रुचिरा सावंत
विज्ञानातला प्रत्येक विषय परस्परपूरक आहे, हे अधोरेखित करणाऱ्या आणि मेंदूचं कार्य व भौतिकशास्त्र या दोन वरवर वेगळय़ा दिसणाऱ्या विषयांचा सखोल अभ्यास करत संशोधन करणाऱ्या तरुण संशोधक रिचा फोगट. आतापर्यंत अकरा संशोधन प्रबंध प्रकाशित झालेल्या रिचा भौतिकशास्त्राच्या मदतीनं मेंदूच्या विश्वातली अनेक कोडी उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रवास सध्या शिकत असणाऱ्या, आपल्याला नेमकं पुढे काय करायचंय याविषयी मनात साशंकता असलेल्या अनेक तरुणींना स्पष्टता देईल असाच..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरियाणामधल्या रोहतक इथल्या ‘शिक्षा भारती’ शाळेत पाचवी-सहावीमध्ये शिकणाऱ्या रिचाला त्या वर्षी वादविवाद स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा झाली. शाळेतून घरी आल्यावर तिनं आपली इच्छा आईजवळ बोलून दाखवली खरी, पण स्पर्धेविषयी, नियमांविषयी काहीच कल्पना तिला नव्हती. तेव्हा आतासारखं सहज ‘गूगल’ करून माहिती मिळत नव्हती. पण आपल्या मुलीची इच्छा पाहता रिचाची आई- मुनेश तिला मदत करायला सरसावली.
मुनेश या अर्थशास्त्र शिकलेल्या, गणित उत्तम जमणाऱ्या आणि तर्कशुद्ध विचार करणाऱ्या गृहिणी. रिचाजवळ बसून आईनं स्पर्धेच्या विषयाबाबत मुद्देसूद चर्चा केली. तिला तर्कानं विचार करायला भाग पाडून त्यावर अनेक प्रश्न विचारले. त्या विषयातल्या जाणकार अशा ओळखीतल्या व्यक्तींकडे आई या इवल्याशा मुलीला एका वादविवाद स्पर्धेच्या तयारीसाठी घेऊन गेली. स्पर्धा, अभ्यास, काहीही असो, आपण त्यात सहभागी व्हायचं ठरवलं तर अगदी खोलात जाऊन मेहनत घ्यायला हवी, हा धडाच रिचाच्या आईनं तिला नकळत दिला होता.

आजोबांच्या शिक्षकी पेशाचा वसा घेतलेले रिचा यांचे बाबा सत्येंद्रसिंग हे हिंदीचे शिक्षक. असा शैक्षणिक वारसा असलेल्या परिवारात रिचा फोगट यांचा जन्म झाला. त्यांना पाठिंबा देणाऱ्या या कुटुंबानं खऱ्या अर्थानं त्यांना घडवलं. अवतीभवतीच्या सगळय़ाच गोष्टींविषयी प्रचंड कुतूहल असल्यामुळे त्यांना सतत प्रश्न पडायचे. गणित व तर्कशुद्ध विचारांच्या विषयांत त्यांना सर्वाधिक गुण मिळायचे. विज्ञान आणि त्यातही जीवशास्त्र खूप आवडत असतानाही जीवशास्त्रातली चित्रविचित्र वैज्ञानिक नावं मात्र त्यांच्या ध्यानात राहायची नाहीत. आजोबांशी गप्पा मारताना, त्यांच्या लहानपणीच्या विविध विषयांच्या गोष्टी ऐकताना त्यांची तीक्ष्ण स्मरणशक्ती बघून त्या अवाक् व्हायच्या. अभ्यासातली त्यांच्या फारशी लक्षात न राहणारी जीवशास्त्रातली नावं सहज सांगू शकणाऱ्यांचा त्यांना हेवा वाटायचा. ‘आपण सगळी एकसारखीच दिसणारी माणसं आहोत, मग माझ्या लक्षात न राहाणाऱ्या गोष्टी या इतरांना सहज कशा बरं आठवतात?’ हा प्रश्न त्यांना पडायचा. ‘आपल्या आणि त्यांच्या मेंदूत, मेंदूच्या कार्यपद्धतीत काय फरक असेल?’ असा विचार त्या सतत करायच्या. कोणत्याही भाषेत बोलायचं झालं, तरी आपण विचार हिंदीमध्ये करून त्याचं भाषांतर करतो असं त्यांच्या लक्षात आलं आणि हे का आणि कसं होत असावं हा प्रश्न सतावू लागला. हा विचार करतानाच त्यांना मेंदू नावाच्या अवयवाविषयी कुतूहल वाटू लागलं! मेंदूच्या या अशा वर्तनाचं कारण शोधण्याची तीव्र इच्छा त्यांना झाली. त्या विषयानं त्या भारावून गेल्या. पण जीवशास्त्र आणि मेंदूविषयी ओढ असतानाही त्यांनी व्यावहारिक निर्णय घेतला.

जीवशास्त्रातली नावं लक्षात ठेवणं कठीण वाटत असल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या त्यांना सहज जमणाऱ्या विषयांची निवड केली.
रिचा यांचे वडील हिंदी शिकवत असलेल्या शाळेतच प्राध्यापक जितेंद्र नारा भौतिकशास्त्र हा विषय शिकवायचे. अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी आवश्यक पूर्वतयारी करून घेण्यासाठी शिकवणीसुद्धा घ्यायचे. दहावी झाल्यानंतर रिचा यांना भौतिकशास्त्रातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंतच्या त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून ते दररोज स्वतंत्र अर्धा तास द्यायचे. त्यांच्याबरोबर भौतिकशास्त्राविषयी चर्चा करायचे, शंकानिरसन करायचे. विषयाची जाण असलेल्या व्यक्तीबरोबर केलेल्या त्या चर्चामुळे भौतिकशास्त्र विषयाकडचा रिचा यांचा कल वाढला. त्यांच्या आजोबांबरोबरच्या गप्पाही त्यांना वेगळय़ा अर्थानं प्रेरणा द्यायच्या. चार भाषा अस्खलितपणे बोलू शकणाऱ्या आजोबांकडे पाहूनच त्यांना हिंदी आणि इंग्रजीच्या जोडीनं स्पॅनिश शिकण्याची प्रेरणा मिळाली. बारावीनंतर भौतिकशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण घ्यायचं ठरल्यावर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या ‘मिरांडा हाऊस’ या महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरूवातीच्या काही दिवसांत घरची आठवण येऊन त्या अस्वस्थ होत असत. त्यामुळे रिचा यांच्याबरोबर थोडा वेळ घालवण्यासाठी त्यांचे बाबा दिवसभर नोकरी करून संध्याकाळी शंभर किलोमीटर दूर असणाऱ्या शहरात काही महिने दररोज प्रवास करून जात होते. पाठिंबा देणारा, सहज प्रेरणा देणारा परिवार आणि अवतीभवतीची माणसं यामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. आत्मविश्वास असणारी, स्वत:चे निर्णय घेऊ शकणारी, त्या निर्णयांची जबाबदारी घेणारी स्वतंत्र विचारांची ही तरुणी या साऱ्यांनी घडवली. रिचा यांच्या पालकांनी व इतरांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेलं पोषक वातावरण हा इतर अनेकांसाठी वस्तुपाठच!

‘मिरांडा’तील त्यांचा अनुभवही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा होता. मुलींच्या त्या महाविद्यालयामुळे कोणतंही काम हे ‘जेंडर स्पेसिफिक’ नसतं आणि व्यक्ती म्हणून घडत असताना लिंग, वय, पार्श्वभूमी आड यायला नको, हे त्यांच्यासाठी अधोरेखित झालं. सकाळच्या तासाला वर्गात न्याहरी करण्याची परवानगी देणाऱ्या आणि प्रत्येक प्रयोग वर्गात करून दाखवून त्यानंतरच त्यामागच्या संकल्पना समजावून सांगणाऱ्या डॉ. प्रतिभा जॉली, प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या प्रोफेसर सरोज महाजन आणि रश्मी रक्षित यांसारख्या अनेक प्राध्यापिकांनी या महाविद्यालयातल्या वास्तव्यात त्यांचं ज्ञान वृद्धिंगत केलं. या विषयात काम करण्याची प्रेरणा दिली. पदवी अभ्यासानंतर आपण काय करावं असा प्रश्न त्यांना पडला. संशोधनाकडे जाण्याचा तेव्हा फारसा मानस नव्हता. याच काळात आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, थोडी आणखी मोठी झेप घेत एक शाळा सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला. मात्र स्वतंत्र शाळेची जबाबदारी घेण्याआधी आपण आणखी थोडा अनुभव घ्यायला हवा, असा विचार करून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ‘आयआयटी-मुंबई’मध्ये प्रवेश मिळवला.

पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षांला असताना विद्यार्थ्यांना दोन पर्याय उपलब्ध होते. एखादा अभ्यासक्रम निवडून त्याचा अभ्यास करणं किंवा एखादा प्रकल्प आणि प्रयोग करून ते संशोधन मांडणं. माहिती, सिद्धांत यापेक्षा प्रायोगिक अनुभवांकडे जास्त कल असल्यामुळे रिचा यांनी प्रकल्पाची निवड केली. स्टीव्हन स्ट्रोगेट्स या प्रसिद्ध अमेरिकी गणितज्ञानं लिहिलेलं गणित विषयावरचं पुस्तक वाचून आणि भवतालाविषयी असणाऱ्या कुतूहलामुळे ‘नॉन लीनियर डायनॅमिक्स’ या विषयात संशोधन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संस्थेतल्या या विषयासाठी काम करणाऱ्या प्रयोगशाळेत प्रवेश मिळवून त्यांनी इलेक्ट्रोकेमिकल सेल्सच्या डायनॅमिक्सचा अभ्यास करायला सुरूवात केली. या सेलमधल्या विद्युत प्रवाहावर क्षरणाच्या(झीज) होणाऱ्या परिणामावर त्यांनी संशोधन केलं. एके दिवशी त्या आपल्या प्राध्यापकांबरोबर चर्चा करत असताना दुसरा एक विद्यार्थी प्रयोगशाळेत आला. मेंदूतला विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रोएन्सेफ्लोग्राम मशीन (ईईजी) विकत घेण्याबद्दल तो प्राध्यापकांना गळ घालत होता. मेंदूविषयी रिचा यांना असणारं आकर्षण या ‘ईईजी’ मशीनच्या निमित्तानं त्यांना पुन्हा आठवलं आणि जाणवलं. काही वर्षांपूर्वी मागे पडलेली आपली स्वप्नं आता वेगळय़ा रूपात जणू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती.

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर जवळपास सहा महिन्यांनंतर रिचा पुन्हा एकदा ‘आयआयटी’मध्ये डॉ. पुनीत परमानंद यांच्या प्रयोगशाळेत ‘पीएच.डी.’चा अभ्यास करण्यासाठी रुजू झाल्या. पदव्युत्तर अभ्यासादरम्यान त्यांनी आपला संशोधन प्रकल्प याच प्रयोगशाळेत पूर्ण केला होता. त्या विद्यार्थ्यांसाठी मागवलेलं ते ‘ईईजी’ मशीन त्या मुलानंतर प्रयोगशाळेत तसंच पडून होतं. कुणीच त्याचा वापर करत नव्हतं. रिचा यांनी त्या मशीनचा वापर करून ‘ईईजी मशीन आणि ब्रेन डायनॅमिक्स’ या विषयात पुढचं संशोधन करण्याचा आपला मनसुबा प्राध्यापकांना बोलून दाखवला. आपल्याला या विषयात फारसा अनुभव नसल्याचं स्पष्ट सांगत प्राध्यापकांनी त्यांनी त्यांच्या आवडीचा हा नवा विषय घेण्यास परवानगी दिली आणि त्या बरोबरीनं एखादा दुसरा संशोधन प्रकल्पसुद्धा सुरू ठेवावा असा प्रस्ताव मांडला. बारावीनंतर जीवशास्त्राशी जवळपास संपर्क नसल्यामुळे हा प्रवास अजिबात सोपा असणार नाही हे रिचा यांना ठाऊक होतं. पण आपल्या आवडीच्या दोन्ही विषयांची सांगड घालण्याची मिळालेली ही संधी त्यांना हातची जाऊ द्यायची नव्हती. त्यासाठी खूप मेहनत घेण्याची त्यांची तयारी होती. त्याच दरम्यान प्रयोगशाळेत उन्हाळी सुट्टीत संशोधन अनुभव घेण्यासाठी रिचा यांच्याहून तरुण असलेले चार विद्यार्थी दाखल झाले. त्यांच्याइतक्याच उत्साहानं त्यांनी मदत केली. त्यांनी एकत्र मिळून जीवशास्त्राचा अभ्यास सुरू केला. या तरुण मित्रांविषयी त्यांना प्रचंड कृतज्ञता आहे.

रिचा हे संशोधन करत असतानाच प्रयोगशाळेत संगणकामध्ये विविध समीकरणं वापरून मेंदूचं एक मॉडेल (प्रारूप) तयार करीत आहेत. माणसांचं निरीक्षण करून हाती आलेला निष्कर्ष त्या या समीकरणरूपी मेंदूमध्ये पुन्हा एकदा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा प्रकारे ते खोलात जाऊन जाणून घेण्याचा, त्याचा इतर गोष्टींवर होणारा परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगणकामधल्या या मॉडेलमध्ये सजीव मेंदूपेक्षा कैकपटीनं अधिक नियंत्रण ठेवता येतं. रिचा यांच्या संशोधनाचे ढोबळमानानं दोन भाग करता येतील. मेंदू विविध गोष्टींना ठरावीक पद्धतीनं प्रतिक्रिया देतो. त्या प्रतिक्रिया तो का देतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. यासाठी एक उदाहरण घेऊ. काही जणांना एपिलेप्सी (अपस्मार) होण्याची शक्यता अधिक असते, तर काहींना तो त्रास होण्याची शक्यता कमी. हे असं का होतं, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आहेत. हे एक प्रकारचं मूलभूत संशोधन आहे. त्यांच्या संशोधनाचा दुसरा भाग हा प्रत्यक्ष प्रयोगांवर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन प्रकारची माहिती पुरवली, तर त्यांपैकी केवळ एकाच माहितीवर लक्ष केंद्रित करणं आणि दुसऱ्या माहितीकडे दुर्लक्ष करणं कितपत शक्य आहे? त्यासाठी बाहेरून ‘स्टिम्युलेशन’ दिलं तर काही फरक पडतो का? अशा प्रश्नांची उत्तरं त्या विविध प्रयोगांती शोधत आहेत. याव्यतिरिक्त रासायनिक दोलक ( Chemical oscillators) हृदयासारखी हालचाल करणारं दोलक आणि नेटवर्क्स या विषयांमध्ये संशोधनही त्या करत आहेत. आतापर्यंत त्यांचे अकरा संशोधन प्रबंध प्रकाशित झाले असून भौतिकशास्त्राच्या मदतीनं मेंदूच्या विश्वातली अनेक कोडी उलगण्याचा प्रयत्न सध्या त्या करीत आहेत.

आपल्या संशोधनाचा मेंदूचे वेगळे आयाम समजून घेण्यासाठी उपयोग होईल याची त्यांना खात्री आहे. आंतरविद्याशाखीय संशोधनाचं इतकं महत्त्वाचं उदाहरण आपल्यासमोर मांडणाऱ्या रिचा मानवी जीवन अधिक जाणून घेता येईल अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं भौतिकशास्त्राच्या मदतीनं शोधण्यात व्यग्र आहेत. विज्ञानातले सारेच विषय परस्परपूरक आहेत हेच त्यांचं संशोधन अधोरेखित करतं.

एक जगावेगळी वाट धुंडाळणाऱ्या, आपल्या यशाचं श्रेय परिवार आणि प्राध्यापकांना देणाऱ्या आणि आताच सुरू झालेल्या संशोधनप्रवासात मोलाचं यश मिळवणाऱ्या रिचा अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहेत. संशोधन क्षेत्राच्या भविष्याचं आशादायी चित्र त्या रेखाटत आहेत, आपल्या साऱ्यांसाठीच!
postcardsfromruchira@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Researcher science brain function physics research dissertation research amy
First published on: 13-08-2022 at 00:03 IST