सुनेची बोलणी सुरू व्हायच्या आतच नातालबाई आपली तयारी करीत असत. दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या संध्याकाळी दुसऱ्या घरी जायचे असा त्यांचा प्रघात होता. त्याप्रमाणे शेवटच्या दिवशी त्यांनी तयारी केली. संध्याकाळी खूप लवकर त्या निघत नसत. ज्या गावात मला तिन्ही मुलगे म्हणून त्या मिरवल्या होत्या, त्यांच्यासमोरून जाणे त्यांना लाजिरवाणे वाटायचे. म्हणून जरा सांजावलं की त्या जायला निघत..

आता शेवटचा एक आठवडा राहिला. नातालबाईचे काऊंटडाऊन सुरू झाले. दुसऱ्या महिन्याचा शेवटचा आठवडा आला की नातालबाईच्या पोटात खड्डा पडत असे. ‘चला, हा आठवडा संपला की दोन महिने आराम. म्हातारीची कटकट नाही. दुपारीच धाकटी सूनबाई मुलाला सांगताना त्यांनी ऐकले होते. तेव्हाच त्यांना कळून चुकले की, आता आपले चंबूगबाळे आवरून घ्यावे लागेल. पुढच्या महिन्यापासून दुसऱ्या मुलाची; पॅट्रिकची पाळी होती त्यांना सांभाळायची. आता वयाच्या ८०व्या वर्षी प्रत्येक दोन महिन्यांनंतर सगळे आवरून दुसऱ्या लेकाच्या घरी जायचे आजकाल त्यांच्या जिवावर यायचे. हल्ली गुडघे दुखत होते. उठता-बसताना त्रास होत असे. पॅट्रिकचे घर त्याने वाडीतल्या जागेत बांधले होते. तेथे जायला पूर्वी नातालबाईंना सात-आठ मिनिटे लागायची, पण आता १०-१२ मिनिटे लागत होती. देवाकडे किती साकडे घातले की बस झालं? आता मला उचल. पण तोही त्यांचे ऐकत नव्हता.
खरंच किती खस्ता काढल्या या पोरांसाठी! सगळ्यात मोठा मुलगा आलेक्स, मधला पॅट्रिक आणि धाकटा स्टीव्हन. नातालबाईला आपल्याला तिन्ही मुलगेच झाले याचा खूप अभिमान होता. सगळे छान चालले होते. पण आलेक्स एस.एस.सी.ला असताना धनी हार्ट-अ‍ॅटॅकने अचानक वारले. त्यानंतर मात्र त्यांना स्वत:ला कंबर कसावी लागली. मुलांना वाढवायला त्यांनी जोडकरणीचा व्यवसाय (घाऊक बाजारातून भाजी घेऊन किरकोळ विकायची) पत्करला. थोडी आपल्या वाडीतली भाजी आणि घाऊक बाजारातून भाजी घेऊन नातालबाई सकाळीच उठून दहिसरला भाजी विकायला जात. वसईची चांगली, ताजी भाजी म्हणून हळूहळू त्यांची गिऱ्हाईके वाढू लागली. दोन-एक तासात भाजी विकून लगबगीने त्या घरी येत. झटपट स्वयंपाक आटपेपर्यंत मुले शाळेतून यायची वेळ व्हायची.
दुपारची थोडी विश्रांती झाली की परत ती वाडीत जायला निघायची. सर्व कामे ती एकटीच करायची. मुलांच्या अभ्यासात तिने कधी व्यत्यय येऊ दिला नाही.     
 त्यांना कधी कामाला लावले नाही. मुलांना कधी कुणाकडे हात पसरावा लागला नाही. त्यांना स्वाभिमानाने तिने वाढवले. मनात एकच आशा होती, तिन्ही मुलगे मोठी झाली की मला त्यांचा आधार होईल.
काळ सरकत होता. मुले मोठी होत होती. मोठा आलेक्स जात्याच हुशार होता. चांगला शिकला आणि नोकरीला लागला. आईचे कष्ट त्याने पाहिलेले होते, म्हणून धाकटय़ा भावंडांची शिक्षणाची जबाबदारी त्यानेच उचलली. जरा उशिराच त्याचे लग्न झाले, पण त्यानंतर त्याला कंपनीमधून बाहेरगावी जावे लागले. हळूहळू दुसरेही दोघे मुलगे नोकरीला लागले. ‘आई, आता तू भाजी विकायला जाऊ नकोस.’ एके दुपारी सगळे एकत्र बसलेले असताना स्टीव्हन म्हणाला.
‘अरे पण घरी बसून मी काय करणार?’
 ‘अगं आता आम्ही कमावतो ना? तू कशाला धडपडत जातेस आता?’
पण इतक्या वर्षांचे गिऱ्हाइकांशी असलेले ऋणानुबंध नातालबाईला तोडवत नव्हते. अडीअडचणीत त्यांनीच जर तिला मदत केली होती. सणासुदीला गोडाधोडाचे पदार्थ त्यांच्यामुळेच तिच्या मुलांच्या तोंडात पडले होते. तरी मग वयोमानाप्रमाणे आणि मुलांच्या सांगण्यामुळे तिने हळूहळू आठवडय़ातील काही दिवस जाणे कमी केले.
यथावकाश दुसऱ्या दोघांचीही लग्ने झाली. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, पण नंतर भांडय़ाला भांडे लागू लागले. वाद वाढले आणि एकत्र कुटुंबाचे दोन संसार झाले. आता आईचा प्रश्न आला. मोठा मुलगा बाहेर होता, पण खर्चाला पसे पाठवत असे. त्यामुळे आईची दोघांमध्ये वाटणी झाली. मधल्या मुलाने वाडीत घर बांधले त्यामुळे प्रत्येक दोन महिन्यानंतर नातालबाईंना एका घरून दुसऱ्या घरी वाऱ्या कराव्या लागत असत.
‘काय गं आजीची तयारी झाली का?’ धाकटी सूनबाई स्वयंपाकघरात मुलीला विचारत होती. दुसऱ्या घरी जायचा शेवटचा आठवडा सुरू झाला की, धाकटय़ा सूनबाईचे टोमणे चालू व्हायचे. कधी एकदा त्या दुसऱ्या घरी जातील असं तिला व्हायचे आणि मग दोन दिवसांपासून फर्मान सुरू  असायचे. ‘कपडे आवरून ठेवा. इकडे काही राहायला नको. सारखी कोणी यांची सगळी उष्टी-खरकटी काढायची?’ खरं म्हणजे त्यांचे तिला काही करावे लागत नव्हते. स्वत: त्या घरात फिरू शकत होत्या आणि सूनबाईची बोलणी नकोत म्हणून नातालबाई अजूनही आपले पातळ स्वत: धूत होत्या. भले ते एवढे स्वच्छ निघत नव्हते तरीही. सुनेचे बोलणे हॉलमध्ये बसलेला मुलगाही ऐकून न ऐकल्यासारखा करायचा. हा स्टीव्हन धाकटा म्हणून केवढा लाडाचा. पाच वर्षांचा होईस्तोवर याला अंगावर पाजलं आहे. आठवलं आणि नातालबाई कसंनुसं हसल्या.
सुनेची बोलणी सुरू व्हायच्या आतच नातालबाई आपली तयारी करीत असत. दुसऱ्या महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या संध्याकाळी दुसऱ्या घरी जायचे असा त्यांचा प्रघात होता. त्याप्रमाणे शेवटच्या दिवशी त्यांनी तयारी केली. संध्याकाळी खूप लवकर त्या निघत नसत. ज्या गावात मला तिन्ही मुलगे म्हणून त्या मिरवल्या होत्या, त्यांच्यासमोरून इथून तिथे जाणे त्यांना लाजिरवाणे वाटायचे. म्हणून जरा सांजवलं की त्या जायला निघत.
त्या दिवशीही त्या सांजवताच आपले चंबूगबाळे घेऊन पॅट्रीकच्या घरी जायला निघाल्या. निघताना नातीला विचारले, ‘तेथपर्यंत येतेस काय गं सोबतीला?’ ‘काही नको.. शाळा चार दिवसांनी सुरू होईल. पुस्तके आणायला जायचे आहे.’ परस्पर सुनेने फटकारले. मग त्या एकटय़ाच निघाल्या. सावकाश इथे-तिथे पाहात एक-एक पाऊल बरोबर पडते की नाही याची खात्री करून त्या चालत होत्या.
पॅट्रीकचा ‘निवांत’ बंगला खरोखरच निवांत होता. कडेकोट कुंपणाने बंदिस्त. आजूबाजूची घरे हाकेपल्याड होती. त्याच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्या दमल्या होत्या. अंग घामाने डबडबले होते. त्याच्या कुंपणाचा भलामोठा दरवाजा ढकलून त्या आत गेल्या. घरासमोरील गुळगुळीत फरशीवरून चालताना त्यांना बाजूच्या झाडांचा आधार घ्यावा लागत होता.
कशाबशा त्या घराच्या ओटीवर पोहोचल्या. ओटीवर छोटा झोपाळा होता. अंमळ त्या त्याच्यावर टेकल्या. आपल्या कपडय़ांची पिशवी बाजूला ठेवली. त्यांना वाटलं झोपाळ्याचा आवाज ऐकून सूनबाई बाहेर येईल. थोडा वेळ वाट पाहिली पण काही हालचाल दिसेना! म्हणून मग त्या उठल्या आणि हळूच दरवाजाची बेल वाजवली. एकदाच वाजवली.. कारण एकदा चुकून दोन-तीनदा बटन दाबले गेले होते, तेव्हा सूनबाई त्यांना फार बोलली होती. बेल वाजवून देखील कोणी बाहेर येत नाही पाहून नातालबाईंना आश्चर्य वाटले. तशाच त्या परत पायऱ्या उतरल्या. कदाचित सूनबाई आणि मुलं मागच्या दारी असतील म्हणून त्यांना ऐकायला गेले नसेल. मग त्या हळूहळू िभतीचा आधार घेत-घेत परसात पोहोचल्या. पण तिथेही शुकशुकाट होता.     
‘सगळे गेले तरी कोठे?’ नातालबाई विचार करू लागल्या. असं कधी होत नव्हतं. सूनबाई नाही तर मुले तरी घरात असायचीच. असू दे! येतील! सुट्टी चालू आहे तर बाजूला कुठे खेळायला गेली असतील!’ म्हणून त्यांनी स्वत:ची समजूत घातली. नातालबाई परत हळूहळू चालत जाऊन झोपाळ्यावर बसल्या. आपल्या पायाने झोका घेत राहिल्या.
हळूहळू अंधार होत गेला. आजूबाजूला रातकिडे किरकिरू लागले. मुले अजून आली नाहीत म्हणून नातालबाईंना काळजी वाटू लागली. घरात अंधार, बाहेर अंधार, त्या कुठेच जाऊ शकत नव्हत्या. झोपाळ्यावर एवढा वेळ बसून-बसून त्यांच्या पाठीलादेखील रग लागली होती. मनात नकळत भीती पसरत होती. विचार करून त्यांचे मेंदू शिणले. डोळ्यावर झापड येऊ लागली. आपल्या कपडय़ांचे बोचके उशी म्हणून डोक्याखाली घेतले आणि अंगाचे मुटकुळे करून तशाच झोपाळ्यावरच त्या आडव्या झाल्या.
‘चला सुट्टीचा महिना संपत आला, आता उद्यापासून दोन-चार दिवस राहिले आहेत. त्यात शाळेची तयारी करावी लागेल.’ शैला- पॅट्रीकची बायको मुलांना म्हणाली. मुले कधीपासूनची मागे लागली होती, म्हणून आज पॅट्रीक आणि शैला त्यांना मॉलमध्ये घेऊन आले होते. त्यानंतर सगळे रात्री जेवूनच घरी जाणार होते. मुले खूप आनंदात होती. आज छान मॉलमधून खरेदी, नंतर हॉटेलमध्ये जेवण झाले होते. हातात आईस्क्रीमचा कोन होता. अचानक पॅट्रीकच्या लक्षात आले, ‘अगं शैला आज ३१ तारीख ना! मग आज आई आपल्या घरी येणार! अरे बापरे! आपण असे कसे विसरलो?’
‘चला रे आटपा लवकर, घरी गेलं पाहिजे पटकन.’ शैला मुलांवर खेकसली.
सगळे घरी आले तेव्हा चोहीकडे अंधारच होता. पॅट्रीकने दाखविलेल्या कारच्या दिव्यांच्या उजेडात शैलाने दरवाजा उघडला. पाहतो तर काय! नातालबाई झोपाळ्यावरच गाढ झोपून गेल्या होत्या.
‘बघा नेहमी तक्रार करतात मला झोप लागत नाही म्हणून. आता एवढा गेटचा आणि गाडीचा आवाज ऐकूनसुद्धा त्यांना जाग आली नाही. नाटकं असतात नुसती.’ शैला करवादली.
‘अहो आई, उठा आता. घरात चला. उगाच लोकांना तमाशा नको.’
‘अगं होऽऽ होऽ. किती बोलतेस? मी उठवतो तिला. तू हो आत.’ पॅट्रीक बोलला आणि तिला उठवायला गेला.
‘आई उठ गं! घरात झोप चल आता.’
तरी ती उठत नाही पाहून त्याने तिला हाताला धरून हलवले. तशी ती एका बाजूला झाली.
‘शैलाऽऽ शैलाऽऽ पाणी आण गं! आईला बहुतेक चक्कर आली आहे.’
‘आता काय हे आणखी?’ शैला पाणी आणता-आणता वैतागून बोलली.
‘अगं संध्याकाळपासून उपाशीच झोपली आहे ना ती! म्हणून कदाचित चक्कर आली असेल तिला.’ पॅट्रीकने पाणी तिच्या चेहऱ्यावर िशपडले, पण नातालबाईच्या चेहऱ्यावर कोणतीच हालचाल दिसली नाही.
‘आईऽऽ आईऽऽ’ पॅट्रीकने मग जरा जोरातच नातालबाईंना हलवले. तसे तिचे शरीर एकीकडे कलंडले आणि हात झोपाळ्यावरून खाली झुलत राहिला.
बऱ्याच दिवसांपासूनचे नातालबाईचे गाऱ्हाणे देवाने आज मनावर घेतले होते आणि त्या आपल्या शेवटच्या प्रवासाला निघाल्या होत्या.. अगदी निवांत.