मुग्धा देवळे
राखी पौर्णिमेची संध्याकाळ, आर्याने साहिलच्या मनगटावर राखी बांधली होती. औक्षण झालं, दोघांनी मिठाई खाल्ली आणि साहिलने नेहमीप्रमाणे आर्याला चिडवत विचारलं, ‘‘आता दरवर्षीसारखं मला तुझं रक्षण करायचं, एवढंच ना?’’ आर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि भुवया उंचावल्या. ‘‘हो. आणि माझं रक्षण करण्याबरोबर माझे सगळे हट्टही पुरवायचे.’’
‘‘अरे वा! म्हणजे राखी बांधली की तुझी मागणीची यादी सुरू?’’ दोघांचं भांडण सुरू होणार इतक्यात बाबा हसत म्हणाले, ‘‘तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगू?’’ साहिल लगेच बाबांच्या जवळ येऊन बसला. बाबा म्हणाले, ‘‘तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रात एक अशी बहीण होऊन गेली आहे, जिला तिच्या भावासाठी काही तरी करायचं होतं… पण त्याआधीच तिच्या भावाने जे केलं, त्याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाही.’’
‘‘काय केलं?’’ साहिलने विचारलं. ‘‘त्याने आपलीच पाठ तवा बनवली!’’ ‘‘काय?’’ साहिलचे डोळे मोठे झाले आणि आर्या हसू लागली.
बाबा म्हणाले, ‘‘हो. पण थांबाआधी गोष्ट समजून घे.’’
‘‘ही गोष्ट आहे ज्ञानोबा आणि त्यांची धाकटी बहीण मुक्ताईची.’’
त्या काळात ज्ञानोबा, निवृत्तिनाथ, सोपान आणि मुक्ताई – ही चार भावंडं साधं आयुष्य जगत होती. त्यांच्या आयुष्यात सुखापेक्षा संकटं जास्त होती; पण त्या सगळ्या संकटांमध्ये एक गोष्ट मात्र कायम होती, ते चौघे एकमेकांसाठी होते. मुक्ताई सर्वात धाकटी होती. पण घरातली सगळी कामं, भावांची काळजी, त्यांच्या आवडी-निवडी सगळं तीच बघायची. तिला सगळ्याचीच काळजी असायची. एक दिवस निवृत्तिनाथांनी मुक्ताईला सांगितलं, ‘‘मुक्ते, आज मांडे खावेसे वाटत आहेत.’’ मुक्ताईला आनंद झाला. ‘‘हो! मी करते.’’ म्हणत तिनं पीठ घेतलं आणि मांडे करायला सुरुवात केली. पण मांडे भाजायला खापर हवं होतं. म्हणून ती कुंभाराकडे गेली. त्या काळात काही लोक या भावंडांचा द्वेष करत होते. कुंभाराला सांगितलं गेलं होतं की, या भावंडांना काहीही देऊ नकोस. म्हणून मुक्ताईला नकार मिळाला. मुक्ताई काही बोलली नाही. परत घरी आली. पण हातात खापर नव्हतं. आणि चेहर्यावरचं हसूही मावळलं होतं. ज्ञानोबांनी तिला पाहिलं. त्यांनी विचारलं, ‘‘मुक्ते, काय झालं?’’ मुक्ताईने सगळं सांगितलं. ज्ञानोबा शांतपणे ऐकत राहिले. मग म्हणाले, ‘‘एवढंच ना?’’ मुक्ताईने त्यांच्याकडे पाहिलं. ‘‘एवढंच? दादा, मांडे कशावर भाजू?’’
ज्ञानोबा हसले. म्हणाले, ‘‘माझ्या पाठीवर.’’ मुक्ताईला वाटलं, दादा गंमत करत आहेत.
‘‘दादा, खरं बोलताय?’’ ज्ञानोबा काही बोलले नाहीत. त्यांनी योगसामथ्र्याने आपली पाठ इतकी गरम केली की ती तव्याप्रमाणे तापली, अशी कथा संतपरंपरेत सांगितली जाते. मुक्ताईने एक मांडा हातात घेतला. साहिलने मध्येच बाबांना थांबवलं.
‘‘ म्हणजे खरंच पाठ गरम झाली?’’
बाबा हसले. ‘‘ही संतपरंपरतेली कथा आहे. आपण तिच्याकडे त्या काळच्या संतपरंपरेतील आख्यायिका म्हणून पाहायचं. पण या गोष्टीतला खरा मुद्दा चमत्कारापेक्षा सुंदर आहे.’’
‘‘तो काय?’’
‘‘मुक्ताईच्या चेहर्यावरचं दु:ख पाहून ज्ञानोबांनी असा विचार केला नाही की, ‘ही माझी समस्या नाही.’ त्यांनी विचार केला, ‘माझ्या बहिणीला हे करता यावं, यासाठी मी काय करू शकतो?’’
आर्या शांतपणे ऐकत होती. बाबा म्हणाले, ‘‘आणि मुक्ताईनेही भावासाठी केलेला तो मांडा साधा नव्हता. प्रत्येक मांडा तिच्या प्रेमाने भरलेला होता. चार भावंडांनी जगाने कितीही अडवलं तरी एकमेकांसाठी उभं राहायचं सोडलं नव्हतं.’’
साहिल म्हणाला, ‘‘पण बाबा, ही तर भावाने बहिणीसाठी केलेली गोष्ट झाली. राखीसाठी तर बहीण भावासाठी काही तरी करते ना?’’ बाबा हसले. म्हणाले, ‘‘थांब. खरी गोष्ट आता सुरू होतेय.’’ काही दिवसांनी ज्ञानोबांचं मन एका प्रसंगाने खूप दुखावलं. लोकांच्या बोलण्याने ते इतके खिन्न झाले की ते झोपडीत गेले आणि आतून ताटी लावून घेतली. बाहेर मुक्ताई उभी होती. बराच वेळ गेला तरी ते बाहेर आले नाहीत तेव्हा तिने दार ठोठावलं.
‘‘दादा’’ उत्तर नाही. तिने पुन्हा हाक मारली. ‘‘ज्ञानोबा’’ तरीही शांतता. मुक्ताईने मग दाराशी बसून आपल्या भावाशी बोलायला सुरुवात केली.
‘‘दादा, जगात कुणी काहीही बोललं म्हणून तुम्ही स्वत:ला बंद करून घ्यायचं का?’’ ती त्याला समजावत राहिली. रागाने नाही. पण प्रेमाने. कारण तिला माहिती होतं, दादा बाहेरून मजबूत दिसतात, पण आज त्यांचं मन दुखलं आहे. मुक्ताईने ज्ञानोबांना जणू सांगितलं, ‘‘दादा, जगाने तुमच्यावर दार बंद केलं म्हणून तुम्ही जगावर दार बंद करू नका.’’ तिच्या या भावनेतूनच पुढे तिचे ‘ताटीचे अभंग’ प्रसिद्ध झाले. साहिल बराच वेळ शांत राहिला.
मग तो म्हणाला, ‘‘म्हणजे आधी ज्ञानोबांनी मुक्ताईला तिच्या दु:खातून बाहेर काढलं आणि नंतर मुक्ताईने ज्ञानोबांना त्यांच्या दु:खातून?’’
‘‘हो,’’ बाबा म्हणाले. ‘‘म्हणून ही गोष्ट फक्त भावाने बहिणीचं रक्षण करण्याची नाही.’’
‘‘अगदी नाही.’’ बाबांनी साहिल आणि आर्याकडे पाहिलं. ‘‘ही गोष्ट आहे दोन माणसांची, जी एकमेकांना आयुष्यात पुढे नेतात.’’
‘‘मुक्ताई लहान होती, पण गरज पडली तेव्हा तिने मोठ्या भावाला थांबवलं. ज्ञानोबा मोठे भाऊ होते, पण बहिणीला त्रास झाला तेव्हा त्यांनी ‘तू लहान आहेस, तुझं तू बघ,’ असं म्हटलं नाही. त्यांनी स्वत: पुढे होऊन तिची अडचण दूर केली.’’
मग बाबा शांतपणे म्हणाले, ‘‘साहिल, आज आर्याने तुझ्या हातावर राखी बांधली. पण तिचा अर्थ एवढाच नाही की तू तिचं रक्षण करायचं. तिने तुला एक छोटासा धागा बांधला आहे. पण त्यात एक मोठं वचन आहे, ‘तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस.’ आणि तुझं तिच्यासाठीचं वचनही तेच असावं. कधी तिच्यासाठी खंबीर उभं राहायचं. कधी तिचं स्वप्न तिला आठवून द्यायचं. कधी ती चुकीची असेल तर तिला थांबवायचं. आणि कधी ती फक्त शांत बसली असेल, तरी ‘काय झालं?’ म्हणून तिच्या शेजारी बसायचं.’’
‘‘आणि आर्याने?’’
बाबा आर्याकडे पाहून म्हणाले, ‘‘तिनेही तेच करायचं. कारण भाऊ-बहीण म्हणजे एकाचा पहारेकरी आणि दुसरा सुरक्षित व्यक्ती नाही. ते दोघे एकमेकांचे सोबती असतात.’’ बाबांनी साहिलच्या मनगटावरची राखी पाहिली आणि म्हणाले, ‘‘म्हणून मला राखीचा एक वेगळाच अर्थ आवडतो.’’ ‘‘कोणता?’’ ‘‘जेव्हा तुझ्या आयुष्यात कुणीही नसेल, तेव्हा ‘मी आहे’ म्हणणारी व्यक्ती म्हणजे भाऊ किंवा बहीण. ज्ञानोबांनी मुक्ताईला सांगितलं नाही की, ‘खापर नाही मिळालं? मग जाऊ दे मांडे राहू दे.’ त्यांनी आपली पाठ पुढे केली. आणि मुक्ताईनेही ज्ञानोबांना सांगितलं नाही की, ‘तुम्ही मोठे संत आहात, तुम्ही स्वत:च स्वत:ला सांभाळा.’ त्याने मन बंद केलं तेव्हा ती ताटीबाहेर उभी राहिली. एकाने बहिणीच्या हातातला मांडा वाचवला, दुसरीने भावाच्या मनातला उजेड. म्हणूनच, साहिल…’’ बाबांनी त्याच्या मनगटावरची राखी हलकेच धरली. आणि म्हटलं, ‘‘राखीचा धागा हाताभोवती एकदा गुंडाळला जातो, पण भावंडांचं नातं आयुष्यभर एकमेकांभोवती गुंफलेलं असतं. दोघांनी एक गोष्ट कधी विसरायची नाही. जग कितीही मोठं झालं, तुम्ही कितीही दूर गेलात, कितीही मोठे झालात, एकमेकांसाठी ‘मी आहे’ हे दोन शब्द कधी छोटे होऊ देऊ नका.’’
बाहेर राखी पौर्णिमेचा चंद्र शांतपणे चमकत होता. आणि त्या रात्री साहिलला पहिल्यांदा जाणवलं, राखी फक्त मनगटावर बांधलेली नव्हती. ती त्याच्या आणि आर्याच्या मनात केव्हाच बांधली गेली होती.
umugdha2001.deole@gmail.
