scorecardresearch

Premium

नातेसंबंधांना हिंसाचाराचा विळखा

एखादी स्त्री नवऱ्याचा मार का सहन करते याची अनेक कारणं आपल्याला माहीत आहेत. पण अलीकडे लग्नाआधीच, नात्यात असताना होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

womens depretion
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

एखादी स्त्री नवऱ्याचा मार का सहन करते याची अनेक कारणं आपल्याला माहीत आहेत. पण अलीकडे लग्नाआधीच, नात्यात असताना होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. मग ते दोघं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असतील किंवा नुसतेच ‘गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड’. अशा घटनांत पुरुष आपलं स्वामित्व वा वर्चस्व सिद्ध करत असतोच; परंतु एखादी तरुणी त्याचा मार, तोही सातत्यानं का खात राहते? काय असावीत त्यामागची कारणं? अलीकडेच घडलेल्या निक्की यादव आणि श्रद्धा वालकर प्रकरणांतून पुढे आलेल्या या गोष्टीमागे काय दडलेलं असू शकेल, याचा केलेला हा ऊहापोह.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Womens Health why facial hair growth increase and What is the solution on it
स्त्री आरोग्य : तुमच्या चेहऱ्यावर आहेत त्रासदायक केस?
satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे

लग्नाआधीचा प्रियकर-प्रेयसी असण्याचा काळ हा सर्वात सुखाचा असतो असं मानलं जातं. अगदी त्या दोघांना ‘लव्हबर्डस्’ वगैरे संबोधनं दिली जातात. अलीकडच्या काळात मोठा सणच झालेला ‘व्हॅलेंटाइन डे’ त्याचंच प्रतीक. पण मग याच काळात कमालीच्या हिंसा असलेल्या घटना पाहिल्या, की प्रश्न पडतो, प्रेमात मश्गूल असायच्या काळात एवढी मारझोड, अगदी जीव घेईपर्यंत का होते? पालकांनी फुलासारख्या जपलेल्या मुली लग्नही झालेलं नसताना, औपचारिक सामाजिक दडपण आलेलं नसतानासुद्धा मार का खातात?..

छोटीमोठी भांडणं सगळय़ाच जोडप्यांमध्ये होत असतात, पण आपल्याला हिंसा असलेल्या अपमानास्पद (abusive) नातेसंबंधांवर प्रामुख्याने भर द्यायला हवा. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे नातेसंबंध सर्व आर्थिक स्तरांत बघायला मिळतात. प्रत्येक स्तरातली त्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. शिवाय हे एक चक्र किंवा जाळं असतं, ज्यात मुली हळूहळू अडकत जातात आणि आपल्याला बाहेरून सोपं दिसत असलं तरी त्यांना मात्र यातून बाहेर पडणं खूप अवघड होऊन बसतं.

एखाद्या ‘टिपिकली अब्युसिव्ह’ नात्यात सर्वसाधारणपणे काय घडताना दिसतं, तर या नातेसंबंधांच्या सुरुवातीला तरुण आपल्या प्रेयसीवर प्रेमाचा प्रचंड वर्षांव करतात आणि त्यांना जाणीव करून देतात, की त्या त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. मजल इथपर्यंत जाते, की समोरचा त्यांच्याशिवाय जगूसुद्धा शकत नाही! या पातळीपर्यंत मुली प्रेमात पूर्णपणे बुडालेल्या असतात आणि त्यांचं अवलंबित्वसुद्धा वाढलेलं असतं. सगळं छान चालू असताना छोटय़ामोठय़ा कारणावरून  संबंध तोडले जातात. फोन कॉल बंद, भेटणं बंद. त्यामुळे मुलींना ऑक्सिजन न मिळाल्यानं जसा त्रास होईल तेवढी घुसमट व्हायला लागते. मग हे सगळं विनाशर्त परत जुळवायला त्या तयार होतात. याच टप्प्यावर या तरुणांकडून मुलींना कुटुंब आणि मित्रांशी संबंध तोडायला सांगितलं जातं किंवा त्यांना कुटुंब, मित्र किंवा जोडीदार यांपैकी एकाची निवड करायला सांगितलं जातं. पहिल्या टप्प्यावर केलेल्या अपार प्रेमाच्या वर्षांवामुळे मुली अर्थातच जोडीदाराला निवडतात. अशा प्रकारे मुलींचा आधार इथे तुटतो आणि त्या पूर्णपणे एकटय़ा पडतात. इतरांशी त्यांचं नातं पूर्णपणे तुटावं म्हणून इतरांबद्दल जोडीदार अशा प्रकारच्या घटना सांगतो, की मुलींचा त्यावर हळूहळू विश्वास बसतो आणि त्या पूर्णपणे नात्यात गुंतल्या जातात. इतरांवरचा त्यांचा विश्वास तुटतो. त्यामुळे इतरांनी त्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना ते अजिबात स्वीकारायचं नसतं. मान्य नसतं.

मानसशास्त्रामध्ये ‘गॅस लाइटिंग’ नावाची एक संज्ञा सांगितलेली आहे, ज्यात नातेसंबंधांमध्ये एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराच्या अस्वस्थ मन:स्थितीचा फायदा घेऊन त्याला सातत्यानं असं भासवतो, की भूतकाळात घडलेली एखादी गोष्ट चुकीची वा तथ्यहीन आहे. समोरच्या  व्यक्तीला मनोरुग्ण ठरवण्याचा काहीसा प्रयत्न या जोडीदाराकडून होत असतो. अशा प्रकारची जाणीव वारंवार करून दिली गेल्यानं मुलींचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्या स्वत:वर शंका घ्यायला लागतात. अशा मुलींचा मग सातत्यानं अपमान करून, त्यांच्यावर टीका करून त्यांच्या नैतिकतेवर (े१ं’) प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. या मुली आपल्यावर अन्याय होतोय की आपणच चुकतोय, या चक्रात अडकतात आणि बाहेर आधार नसल्यामुळे त्या परिस्थिती एक दिवस बदलेल अशी आशा ठेवून अन्याय आणि मार सहन करत राहतात.

‘ट्रॉमा बॉण्डिंग’ ही आणखी एक संज्ञा इथे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. ही संज्ञा नवरा-बायको किंवा कोणत्याही नातेसंबंधांमध्ये दिसत असली, तरी ती सर्वार्थानं प्रियकर-प्रेयसीच्या नात्यात जास्त  दिसून येते. म्हणजे, एखादीचा जोडीदार तिला मानसिक त्रास देत असेल, मारहाण करत असेल, आपला पार्टनर चुकतोय, तो आता पूर्वीसारखा आवडत नाहीये, हे सगळं लक्षात येऊनही त्याच्यापासून दूर होण्याचा विचारच तिला सगळय़ांत जास्त भीतीदायक वाटतो. काय वाटेल ते झालं, तरी जोडीदारापासून ती दूर राहू शकत नाही, हा पक्का विचार या ‘ट्रॉमा बॉण्डिंग’मध्ये होतो. अशा प्रकारच्या बॉण्डिंगचे खूप गंभीर परिणामही होऊ शकतात. जोडीदारांपैकी एकाला जेव्हा नातं टिकवायचं असतं आणि दुसरा या नात्याबद्दल गंभीर नसतो, अशा वेळी हा बॉण्ड तयार होतो. ‘डार्लिग’ या नव्या चित्रपटातली नायिका (आलिया भट)आठवा. छोटय़ा मोठय़ा कारणांवरून चित्रपटाचा नायक तिला मारत असतो; पण दुसऱ्या दिवशी ‘सॉरी’ म्हणत असतो. ‘यापुढेही असं होणार नाही,’ असंही सांगत असतो. नायिकेला भविष्यकाळावर विश्वास असतो, तो बदलेल ही आशा असते. इथे ‘ट्रॉमा बॉण्ड’ बघायला मिळतो. ज्या दिवशी मुली भविष्याऐवजी वर्तमानात काय घडतंय हे योग्य की अयोग्य आहे हे ठरवू शकतील, त्या दिवशी त्यांना या बॉण्डमधून बाहेर पडण्यास मदत होईल. ‘हे अजिबात चालणार नाही’ असं आतून मुलींना वाटणं गरजेचं आहे. पार्टनर कोणते बहाणे देत आहे, तिच्या मनातली आशा काय सांगत आहे, यापेक्षा वास्तव काय आहे, शरीरावरच्या जखमा काय सांगत आहेत, हे मुलींनी लक्षात घ्यायला हवं. श्रद्धा आणि निकी या दोघींच्या नात्यांमध्ये हिंसाचार आधीपासूनच होता आणि शेवटी तो जिवावर बेतला ही बाब मानसशास्त्रीय पातळीवर विचार करण्यासारखी आहे. कारण आपल्या समाजात विविध वर्गामध्ये अनेक जोडप्यांत सुप्त पातळीवर मारहाणीच्या पातळीवरचा हिंसाचार आपल्याला ऐकून-पाहून ठाऊक आहे. प्रेमात मश्गूल असण्याच्या काळात अशी काय कारणं असतील, की मुली गुपचूप मार खात असतील? पालकांनी मोठं होईपर्यंत फुलासारख्या जपलेल्या या मुली अगदी काही काळापूर्वी आयुष्यात आलेल्या मुलाकडून मार खातातच कशा? या प्रश्नांचा विचार करणं क्रमप्राप्त आहे.

शालेय जीवनात कायम पहिल्या पाचात असणारी केतकी.  इंजिनीयर वडील आणि शिक्षिका असलेल्या आईची मध्यम वर्गातली मुलगी. ती वर्गातल्या खालून पाचात असणाऱ्या संदीपकडे दहावीच्या वर्गात असताना आकर्षित झाली. तो दिसायला रुबाबदार, पण त्यांच्या शिक्षकांच्या भाषेत मठ्ठ. तिच्या भाषेत सांगायचं तर रावडी. पुढे ती कॉलेजला गेली आणि त्यानं दहावीनंतर शिक्षणच सोडलं. केतकीला दुर्दैवानं कॉलेजमध्ये चांगली संगत मिळाली नाही आणि ती व्यसनाच्या आहारी गेली. या काळात तिच्या घरी याचा सुगावा न लागू देता तिच्या या रावडी हिरोनं तिची साथ न सोडता तिला व्यसनातून बाहेर काढण्यास मदत केली. त्यामुळे तिला तो भक्कम आधार वाटत होता. साहजिकच तो कसाही असला तरी या उपकाराची परतफेड संदीपला आयुष्यभर साथ देऊन करायची असं केतकीनं ठरवून टाकलं. खरं तर तिच्या वयाची अजून अठरा वर्षही पूर्ण झाली नव्हती. ती घरच्या कुणालाही न जुमानता त्याच्याकडे जाऊ लागली. आपली एवढी हुशार मुलगी असा जोडीदार कसा निवडू शकते, असा प्रश्न पालकांना सतावत होता. घरातल्यांना न जुमानता केतकी आपल्यासोबत असते याची अहंकारात बदलवणारी जाणीव झालेला संदीप हळूहळू बदलला आणि त्यांच्यातल्या नात्याचं गणितही बदललं. तो शिरजोरपणा करू लागला. एकदा केतकीच्या आईला समजलं, की त्यानं भर रस्त्यात तिला थोबाडीत मारली. आईनं थोडं विश्वासात घेतल्यावर केतकीनं सांगितलं, की ‘त्याला राग आला की तो नेहमीच मारतो आणि व्यसनाच्या प्रकरणाबाबत घरी सांगेन अशी धमकी देतो.’ या धमकीला घाबरून केतकी मारहाणीला विरोध करत नव्हती. हे ऐकून आई हादरलीच. आई आणि बाबांनी केतकीचं भूतकाळातलं व्यसनाचं प्रकरण स्वीकारलं आणि तिला आधार देत या हिंसक नातेसंबंधातून बाहेर पडण्यास मदत केली. जो मुलगा लग्नाच्या आधी केवळ राग आला म्हणून मुलीवर हात उचलतो, तो पुढे कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नव्हता. तिच्या प्रकरणात प्रामुख्यानं व्यसनी असतानाच्या काळात त्यानं दिलेला आधार हे भावनिक कारण मार सहन करण्यास कारणीभूत होतं. पण बऱ्याच वेळा मुलगे मुलींना कशावरून तरी ब्लॅकमेल करत राहतात आणि घरच्यांच्या भीतीनं मुली इच्छा असूनही त्या नातेसंबंधातून बाहेर पडू शकत नाहीत. अशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला मोठय़ा संख्येनं आहेत.

शिवानी फोतेदार या एक मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक. किशोरवयीन मुलींबरोबर काम करताना त्यांना एक वेगळाच अनुभव आला. निम्न आर्थिक स्तरातल्या एका वस्तीत मुलींसह एक सत्र घेत असताना त्यांनी मुलींना विचारलं की, ‘तुम्हाला तुमचा बॉयफ्रेंड मारतो का? आणि तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता?’ त्यावर मुलींनी सांगितलं, की ‘तो प्रेम करतो म्हणून मारतो. त्याचा माझ्यावर हक्क आहे. म्हणून तो बाहेरचा राग माझ्यावर काढतो. पण आज मारलं तरी दुसऱ्या दिवशी काळजी घेतो. मग त्या मारहाणीचा राग राहात नाही.’ हे ऐकून शिवानी सुन्न झाल्या. अशा मुलींचा विचार करता असं दिसून येतं, की लहानपणापासून जर घरात किंवा आसपास नवऱ्यानं बायकोला उदा. बाबांनी आईला मारलेलं पाहिलं असेल, तर जोडीदार मारतो म्हणजे काही तरी चूक करतो असं वाटतच नाही. त्या मार खात राहतात आणि मारहाण करणारा शिरजोर होत राहतो.

     अनेक मुलींना मुलांच्या तुलनेत घरात कमी प्रेम दिलं जातं. त्यातून अशा प्रेमाच्या भुकेल्या मुली बॉयफ्रेंडनं रोज ‘जेवलीस का?’ इथपासून ते ‘छान दिसतेस’, ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’ अशी विधानं केली तरी पार विरघळून जातात. त्यांच्यासाठी मग प्रेमापुढे हिंसाचार दुय्यम ठरू लागतो.   करिश्माच्या घरात लहानपणापासून वडिलांच्या माघारी आईनं मुलांना मोठं केलं होतं. आईला घरात मदत करता करता तिचं बालपण केव्हा संपलं हे तिलाच कळलं नाही. अशातच तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा असणारा पक्या करिश्माला आवडायला लागला. पक्या तिला गिफ्ट्स दे, कॅडबरी दे, असं करून तिचे लाड करायचा. बाहेर खायला घेऊन जायचा. गोड बोलायचा, पण पक्याला न आवडणारे कपडे घातले, येता-जाता दुसऱ्या एखाद्या मुलाशी बोलताना दिसली, तरी पक्या करिश्माला मारायचा. या मारहाणीचा तिला त्रास व्हायचा, पण घरात न मिळालेलं प्रेम पक्या देतो, या भावनेतून ती हे सारं मुकाटपणे सहन करायची. दुसरं म्हणजे आपण दुसऱ्या मुलाशी बोललो की त्याचा राग अनावर होतो म्हणजे त्याचा आपल्यावर फारच जीव आहे, अशी ती स्वत:ची समजूत काढायची. अशा ‘पझेसिव्ह’ मुलाचं प्रेम झिडकारणं मुलींना जमत नाही. त्यातून मुलांची हिंमत वाढत राहते. दुसरीकडे पक्याशी याबाबत बोललं असता, त्यानं सांगितलं की, ‘ती लहान आहे. तिला चांगलं वळण लावायलाच मी तिला मारतो.’ इथे तर पक्या वडिलांच्या भूमिकेत शिरूनही मारायचा आणि प्रियकराच्या भूमिकेतूनही मारायचाच. याबाबत घरी सांगूनही फारसा फरक पडणार नाही याची कल्पना असल्यामुळे करिश्मा घरी काहीच सांगत नव्हती. आज तीच नाही तर तिच्यासारख्या हजारो करिश्मा अशा रिलेशनशिपमध्ये मार खात राहतात. लग्नाआधीच मार खाणं सुरू झालेलं असतं. अशा वेळी लग्नानंतर अशा मुलींचं काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.     निलू मोठय़ा आयटी कंपनीत नुकतीच कामाला लागली होती. तिथे तिची प्रसादशी ओळख झाली. पुढे ओळखीचं रूपांतर एक-दोन महिन्यांत प्रेमात झालं. दोघांनी आपापल्या घरी याबद्दल काहीच सांगितलं नाही. पण निलूनं सोशल मीडियावर दोघांचे फोटो टाकायला सुरुवात केली. त्यामुळे निलूच्या आई-वडिलांना माहिती नसलं तरी तिच्या समवयस्क भावंडांना आणि मित्रमैत्रिणींना या नात्याची कल्पना आली. काही दिवसांत ते एकत्र राहू लागले आणि सहा महिन्यांनंतर एका पार्टीच्या निमित्तानं तिला त्याच्या ड्रग्जच्या व्यसनाबाबत समजलं. मग तर तो उघडपणे तिच्या समोरही ड्रग्ज घेऊ लागला आणि त्या नशेत तिच्यावर हातही उचलू लागला. निलूला आता हळूहळू समजू लागलं होतं, की प्रसाद तिच्यासाठी योग्य जोडीदार नाही. पण गेल्या सहा-सात महिन्यांत त्यांच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’बद्दल लोकांना माहिती झालं होतं. आई-वडिलांना कसं सामोरं जायचं हा विचार.. या भीतीनं तिनं कुणालाच काहीही न सांगता स्वत:ला कायमचं संपवलं.

 लग्नानंतर घटस्फोट घेण्यापेक्षा अशा नातेसंबंधांमधून बाहेर पडणं कितीही सोपं आणि कायद्याच्या दृष्टीनं सहज असलं, तरी भावनिक पातळीवर तसं नसतं. मुली मुळातच जास्त भावनाप्रधान असतात. त्यात जर नात्यामध्ये शारीरिक संबंध आलेले असतील, तर मग मुलींना या नात्यातून बाहेर पडणं अधिकच अवघड जातं.

दुसरी एक गोष्ट म्हणजे या सगळय़ा प्रकरणांत एक समान आणि महत्त्वाची गोष्ट दिसून येते, ती आधार देणाऱ्या माणसांचा अभाव. अशा नात्यांमधून बाहेर पडून पुन्हा नियमित जीवन जगणं सर्वासाठी सोपं नसतं. त्यासाठी कुटुंबाची आधार देणारी व्यवस्था गरजेची असते. ती नसली की मुली आणखीनच घाबरतात किंवा आपणच त्यावर तोडगा काढला पाहिजे असा विचार करून त्या सारी परिस्थिती एकटय़ानं हाताळायचा प्रयत्न करत राहतात. भारतात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला पालकांचा सर्वसाधारणपणे पाठिंबा नसतो. त्यामुळे अशा नात्यांत गुंतलेल्या मुली कुटुंबापासून दुरावतात. अनेकदा त्या दुराव्यात तिरस्कार आणि कटुतेची भावनाही मुलींना सहन करावी लागते. अशा मुली प्राथमिक हिंसा खपवून घेतात आणि मारणारेही आपल्याला रोखणारं तिच्याकडचं कुणी नाही, या विचारातून परिस्थितीचा गैरफायदा घेतात. पालकांच्याही आधी मित्रमंडळींना किंवा कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांना ही धोक्याची घंटा ऐकू येते. काही वेळा ते सावधगिरीचा इशारा देतात. पण परिस्थिती बदलेल या आशेवर असणाऱ्या मुली या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा आणीबाणीची वेळ येते तेव्हा मुलींना त्या मित्रमैत्रिणींची मदत मागायला संकोच वाटतो. शिवाय आताच्या काळात दुसऱ्या व्यक्तीच्या ‘पर्सनल’ गोष्टींमध्ये फारसं पडायचं नाही, असा नियम सहसा पाळला जातो. त्यामुळे अनेकदा मदत मिळणं वा मागणं लांबणीवर पडतं. त्यातून पुढे अघटित घडतं.

   मुली, तरुणी निर्णय घ्यायला चुकतही असतील, पण ‘काहीही संकट आलं तर आम्ही आहोत’ हा आधार आणि विश्वास पालकांनी मुलींना द्यायलाच हवा. अनेकदा आई-वडिलांचा अहंकार मुलांच्या प्रेमापेक्षा मोठा होता. ही आपली मुलं आहेत ती चुकली तरी त्यांना माफ करायला हवं, याचं भान अनेकदा सुटतं. कितीही चुका झाल्या तरी ज्या क्षणापासून माणूस नव्यानं जगायचं ठरवतो, तिथून नवीन आयुष्य सुरू होऊ शकतं. कदाचित समाजातील तथाकथित बदनामीमुळे लग्न जमायला अडचण येईलही, पण जीव तरी धोक्यात येणार नाही. लग्न म्हणजे आयुष्य नव्हे. म्हणूनच त्यांना उभारी देण्यासाठी मदतीचा हात तरी द्यायला हवा.

    नातेसंबंधांतल्या तणावाचं एखादं प्रकरण माझ्याकडे येतं, तेव्हा आधी मी शारीरिक हिंसा आहे का, हे तपासते आणि सगळय़ात आधी त्यावरच काम करते. मारणं, मग ते कोणत्याही नात्यातलं असो, ते अपमानास्पद असतं. त्याचे मनावरचे पडसाद हे नकारात्मकच असतात. ‘थप्पड’ या चित्रपटातली नायिका नवऱ्यानं रागाच्या भरात थोबाडीत मारल्यानंतर घटस्फोटाचा निर्णय घेते. काहींना चित्रपट पाहताना ती जरा जास्तच ताणत आहे, तो काही मारहाण करणारा नाही, एकदाच मारलं आहे, असे विचार येऊ शकतात. नव्हे, भारतीय मानसिकतेत ते बहुतांश लोकांच्या मनात येतातच. पण प्रश्न केवळ एकदा थोबाडीत मारण्याचा नसून स्वाभिमानाचा आहे. केवळ स्त्रीला मारणं हा विषय नसून एक तत्त्व म्हणून मी हे सहन करणार नाही, यात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही (नॉन निगोशिएबल) या मूल्याचा मुद्दा आहे. एखादी थोबाडीत मारणं ही सुरुवात असू शकते आणि नंतर त्याचे परिणाम पुढे कुठपर्यंत जातील ते सांगता येत नाही. त्यातून या श्रद्धा वालकर आणि निक्की यादव यांच्या बाबतीतल्या दुर्घटना आपल्यासमोर आल्या.

 शिकलेल्या किंवा न शिकलेल्या, कोणत्याही वयातल्या कमावणाऱ्या किंवा न कमावणाऱ्या स्त्रियांना हे लक्षात ठेवावं लागेल, की प्रत्येक समस्येवर मार्ग आहे. त्यांचा एखादा फोटो किंवा व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल केलं जात असेल तरी कायदा त्यांना या विळख्यातून बाहेर काढू शकतो. इंटरनेट जर त्यांचा फोटो पसरवू शकतो, तर इंटरनेटवर असे मार्गही आहेत की ज्यामुळे फोटो ‘व्हायरल’ होण्यापासून थांबवता येतं. तुमच्या मनाला न पटणाऱ्या विषारी नात्याला तुम्हालाच आयुष्यातून बाहेर फेकावं लागेल. परिस्थिती बदलेल या आशेवर सहन करत न बसता त्यातून बाहेर पडावं लागेल.

 छोटंसं कुलूपच पूर्ण घराला सुरक्षित ठेवतं, त्याचप्रमाणे स्वाभिमानाचं कुलूपच तुमचं

(लेखिका समुपदेशक आहेत.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Relationships violence husband woman marriage live in relationship chaturang article ysh

First published on: 11-03-2023 at 00:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×