आमच्याही घरी ‘पाचची नोट’
‘मनातलं कागदावर’ सदरातील सुप्रिया सावंत यांचा ‘पाच रुपयांची नोट’ हा लेख (२१ मार्च) वाचला आणि माझ्या बालपणीची घटना जागी झाली. माझ्या वडिलांचा देहान्त झाला तेव्हा मी तीनएक वर्षांचा, मोठा भाऊ दहा वर्षांचा आणि धाकटा काही महिन्यांचा होता. शेतीचे थोडेफार उत्पन्न यायचे. त्यातून आई कसेबसे भागवायची. पण पुढे कूळ कायद्यामुळे तेही उत्पन्न बंद झाले. पण माझ्या आईने कंबर कसली आणि घरातच खाणावळ चालू केली होती.
त्या वेळी मी नऊएक वर्षांचा होतो, पण मला आमच्या परिस्थितीची जाणीव होती. त्या वेळी किराणा सामान वगैरे खरेदी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी सामान खरेदीतून जे पैसे उरत त्यातले एक-दोन पैसे आईला कमी देऊन माझ्याजवळ ठेवत असे. एकदा आईला पैशांची जरूर होती म्हणून आईने मला पाच रुपये उसने घेऊन यायला सांगितले होते. तेव्हा मी साठवलेल्या पैशांतून पाच रुपये तिला दिले. मी कुठून आणले पैसे असे विचारत आई रागावली; परंतु जेव्हा सर्व खरे खरे सांगितले तेव्हा मात्र आईने प्रेमाने मला जवळ घेतले.
– रमेश नारायण वेदक, रायगड</strong>.
दुर्गाभाभींचे अदम्य साहस
अपर्णा देशपांडे यांचा ‘अदम्य धाडस’ (१४ मार्च) लेख वाचण्यात आला आणि मनात प्रश्न उभा राहिला, आपल्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये किती तरी क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाची होळी केली. त्यातल्या किती जणांची नावे आपल्याला माहिती आहेत? अंदमानच्या ‘सेल्युलर जेल’मध्ये किती तरी मराठी आणि बंगाली क्रांतिकारची नावे आहेत.
या लेखात क्रांतिकारक गुप्तहेर दुर्गावती व्होरा यांनी पार पाडलेल्या मोहिमांची माहिती अतिशय सुंदर रीतीने लेखिकेने वाचकांकडे पोहोचवली आहे. त्याबद्दल अनेक आभार. दुर्गाभाभी यांचा लाहोर स्थानकावरील प्रसंग म्हणजे त्यांनी दाखविलेले अतुलनीय साहस, पराकोटीचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. दुसरा असाच प्रसंग म्हणजे पतीचे क्रांतिकार्यात बॉम्बची तपासणी करताना झालेले निधन व त्यानंतर मुस्लीम महिलेचा वेश परिधान करून त्या केवल कृष्ण यांच्याकडे राहिल्या तो. हा आघात त्यांनी कसा सहन केला असेल? त्यांच्याबद्दल किती भारतीयांना माहिती होती, हा प्रश्नच आहे. त्यांना विनम्र अभिवादन.
– संजय घाटपांडे, पुणे</strong>.
