तळपायांना मऊशार हातांनी मऊशार मातीचे लोणी माखलं. एवढी म्हणून कळ येऊ नाही दिली. दिस बुडी होऊन मुक्कामाचं छप्पर गाठेपर्यंत मग मी याच सुखस्वादात चालत राहिलो. ते चालणं वाटलंच नाही, श्रम झाले नाहीत, दमायला झालं नाही, दुखलं खुपलं नाही. मायेच्या मांडीवर जोजावल्याची ती अनुभूती रात्री डोळा लागेपर्यंत मनात घोळत राहिली.

हेही वाचा

आज आत्ता दोन दिवसांपासून लागून राहिलेल्या या आषाढधारांनी तो अनुभव, ते जोजावणं जागं झालं आहे. काही काळ त्या आठवणींच्या गुहेत पडून राहिलो. पुन्हा ते क्षण जगलो, भानावर आलो ते पायाच्या बोटातल्या कळांमुळे. हे वास्तव कठोर आहे.

मला यावर्षीचा पावसाळा वर्ज्य आहे. मीच त्याला कारण आहे. माझ्या या सह्याद्रीला, दगड मातीला सोडून मी जरा दूरवर भटकायला हिमालयात गेलो. ओळखीच्या नसणार्‍या त्या बर्फात जरा जास्तच रमलो. त्या अनोळखी मातीने, बर्फाने मला जवळ केलं नाही. केली ती शिक्षाच. कडकडून चावे घेतले. पाय आधी काळे निळे पडले. मग रक्तबंबाळ झाले. मी माझ्या मातीकडे धावलो. पण डॉक्टरांनी माझ्याच मातीला, उघड्याच काय पण वस्त्रालंकित पायासहितही भेटण्याची मनाई केली आहे. पायाला माती-पाण्याचा स्पर्श सहा महिने होता कामा नये असं बजावले. माझ्यासारख्या अनगड पोराला डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे. आता नाही पण पुढे तरी मनासारखं सह्याद्री भटकता यावं म्हणून आता त्यांचं ऐकलं पाहिजे.

माझी माती थोडी रागावल्यासारखी दिसते आहे. आपलं अंगण सोडून दुसर्‍याच्या परसदारी कशाला खेळायला गेलास म्हणून तिने वटारलेल्या डोळ्यातही पाणी तरळलेलं मला जाणवतंय. माझ्याच वेदनांचं पाणी तिथे तरळतंय याची मला खात्री आहे. थोडा वेळ तिचा राग राहील, मग परत मला पोटाशी घेईल याचीही खात्री आहे. मीही थांबायचं ठरवलं.

यावर्षीचा पावसाळा मी माझ्या आयुष्यातून वजा केला आहे. घरात बसून, आभाळातून नव्हे तर कौलावरून पडणार्‍या पागोळ्या बघत बसणार आहे. मला पाणी परकं झालंय. मीही रुसल्या पोरासारखा दूरस्थ झालोय. पण थोडा वेळच.

माझ्या आयुष्यातून एक पावसाळा वजा झाला आहे, पुसला गेला आहे, पण तरी तो मला भेटणार आहे…

dilip.naiknimbalkar@gmail.com