नातं आजी-आजोबांचं!

बाळाची आजारपणं, आई-बाबांचा कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी प्रवास किंवा अचानक उद्भवलेलं ऑफिसचं महत्त्वाचं काम.

बाळाची आजारपणं, आई-बाबांचा कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी प्रवास किंवा अचानक उद्भवलेलं ऑफिसचं महत्त्वाचं काम. अशा गरजेच्या वेळी आजी-आजोबांनी बाळासाठी उपलब्ध असणं हे आई-बाबांना केवढा आधार देऊन जातं. आपण केलेल्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करणं हे मात्र अगदी टाळलं पाहिजे. त्यामुळे आपली मुलं दुखावली जातात. ती एरवी आपलं पालकत्व किती चांगलं निभावताहेत हे तुम्ही त्यांना कधी सांगितलं का? आई-बाबा झाले तरी त्यांना अजूनही त्यांच्या आई-बाबांकडून पाठीवर कौतुकाची थाप हवी असतेच.
‘सुजाण पालकत्व’साठी मी लिहिलेला हा शेवटचा लेख. गेल्या वर्षी मी एका गोडुल्याची आजी झाले – आयुष्यात पहिल्यांदा. त्यामुळेच ही लेखमाला अगदी खास उतरली. कोवळ्या आई-बाबांनो, आजचा हा लेख जेवढा तुमच्यासाठी तेवढाच तुमच्या आई-बाबांसाठी आहे.
आई-बाबा होणं ही आयुष्यातली अत्यंत आनंदाची गोष्ट आहेच, पण आजी-आजोबा होणं ही त्यापुढची पायरी- दुधात साखर, सोन्याला सुगंध! त्या चिमुकल्यावर आपण फक्त प्रेम करायचं आहे. निखळ, शुद्ध प्रेम. अटीविना प्रेम. त्याला शिस्त लावण्याचं काम आपलं नाही की त्याच्या पोषण-शिक्षणाची जबाबदारी आपली नाही. आपलं काम आहे त्याच्या आई-बाबांना आधार-दिलासा देण्याचं. आपल्या अनुभवाचा फायदा करून देण्याचं, जमेल तेव्हा जमेल तितका त्यांचा ताण हलका करण्याचं आणि कणाकणानं वाढणाऱ्या त्या चैतन्याला पाहून स्वत: ताजं टवटवीत राहण्याचं.
शहरी जीवनातलं एक कठोर वास्तव म्हणजे दिवसभर कामात बुडालेले आणि घरी आल्यावर बाळाच्या गरजा भागवताना मेटाकुटीला आलेले आई-बाबा. त्यांना गरज असते थोडय़ाफार मदतीची. बाळाला मोठं करताना आजी-आजोबांची भूमिका नेमकी काय असावी, या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लहानपणीच्या ज्या स्मृती आहेत त्यावर अवलंबून आहे. माझ्या आई-वडिलांनी मला जशी वागणूक दिली तसं माझ्या मुलांना मी कधी वागवणार नाही, असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? कडक शिस्तीचा बडगा सदैव उगारणं किंवा अतिशय ढिसाळ वागून मुलांना हवं ते करायला मोकळीक देणं ही दोन्ही टोकाच्या पालकत्वाची उदाहरणं आहेत. याउलट तुमच्या बालपणाच्या मधुर स्मृती तुमच्या मनात सतत रुंजी घालत असतील, तर तुमच्या लाडक्यालाही असंच बालपण मिळावं असं तुम्हाला नक्कीच वाटेल, यात शंका नाही.
घरातच आजी-आजोबा असतील, तर त्यांचं  बाळाबरोबरचं नातं नैसर्गिकपणेच उमलत जातं. आई-बाबा कामावर गेल्यावर त्यांच्याच देखभालीखाली बाळ वाढत असतं. त्याच गावात जवळच राहणारे आजी-आजोबासुद्धा दिवसाचा ठरावीक वेळ बाळासाठी देतात. तेवढय़ापुरतं पालकत्व निभावतात. हे काम त्यांनी आनंदानं स्वीकारलंय का, ही गोष्ट आई-बाबांना माहिती असणं आवश्यक आहे. बाळाच्या संगोपनासाठी आजी-आजोबा नेमका किती वेळ देऊ शकतील, कायकाय करू  शकतील याची चर्चा मोकळेपणाने झाली नाही, तर उगीचच धुसफूस वाढते, संघर्ष वाढतो. आजी-आजोबांचा दृष्टिकोन पारंपरिक असतो, त्यात त्यांच्या अनुभवाचे रंग मिसळलेले असतात, तर आई-बाबांची मते त्यांचे डॉक्टर, समवयस्क मित्रमंडळी, पुस्तकं आणि इंटरनेट यावर आधारित असतात. बाळाचं खाणं-पिणं, स्वच्छता, औषधं, सवयी याविषयीच्या आई-बाबांच्या कल्पना अत्याधुनिक शास्त्रीय माहितीवर आधारलेल्या असतात.
या नव्या कल्पना समजून घेणं, त्यांचा आदर करणं हे आजी-आजोबांसाठी गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही प्रेमळ आणि अनुभवी श्रोता असता. विचारल्याशिवाय सल्ला किंवा उपदेश हे दोन्ही टाळलेलं चांगलं. खरंतर दोन्ही पिढय़ांनी जुनं ते सोनं किंवा नवं तेच हवं हे अट्टहास टाळले तर संघर्ष कमी होतील. शेवटी बाळ कोणाचं, हा मुद्दा महत्त्वाचा. आजी-आजोबांनीही तरुण असताना बाळासंबंधी अनेक निर्णय स्वत: विचार करून घेतले होते, याची आठवण ठेवली पाहिजे. बाळाला अजिबात चॉकलेट, गोळ्या द्यायच्या नाहीत, त्याला घेऊन टीव्हीसमोर बसायचं नाही, ताटलीतले शेवटचे घास चिऊकाऊचे म्हणून टाकू द्यायचे नाहीत, असं आईला वाटत असतं तर आजी बऱ्याचदा हे नियम धाब्यावर बसवते असं दिसून येतं.
बाळाला काय खाऊ द्यावा, कोणती खेळणी किंवा इतर वस्तू द्याव्यात या गोष्टी त्याच्या आई-बाबांना विचारून केल्या तर चांगलं. पालकत्वाच्या त्यांच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.
बाळ थोडं मोठं झालं की त्याच्या खोडय़ा वाढतात. नासधूस, सांडलवंड सुरू होते. आपली कृती आणि तिचा परिणाम याचा संबंध आहे हे त्याला अजून कळत नसतं. अमुक केलं की इजा होते ही जाणीव अजून यायची असते. अशा वेळी आई-बाबा रागवायला लागले, शिस्त लावायला लागले तर त्या प्रसंगी आजी-आजोबांनी शांतच राहायला पाहिजे. मुसमुसणाऱ्या बाळाला नंतर जवळ घ्यावं, शांत करावं, पण त्याच्यासमोर त्याच्या आई-बाबांशी वाद घालू नये, त्यांच्या पालकत्वाचा हक्क अबाधितच राहिला पाहिजे. आई-बाबांनीसुद्धा बाळ आजी-आजोबांना चिकटतंय म्हणून नाराज होऊ नये किंवा मत्सर वाटून घेऊ नये. शेवटी बाळाच्या जगात आई-बाबांची जागा दुसरं कोण घेऊ शकेल?
आजी-आजोबा म्हणजे थकले-भागलेले, तब्येतीच्या असंख्य तक्रारी सांगणारे हे दृश्य आता विसरा. आजचे आजी-आजोबा जास्त तरुण दिसणारे, उत्साही आणि कार्यक्षम आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण अजून कामही करीत आहेत. अशा आजच्या आजी-आजोबांचा दिनक्रमही अगदी आखीवरेखीव असतो. त्यांचा व्यायाम, छंद, पर्यटन, सगळं व्यवस्थित चालू असतं. पण प्रश्न आहे मुलांसाठी, नातवंडांसाठी वेळ काढण्याचा. एक किंवा दोन मुलांच्या या काळात आपल्या मुलांना त्यांची बाळं सांभाळण्यासाठी आपण खूप काही करू शकतो, हे समजून घेण्याचा. त्यानुसार स्वत:च्या आयुष्यातला वेळ मुद्दाम बाजूला काढण्याचा.
अशा वेळा म्हणजे बाळंतपणाच्या आधी आणि नंतरचा काळ (काही महिने). बाळाची आजारपणं, आई-बाबांचा कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी प्रवास किंवा अचानक उद्भवलेलं ऑफिसचं महत्त्वाचं काम. अशा गरजेच्या वेळी आजी-आजोबांनी बाळासाठी उपलब्ध असणं हे आई-बाबांना केवढा आधार देऊन जातं. आपण केलेल्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करणं हे मात्र अगदी टाळलं पाहिजे. त्यामुळे आपली मुलं दुखावली जातात. ती एरवी आपलं पालकत्व किती चांगलं निभावताहेत हे तुम्ही त्यांना कधी सांगितलं का? इतकी गोड नातवंडं दिल्याबद्दल त्यांना कधी  शाबासकी दिलीय? आई-बाबा झाले, तरी त्यांना अजूनही त्यांच्या आई-बाबांकडून पाठीवर कौतुकाची थाप हवी असतेच.
आई-बाबा-बाळ ही न्यूक्लिअर फॅमिली. एकत्र कुटुंब ही आता ऐतिहासिक गोष्ट झालीय. पण शास्त्रीय सत्य आहे की बाळ जन्माला येतं ते दोन वेगवेगळ्या घराण्यांची गुणसूत्रे घेऊन. आई आणि बाबा या दोन्ही बाजूंनी बाळाला आपली अशी अनेक माणसं आहेत. त्यांच्याविषयी बाळाला कोण माहिती सांगणार? प्रत्येक कुटुंबाच्या काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत, मूल्यव्यवस्था आहे. काही व्यक्तींनी कौतुकास्पद, भव्यदिव्य कामगिरी केलेली आहे त्यांचा कुटुंबाला अभिमान वाटतो. काही सदस्य दुर्बल आहेत. त्यांच्या गरजा इतरांनी भागवाव्या लागतात. त्यांना सांभाळून घ्यावं लागतं. बाळाच्या आई-बाबांचं लहानपण कसं गेलं ही माहिती बाळाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. अनेक व्यक्तींमधले धागेदोरे विणून बाळाच्या आयुष्याचा पट निर्माण होतो. त्यांची स्वप्रतिमा यातूनच ठळक होते. प्रत्येक व्यक्तीला आपली पाळंमुळं कुठे रुजलेली आहेत हे जाणून घेण्याची ओढ असते. या ज्ञानाशिवाय एक प्रकारचं पोरकेपण, अधांतरी अस्तित्व वाटू शकतं. बाळाच्या अस्तित्वाला बळकट आधार देण्याचं हे काम आजी-आजोबा फार उत्तमप्रकारे पार पाडू शकतात. जुने फोटो दाखवून, जुन्या आठवणी सांगून गोष्टी रूपानं बाळाच्या अस्तित्वाला आकार देऊ शकतात. त्याला स्वत:ची ओळख पटवून देऊ शकतात.
मात्र हे काम करताना कोणाही व्यक्तीबद्दल खोचक बोलणं, दोषारोप करणं जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. बाळाशी जडलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उपयोग स्वत:च्या मनातली मळमळ ओकून टाकण्यासाठी करू नये.
प्रत्येक नातवंड वेगवेगळं असतं. वयानुरूप गरजाही वेगळ्या असतात. अगदी छोटय़ांना दूध, खाणं, गाणी, थोपटून जोजवणं हेच  हवं असतं, तर थोडय़ा मोठय़ांना खेळणी, गोष्टी, बागेत घेऊन जाणं यात मजा येते. एखाद्याला दंगामस्ती आवडेल तर दुसऱ्याला शांत बसून खेळणं आवडेल. बाळांच्या आवडीनुसार त्यांच्याबरोबर रमणारे, त्यांच्यामध्ये मनापासून रस घेणारे, त्यांच्या चुकांचा समंजस स्वीकार करणारे आजी-आजोबा नातवंडांना जीव की प्राण वाटतात, यात काय नवल!
माझा नातू शर्वित आता चालायला लागलाय. दुडदुडत्या पावलानं तो रस्त्यावर पळायला लागला, की मी त्याचा हात पकडते. अजून १५-२० वर्षांनी माझीच पावलं लडखडायला लागली तर तोच माझा हात धरेल. आजी-नातवाचं नातं कायम राहील पण संदर्भ बदललेले!    (समाप्त)
drlilyjoshi@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Relation of grandparents

ताज्या बातम्या