सासू-सुनेचे जीवनप्रवाह भिन्नच असले पाहिजेत, असा काही नियम नाही. उलट प्रवाह भिन्न असूनही जर ते एकमेकांत मिसळले, तर आयुष्य अधिक सुसह्य़ होऊ शकेल.
‘अक्कणमाती, चिक्कणमाती, घर ते बांधावं
अस्सं घर सुरेख बाई..
अस्सं सासर सुरेख बाई..’
पूर्वीच्या या पारंपरिक गाण्यांप्रमाणं खूपशा गोष्टी आता कालबाह्य़ होत चालल्या आहेत. जसं सुट्टय़ा लागायचा अवकाश, मुलांचं मामाकडे, आजोळी राहायला जाणं, नातेवाईकांनी एकत्र येऊन सण साजरे करणं, एकमेकांना भेटी पाठविणं, मुलींना- बहिणींना माहेरपणासाठी घरी आणणं आणि त्यांनीही माहेरपणाचा आनंद उपभोगणं. त्यातही एकीकडे ‘माहेर’ भेटल्याचा आनंद, तर त्याच वेळी ‘तिकड’चा विरह आणि हुरहुर (गोड) अशा संमिश्र भावनांचा खेळ. सध्याच्या या अतिशय बिझी लाइफ शेडय़ुलमध्ये खरं तर अशा गोष्टींना जागाच राहिलेली नाहीये. कुटुंब-सहली कमी झाल्यात. लोकांशीच काय, पण घरातल्या घरातदेखील संवाद साधायला वेळ नाहीये आणि संवाद असलाच तरी तो ‘सु-संवाद’च असेल याची खात्री देता येणार नाही. एक तर विभक्त कुटुंबपद्धती झपाटय़ाने वाढत आहे. त्यातून आजच्या मुली जास्त शिकलेल्या, पर्यायानं स्वत:विषयी आणि करिअरविषयी अधिक जागरूक असलेल्या. त्यामुळे अस्सं ‘सासर सुरेख बाई वा अश्शी सासू सुरेख बाई’ म्हणण्याची वेळच येत नसावी (किंबहुना त्या स्वत:वर येऊ देत नसाव्यात.) उलट आपण कामावर गेल्यावर सासूनं घरची जबाबदारी पार पाडावी, अशीच कमावत्या सुनेची अपेक्षा असते, पण याला अपवाद असा एक अनुभव नुकताच आला.
मी मुंबईला गेले होते भाचीकडे, गेल्या महिन्यात. मी गेले त्या वेळी मुग्धा घरी नसणार हे गृहीत धरलं होतं. कारण मुग्धा म्हणजे माझी भाची एका नावाजलेल्या कंपनीत नोकरी करते, हे मला माहीत होते, पण तिच्या सासूबाई इतक्या बोलघेवडय़ा आणि प्रेमळ आहेत की, भाचीबाई घरात नसली तरी हक्कानं जाण्यासारखं घर होतं ते. ठाण्याला मुग्धाच्या घरी पोहोचल्यानंतर तिला घरात पाहून मला आश्चर्यमिश्रित आनंदाचा धक्का बसला. ‘अय्या! मावशी तू? आणि अशी अचानक? कळवायचं तरी होतंस. मी आले असते घ्यायला.’
‘अगं हो हो. मुद्दामच नाही कळवलं. एक तर तू ऑफिसात असणार असं वाटलं आणि दुसरं म्हणजे मी कुणी पाहुणी नव्हे घ्यायला यायला. हो न? बाय द वे, आज सुट्टी घेतलीस काय? घरी सापडलीस म्हणून विचारलं, पण तुला घरात बघून खरंच खूप छान वाटलं बघ.’
‘बस हं मावशी. मी तुझ्यासाठी चहा टाकते.’
तेवढय़ात मुग्धाच्या सासूबाई हसतमुखानं बाहेर आल्या. ‘अरे व्वा! सुधाताई, कसं काय येणं केलंत? घरी सगळं मजेत?’
मीही त्यांना वाकून नमस्कार करीत त्यांची खुशाली विचारली. ‘पण काही म्हणा काकू, मानलं पाहिजे हं तुम्हाला. तब्येत खूप छान सांभाळली आहे तुम्ही. म्हणूनच नेहमी एव्हरग्रीन वाटता. पहिल्यापेक्षा प्रसन्नही वाटता आहात.’
‘हा, त्याचं क्रेडिट मात्र आमच्या मुग्धाला बरं का.’
‘ते कसं काय बुवा? म्हणजे मुग्धा गुणी मुलगी आहे, प्रश्नच नाही, पण तुमच्या प्रसन्न राहण्याचा तिच्याशी संबंध कसा?’
‘आता ते तिलाच विचारा. मी जरा मंडईतून भाजी घेऊन येते. तोवर तुमच्या भाचीशी गप्पा मारा.’
‘काय गं मुग्धा! काय जादू केलीस सासूवर? फार कौतुकानं बोलत होत्या हो तुझ्याबद्दल.’
‘मावशी, त्या आहेतच खूप चांगल्या. आणि जादूबिदू कसली करते गं मावशी? थोडासा समंजसपणा दाखवलास इतकंच.’
म्हणजे काय केलंस नेमकं?
‘मी नोकरी सोडलेय मावशी.’
‘काय ऽऽऽ?’ मी तर चक्कउडालेच.
‘अगं, अशी काय ओरडतेस शॉक बसल्यासारखी? खरंच सांगते. मी अगदी विचारपूर्वक निर्णय घेऊन जॉब सोडलाय.’
 ‘पण कशासाठी मुग्धा? एवढी चांगली संधी तुला परत मिळणार आहे का?’
‘गेलेली संधी परत मिळविता येते गं; पण हातून निसटून गेलेले सुखाचे क्षण आणि निघून गेलेली वेळ कितीही प्रयत्न केले तरी नाही परत आणू शकत.’
‘असं कोडय़ात बोलू नकोस बाई. नीट स्पष्ट काय ते सांग.’
‘मावशी, आमच्या आई कितीही समंजस आणि शांत असल्या तरी त्याही एक माणूसच आहेत गं. इतके दिवस त्यांनी स्वत:चा संसार सांभाळला तेही समर्थपणे आणि आता, त्या आमचा संसार पेलण्याचा प्रयत्न करताहेत तेही कोणत्याही तक्रारीविना आणि अपेक्षेविना. हे त्यांचं मोठेपण आहे, पण त्याही आता थकायला लागल्या आहेत. बोलून दाखवत नसल्या तरी मला ते जाणवायचं गं. अगोदर नवऱ्यासाठी, मग मुलांसाठी, मग सुनांसाठी, नंतर नातवंडांसाठी हे चक्र कधी संपणारच नाही गं! पण ते थांबविणं पुढच्या पिढीच्या अर्थात आमच्या हातात आहे आणि त्यांच्याही काही अपेक्षा असतीलच की नाही नव्या पिढीकडून? काही सुप्त इच्छा असतील. बऱ्याचशा गोष्टी ज्या करायच्या राहून गेलेल्या असतील, त्या पूर्ण कराव्याशा वाटत असतील, त्यांनी तरी त्यांचं आयुष्य कधी जगायचं? शेवटी प्रत्येकाला स्वत:चं सुख शोधण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आयुष्यातील अनेक सुखाचे, आनंदाचे क्षण आपल्याच हृदयात दडलेले असतात आणि ते आपणच शोधून वेचून काढायचे असतात. दुसऱ्याला आनंद देण्याइतका निर्मळ आनंद खरंच नाही गं मावशी आणि माहेरी असताना आपण आई-बाबांची काळजी घेतोच ना? त्यांच्या भावनांचा विचार करतोच ना? मग सासरी आल्यावर या नव्या आई-बाबांच्या मनाचा विचार करायला नको? आणि तेही आपल्याला इतकं समजून घेणाऱ्या? थोडा मीपणा, माझं, माझ्यापुरतं असा स्वार्थी विचार बाजूला ठेवून प्रसंगी स्वत:कडे नमतं घेण्याची वेळ आली तरी ती घेऊन वागण्यानं समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि जीवनात आपण हास्य फुलवू शकत असू तर जीवनाचं सार्थकच होईल. आजपर्यंत मला इतक्या तीव्रतेनं कधी जाणवलं नव्हतं. कारण मी माझ्या जॉबमध्ये, करिअरमध्ये इतकी व्यस्त झाले होते की, त्यापुढे आईंची होणारी धावपळ, त्यांच्या जिवाची ओढाताण मी चक्क नजरेआड करीत होते, पण मी जेव्हा त्यांच्या जागी स्वत:ला कल्पून विचार केला तेव्हा मात्र मनोमन निश्चय केला अन् क्षणाचाही विचार न करता राजीनामा देऊन मोकळी झाले. तूच सांग मावशी, मी काही चुकीचा निर्णय घेतला का गं?’
अजिबात नाही मुग्धा. उलट मला तुझा खूप अभिमान वाटतो आहे. सासू-सुनेचे जीवनप्रवाह भिन्नच असले पाहिजेत, असा काही नियम नाही. उलट प्रवाह भिन्न असूनही जर ते एकमेकांत मिसळले, तर आयुष्य अधिक सुसह्य़ होऊ शकेल.’