अर्चना जगदीश
उद्या प्लास्टिक पिशवीमुक्त दिन. असा दिन पाळावा लागतो, कारण आजही लोक प्लास्टिकच्या भस्मासुराकडे म्हणावं तितकं गांभीर्याने पाहात नाहीत. दरवर्षी समुद्रात येणाऱ्या ३० कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली गेली नाही तर २०५० पर्यंत पृथ्वीवरच्या समुद्रांमध्ये मासे आणि इतर जीवांपेक्षा प्लास्टिकच जास्त असेल. ज्याचा गंभीर परिणाम निसर्गावर आणि पर्यायाने मानवावर होऊ शकतो. आज अनेक जण चहा किंवा खाण्याचे गरम पदार्थ प्लास्टिक पिशवीतून आणतात. यातून पोटात जाणारे अतिसूक्ष्म प्लास्टिक आरोग्याला अत्यंत अपायकारक ठरतं. प्लास्टिकला आणि प्लास्टिक पिशवीला नकार हाच आरोग्यदायी आयुष्याचा मार्ग आहे. उद्याच्या (३ जुलै) आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिनानिमित्तानं सर्वानाच हे आवाहन..

रायगड जिल्ह्यातल्या हाशिवरे गावाजवळ अंबा नदीला मिळणारी एक छोटी खाडी.. या खाडीत आजूबाजूला कांदळवन असले तरी प्रचंड कचरा होता. मुख्यत: एकदाच वापरल्या जाणाऱ्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या. हे प्लास्टिक इथे असेच साठत राहिले तर कांदळवन म्हणजे मॅन्ग्रूव्हज नाहीसे होणार हे सांगायला संशोधनाची गरज नव्हती. कृती तर करायला हवीच होती, मग आमचे स्वयंसेवक आणि गावकरी यांच्या मदतीने ८०० मीटर रुंदीचा नाला आणि कांदळवनांच्या परिसरातून प्लास्टिक गोळा करायला सुरुवात केली. दिवसभरात एक टन प्लास्टिक गोळा झाले..

kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
in pune Gavathi liquor making in Nursery
पुण्यातील रोपवाटिकेत गावठी दारूचा अड्डा
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

हे काम खूपच दमवणारे होते, परंतु पुढचा संभाव्य धोका लक्षात घेऊन काम तर करायला हवेच होते. मग गावातल्या काही बेरोजगारांना हाताशी धरले. ते दिवसाचा मोबदला घेऊन आमच्या बरोबर हे काम करायला तयार झाले, आठवडाभरात हे पाच लोक आणि आमच्या सहा जणांच्या टीमने १२ टन प्लास्टिक कचरा गोळा केला. तो अलिबाग नगर परिषदेकडे स्वखर्चाने सुपूर्द केला. पण महिन्या दोन महिन्यांनी बघितलं तर पुन्हा कचरा जमा झाला होताच. दुसरे म्हणजे गावातल्या लोकांना कचरा गोळा करणे हे रोजगाराचे साधन वाटायला लागलं. अर्थातच आम्हाला ते सुरू ठेवणे मान्य नव्हते. अलिबाग हे मुंबईजवळच्या समुद्रकिनाऱ्यावरचे नितांतसुंदर पर्यटनस्थळ आहे, इथे भारतातल्या सर्व क्षेत्रातल्या उच्चपदस्थांचे बंगले आणि जमिनी आहेत. पण इथल्या प्लास्टिक प्रदूषण आणि कचऱ्याबद्दल काम करायला कुणी फारसे पुढे येताना दिसत नाही. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. भारतातल्या निरनिराळय़ा पर्यटनस्थळांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. आज अनेक कंपन्या आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव या कार्यक्रमांतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करताना दिसतात. पण खरेच स्वयंसेवा म्हणून दुसऱ्यांनी केलेला कचरा उचलणे किती बरोबर आहे? मुळातच समुद्रात कचरा येणारच नाही यासाठी प्रचंड काम करावे लागणार आहे. त्यासाठी उपयोगी ठरू शकतात ते ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त’ सारखे दिवस. उद्या, ३ जुलैला हा दिवस साजरा केला जाणार असून जाणीव जागृतीसाठी समाजाला तयार करण्याचे प्रयत्न या दिवशी नक्कीच होतील.

खरेतर, प्लास्टिकचा भस्मासुर आपल्या आयुष्यात चोरपावलांनी प्रवेश करता झाला तो सत्तरच्या दशकात. सुरुवातीला अतिशय उपयोगी वाटणाऱ्या प्लास्टिक या पदार्थाचा शोध खरे तर अपघातानेच लागला तो १९३३ मध्ये. इंग्लंडमधल्या नॉर्थवेस्टच्या एका रसायनांच्या कारखान्यात. याची उपयुक्तता लक्षात आली, तरी सुरुवातीला या नव्या रसायनाचे उत्पादन त्यामानाने मर्यादित होते. या पदार्थाचा वापर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्य गुप्तपणे करत असे. मात्र याचे अनंत उपयोग असल्यामुळे आणि वापरायला सोपे आणि अतिशय हलके असल्यामुळे या नव्या रासायनिक पदार्थाचा वापर पुढे अनेक ठिकाणी होऊ लागला.

‘सेलोप्लास्ट’ या स्वीडिश कंपनीतील स्टेन गुस्टाफ तुलीन या इंजिनीयरने १९६५ मध्ये सर्वप्रथम प्लास्टिकची साधी सोपी वापरता येईल अशी पिशवी तयार केली. या नव्या उत्पादनामुळे युरोपमध्ये कापडी पिशव्या मागे पडायला लागल्या आणि प्लास्टिक पिशव्यांची मागणी वाढत गेली. युरोपातील पिशव्यांची ७०-८० टक्के बाजारपेठ काबीज केल्यानंतर हा अद्भुत पदार्थ वा ‘वंडर मटेरियल’ आणि पिशव्या १९७९ मध्ये अमेरिकेत पोहोचल्या. अमेरिकेत तेव्हापासून ‘प्लास्टिक इज फँटॅस्टिक’ हे ग्राहकांचे ब्रीदवाक्य बनले. कारण रोजच्या किराणा मालापासून द्रव पदार्थासाठी या पिशव्या म्हणजे वरदान ठरले. तेव्हापासून हे प्लास्टिक आणि मुख्यत: या पिशव्या जगभरात सर्वत्र सहज उपलब्ध होऊ लागल्या, मात्र या पिशव्या हाच आज जगासमोरचा सगळय़ात मोठा पर्यावरणाचा प्रश्न बनला आहे.

तयार झालेल्या प्लास्टिकच्या प्रत्येक पातळ पिशवीचा उपयोग सहसा एकदाच व्हावा आणि तोही सरासरी २०-२५ मिनिटांच्या वर नाही, हे संशोधनाने दाखवून दिले आहे. प्लास्टिकच्या पिशव्या कितीही उपयोगी असल्या तरीही प्लास्टिक कचऱ्याचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नाही. कारण प्लास्टिकमधल्या रसायनांचे विघटन व्हायला ७०० ते १००० वर्षे लागतात. अर्थातच अशा कचऱ्याचा निसर्गावर, माणसावर आणि सर्व जैवविविधतेवर दुष्परिणाम होतो. सागरी कासवे आणि डॉल्फिन, व्हेलसारखे महाकाय जीवही प्लास्टिक कचऱ्याचे बळी ठरतात. मग व्हेलच्या पोटात टनावारी प्लास्टिक आढळले, सागरी कासवांना महाकाय प्लास्टिक जाळय़ांनी वेढून टाकले, अशा बातम्या लक्ष वेधून घेत असल्या तरी त्यावर उपाय काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. १९९५ मध्ये चार्ल्स मूर या संशोधकाला प्रशांत महासागरात फिरताना प्रचंड मोठा कचऱ्याचा ढीग आढळला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने प्लास्टिकच्या भस्मासुराची आणि आपल्यासमोर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची जाणीव झाली. पुढे तर सर्व समुद्रांमध्ये ठिकठिकाणी असे महाकाय ढीग आहेत हे लक्षात आले. ‘युनो’च्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे केलेल्या संशोधनानुसार दरवर्षी
३० कोटी टन प्लास्टिक कचरा तयार होतो आणि हे वजन म्हणजे जवळपास सर्व मनुष्यप्राण्यांच्या एकत्रित वजनाएवढे आहे. या अहवालात असा इशारा दिला आहे, की या प्लास्टिकवर बंदी घातली नाही आणि आहे तो कचरा समुद्रातून नष्ट केला नाही तर २०५० पर्यंत पृथ्वीवरच्या समुद्रांमध्ये मासे आणि इतर जीवांपेक्षा प्लास्टिकचे अस्तित्व जास्त असेल आणि अर्थातच त्याचा माणसांच्या जगण्यावर, खाद्यपुरवठय़ावर परिणाम झाल्याशिवाय राहाणार नाही. समुद्रात जागोजागी अशा साठलेल्या ढिगांवर आणि त्यामुळे सागरी जीवनावर होणाऱ्या परिणामांवर खूप संशोधन झाले असून उपायांवर ऊहापोहही सुरू झाला आहे.

मुळात प्लास्टिक कचरा ही धोकादायक समस्या आहे हे लक्षात यायला दोन तीन दशके जावी लागली. मात्र त्यानंतर अशा वस्तूंच्या उत्पादनावर कायदेशीररीत्या बंदी आणण्यासारखे उपाय पाश्चिमात्य देशांत तसेच विकसनशील देशातही अवघड असतात, कारण अशा उत्पादनांमध्ये अनेक व्यावसायिक हितसंबंध असतात. शासनाला आणि राज्यकर्त्यांना ते जपायचेही असतात. म्हणूनच ग्राहकांना जागरूक करणे आणि अशा पदार्थाची मागणी कमी करणे हा उपाय जास्त परिणामकारक ठरू शकतो म्हणून अशा ‘प्लास्टिक मुक्त’ दिवसांचे महत्त्व. या दिवसाची सुरुवात Break Free from Plastic Movement या चळवळीतून २०१६ मध्ये झाली. पुढच्या दोन वर्षांतच १५०० पेक्षा जास्त संस्था या चळवळीत सहभागी झाल्या आणि प्लास्टिकपासून संरक्षण, प्लास्टिकला पर्याय आणि प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण यासारख्या गोष्टींवर काम करायला लागल्या. प्लास्टिकला पर्याय तयार करण्यासाठी जगभरात मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे, पण ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून प्लास्टिकऐवजी त्याचा वापर होण्यासाठी बराच काळ जाणार आहे.

प्लास्टिक पिशव्यांचे हे संकट लक्षात घेऊन सर्वप्रथम बांगलादेशने २००२ मध्ये पातळ प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली. कारण त्यांच्याकडे सर्व छोटय़ामोठय़ा ओढेनाले आणि नद्यांमध्ये प्लास्टिक कचरा अडकून लहानमोठे पूर येण्याचे प्रकार वाढले होते. दक्षिण आफ्रिका, रवांडा, चीन, ऑस्ट्रेलिया या देशांनीही अशा पिशव्यांवर तात्काळ बंदी आणून ती अमलात आणण्यासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले. आपल्याकडे मिठी नदीचे प्रदूषण आणि पावसाळय़ात येणाऱ्या पुराला अतिपातळ प्लास्टिकच्या पिशव्या जबाबदार आहेत ही वस्तुस्थिती आहे, पण लक्षात कोण घेतो?

भारतात १९९८ मध्येच २० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर सर्वप्रथम बंदी आणली ती सिक्कीम या छोटय़ाशा राज्याने. तर सप्टेंबर १९९९ मध्ये भारताने प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा कायदा मंजूर केला. पण ही बंदी संपूर्णपणे अमलात आलेली नाही. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने पिशव्यांवरच्या बंदीची अंमलबजावणी केली जाईल, असे जाहीर केले आहे. पण ते संपूर्णपणे अमलात आणले जाईल का, ते फक्त सरकारच नव्हे तर आपल्या सगळ्यांवर अवलंबून आहे, ती आपली जबाबदारी आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक- विशेषत: अतिसूक्ष्म प्लस्टिक आता आपल्या अन्न साखळीतही येऊ लागले आहे. पाण्याच्या स्रोतांमध्ये तर ते आहेच, पण त्याचे दुष्परिणाम आता संशोधनाने समोर येऊ लागले आहेत. हे अतिसूक्ष्म प्लास्टिक प्रमाणाबाहेर शरीरात साठून राहिले तर आरोग्यावर परिणाम होतो आणि कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण मिळते. पण तरीही पातळ पिशव्यांतून चहासारखी गरम पेये, हॉटेलमधले गरम पदार्थ सहज आणले जातात हे दुर्दैवी आहे. आपली आरोग्याबद्दलची अनास्था त्यातून दिसते. जागतिकीकरणाबरोबर पर्यटन व्यवसाय वाढतो आहे आणि त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याची समस्याही. यावर उपाय करणे, लोकांची मानसिकता बदलणे किंवा चुटकीसरशी तंत्रज्ञानावर आधारित उत्तर शोधणे खूप अवघड आहे.

आज वयाच्या पन्नाशीच्या आसपास असलेल्या अनेकांना लहानपणी प्लास्टिक नसतानाही काही अडत नव्हते हे आठवत असेल. २०१५ पर्यंत मोठय़ा परिषदांमध्येही प्रत्येकाला छोटय़ा प्लास्टिकच्या बाटल्या देण्याऐवजी मोठय़ा बाटल्या आणि ग्लासेस ठेवलेले असत. त्याआधी तर आपल्याकडे व्यासपीठावर तांब्याभांडे ठेवायची पद्धत होती, पण आता तीही इतिहासजमा झाली. आता परिषदा, सार्वजनिक कार्यक्रम, तसेच लग्न आदी समारंभांमध्ये छोटय़ा प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरल्या जातात. एखाद्या भाजीवाल्याने प्लास्टिक पिशवी द्यायला नकार दिला तर त्याच्याशी भांडणारे लोक नेहमी दिसतात.

आज असे चित्र एकीकडे असले तरी अनेक कंपन्या, संस्था प्लास्टिकला पर्याय शोधताना दिसतात. त्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्याबद्दल बाटलीमागे एक रुपया देऊन, त्या प्लास्टिकपासून इंधन म्हणजे डिझेल तयार करणे, प्लास्टिकचा वापर करून रस्ते तयार करणे अशा गोष्टी होऊ लागल्या आहेत. पण त्या पुरेशा नाहीत. आता विघटन होणाऱ्या प्लास्टिकची निर्मिती, रोबोद्वारे समुद्राच्या तळाशी असलेले प्लस्टिक गोळा करणे अशा उपायांवर विचार होतो आहे आणि प्रात्यक्षिके होताना दिसतात.

गरज आहे ती लोकांच्या, स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची. म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळणे, त्यातल्या त्यात एकदाच वापरल्या जाणाऱ्या पिशव्यांना नकार देणे. जगण्यासाठी प्लास्टिक अपरिहार्य आहे, या भावनेतून बाहेर येणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या घरी करता येण्यासारखा उपाय म्हणजे घरातला प्लास्टिकचा कचरा एक लिटर पाण्याच्या बाटलीत दाबून भरून साठवला तर त्यात अनेक पिशव्या,वेष्टने जमा होऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावता येते. कचरा गोळा करणाऱ्यांनाही ते सोयीचे जाऊ शकते. तसेच घरातला प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणे, तो ओल्या कचऱ्याबरोबर मिसळू न देणे, हे सुद्धा प्लास्टिक प्रदूषण आणि शेवटी त्यामुळे आपल्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी गरजेचे आहे. प्लास्टिक पिशवीमुक्त दिनीच नव्हे, तर रोजच प्लास्टिकचा वापर टाळायला हवा, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

(लेखिका गेली २७ र्वष पर्यावरण रक्षणाच्या कामात असून देवराया आणि जंगले वाचवणे, वाढवणे यासाठी त्यांनी ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रीसर्च फाउंडेशन’या संस्थेची स्थापना केली आहे.)
godboleaj@gmail. Com