डॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘संतसंग’ या सदरातील ‘तेरा साहब है घर माँ ही’ (२५ एप्रिल) या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला, यातील ‘.माँ ही’ या शब्दामुळे थोडा अर्थदोष निर्माण झाला आहे. संत कबीराचे हे पद ‘ तेरा साहब है घर माही’ असे आहे. कबीराच्या दोह्य़ांमध्ये अनेकदा ‘माही’ हा शब्द आला असून त्याचा अर्थ ‘मध्ये’ असा आहे. जसे- जैसे घर घर राम है, जग ढुँढे बन माही।
    -डॉ. शारदा तुंगार, नांदेड

ध्येयवेडय़ा ‘विदुषी’ आनंदीबाई
‘आहुती’ हा मधुवंती सप्रे यांचा लेख ( २८ मार्च) वाचला. मनाला चटका लावून जाणारा व बराच वेळ मनामध्ये हुरहुर निर्माण करणारा लेख होता. अशा किती स्त्रिया या समाजव्यवस्थेच्या बळी ठरल्या असतील किंवा अजूनही ठरत आहेत? स्त्री नेहमीच या व्यवस्थेची शिकार ठरली आहे. तरी आहे त्या वर्तुळात राहून काहीतरी करून दाखविण्याची तिची जिद्द, एक पाय या व्यवस्थेशी घट्ट बांधूनही धावण्याची धडपड आपापल्या परीने स्त्री करताना दिसते. आनंदीबाईंनी ज्ञानसाधना केल्यानंतर, पुरेसे ज्ञानाचे उपयोजनही करण्याची संधी न मिळताच जीवन प्रवास संपवण्याची वेळ यावी, म्हणून ही ध्येयवेडी ‘विदुषी’ मला संत ज्ञानेश्वरांसारखी वाटते. ज्ञानेश्वरांनी कार्यसिद्धीनंतर स्वखुशीने संजीवन समाधी घेतली. आनंदीबाईंनी मात्र सगळे नकार पोटात पचवून व्यवस्थेच्या अग्नीकुंडात ‘आहुती’ दिली, अवघ्या २२ व्या वर्षांत..
    -तोष्णा मोकडे, यवतमाळ</strong>

जादव यांच्या निष्ठेला सलाम
‘जंगल वसवणारा माणूस’ (२१ मार्च) हा अंजली श्रोत्रीय यांचा जादव पायेंग यांच्या अजोड कामगिरीवरचा लेख वाचला. जादव यांच्या निष्ठेला सलाम. जे लोक काम करण्यापूर्वी अडचणींचे गुणगान गातात, चांगले काम करण्याची इच्छा असूनही काही बाधा आली तर प्रयत्न सोडतात व असे मोठे सामाजिक काम असेल तर स्वत: काही न करता सर्व काही सरकारने करावे अशी इच्छा करतात, अशा सर्वाना जादव यांचे उदाहरण म्हणजे एक धडा आहे. कुणाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता स्वत:च जग बदलू शकतो ही त्यांची वृत्ती खरोखर आदर्शवत आहे.
    -विश्वजीत, दिल्ली