आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटू क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच वाढते! ..  रांगोळीचा छंद जोपासता जोपासता अचानक हाती गवसतो तो आनंदाचा घडा, दिवाळीचा आनंद  द्विगुणित करणारा.. आमच्या दोन वाचक मत्रिणींनी पाठवलेल्या या आठवणी.. रांगोळीच्या. खास दिवाळीनिमित्ताने तुमच्याही आठवणी ताज्या करणाऱ्या..
रांगोळी काढायचा माझा छंद बालवयातला. आलेखाच्या पेपरवर ठिपके काढून मी स्वत:च रांगोळी जुळवायचे. अशा किती तरी वह्य़ा मी बनवल्या होत्या. शेजारपाजारच्या मुलीच नाही तर बायकाही त्या घेऊन जायच्या. त्या वेळी सुचलं नाही, नाही तर कवितेऐवजी माझं पहिलं पुस्तक रांगोळीचं आलं असतं. आमच्या गल्लीत मी ‘रांगोळीपटू’ म्हणून प्रसिद्ध झाले होते, पण या रांगोळी काढण्यातला आनंद मात्र मला हवा तसा घेता आला नाही, कारण आमचं घर तसं बोळात. पायरीसमोरच रस्ता, जेमतेम दहा फूट रुंदीचा, त्यामुळे आजोबा दहादा बजावायचे, खूप फापटपसारा करू नका. नावाला रांगोळी घाला. अर्धा तासही राहणार नाही ती; पण आम्हा दोघी बहिणींचा उत्साह दांडगा. त्यांची सूचना डावलून आम्ही ३०-३० ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायचो.
पहिली ओळ अगदी पायरीला चिकटलेली. यायला-जायला दोन-एक फुटांची जागा सोडलेली. दोन-तीन तास खपून आम्ही अगदी सुरेख रांगोळी काढायचो. येणाराजाणारा थोडा रसिक असेल तर मिनिटभर रांगोळी न्याहाळायचा. कुणी कौतुकही करायचा. रांगोळीवर पाय पडणार नाही याची काळजी घेऊन बाजूने निघून जायचा. काही अरसिक महाभाग मात्र त्यावर बिनधास्त पाय ठेवून जायचे. काही व्रात्य पोरं तर मुद्दामहून रांगोळी फिसकटून जायचे, मी अगदी रडकुंडीला यायचे. दोन-तीन तास खपून काढलेली रांगोळी दहाव्या मिनिटाला पुसली गेल्याचं पाहून आजी-आजोबांचा जीव अगदी तीळतीळ तुटायचा. मग तेच दोघं आलटून पालटून तासभर तरी आमच्या रांगोळीची राखण करत बसायचे, पण ते तरी काम सोडून किती वेळ पायरीवर बसणार? कशासाठी तरी आत जाणं व्हायचंच.
माणसं तरी आवरता येतील, पण आजीने लाडावलेली गाय कशी आवरणार! रोज एक काळी गाय दोन पाय पायरीवर ठेवून चक्क चौकटीतून आत डोकावायची. आजी रोज तिला भाकरीचा तुकडा भरवून हळदीकुंकू लावायची. दिवाळीत तर तिच्याचसाठी रांगोळी काढली आहे अशा थाटात ती आपले शेणाचे पाय घेऊन रांगोळीवर उभी राहायची. मग मात्र मी रडून भोकाडच पसरायची. मग आजीआजोबा समजावयाचे. ‘गायीला आपण देव मानतो ना? मग तिने पाय ठेवला याचा अर्थ तुझी रांगोळी पावन झाली. देवांच्या स्वागतालाच तर आपण रांगोळी काढतो ना? संध्याकाळी चांगली रांगोळी काढ.’ आजोबाही मग रंगासाठी आठ आणे हातावर टेकवून माझी समजूत काढायचे, कारण रांगोळीत रंग भरण्याची हौसही त्या काळी आम्हाला परवडणारी नव्हती. कधीमधी घराला द्यायला आणलेले मातीचे रंगच आम्ही जपून ठेवायचो. जोडीला मग कुंकू, हळद आणि कपडय़ाला घालायची नीळ गुपचूप घेऊन आम्ही रंग बनवायचो. रांगोळीदेखील २५-३० पैसे किलोवर मिळायची, तीदेखील जपून वापरायची ताकीद असायची. या सगळ्यातून मी रांगोळीचा माझा शौक पुरवायचे. माझं हे रांगोळीप्रेम पाहून शेजारपाजारच्या बायका म्हणायच्या, ‘आजी, चांगलं मोठ्ठं अंगण असलेला नवरा बघून द्या बरं या नातीला.’ आणि अखेर आपल्या सासरच्या घराला मोठ्ठं अंगण असावं असं स्वप्न मीही पाहू लागले. यथावकाश लग्न करून मी मुंबईत आले. मोठ्ठं नाही, पण माहेरपेक्षा इथलं अंगण बरं होतं. इथेही घरासमोर रहदारीचा रस्ता होता, पण घरापासून ८-१० फुटांवर. पहिलाच दिवाळसण आला..
पहिल्या आंघोळीला भल्या पहाटे उठले. शेणाचा सडा शक्य नव्हता. मग असाच पाण्याचा सडा मारला आणि माझी स्वारी रांगोळी काढायला अंगणात बसली. रंगही भरपूर आणले होते. माहेरसारखी काटकसर करायची आता गरज नव्हती. अगदी तल्लीन होऊन मी रांगोळी काढत होते. सासू-सासरे एकदोन वेळा अंगणात डोकावून गेले. येणारेजाणारेही बघत होते. मधूनच माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. कळेनाच हे लोक असे का बघतात ते. शेजारीपाजारीही कुणी रांगोळी काढत नव्हते. मला कळेनाच हे लोक दिवाळी असूनही दारात रांगोळी का काढत नाहीत ते!  मस्तपैकी रांगोळी काढून मी घरात आले. ह्य़ांना विचारलं, ‘काय हो! आजूबाजूचे कुणीच कसे रांगोळी काढत नाहीयेत?’ सगळेच गालातल्या गालात हसले. हे सांगू लागले, ‘अगं, ही मुंबई आहे. इथे अशी अंगणात रांगोळी नाही काढत. गॅलरीत नाही तर पॅसेजमध्ये गेरू लावून रांगोळी काढतात.’ अंगण सोडून घरात काय रांगोळी काढायची! मी थोडी खट्टूच झाले.
दुपारी जेवणंखाणं झाली. मी सहज शेजारी डोकावले, तर सगळ्या मुली, बायका रांगोळी काढण्यात मग्न. कुणी गॅलरीत, कुणी पॅसेजमध्ये, तर कुणी घरातल्या घरातच एका कोपऱ्यात रांगोळी काढत होते. कुणी चक्क पाटावरच रांगोळी काढत होते, तेही भर दुपारी जेवूनखाऊन. मोठमोठय़ा बायकादेखील अतिशय बाळबोध रांगोळ्या काढत होत्या, तर कुणी अगोदर खडूने रेखून मग रांगोळी काढत होते. बऱ्याचजणींना चिमटीतून रांगोळी सोडताच येत नव्हती, म्हणून रिकाम्या बॉलपेनमध्ये रांगोळी भरून रेषा मारल्या जात होत्या. मला गंमतच वाटली. मग मीच एकदोनतीन जणींना रांगोळी काढून दिली, मोजून अध्र्या तासात. कुणाच्या दारात पानाफुलांची, कुणाच्या दारात फ्रीहँड, तर कुणाच्या दारात ठिपक्यांची वळणदार रांगोळी काढली, तीही पुस्तकात न बघता. सगळ्या जणी माझं कौतुक करायला लागल्या. गावच्या मुलींना विशेष काही येत नाही, असं सदान्कदा म्हणणाऱ्या सासुबाईंपुढे माझा भाव त्यानिमित्ताने चांगलाच वधारला. माझा रांगोळीचा छंद असा कलात्मकदृष्टय़ा सार्थकी लागला होता..

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
sangli wild animal attack marathi news
सांगली : हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार, ७ गायब