रुचिरा सावंत

१५० पेक्षा जास्त संशोधन निबंध लिहिलेल्या आणि ‘प्रायोगिक भौतिकशास्त्र’ या फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या, पण तितक्याच महत्त्वाच्या विषयात भारतातील आघाडीच्या वैज्ञानिकांपैकी एक ठरलेल्या डॉ. शिखा वर्मा. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स’मध्ये त्यांनी ‘सरफेस सायन्स’ या विषयाला वाहिलेली स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केली असून विज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी पॉलिसी दृष्टिकोनातून त्या प्रयत्न करत आहेत. विज्ञानाचा अभ्यास हा केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न राहाता तो आपल्या विचारसरणीत व आचरणात रुजवणं महत्त्वाचं आहे, असं सांगणाऱ्या डॉ. शिखा वर्मा यांच्याविषयी..

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
ग्रामविकासाची कहाणी

‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये अभियंता असणाऱ्या घनश्यामदास वर्मा यांची कायम फिरतीची नोकरी असायची. एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ते आपली पत्नी सरोजिनी वर्मा, मुलगा प्रदीप आणि शेंडेफळ लेक शिखा यांच्यासोबत सातत्यानं स्थलांतर करायचे.
सरोजिनी यांना वाचनाचं भयंकर वेड. त्या नोकरी करत नसत, परंतु ज्या शहरात बदली होईल तिथली वाचनालयं त्या सर्वात आधी शोधायच्या. सरोजिनी यांना त्यांच्या मुलांनी कायम वाचताना, नवीन गोष्टी शिकताना पाहिलं. घनश्यामदास यांना विज्ञानाविषयी विशेष कुतूहल आणि प्रेम होतं. आपल्या दोन्ही मुलांना ते फार आवडीनं विज्ञान शिकवायचे. आपलं भौतिकशास्त्राचं वेड त्यांनी दोन्ही मुलांनाही दिलं. साठीच्या दशकात या दाम्पत्यानं ग्रहणासारख्या घटनांमागच्या शास्त्रीय कारणांविषयी आपल्या शालेय मुलांबरोबर आवर्जून चर्चा केल्या. वैज्ञानिक दृष्टिकोन, विचारसरणी आपल्या मुलांसाठी दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून रुजवली.

उपलब्ध झालेल्या पोषक वातावरणामुळे दोघं भावंडं विज्ञान शाखेत अभ्यास करू लागली आणि त्यापैकी शिखा वैज्ञानिक झाल्या. प्रायोगिक भौतिकशास्त्रसारख्या फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या, पण तितक्याच महत्त्वाच्या विषयात भारतातल्या आघाडीच्या वैज्ञानिकांपैकी एक ठरलेल्या डॉ. शिखा वर्मा यांच्या प्रवासात त्यांच्या या कौटुंबिक पार्श्वभूमीचा व समृद्ध अनुभवांचा फार मोठा वाटा आहे. विज्ञानाचा अभ्यास हा केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न राहता तो आपल्या विचारसरणीत व आचरणात रुजवणं त्यांना आवश्यक वाटतं यासाठी अनुभवांची हीच शिदोरी कारणीभूत असावी.
इयत्ता बारावीपर्यंत पाच शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे कोण्या एका शहरात असणारं जिवलग व दीर्घकाळ टिकेल असं मैत्र जरी त्यांनी अनुभवलं नसलं, तरी सततचा प्रवास त्यांच्यासाठी सवयीचा झाला आणि त्याचमुळे त्या जगण्याकडे, प्रवासाकडे जागतिक दृष्टिकोनातून पाहू शकल्या. आपली मुळं कुठल्याच एका शहरात किंवा गावात नाहीत तर आपण जितक्या ठिकाणी गेलो, राहिलो त्या प्रत्येक ठिकाणचा अंश आपल्यात आहे. या साऱ्या जागा आपल्या आहेत असा एक वैश्विक विचार त्यांच्यात याच प्रवासामुळे रुजला. पुढे शिक्षणाच्या व संशोधनाच्या निमित्तानं शहरं ओलांडून परदेशी भरारी घेतली, तेव्हा हाच दृष्टिकोन घेऊन त्या वाटचाल करत राहिल्या.

लखनौच्या ‘इसाबेला थॉबर्न’ (आयटी) महाविद्यालयातून भौतिकशास्त्र या विषयात पदवी संपादन करत असताना त्यांच्या एका मैत्रिणीनं ‘आयआयटी कानपूर’मध्ये मूलभूत विज्ञान व भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अर्ज करायचं ठरवलं. त्या छोटय़ा शहरात या संधीविषयी तिच्याकडून पहिल्यांदा ऐकल्यावर शिखा यांनीसुद्धा उत्साहानं अर्ज केला. गंमत म्हणजे परीक्षेला ती मैत्रीण आलीच नाही. शिखा यांनी मात्र त्याच्या सगळय़ा पायऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या व ‘आयआयटी कानपूर’मध्ये प्रवेश मिळवला. ‘आयआयटी’मधलं वातावरण फार वेगळं होतं. आजवर महाविद्यालय व विद्यापीठामध्ये आलेला अनुभव व इथलं वातावरण यात बराच फरक होता, पण नव्या परिस्थितीबरोबर जुळवून घेण्याची अवगत झालेली कला इथेही कामी आली. प्रोफेसर जी. के. मेहता यांचा ‘एक्सपिरिमेंटल मेथड्स’ हा कोर्स त्यांना अभ्यासाला होता. हा विषय शिकवताना प्रोफेसर केवळ प्रयोग करण्याच्या पद्धतींविषयी, प्रायोगिक संशोधनाविषयी बोलायचे नाहीत तर विद्यार्थ्यांना विविध प्रयोगशाळांमध्ये काम करायला लावायचे. स्वत: गोष्टी करून बघण्याची वडिलांकडून आलेली ती सवय त्यामुळे जोपासली गेली आणि पुढे या विषयाची संशोधनासाठी निवड करण्यासाठी कारणीभूतसुद्धा ठरली. ‘आयआयटी कानपूर’नं त्यांना जशी त्यांच्या संशोधनाच्या विषयाची गाठ घालून दिली त्याचप्रमाणे त्यांच्या पतीचीही भेट इथेच झाली. अजित मोहन हे तेव्हा ‘आयआयटी’मध्ये त्यांना एक वर्ष सिनिअर होते. मित्र होते. मैत्री प्रेमात बदलली आणि त्यांनी पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर लगेच विवाह केला. अमेरिकेतील ‘सिरॅकस’ विद्यापीठात दोघांनीही ‘पीएच.डी.’साठी प्रवेश मिळवला.

पीएच.डी. अभ्यासादरम्यान त्यांनी ‘अल्ट्राव्हायोलेट फोटोएमिशन स्पेक्ट्रोस्कोपी’ आणि ‘सिंक्रोटोन रेडिएशन’ या पद्धतींचा वापर करून चांदीवर पाऱ्याचा पातळ थर दिल्यावर मिळणारे इलेक्रॉनिक संरूपण व बँड स्ट्रक्चरचा अभ्यास केला. १९९० मध्ये हा अभ्यासक्रम संपवल्यानंतर पोस्ट डॉक्टरल अभ्यासासाठी आधी क्लेव्हलँड येथील ‘केस वेस्टर्न विद्यापीठ’ आणि त्यानंतर मिलवॉकी येथील ‘विस्कॉन्स’ विद्यापीठात त्यांनी संशोधन केलं. या दरम्यानची चार वर्ष त्या व त्यांचे पती अमेरिकेतल्या वेगवेगळय़ा विद्यापीठांमध्ये काम करत आपलं दूरस्थ कुटुंब सांभाळत होते. या काळात ‘एक्स रे फोटोइलेक्ट्रॉन डायफ्रॅक्शन’चा वापर करून वेगवेगळय़ा ऑक्साइड्स संदर्भात ‘कोर लेव्हल फोटोएमिशन स्पेक्ट्रोस्कोपी’चा अभ्यास त्यांनी केला. कॅलिफोर्निया येथील ‘सांता बारबारा’ विद्यापीठात त्यांनी १९९३ पासून ‘क्वांटम डॉट स्ट्रक्चर’चा अभ्यास केला.

संशोधनासाठी चार वर्ष एकमेकांपासून दूर राहून काम केल्यानंतर डॉ. शिखा आणि डॉ. अजित यांनी एकत्र काम करता येण्याचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. भारतातील विद्यापीठं व संशोधन संस्थांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकीसाठी व संशोधनासाठी अर्ज करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असं त्यांना वाटलं. त्याच वेळी भुवनेश्वर येथील ‘भारतीय भौतिकशास्त्र संशोधन संस्था’ (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स -‘आयओपी’) या संस्थेमध्ये त्या दोघांनाही एकत्र नोकरी मिळाली. १९९४ मध्ये त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी त्या नोकरीसाठी रुजू झाल्या आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली.

डॉ. अजित आणि डॉ. शिखा यांना एकाच संशोधन संस्थेमध्ये नोकरी मिळाली हे त्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं वाटतं. बऱ्याचशा संशोधन संस्थांमध्ये पती व पत्नीस ते पात्र असतानाही एकाच संस्थेमध्ये नोकरी न देण्याचा पाळला जाणारा अलिखित नियम अनेक वैज्ञानिक जोडप्यांसाठी त्रासदायक आहेच, पण सोबतच त्यांची ऊर्जा व उत्साह यावरही परिणाम करतो. वैज्ञानिकांना संशोधन करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करत असताना या सहसा दुर्लक्षिल्या जाणाऱ्या, महत्त्वाच्या विषयाविषयी त्या ठामपणे बोलतात. या सुविधा अनेक स्त्रियांना विज्ञान क्षेत्रात टिकून राहाण्यासाठी, संशोधन करत राहाण्यासाठी प्रेरणादायी असतील यावर त्यांचा विश्वास आहे. आपल्या उदाहरणावरून त्या हे पटवून देतात.
‘आयओपी’मधले सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. आई म्हणून लहान बाळाची जबाबदारी होतीच, पण प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ (एक्सपेरिमेंटल फिजिसिस्ट) म्हणून पुरेशा प्रणाली व साधनं उपलब्ध नसताना, उपलब्ध उपकरणांचा वापर करत संशोधन सुरू ठेवणं हेही एक मोठं आव्हान होतं. आपल्या विभागामध्ये एकमेव स्त्री प्रायोगिक भौतिक शास्त्रज्ञ म्हणून काम सुरू करणाऱ्या डॉ. शिखा यांनी संस्थेमध्ये उपलब्ध असणारे एक्सिलिरेटर्स, रुदरफर्ड बॅक स्पेक्ट्रोमेट्रीसारख्या प्रणाली व उपकरणांचा अभ्यास केला. त्या नव्यानं शिकून घेतल्या व आपल्या संशोधनात खंड पडू दिला नाही. डॉ. शिखा यांचे सतत सुरू असलेले शास्त्रीय प्रयोग, लहान बाळाचं संगोपन आणि नव्या संस्थेमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठीची मेहनत, अशी कामाची जुगलबंदी त्या काळात सुरू होती. पतीच्या सहकार्यामुळे व पाठिंब्यामुळे त्यांना हे सगळं व्यवस्थित सांभाळता आलं. समजूतदार पतीप्रमाणेच, या एका संस्थेमध्ये त्यांना करता आलेलं कामही त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरलं. प्रायोगिक वैज्ञानिक असल्यामुळे त्यांचे प्रयोग कोणत्याही वेळी चालतात. कधी कधी ते रात्रभर सुरू असतात. काही वेळा तर आवश्यक साधनं व उपकरणं ‘आयओपी’ मध्ये उपलब्ध नसली तर देशपरदेशातील प्रयोगशाळांना भेट देणं अनिवार्य असतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तर हे फार व्हायचं. अशा वेळी ‘आयओपी’चे तत्कालीन संचालक डॉ. व्ही. एस. राममूर्थी यांच्यासारखे समजूतदार आणि प्रेरणादायी वरिष्ठ पाठीशी उभे राहायचे. स्त्रियांचं या क्षेत्रातलं पदार्पण वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी ही अशी ‘सपोर्ट सिस्टिम’ प्रत्येक स्त्री वैज्ञानिकेला मिळायला हवी असं त्या अधोरेखित करतात.

‘कन्डेन्स मॅटर’, ‘सरफेस सायन्स’, ‘नॅनो सायन्स’, ‘नॅनो बायो इन्टरॅक्शन’ या विषयात त्या प्रायोगिक भौतिक शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. त्यापैकी ‘सरफेस सायन्स’ या विषयात संशोधन करत असताना कालांतरानं डॉ. शिखा यांनी‘आयओपी’मध्ये या विषयाला वाहिलेली एक प्रयोगशाळा सुरू केली असून या विषयात त्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जोडीनं पुढील संशोधन तिथे करत आहेत. एखाद्या मटेरियलच्या पृष्ठभागामध्ये जर आपण बदल केला तर त्या मटेरियलचे गुणधर्म बदलतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ‘सरफेस सायन्स’ या विषयात याचाच खोलात जाऊन अभ्यास केला जातो. काही उदाहरणं देऊन हे त्या समजावून सांगतात. ‘टायटॅनियम ऑक्साइड’ या सेमिकंडक्टरच्या ‘बँड गॅप’मध्ये बदल करून सोलर सेलची कार्यक्षमता वाढवता येते, हे एका संशोधनादरम्यान त्यांच्या ध्यानात आलं. उत्कल विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञांसोबत त्यांनी वर्तुळाकार ‘डीएनए’वर संशोधन केलं. त्यांनी त्या ‘डीएनए’मध्ये पारा मिळवला. आणि त्यातून निर्माण झालेल्या रासायनिक अभिक्रिया व पॅरा आणि डीएनए यांच्यातील परस्पर अभिक्रिया यांचा अभ्यास केला. अभ्यासांती अनेक चित्तवेधक गोष्टी लक्षात आल्या. वर्तुळाकार डीएनए रेखीय (लिनिअर) डीएनएमध्ये रूपांतरित होणं हे त्यापैकीच एक. या डीएनए स्ट्रक्चरचा उपयोग ‘डीएनए’मधील मक्र्युरी डिटेक्टर म्हणून करता येऊ शकतो. ‘डीएनए’मध्ये उपलब्ध असणारं मक्र्युरीचं प्रमाण याचा वापर करून शोधता येऊ शकेल. त्याचप्रमाणे पाण्यातल्या प्रदूषणाचं प्रमाणही ध्यानात येईल. ‘सरफेस सायन्स’ या विषयात होत असणाऱ्या संशोधनांचा आणि प्रयोगांची मोठय़ा प्रमाणावर अॅप्लिकेशन्स आहेत. रंग उद्योगांपासून ते इलेक्ट्र्ॉनिक्सपर्यंत, कम्युनिकेशनपासून ते अवकाश संशोधनापर्यंत तुम्ही म्हणाल त्या क्षेत्रात. प्रयोग करत राहाणं महत्त्वाचं आणि त्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं आणखी महत्त्वाचं. विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक संशोधनाची आवड रुजवण्यासाठी त्याची अॅप्लिकेशन्स समजावून सांगणं, अधोरेखित करणं आवश्यक आहे असा त्यांचा आग्रह आहे.

१५० पेक्षा जास्त संशोधन निबंध लिहिलेल्या आणि आपल्या संस्थेमध्ये जवळपास २३ वर्ष प्रायोगिक वैज्ञानिक म्हणून कार्यरत असणाऱ्या एकमेव स्त्री वैज्ञानिक असणाऱ्या डॉ. शिखा या क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक समित्यांचा भाग आहेत. यासाठी पॉलिसी दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे, असं सांगताना तशी पावलंही उचलत आहेत.

प्रायोगिक भौतिकशास्त्रासारख्या क्षेत्रात तरुण- तरुणींचा सहभाग वाढेल याची त्यांना खात्री असून आपल्या या स्वप्नाच्या दिशेनं त्यांनी आशादायी वाटचाल सुरू ठेवली आहे, जी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
postcardsfromruchira@gmail.com