रुचिरा सावंत
जीवशास्त्र आणि शरीरशास्त्र हा खूप व्यापक विषय. मानवी आरोग्याशी निगडित असलेल्या विविध समस्यांच्या अनुषंगानं आपलं शरीर कसं काम करतं, या मार्गानं जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवास मोठा रंजक आहे. एका जिज्ञासू मुलीला हाच प्रवास यशस्वी वैज्ञानिका होण्यापर्यंत घेऊन गेला. त्या डॉ. रिशीता चंगेडे यांचा हा प्रवास..

शाळेत अभ्यासाचे विविध विषय आवडणारे ढोबळमानानं दोन गट असतात. पाठांतर करायला लागणारे, उजळणी करायला लागतील असे इतिहासासारखे विषय आवडीनं अभ्यासणारे विद्यार्थी आणि विज्ञान, गणितासारखे तर्कशुद्ध विषय आवडणारे विद्यार्थी.मुंबईच्या वाळकेश्वर भागातल्या ‘गोपी बिर्ला मेमोरियल शाळे’त शिकणारी रिशीता चंगेडे यांपैकी दुसऱ्या वर्गात मोडणारी. गंमत म्हणजे या विषयांचा फारसा अभ्यास करावा लागत नाही, व्यवस्थित समजून घेतलं की पाठांतराची चिंताही नसते, या कारणामुळे तिची या विषयांची आवड वाढत गेली असं तिचं म्हणणं आहे. ही शाळेत वर्गातल्या लक्षवेधी विद्यार्थ्यांमध्ये येत नसली, तरी विज्ञान प्रचंड आवडणारी, तार्किक विचार करणारी आणि खूप चौकस मुलगी. तिला खूप प्रश्न पडायचे आणि या प्रश्नांची उत्तरं आपण स्वत: शोधावीत असं तिला वाटायचं.

ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती

इंटरनेट नसतानाच्या त्या काळात छोटय़ा रिशीताला तिची आई लहान मुलांसाठीचे माहितीकोश वापरून पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं स्वत: शोधायला लावायची. शब्दकोशांपासून कादंबऱ्यांपर्यंत सगळं मन लावून वाचणाऱ्या रिशीतानं कदाचित याच गोष्टीपासून प्रेरणा घेऊन विश्वासंदर्भात तिला पडणाऱ्या प्रश्नांची उकल स्वत:च करायची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जीवशास्त्रातल्या कोडय़ांची उकल करण्यात तिला मौज वाटली आणि मुंबईच्या ‘झेव्हिअर्स’मध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’त (टीआयएफआर) पदव्युत्तर शिक्षणासाठी दाखल झाली.
‘सी.ए.’ वडील आणि योग प्रशिक्षक आई असलेल्या रिशीताच्या मारवाडी कुटुंबात विज्ञानाची पार्श्वभूमी मुळीच नव्हती. पण पदवीच्या शिक्षणावेळी भेटलेल्या एका जीवशास्त्राच्या प्राध्यापिकेनं तिला ‘टीआयएफआर’विषयी सांगितलं आणि संशोधनाच्या समृद्ध जगाची कवाडं तिच्यासाठी उघडली गेली. तत्क्षणी त्या मुलीचा एक यशस्वी वैज्ञानिक होण्याकडे प्रवास सुरू झाला. ‘टीआयएफआर’ ही वैज्ञानिक वर्तुळात फार आघाडीची आणि सन्माननीय अशी संस्था असली तरी सर्वसामान्यांमध्ये या संस्थेविषयी फारशी माहिती तेव्हा नव्हती. रिशीतांच्या मते ती वास्तू आणि तिथलं आवार म्हणजे अगदी परीस. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला समृद्ध करणारा. आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलणारा. विविध क्षेत्रं गुण्यागोविंदानं एकत्र नांदणारा. तिथल्या त्या छान कॅन्टीनमध्ये एकत्र बसून जेवण करणारी वेगवेगळय़ा विषयांतली जगभरातली हुशार माणसं. दिवसागणिक विश्वातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्जनशील पद्धती आणि त्या संदर्भातल्या चर्चा. हे सारंच रिशीतांसाठी खूप प्रेरणादायी होतं.


‘टीआयएफआर’मधल्या वेगवगळय़ा सभांना जगाच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर यायचे. तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद, सांगितलेल्या ‘इस्रो’ स्थापनेच्या रोमांचक कथा आणि अलवारपणे उलगडलेला आपला जीवनप्रवास आठवताना रिशीता आजही भूतकाळात रमतात, भारावून जातात. विविध क्षेत्रांतल्या नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांसमोर मांडलेल्या विविध प्रभावशाली कथा, त्यांनी शोधलेल्या उत्तरांपर्यंतच्या प्रवासाचा अनुभव आणि त्यातून दिलेले धडे हे सारंच त्या संस्थेत त्यांना अनुभवता आलं. वैज्ञानिक प्रश्नांची उकल कशी करतात हे त्यांच्याकडूनच समजून घेता आलं. यामुळे विज्ञानावरचा विश्वास वृद्धिंगत झाला. जगातल्या मूलभूत प्रश्नांची उकल करणाऱ्या, त्यासाठी हातभार लावणाऱ्या एका महत्त्वपूर्ण संस्थेचा आपण एक भाग आहोत ही भावनाच त्यांना स्फूर्ती देणारी ठरली. तिथल्या या बौद्धिक वातावरणाच्या जोडीनं सर्वत्र भरून राहिलेली सर्जनशीलता आणि कलात्मकता रिशीता यांना मुळीच विसरता येणार नाही. तिथले माळीबुवा ज्या प्रेमानं आणि कलात्मक दृष्टिकोनातून ती बाग फुलवायचे ते आठवून ‘ते जगातले सर्वोत्तम सर्जनशील माळीबुवा होते,’ असं त्या मिश्कील हसत जाहीर करतात. या संस्थेनं माणूस म्हणून जसं त्यांना समृद्ध केलं, तशीच प्रेरणादायी वैज्ञानिकांची गाठ घालून दिली. डॉ. कृशानू रे यांच्यासारख्या अनुभवी वैज्ञानिकांसमवेत काम करण्याची संधी त्यांना याच ठिकाणी मिळाली. इथेच त्यांची प्रो. वेरॉनिका रॉड्रिग्जसारख्या प्रभावशाली स्त्री वैज्ञानिकांशी भेट झाली. प्रत्येकाला आपल्या आवाक्यानुसार हव्या त्या दिशेनं कल्पना करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या, कुठलाही प्रश्न चुकीचा नसतो यावर खऱ्या अर्थानं विश्वास ठेवणाऱ्या त्या वैज्ञानिकेनं तिथल्या नव्या फळीला कधी बंधनमुक्त विचार करण्यास प्रोत्साहन देत, तर कधी ‘छडीवाल्या बाई’ होत आकार दिला. त्यांच्या विचारांना आणि कार्याला अधिकारवाणीनं दिशा दिली.


आपल्या पेशींमध्ये असणारी प्रथिनं त्यांचा योग्य पत्ता कसा शोधत असतील या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करायचं रिशीता यांनी ठरवलं. जर ही प्रथिनं योग्य पद्धतीनं विभागली गेली नाहीत आणि योग्य पत्त्यावर पोहोचली नाहीत, तर ‘स्टेम सेल्स’ म्हणजेच शरीरातल्या मूळ पेशींच्या विभाजनामध्ये आणि निर्मितीमध्येही अडचण येते. यामुळे संपूर्ण पद्धतीमध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. या प्रक्रियेमध्ये कोणत्या जनुकांची भूमिका असते आणि त्या जनुकांमधला लहानसा बदलही कशा प्रकारे परिणामकारक ठरू शकेल याचा अभ्यास करत त्यामागचं भौतिकशास्त्र समजून घेण्याची धडपड वैज्ञानिकांच्या या चमूनं केली. या संशोधन प्रकल्पामुळे संशोधन म्हणजे नेमकं काय, कशा प्रकारचे प्रश्न आपण विचारायला हवेत आणि कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू शकतो याचा अंदाज त्यांना आला.


सिंगापूरच्या ‘एस्टार’ (ASTAR) आणि ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’मध्ये ‘पीएच.डी.’साठी संशोधन करत असताना त्यांनी अशाच एका महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नावर आपलं लक्ष केंद्रित केलं. खऱ्या आयुष्यातले खरेखुरे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचं गांभीर्य लक्षात येण्यासाठी, त्याचा अभ्यास करता येण्यासाठी काही प्रायोगिक मंचांची उभारणी केली जाते. त्याला ‘मॉडेल सिस्टीम’ असंही म्हणतात. शरीरातल्या कर्करोगग्रस्त उती कर्करोगपीडित पेशींचा प्रसार इतर उती आणि अवयवांपर्यंत करत असतात. त्या उतींचा अभ्यास करण्यासाठी आणि ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी रिशीता यांनीही अशाच मॉडेल सिस्टीमचा वापर केला. पेशींचा एक समूह मूळ उतीपासून वेगळा होऊन प्रवास सुरू करतो. त्या वेळी कोणत्या प्रकारच्या सांकेतिक खुणा या पेशी देतात आणि त्यांचा अर्थ काय असतो हे जाणून घेऊ शकणारा, मांडू शकणारा हा जगातला पहिला प्रकल्प ठरला. त्यासाठी त्यांनी ‘बायोसेन्सर्स’ बनवले. या बायोसेन्सर्सचा वापर करून नेमक्या वेळी या सांकेतिक खुणा त्यांना पाहता आल्या. याबरोबरच त्यादरम्यान खरोखर काय घडतं याचा अंदाज व्यक्त करण्यात, पाहण्यात आणि ते सर्वासमोर मांडण्यात त्यांना यश मिळालं.


आपल्या ‘पीएच.डी.’नंतर डॉ. रिशीता यांनी कोलंबिया विद्यापीठातले लास्कर पारितोषिक विजेते वैज्ञानिक डॉ. मायकेल शिट्झ यांच्याबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत काम सुरू केलं. तिथे त्यांनी जैवतंत्रज्ञान विषयातल्या ४-५ गोष्टींवर काम केलं. भौतिकशास्त्र, मटेरियल सायन्स आणि जीवशास्त्र यांचा मेळ साधून इथे संशोधन करण्याची त्यांची इच्छा होती आणि तशीच संधी त्यांना मिळाली. विविध पेशी, उती, पेशी समूह एकमेकांना काही ठरावीक प्रकारच्या पेशी समूहांनी जोडलेले असतात. त्यांना संयोजी उती असं म्हणतात. या संयोजी उती विविध प्रकारच्या असतात. हाडं आणि रक्त यासुद्धा संयोजी उतीच आहेत. रिशीता यांच्या समूहाला असा प्रश्न पडला, की या वेगवेगळय़ा प्रकारच्या उती शरीराच्या कुठल्या भागात कुठल्या प्रकारची संयोजी उती निर्माण करायची हे कसं बरं ठरवत असतील? या रचनेमधली योजना (डिझाइन प्रिन्सिपल) काय असेल हे जाणून घेणं त्यांना फार महत्त्वाचं वाटलं. कुठल्या भागात कुठल्या संयोजी उती निर्माण करायच्या हा निर्णय कसा घेतला जात असेल, हे कुतूहल शमवण्याचा प्रयत्न झाला. पेशींची अवनती कशी होते, याबरोबरीनं पेशींची पुनर्निर्मिती, अशा अनेक घटनांची कारणमीमांसा झाली. हे पाहू शकणारा तो वैज्ञानिकांचा पहिला समूह नसला तरी याविषयी भाष्य करणारे ते जागतिक पातळीवर पहिले ठरले. कोणतीही उती असली, तरी सर्वात आधी या सांकेतिक खुणांचं जाळं पसरवलं जातं आणि त्या पेशींना त्या सांकेतिक खुणांद्वारे चिमटे घेऊन त्या पेशींची माहिती मिळवली जाते. या विषयावर त्यांनी ‘द नेचर’, ‘मटेरियल’ अशा महत्त्वाच्या जर्नल्समधून शोधप्रबंध लिहिले. याबरोबरच रासायनिक संकेतांच्या बरोबरीनं त्यांनी भौतिक संकेत समजून घेण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी विविध गणितीय आकृत्यांचा विचार केला. भौतिक संकेतांना पेशी कशा प्रतिक्रिया देतात हे समजून घेऊन त्याचा वापर करून पेशी पुनर्निर्मिती, पेशी अवनती, पेशीवाढीचा वेग वाढवणं, इतकंच नाही तर कर्करोगासारख्या आजारांवर उपायही करता येऊ शकेल. रासायनिक मिश्रणातून तयार केलेल्या औषधांच्या जोडीनं भौतिक संकेतांचा वापर करून पर्यायी औषधोपचार यातून विकसित होईल. जो कदाचित या दोहोंचा सुवर्णमध्य असेल. या विषयावर डॉ. रिशीता यांनी काही शोधप्रबंध लिहिले असून या विषयावरचं काम अजूनही सुरू आहे. ही एक खऱ्या अर्थानं वर्तमानाच्या थोडं पुढे जात भविष्याला कवेत घेणारी झेप आहे.
आरोग्य क्षेत्रामध्ये मोठा बदल होत आहे हे खरं असलं तरी या साऱ्या संशोधनाला प्रत्यक्षात येण्यासाठी बराच काळ जाणार आहे हे त्यांना माहीत आहे. मग खऱ्या जगातले कोणते प्रश्न आपण आता तातडीनं सोडवू शकू, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. थोर, मोठय़ा वैज्ञानिकांच्या सहवासात संशोधन करण्याचा पुरेसा अनुभव घेतल्यानंतर केलेल्या संशोधनाचा वापर खऱ्याखुऱ्या जगात झाला पाहिजे, आपला अभ्यास आणि संशोधन प्रयोगशाळेत अडकून पडता काम नये, या विचारातून त्यांनी ‘TeOra’ ( टीओरा) या विविध आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या स्टार्टअपची सिंगापूर इथे सुरुवात केली. सध्या बाजारात उपलब्ध असणारी आरोग्य आणि रोगांना नियंत्रित ठेवणारी संयुगं, खतं ही पर्यावरणपूरक नाहीत. जैवतंत्रज्ञान तसंच जीवशास्त्र विषयातल्या ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून टिकाऊ, जैविक व पर्यावरणपूरक पद्धतीनं संयुगांची निर्मिती करण्यासाठी हे स्टार्टअप एकनिष्ठ आहे. यासाठी निसर्गात उपलब्ध असणारी विविध संयुगं विविध पद्धतीनं वापरण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी तयार केलेली उत्पादनं सध्या चाचणीच्या टप्प्यात आहेत. याबरोबरच ही एका नव्या वैज्ञानिक प्रवासाची सुरुवात आहे.


या शतकात जीवशास्त्रामध्ये आमूलाग्र संशोधन होत आहे. या संशोधनाच्या आधारे विविध आजारांवर उपचार सापडत असतानाच त्यांची कारणमीमांसा करणंही शक्य होणार आहे. याबरोबर जीवशास्त्रातलं ज्ञान नैसर्गिक आणि शाश्वत उत्पादन निर्मितीसाठीही उपयोगात येणार आहे. डॉ. रिशीता चंगेडे आणि त्यांच्यासारखे प्रयत्न करत असलेले वैज्ञानिक येत्या काही वर्षांत भारत या क्षेत्रातल्या संशोधनाचं नेतृत्व करणाऱ्या देशांपैकी एक ठरू शकेल असा विश्वास देत आहेत.

‘‘जग फार वेगानं बदलतंय आणि या बदलाबरोबर अनेक नवे प्रश्न निर्माण होताहेत. प्रामाणिकपणे, सातत्यानं प्रश्न विचारायला हवेत. जोवर आपल्याला उत्तर शोधायचं असणारा, अस्वस्थ करणारा प्रश्न सापडत नाही तोवर.’’ असं त्या तरुणांना आवर्जून सांगतात. हे सांगत असताना स्वत:वर विश्वास ठेवत, आपला ‘कम्फर्ट झोन’ प्रत्येक पातळीवर मोडत जगातले खरेखुरे प्रश्न सोडवण्यासाठी प्रोत्साहन देतात. हा प्रवास सोपा आणि सहज नसला तरी आनंद आणि समाधान देणारा आहे.

अडचणी कुणाच्या वाटेत येत नाहीत? पण रस्ता स्वत: निवडलेला असेल, तर त्या अडचणीही आठवणी होतात. आपल्याला आणखी आत्मविश्वास देतात, असा विश्वास रिशीता देतात. त्यांचा हसतमुख चेहरा आणि कर्तृत्व प्रेरणा देतं. त्यांचं सजीवांवरचं, पृथ्वीवरचं प्रेम आपल्यात निसर्गप्रेमाचं बीज पेरतं आणि मानवी अंतरंगात खऱ्या अर्थानं डोकावायला भाग पाडतं.
postcardsfromruchira@gmail.com