‘मला खात्री आहे म्हणून..’

 'मला वाटलं म्हणून' हा नीलिमा किराणे यांचा १८ ऑक्टोबरचा लेख नराश्यवादी जीवनाचे कोडे उलगडणारा होता. 'मला वाटलं..' असा विचार करून स्वत:ला कधीही गौण लेखू नये. उलट स्वत:च्या मर्यादांचा स्वीकार करणे हीच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. अनेक वेळा नियती आपली कसोटी …

 ‘मला वाटलं म्हणून’ हा नीलिमा किराणे यांचा १८ ऑक्टोबरचा लेख नराश्यवादी जीवनाचे कोडे उलगडणारा होता. ‘मला वाटलं..’ असा विचार करून स्वत:ला कधीही गौण लेखू नये. उलट स्वत:च्या मर्यादांचा स्वीकार करणे हीच सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. अनेक वेळा नियती ch13आपली कसोटी बघत असते, पण हीच वेळ असते धीराने वागण्याची. आज अनेक जोडपी केवळ विनाअपत्य असल्यामुळे निराशेत जीवन व्यतीत करीत असतात. या कमतरतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर आनंदी जीवन जगता येते. परेल येथील शिरोडकर हायस्कूलच्या जुन्या काळातील माझ्या शिक्षिका विजया वैद्य यांचे नुकतेच निधन झाले. वांद्रे येथे त्यांच्या शोकसभेला गेलो असताना १० वष्रे अमेरिकेत व गेली पाच वष्रे हैदराबाद येथे नोकरीनिमित्त वास्तव्य करीत असलेल्या त्यांच्या मुलाची भेट झाली. बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, , My Mother was my child  मला प्रथम या वाक्याचा अर्थ समजला नाही. मग स्वत:हून ते म्हणाले, ‘लग्नाला १६ वष्रे झाली पण आम्हाला अपत्य नाही. म्हणून आईलाच मी माझे मूल समजत होतो.’ खरेच ज्याच्या सोबतीला असे सुंदर विचार असतात तो स्वत:स कधी एकटा समजत नाही. यशाला नेणारी वाट आपली आपणच शोधली पाहिजे. अन्यथा निराशामय जीवन पदरी आहेच. आपले तर्क, विचार, मते, संकल्प स्वत:ही ऐकू नये व दुसऱ्यासही ऐकवू नये. आपले ‘स्वरूप’ मग ते कसेही असो, परमेश्वराची देणगी आहे, ते आधी पाहा, नंतर ‘विश्वरूप’ हा विनोबा भावे यांचा सुविचार प्रमाण मानला तर आलेला प्रत्येक क्षण उत्साही वाटेल. कदाचित स्वत:साठी असलेले ‘एव्हरेस्ट’ शिखर तेच असेल जे गाठण्यासाठी ‘मला वाटलं म्हणून’ नव्हे तर ‘मला खात्री आहे म्हणून’ पावले उचलली जातील.
-सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व)

एक विलक्षण मैत्र
२ ऑगस्टच्या ‘चतुरंग’ पुरवणीमधील ‘ल्हादिनी’ हा लेख रवींद्रनाथ टागोरभक्तांना खूपच भावणारा होता. रवींद्रनाथ साहित्य आणि संगीत या पायांवरच जीवननौका वल्हवीत होते. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक विलोभनीय रहस्य होतं ते म्हणजे कादंबरीदेवी यांचं. ती रवींद्रनाथांचे थोरले बंधू ज्योतिरींद्रनाथ यांची पत्नी. रवींद्रनाथांचं साहित्यिक व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांचं मोठंच योगदान होतं. ते स्वत: नाटय़निर्मितीत रस घेणारे होते. पियानोवर ते नवनव्या सुरावटी बनवत तेव्हा रवींद्र त्यांच्याजवळ बसून त्या त्या सुरावटींना शब्दांची साथ देण्याचा प्रयत्न करीत. त्यामुळेच आपल्या गीतरचनेचं खरं शिक्षण सुरू झालं असं रवींद्रनाथांनी म्हटलं आहे. कादंबरीदेवी ही या त्यांच्या साहित्यनिर्मितीची साथीदार होती, असं रवींद्रनाथांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्या उभयतात एक वेगळंच ‘मैत्र’ निर्माण झालं. त्यांच्यात साहित्य चर्चा होई, तसेच वादविवादही होत. अर्थात साहित्य विषयांवरूनच! दीर-भावजयीची ही ‘जवळीक’ टागोर कुटुंबात, विशेषत: घरातील स्त्रियांमध्ये टीकेचा, कुचेष्टेचा विषय होई. पुढे रवींद्रनाथांचा विवाह झाला तेव्हा या कादंबरीदेवींना आपण ‘एकाकी’ पडू अशी काहीशी भावना निर्माण झाली. आपण एकटय़ा पडणार ही चिंता त्यांना सतावू लागली. या वैफल्यग्रस्त अवस्थेतच त्यांनी आत्महत्या केली. तिचा उल्लेखही घराण्याच्या नोंदींमध्ये राहू दिला नाही. या घडामोडींमुळे ज्योतिरींद्रनाथ आणि रवींद्रनाथ यांच्यातील बंधुभाव संपला, मैत्र नष्ट झालं. इतकं की, रवींद्रनाथांना १९१३ मध्ये ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा ज्योतिरींद्रनाथांनी त्यांना अभिनंदनाचं पत्र पाठवलं, पण रवींद्रनाथांनी त्या पत्राला उत्तरही पाठविलं नाही.
मात्र टागोरांनी आपली मनोवेदना व्यक्त केली ती ‘नष्टनीर’ ही कथा लिहून! त्यांच्या या कथेवरच ‘चारुलता’ हा चित्रपट पुढे सत्यजीत रॉय यांनी निर्माण केला. ‘नष्टनीर’ म्हणजे उद्ध्वस्त झालेलं घरटं! टागोरांच्या जीवनातील एका वेगळ्याच ‘ल्हादिनी’चं मनोज्ञ दर्शन त्यातून होतं. टागोरांच्या जीवनातलं ते एक विलक्षण मैत्र होतं. अगदी अनोखे!
-अविनाश टिळक, सांगली

‘स्त्री-पुरुष समानते’चा नवा आयाम
‘तिचा वारसाहक्क’ हा २० सप्टेंबरच्या अंकातील अ‍ॅड्. नीलिमा कानेटकरलिखित लेख फार भावला. समर्पक वाटला.
ch14स्त्रीला वडिलोपार्जित मालमत्तेत अधिकार मिळावा एवढाच या कायद्याचा उद्देश नसून, मुलगी एकदा सासरी गेली की, तिच्यासाठी माहेर संपलं हा विचार गाडून टाकण्यासाठी हा कायदा आहे, तसेच मुलगी ही सासरी व माहेरी अशा दोन्ही घरांत दिवा लावते म्हणजेच दोन्ही घरांत आर्थिक, भावनिक, मानसिक आधार देते हे जोपासण्यासाठी आहे तसेच मुलगी आज ना उद्या सासरी जाणारच आहे तिच्यासाठी खर्च करून काय उपयोग हा विचार संपविण्यासाठी आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी आहे हे मुद्दे लेखिकेने समर्पकपणे मांडले त्याबद्दल धन्यवाद.
फक्त या संदर्भातील एकच बाब खटकते ती म्हणजे घर अथवा जमीन मृत आई-वडिलांकडून हस्तांतरित करताना ती एकाच व्यक्तीच्या नावे हस्तांतरित करता येईल बाकीच्यांची (भावा-बहिणींची) ना हरकत प्रमाणपत्रे आणा हा सरकारी संस्थांचा आग्रह अनाकलनीय वाटतो. जर इतर भाऊ-बहीण ना हरकत प्रमाणपत्रे देण्यास मनापासून तयार नसतील तर हस्तांतरणाचे भिजत घोंगडे ठेवण्यापेक्षा सर्व वारसदारांची नावे नोंदण्यात यावीत. फक्त एकाच नगरपालिकेच्या हद्दीत, एकाच व्यक्तीच्या नावे दोन किंवा जास्त घरे होतील या नियमाचा अभ्यास करावा लागेल.
-हेमंत पराडकर, मुंबई

..ती घालमेल शब्दात व्यक्त करणे अशक्य
 आम्ही ‘चतुरंग’ची चातक पक्ष्यासारखी वाट पाहत असतो. ‘चतुरंग’ चौरस माहिती  देतो व जगात कसे जगायचे ते दाखवितो.
६ सप्टेंबरच्या अंकातील ‘आजची स्त्री व अपराधभाव’ हे संकलन असंख्य महिला-भगिनींचे चतुरस्र जीवन, धडपड, खटपट, एकदा नाही अनेकदा वाचली व मनाची जी अवस्था झाली ती घालमेल मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. कुठेही सासुरवास अथवा नरप्रवृत्तीवर टीका केली नाही हे कौतुकास्पद आहे. या विधानाला सर्व थरांतून अमेरिकेपासून ते दिल्ली व संपूर्ण महाराष्ट्राचा प्रतिसाद पाहून ‘लोकसत्ता’चे अभिनंदन. माझे मन अभिमानाने भरून आले.
दूरदर्शनच्या रटाळ व नाठाळ मालिका आता पाहवत नाहीत. सासू-सून सासुरवास, भाऊबंदकी हे आता जुने झाले आहे. मला वाटते दूरदर्शनने या महिलांच्या खडतर जीवनावर मालिका बनवाव्यात व समाज सुधारावा.
-अशोक बुटाला, मुंबई

महर्षी कर्वेंचे ऋण शब्दातीत
२६ जुलैच्या चतुरंगमधील ‘एसएनडीटी एक अश्वत्थ’ हा लेख फार आवडला. आजच्या काळातील सोयी-सुविधांचा,प्रगत तंत्रज्ञानाचा आम्ही सुशिक्षित स्त्रिया पुरेपूर आस्वाद घेऊ शकतो. याला एकमेव कारण आहेत महर्षी कर्वे आणि त्यांच्या सारखेच इतर अनेक समाजधुरीण, ज्यांनी काळाच्या कित्येक वर्षे पुढे जाऊन स्त्रियांच्या शिक्षणाचा विषय ऐरणीवर घेऊन सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. या कामी अनंत अडचणी आल्या तरी ते आपल्या मतांवर ठाम राहिले म्हणूनच लेखात उल्लेखलेल्या महिलांप्रमाणेच आणखी कितीतरी स्त्रिया आपली स्वत:ची अशी खास ओळख समाजाला देऊ शकल्या.
मी स्वत: महर्षी कर्वे यांची अत्यंत ऋणी आहे. कारण मला वारसा मिळाला तो माझ्या तीन आत्यांचा. तिघीही पदवीधर. आम्ही पडळकर मूळ कोल्हापूरचे. परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना पुण्याला येऊन वसतिगृहात राहून, एक आत्या फग्र्युसनमधून बी.ए. आणि माझ्या दोन आत्या जी.ए. (गृहितागमा) झाल्या. ‘लोकसत्ता’मध्ये १९३५चा दीक्षान्त समारंभाचा जो फोटो दिला आहे त्याच सुमारास माझ्या या आत्या पुण्यात येऊन शिकल्या आणि त्या काळात शिक्षणानंतर एकेकटय़ा परगावी राहून त्यांनी नोकऱ्याही केल्या. हे शक्य झाले केवळ महर्षी कर्वे यांच्या कॉलेज काढण्याच्या निर्णयामुळेच. एवढेच नव्हे तर महर्षी कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन समविचारांच्या ४-५ शिक्षकांबरोबर सांगलीच्या राणीसाहेबांच्या पाठिंब्याने तिने सांगलीत १९३३ साली राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा सुरू केली. त्या संस्थेचाही वटवृक्ष झाला आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या माजी विद्यार्थिनी त्या शाळेच्या उत्कर्षांसाठी झटताहेत. ही माझी आत्या श्रीमती मनुताई पडळकर व दुसरी आत्या कमलताई पडळकर या दोघी आजन्म अविवाहित राहिल्या व त्यांनी पूर्णपणे शाळेलाच वाहून घेतले होते. आज सत्तरीच्याही पुढे असलेल्या त्यांच्या माजी विद्यार्थिनी त्यांची आदराने आठवण काढतात. एमपी, केपी या नावाने त्या शाळेत प्रसिद्ध होत्या. तिसरी आत्या लग्न करून गृहिणी झाली, पण शिक्षणामुळे तिचेही विचार खूपच पुढारलेले आणि प्रगल्भ होते.
अशा या आमच्या आत्यांकडे पाहातच आम्ही भावंडे मोठी झालो. मी राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेतून एसएससी झाले. माझ्या वडिलांची नोकरी खेडेगावात असल्याने माझ्याही कॉलेज शिक्षणाचा प्रश्न आला. वडिलांची परिस्थितीही बिकटच, पण तरीही मुलींना शिकवलेच पाहिजे हा ठाम निश्चय. आत्यांच्या सल्ल्याने मीही पुण्यात ना. दा. ठाकरसी महाविद्यालयातून हॉस्टेलला राहूनच १९६३ साली बी.ए. झाले.  मुख्य विषय मानसशास्त्र घेऊन मी युनिव्हर्सिटीत त्या विषयात पहिली आले. शिक्षणामुळे आपली प्रगती तर होतेच, पण आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहाण्याचा, तिचे आकलन करण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन तयार होतो. शिवाय घरापासून दूर हॉस्टेलवर राहिल्यानेही खूपच फायदा होतो. बरोबरीच्या मुलींशी जुळवून घ्यावे लागते, आपण स्वावलंबी होतो, स्वतंत्र विचार करायला शिकतो, या साऱ्याचा फायदा मला माझ्या पुढील आयुष्यात निश्चितच झाला.
– हेमा कळके, शिवाजी पार्क

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers response on chaturang article