मेधा कुळकर्णी
विविध धर्मांनी वार्धक्याला केवळ शारीरिक अवस्था न मानता ते अनुभव, ज्ञान, आध्यात्मिक परिपक्वता यांचं प्रतीक मानलं आहे. प्रत्येक धर्मात या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडण्यात आले असले तरी वृद्ध पालकांच्या सेवेची महती अपार आहे; पण या धर्माचं आचरण रोजच्या जगण्या-व्यवहारात होतं का? की बदलता काळ, नव्या पिढीच्या बदलत्या गरजा यामुळे पालकांसाठीचा सेवाभावही विरत चालला आहे ? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
नांदेडचा तरुण कार्यकर्ता दीपक हाजुरिया सांगत होता की, तो तिथल्या गुरुद्वारात जेव्हा जेव्हा जातो, तेव्हा तेव्हा गुरुद्वाराने सुरू केलेल्या शीख धर्मीयांसाठीच्या वृद्धाश्रमासाठी थोडा वेळ देतो. तिथल्या आजी-आजोबांशी गप्पा मारतो. गुरुद्वाराकडून त्यांचा उत्तम सांभाळ होत असला तरी त्यांना तिथं बघून दीपकला वाईट वाटतं. त्यांची मुलं परदेशात, काहींची भारतात- महाराष्ट्रात वेगळ्या शहरांत आहेत. मुलांच्या आठवणींनी ते वृद्ध व्याकूळ होत असतात. दीपक म्हणाला की, शीख धर्मात आई-वडिलांची सेवा करणं हे प्रत्यक्ष ईश्वराच्या सेवेसारखं मानलं जातं. आई-वडिलांना उपेक्षून केलेली तीर्थयात्रा किंवा पूजा व्यर्थ मानली जाते.
‘‘माता पिता की सेवा करै, सोई निरमलु साचा…’’ ‘गुरू ग्रंथ साहिब’चे मोठे भाष्यकार भाई गुरदासजी यांचं हे वचन. त्यांनी लिहिलंय की, आईच्या ऋणातून मुक्त होणं अशक्य. आई नऊ महिने बाळाला पोटात वाढवते. अनेक दु:खं सोसून त्याला मोठं करते. त्यामुळे तिच्याप्रति कृतज्ञ राहणं, हे प्रत्येक शिखाचं कर्तव्यच. कौटुंबिक जीवनाला सर्वोपरी मानणारा, संन्यास घेऊन जंगलात जाण्यापेक्षा घरात राहून आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्याला आध्यात्मिक कर्म मानणारा शीख धर्म. ‘शीख रहत मर्यादा’ ही अधिकृत शीख धर्मातील आचारसंहिता आहे. या रहत मर्यादेनुसार आई-वडील हे पृथ्वीवरचे चालते-बोलते देवच. प्रत्येक शिखाने आपल्या आई-वडिलांची सेवा करणं हे धर्मकार्य आहे. हाच मोक्षप्राप्तीचा मार्ग.
सगळेच धर्म आई-वडिलांचा, कुटुंबातल्या वृद्धांचा आदर करणं आणि त्यांची काळजी घेणं हे मुलांचं कर्तव्य असल्याचं सांगतात. टोपल्यांमध्ये बसवून पालकांना खांद्यांवरून तीर्थयात्रेला वाहून नेणारा श्रावणबाळ हा आपल्यासाठी मातृ-पितृभक्तीचा आदर्श असतो. माता-पित्याची सेवा करताना साक्षात देव भेटायला आला तरी त्याला वाट बघायला लावणारा भक्त पुंडलिक. पित्याच्या आणि सावत्र मातेच्यादेखील आज्ञेचं पालन करणारा राम. यांच्या गोष्टी लहानपणी कानावर पडल्या नाहीत, असं होत नाही. ‘मातृ-पितृ देवो भव’ हे शाळकरी वयात शिकवलं जातंच. गौतम बुद्धांनी पाहिलेल्या चार दु:खद दृश्यांपैकी एक वृद्ध व्यक्ती होती. बौद्ध धर्मात करुणा आणि वृद्धांचा आदर या मूल्यांवर भर आहे.
गेली काही वर्षं आपल्याकडे धर्माचा आविष्कार जोरकसपणे होतोय. धार्मिक सण-उत्सव अपूर्व अशा उत्साहात साजरे होतायत. तरुण पिढी या जल्लोशात सामील असते. आपल्या राज्यघटनेने दिलेला धर्मपालनाचा हक्क आपण बजावतो. नागरिकांच्या धर्मश्रद्धांविषयी आदर बाळगलाच पाहिजे. तरीही हे खरोखरचं धर्मपालन आहे का, अशी चर्चा गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने होत राहते. या उत्सवी काळात ‘पालकांच्या पालकत्वा’संबंधात धर्माची शिकवण वास्तवात कितपत उतरतेय? ही चर्चा करणं रास्त ठरावं. दीपक हाजुरियाला शिकवण आणि आचरण यातल्या दरीबद्दल खेद वाटतो.
कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा मेहता यांनी जैन धर्मात कर्मकांड वाढत चालल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या धर्माचा मूळ गाभा असलेल्या अपरिग्रह, सहिष्णुता या तत्त्वांचा विसर लोकांना पडत चालल्याचं काहीवेळा दिसतं. मात्र कुटुंबांचं एकमेकांना धरून राहणं टिकून आहे. ज्येष्ठांचा आदर, त्यांना सांभाळणं हे जैन धर्मीयांमध्ये अगत्याने केलं जातं. एक तर आम्ही मंडळी पैसे राखून असल्याने सोयीसुविधा विकत घेता येतात. धर्माचा प्रभाव, समाजाचा दबाव यामुळे कुटुंबसंस्था टिकून आहे. व्यापार, शेती अशा व्यवसायांत वय वाढलं तरी निवृत्ती नसते. वाढत्या वयानुसार वृद्धांची फक्त भूमिका बदलते. त्यांची मतं, अनुभव याचं मोल तरुण पिढी जाणून असते. अशा वातावरणात आमच्याकडे म्हातारी माणसं वृद्धाश्रमात जाण्याची शक्यताच नसते. प्रत्येक जैन देवस्थानी गोरगरिबांसाठी राहण्याची चांगली व्यवस्था केलेली असते. फार तर अशा ठिकाणी काही वृद्ध जाऊन राहतात.’’
एका व्यक्तीने विचारलं, ‘‘अल्लाला सर्वात प्रिय असलेलं आचरण कुठलं?’’ प्रेषित मोहम्मद म्हणाले, ‘‘वेळेवर नमाज पढणं आणि आई-वडिलांशी आदरपूर्वक वागणं.’’ अल्लाची उपासना आणि पालकांशी उत्तम वागणं हे दोन्ही आदेश कुराणमध्ये एकत्र जोडलेले आहेत. दोन्ही एकाच तागडीत तोललंय. कुराणात अल्लाला परमपरमेश्वर मानल्यानंतर लगेचच आई-वडिलांशी सद्वर्तनाची आज्ञा येते. आई-वडिलांशी वाईट वागाल, तर तुमच्यासाठी जन्नतची दारं बंद होतील, अशी प्रेषित मोहम्मद यांची शिकवण.
या शिकवणीचा मोठा प्रभाव मुस्लीम जनांवर असल्याने वृद्धांचा सांभाळ हे धार्मिक कर्तव्य म्हणून घरोघरी बजावलं जातं. मुस्लीम व्यक्ती सहसा वृद्धाश्रमात दिसत नाही. मुंबईत, महाराष्ट्रात ठिकठिकाणी राहणार्या अनेक मुस्लीम मित्र-मैत्रिणींनी हेच सांगितलं. बदलत्या काळात त्यांच्याकडेही कुटुंबं विभक्त झाली आहेत. स्त्रिया शिकतायत, कामासाठी घराबाहेर पडतायत. तरीही आई-बापाची, कुटुंबातल्या इतर वृद्धांची जबाबदारी सगळे मिळून निभावतात.
प्रसिद्ध लेखक सॅबी परेरा यांच्याशी वसईच्या ख्रिश्चनांसंबंधी बोलणं झालं. ‘‘ख्रिश्चन धर्मामध्ये आई-वडिलांचा सांभाळ केला गेला पाहिजे, असं तत्त्व आहे. पण आता वसईतलं आमचं नानभाट हे गाव. त्यातली तीनशेपैकी ४२ जण परदेशी आहेत. म्हणजे जवळपास आठपैकी एक व्यक्ती. मोठमोठ्या घरांत फक्त म्हातारा-म्हातारी राहतायत. मुलं दूरदेशातून पैसे पाठवतात. नाताळला येऊन जातात. इथं आई-वडील खरोखरच एकाकी आहेत. प्रत्येक आजारपणात मुलं येऊ शकत नाहीत. ही त्यांची सल असते. तरीही, आत्ता थोडी तरी तरुण मुलं गावात आहेत. पण पुढे तर तितकीही राहणार नाहीत, असं वाटतं. आत्ता पन्नाशी-साठीत असणार्यांचं म्हातारपण आणखी वाईट असणार.’’ ही स्थिती वसईपुरती नाहीच; सर्वत्र आहे.
‘‘तू आपल्या बापाचा-आईचा मान राख म्हणजे तुझं आयुष्य मोठं होईल.’’ बायबलमधल्या ‘दहा आज्ञां’पैकी ही एक महत्त्वाची आज्ञा. विशेष म्हणजे, इथं देवाने माणसाला दीर्घायुष्याचं फळ जिवंतपणी, इहलोकीच देऊ केलंय, मृत्यूपश्चात, परलोकी नाही. आईने सोसलेले कष्ट आणि वडिलांचं छत्र हे इथं देवाचे आशीर्वाद मानले जातात. मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या उपकारांची परतफेड म्हणून त्यांची सेवा करणं हे देवासाठी पवित्र, अतिशय आवडतं कर्तव्य आहे. ख्रिस्ती धर्मात ‘पालकांचा सन्मान’ हा केवळ सामाजिक शिष्टाचार नाही, स्वर्गप्राप्तीच्या मार्गातला एक अनिवार्य टप्पा आहे.
मध्यंतरी मुंबईतील दिंडोशीत गणेशोत्सवातल्या एका अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमाला जाणं झालं. मध्यमवयीन, मध्यमवर्गीय ्त्रिरया-पुरुष जमले होते. या स्त्रियांचा बचत गटही आहे. देव-धर्म-उत्सव यावर चर्चा सुरू झाली. एक-दोन कुटुंबं चारधाम यात्रेला निघणार होती. समाजात धर्माचा धाक कितपत राहिलाय? हा प्रश्न विचारल्यावर लोकांनी बरेच रोचक मुद्दे मांडले. हिंदू धर्मात पालकांची सेवा हे कौटुंबिक ऋणाची परतफेड मानलं जातं. बरेचसे लोक तसं वागतातदेखील. आपल्याकडे घरकामाला येणार्या स्त्रिया त्यांच्या आई-बापाला, सासू-सासर्याला तोकड्या साधनसुविधांसह सांभाळतात. अर्थात अप्रिय घटनाही घडतात. घरच्या गणपतीला कौतुकाने मुलगा-सुनेला बोलावलं आणि त्यांनीच आई-बापाच्या नावावरचं घर बळकावलं, हे घडतं.
राम मंदिर बघायला लोक अयोध्येला जातात. तेव्हा रामाची माता-पित्यावरची निष्ठा नजरेआड करतात का? रामायण-महाभारताची पारायणं करणार्या वैशाली म्हणाल्या, ‘‘रामाने राज्यत्याग करून वनवासात जाणं, हे केवळ आज्ञापालन नव्हतं. ती एक नैतिक निवड होती. वैयक्तिक सुखापेक्षा कौटुंबिक कर्तव्य आणि वचन यांना त्याने प्राधान्य दिलं. भरतानेही राज्य करायला नकार देऊन, रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून तेच केलं. राम हा केवळ पूजाविषय नाही, आचरणाचा आदर्श आहे.’’
आणखी काही मुद्दे आले. कुंभमेळा, पंढरीची वारी इथं आई-बापांना, तर वाराणसी, वृंदावन इथं विधवा आईला सोडून देणारे पाल्य असतात. मुलांनी, विशेषत: मुलग्यांनी पालकांच्या अंत्यविधीची मुख्य जबाबदारी स्वीकारावी, असंही धर्म सांगतो. या कार्यक्रमात पुण्यातल्या पिंपळे सौदागरहून आलेलं एक दाम्पत्य होतं. त्या परिसरात ‘एनआरआय’ मुलांचे पालक मोठ्या संख्येने राहतात. तिथल्या स्मशानभूमीत परदेशातून अंत्यसंस्कार बघता येईल, अशी व्यवस्था केली आहे तेवढ्यासाठी आपापल्या देशांतून मुलांना यायला नको. धर्माचा धाक तर राहिला नाहीच. उलट धार्मिक शिकवणीच्या विपरीत आचरण या उदाहरणांतून दिसतं. अर्थातच कोणत्याही लोकांच्या आचरणाविषयी सरसकट नकारात्मक निष्कर्ष काढू नये. कारण सामाजिक वास्तव गुंतागुंतीचं असतं. धार्मिक उत्सवांचं ठळक दर्शन सार्वजनिकरीत्या घडत असलं तरी रोजच्या जगण्या-व्यवहारात धर्माचा प्रभाव कमी होत चाललाय, असं निरीक्षण गप्पांमध्ये नोंदवलं गेलं. आणि हो, धार्मिक तत्त्व आणि समाजवास्तव यातलं अंतर केवळ ‘वृद्धांचा सांभाळ’ या एका विषयापुरतं मर्यादित नाहीच. देव, धर्म हे उत्सवांमध्ये प्रकाशी आणि ‘हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी’ अशी समाजाची स्थिती! हेही एकाने नोंदवलं.
‘भारतात धर्माचा घटता पगडा’ यावर प्यू रिसर्च सेंटर आणि EBSCOhost
संशोधन मंच यांचे अनुक्रमे २०२२ आणि २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेले अहवाल आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय समाजात धार्मिक शिकवण आणि सामाजिक वास्तव यातली दरी जातींच्या उतरंडीत सर्वात तीव्रपणे दिसून आली. आणि आता शहरीकरण, बदलतं अर्थकारण, स्त्रियांचं घराबाहेर पडणं, विभक्त कुटुंबांकडे वाटचाल यामुळे धर्माचा थेट जगण्याशी बांधलेला धागा उसवला आहे, असं त्यात म्हटलंय. ‘मिनिंगफुल एजिंग’ या ऑस्ट्रेलियातल्या संस्थेने तिथल्या नागरिकांसाठी बौद्ध, हिंदू, इस्लाम, शीख, ज्यू, ख्रिश्चन या धर्मांच्या तत्त्वांना उजाळा देणारी मार्गदर्शिका तयार केली आहे. विविध धर्मांनी वार्धक्याला केवळ शारीरिक अवस्था न मानता ते अनुभव, ज्ञान, आध्यात्मिक परिपक्वता यांचं प्रतीक मानलं आहे. वृद्धांनीही याचं भान बाळगायला हवं. त्यांच्या वागण्यात ते उतरायला हवं.
थोडक्यात, शिक्षण, विज्ञान, नागरी जीवनाचे नियम, कायदे, अर्थकारण, जागतिकीकरण, नव्या पिढीच्या बदलत्या गरजा या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून धर्माची पकड ढिली होत चालली आहे. धर्माच्या पगड्याविना माणसांचे नातेसंबंध प्रगल्भ राहण्यासाठी, कुटुंब आणि समाज सुसंस्कृत राहण्यासाठी माणुसकी, सहानुभूती, आदर, जबाबदारी, सहकार्य, न्याय, क्षमाशीलता, ऋजुता यांसारखी मूल्य आपल्या समाजात रुजून फळलेली आहेतच. त्यांचं संवर्धन व्हावं. आई-वडील, भावंडं, जोडीदार, मित्र-मैत्रिणी यांच्यातले भावबंध, माणसा-माणसांमधलं प्रेम, विश्वास, जवळीक हे सारं कोणत्याही दुराव्याला पुरून उरतं. आणि हे आपल्यापाशी असतंच की. ‘मोको कहां ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में’ या दोह्यात कबीरांनी म्हटल्यानुसार!
kulmedha@gmail.com
