‘एपस्टिन प्रकरणामागचं स्त्रीवादी वास्तव’ हा संध्या गोखले यांचा लेख (७ मार्च) धारदार शब्दांनी जगाच्या सभ्यतेचा बुरखा फाडणारा वाटला. जगाच्या निम्म्या लोकसंख्येचे अनेक क्षेत्रात प्रतिनिधित्व करणारे तथाकथित नेतृत्व कसं २१ व्या शतकातही स्त्रियांना वस्तू म्हणून वापरू शकतात, त्यांचा मनमानी वापर करून त्यांना निर्जीव वस्तूसारखे फेकू शकतात आणि वर जगभर उजळ माथ्याने फिरू शकतात, तेही या कानाची त्या कानाला खबर लागू न देता! सगळंच अतर्क्य! स्वत:ला नशीबवान समजत त्या मुलींसारखं गरीब- असुरक्षित बालपण आपल्याला मिळाले नाही यात समाधान मानायचे आणि नेहमीच्या समाजाच्या अल्प स्मृतीनुसार हे विसरून जायचे की त्या अत्याचारांची जाणीव ठेवून कोणत्याही माध्यमातून प्रश्न विचारत त्या मुलींना न्याय मिळवून देण्यात आपली पण भूमिका बजावायची हे आपण ठरवायचे आहे. आपली संवेदना बोथट होऊ न देणे हा पुढील पिढीतील मुलींना दिलेला सगळ्यात मोठा वारसा असणार आहे. एका मुलीवर होणारा अत्याचार हा केवळ तिच्या शरीरावरील आघात नसतो तर आयुष्यभरासाठी मानसिक जखम देणारी, तिच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणारी घटना असते. सुदैवाने ‘एपस्टिन’ प्रकरणाला वाचा फोडणारी पत्रकारिता अद्याप अस्तित्वात आहे. या प्रकरणातील मुलींना न्याय देणे आणि असा गुन्हा परत न करण्याची जरब समस्त जगावर बसवणे हाच यंदाच्या महिला दिनाचा योग्य संदेश असेल.
– प्रतीक्षा मुळीक
‘लोलिता’चीच आवृत्ती
संध्या गोखले यांचा ‘एपस्टिन प्रकरणामागचं स्त्रीवादी वास्तव’ हा लेख वाचला. वाचनांती एक गोष्ट जाणवली, की एपस्टिनच्या खासगी बेटांवर जाऊन मौजमजा करणार्या व्यक्तींची तुलना १९५५ मध्ये व्लादिमीर नाबोकोव यांच्या ‘लोलिता’ कादंबरीतील विकृत मानसिकतेच्या प्राध्यापक हंबर्ट सोबतच होऊ शकते. मानवी विकृतीला सत्तेच्या बळावर कोणताही गुन्हा दडपण्याच्या शक्तीची जोड मिळाल्यास काय घडू शकते याचे भयावह वास्तव या फाइल्समधून उघड होते. शांता निसळ यांच्या ‘बेघर’ कादंबरीतदेखील आर्थिक, सामाजिकदृष्ट्या कुचंबणा झालेल्या महिलांच्या समस्यांचे प्रभावी चित्रण वाचावयास मिळते.
एपस्टिन यांच्या सोबत मॅक्सवेलसारख्या महिलादेखील होत्या हे वास्तव अधिक अस्वस्थ करणारे. झाल्या प्रकरणापासून योग्य तो धडा घेऊन पुढील काळात अशा घटना घडविण्यास वावच मिळू नये म्हणून सार्या देशांनी एकत्र येऊन परिपूर्ण असे उपाय शोधल्यास या प्रकरणापासून बोध घेतला असे म्हणता येईल. अन्यथा, स्त्रीशक्ती, महिला दिन, महिलांचे सक्षमीकरण वगैरे म्हणजे केवळ शाब्दिक बुडबुडे ठरावेत.
– शैलेश न. पुरोहित, मुलुंड
शेतकरी स्त्रियांचा आदर्श
आणि या मातीतून चैतन्य गावे! हा किन्नरी नेरुरकर यांचा लेख (७ मार्च) वाचनीय आहे. स्त्रियांनी आपले कर्तृत्व विविध क्षेत्रांत सिद्ध केले आहे. उदा. कोणी मोठी उद्योजिका होते. कोणी लोकल अथवा मेट्रोचे सारथ्य करते. अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण या लेखातील शेतीच्या क्षेत्रातील एकल स्त्रियांचे, जरासे वेगळे क्षेत्र उल्लेखनीय आहे. शेतकर्यांनी विविध कारणांसाठी कर्जे काढलेली असतात. पती ज्या वेळेस आत्महत्या करतो, त्या वेळेस पीडित स्त्री उन्मळून पडते. वास्तविक पाहता, पतीच्या पश्चात, पत्नीलाही आत्महत्या करणे, सहज शक्य असते. पण आपणच जर आत्महत्या केली तर, आपल्या मुलांकडे तसेच शेतीकडे कोण पाहणार? या विचाराने ती आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होते व शेतीचा गंध नसलेली ती स्त्री, एखाद्या फिनिक्स पक्ष्याने राखेतून भरारी घ्यावी, तशी ती उभी राहते. अर्थात या बाबतीत, ती सर्व गोष्टी शिकून घेते. प्रसंगी सासरच्यांचा जाच सहन करावा लागतो, तसेच काही वेळा टोमणेही ऐकावे लागतात. परंतु इच्छा असेल तिथे मार्ग सापडतो असे म्हणतात. त्यानुसार या सर्व अडचणींवर मात करत, मेहनतीने, जिद्दीने ती जेव्हा शेतात धान्यरूपी सोने पिकवते. तेव्हा तिच्या डोळ्यातील आनंद काही आगळाच असतो. आज या क्षेत्रातील एकल स्त्रिया, आपले आयुष्य आपल्या मुलाबाळांसह आनंदाने व समाधानाने जगत आहेत. समाजातील इतर स्त्रियांनीही, यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे.
– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली
