‘पंचसूत्री: भोंदू प्रतिकाराची’ (२५ एप्रिल) हा ॲड.रंजना पवार गवांदे यांचा लेख वाचला. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या म्हणून त्यांचा अनुभव दांडगा आहेच आणि अनेक लेखांमधून त्या सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी अनेक उदाहरणांसह प्रभावी मांडणी करत असतात. स्त्रियांना सहआरोपी करण्यात येऊ नये. अनेक कारणांमुळे ती विरोध करण्यास घाबरते. त्यामुळे एकंदर समाजाची मानसिकता बदलून वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी, अनिष्ट प्रथा-परंपरांना नकार, दैववादाचा अस्वीकार आणि जादूटोणाविरोधी कायदा अंमलबजावणी ही पंचसूत्री परिणामकारक ठरेल, असे स्पष्ट विचार त्यांनी मांडले आहेत. पूर्वीच्या नराधमांची उदाहरणे असताना सुशिक्षित तरुणी, लग्न झालेल्या व न झालेल्या बायका, गर्भवती या बुवांकडे संमोहित होऊन जातातच कशा? कोप होईल, शाप मिळेल, नवरा मरेल, व्हिडीओ होईल म्हणून तक्रार करण्यास घाबरतात? भगिनींना कळकळीची विनंती. फक्त महिला दिन साजरे करू नका. सुशिक्षित, सुसंस्कृत राहून डोळे उघडे ठेवा. एकत्र या आणि अशा भोंदूंचे बुरखे फाडा. इतरांनाही सावध करा.-डॉ. अनुपमा साळगांवकर-नेरुरकर

सापळ्यात किती अडकावं?

शुभदा चंद्रचूड यांचा ‘समाजमाध्यमांचा मोहमयी सापळा’ (२ मे) हा लेख वाचला. काही वर्षांपूर्वी यूट्यूबच्या माजी प्रमुख सुसान योकिकी (Wojcicki) यांनी, ‘‘माझा खरा प्रतिस्पर्धी, मानवाची झोप हा आहे,’’ असं एक विधान केल्याचं आठवतं. म्हणजे, तुमच्या व्यावसायिक यशाकरिता मानवाच्या खासगी अवकाशावर घाला घालायचा? बरं, ‘यूट्यूब’,‘फेसबूक’ वगैरेंच्या वापरकर्त्यांची संख्या लक्षात घेता त्यांना न्यायालयात खेचणार्यांची संख्या हाताच्या बोटावरील ठरावी हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. भारतासारख्या देशांत समाजमाध्यमांची व्यसनाधीनता अगणित… समाजमाध्यमांतून जनतेवर ताबा मिळविल्यास राजकीय सत्तादेखील मिळवता येते हे आणखी एक वास्तव ती हाताळणार्यांना पूर्णत: समजलेलं दिसतंय, तेव्हा अशा देशात खटले, न्याय वगैरे गोष्टी अशक्यच. समाजमाध्यमांच्या मोहमयी सापळ्यात किती अडकावं याचं भान जनतेनं राखणंच महत्त्वाचं.-शैलेश न. पुरोहित, मुलुंड