आत्मप्रतिष्ठेचा सन्मान

स्त्रीमुक्ती म्हणजे आत्मप्रतिष्ठेचा सन्मान मानणाऱ्या अंबई ऊर्फ  डॉ. सी. एस. लक्ष्मी यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

सविता दामले 

स्त्रीमुक्ती म्हणजे आत्मप्रतिष्ठेचा सन्मान मानणाऱ्या अंबई ऊर्फ  डॉ. सी. एस. लक्ष्मी यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लेखनावर ‘स्त्रीवादी’पणाचा शिक्का बसलेला असला तरी त्यांनी स्त्रीवादी लेखन ठरवून केलं नव्हतं. आजूबाजूच्या वास्तवाला त्यांनी फक्त शब्दरूप दिलं होतं. पण ते इतकं घणाघाती होतं, की त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाची तमिळ माध्यमांनी दखलही घेतली नाही, त्यांच्यावर जणू बहिष्कार घालण्यात आला होता. पण त्या लिहीत राहिल्या. ‘फोर्ड फाउंडेशन’ आणि ‘होमी भाभा शिष्यवृती’  घेऊन त्यांनी ‘द फेस बिहाइंड द मास्क- द विमेन इन तमिळ लिटरेचर’ आणि ‘अ‍ॅन इडियम ऑफ सायलेन्स’ असे दोन प्रकल्प पूर्ण केले. इतकंच नाही तर स्त्रियांविषयी, स्त्री-साहित्याविषयीचं दस्तऐवजीकरण झालं पाहिजे म्हणून त्यांनी ‘स्पॅरो’ या संस्थेची १९८८ मध्ये उभारणी केली. त्या अंबई यांच्याविषयी..

अंबई या आजच्या सर्वोत्कृष्ट तमिळ लेखकांपैकी एक आहेत. त्यांचं साहित्य वाचकप्रिय आहे, त्यांच्या लेखनातील मार्मिकता, हजरजबाबीपणा, लहान गोष्टीतही मोठा आशय शोधण्याची वृत्ती आणि काव्यात्मकता या गोष्टी वाचकांना खिळवून ठेवतात. त्यांच्या लेखनात बंडखोरी असूनही आक्रस्ताळेपणा नाही. कथा-कादंबरीतील बारीकसारीक तपशील त्या इतक्या सुबकतेनं भरतात, की वाचकासमोर ते चित्र जिवंत होऊन उठतं. त्यातील चिरंतन सत्य वाचकाच्या काळजाला भिडतं. म्हणूनच तर त्यांचं साहित्य कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही वाचकाला आपलंसं वाटेल यात काहीच शंका नाही.अंबई ऊर्फ डॉ. सी. एस. लक्ष्मी यांच्या तमिळ कथांचा अनुवाद ‘मनोविकास प्रकाशना’च्या  कविता महाजन संपादित ‘भारतीय लेखिका’ या मालेसाठी मी केला, तेव्हा तो पूर्ण झाल्यावर माझ्या मनात वर लिहिलेले सगळे विचार आले होते. त्या अनुवादाच्या वेळेस माझी अंबई यांच्याशी भेट झाली, तेव्हाच त्यांच्या विचारांतील स्पष्टता, स्वत:ला हवं ते नेमकेपणानं सांगण्याची वृत्ती यांचा माझ्यावर प्रभाव पडला होता, परंतु त्यांच्या विद्वत्तेचं दडपणही आलं होतं. अर्थात लवकरच त्यांच्या ऋजू वागण्यामुळे ते दडपण नाहीसं झालं. माझं अनुवादाचं बाड घेऊन कधी मी त्यांच्या घरी, तर कधी त्या माझ्या घरी, असं आम्ही मूळ तमिळ पुस्तक बाजूला ठेवून (ते त्या बघायच्या) मराठी अनुवाद मोठय़ानं वाचायचो. अशा प्रकारे मूळ लेखकाकडून शब्दन् शब्द ‘अप्रूव्ह’ करून घेण्याचा असा माझा तो  आत्तापर्यंतचा तरी पहिला आणि एकमेव अनुभव आहे. त्या अंबईंना साहित्य अकादमीनं ‘सिवाप्पुक कळुत्तुतन ओरु पच्चाई परवै’ (‘रेड नेक्ड ग्रीन बर्ड’) या पुस्तकासाठी २०१९ चा  पुरस्कार दिला. त्यांना पुरस्कार मिळाला हे कळल्यावर मला खूप आनंद झाला आणि उशिरा का होईना पण त्यांना हा बहुमान मिळाला याबद्दल समाधानही वाटलं. पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन करताना मी  विचारलं, ‘‘कसं वाटलं तुम्हाला?’’ तर त्या म्हणाल्या, ‘‘ध्यानीमनी नसताना हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे हा आनंदाचा सुखद धक्काच होता.’’

डॉ. सी. एस. लक्ष्मी ऊर्फ ‘अंबई’ यांचा जन्म १९४४ चा. वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत त्या मुंबईत दादरला राहत होत्या, घराजवळच्याच तमिळ शाळेत जात होत्या. वडील केंद्र सरकारच्या नोकरीत त्यामुळे त्यांची बेंगळूरुला बदली झाल्यावर त्याही तिथे गेल्या. पदवीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालं. अशा प्रकारे तमिळ मातृभाषा असली तरी वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत मराठी आणि नंतर पुढे कन्नड, मल्याळम् अशा भाषांशीही त्यांचा उत्तम परिचय झाला होता. अंबईंची आई उत्तम वीणावादक आणि गायिका होती, तिचा स्वभाव अत्यंत संवेदनशील होता. तो जुना काळ, वडिलांचा कडक स्वभाव आणि घरातला तमिळ ब्राह्मणी कर्मठपणा. त्यामुळे एक कलाकार म्हणून आईची फार घुसमट झाली, त्याचं चित्रण अंबईंच्या कथांमध्ये दिसतं. वयाच्या बाराव्या वर्षी आईनं त्यांना भरतनाटय़म्च्या क्लासला घातलं, त्या आईकडून गाणं शिकल्या. या सगळय़ातून स्वत:ला अभिव्यक्त करण्याची प्रेरणा त्यांना मिळत गेली. अंबईंना दोन भाऊ आणि एक बहीण अशी भावंडं असली तरी सर्व भावंडांच्या वयात खूपच अंतर होतं. म्हणजे थोरला भाऊ त्यांच्याहून अकरा वर्षांनी मोठा तर बहीण सहा वर्षांनी मोठी. त्यातच ती काही वर्ष मावशीकडेच राहायला होती. धाकटा भाऊ पाच वर्षांनी लहान. अशा परिस्थितीत त्यांना घरात एकटेपणा वाटायचा. बरोबरीचे मित्रमैत्रिणी कुणी नव्हते. शाळाही घरापासून लांब. त्यामुळे त्या स्वत:चं मन वाचनात रमवायला शिकल्या. आई दिवसभर कामात मग्न, पण तिला वाचनाची खूप आवड होती. भरपूर तमिळ मासिकं घरी येत. वडील इंग्रजी पुस्तकांचे भोक्ते होते. त्यामुळे या मुलीला मासिका-पुस्तकांनी वेगळय़ाच जगात नेलं. त्यातूनच त्यांच्या हातात कधी लेखणी आली ते त्यांनाही कळलं नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी एका कादंबरी स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी चक्क कादंबरीच लिहिली. त्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं, त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. मग त्या कथा लिहू लागल्या. ‘आनंद विकतन’ या मासिकात पाठवू लागल्या. त्या छापूनही येऊ लागल्या.

 अंबई हे टोपणनाव घेण्यामागचं कारणही वेगळंच आहे. ‘आनंद विकतन’ मासिकाचे संपादक देवन यांनी एक कादंबरी लिहिली होती. त्यातला नायक विद्वान असतो, परंतु त्याचं लग्न एका साध्यासुध्या अशिक्षित मुलीशी लावून दिलं जातं. ही पत्नी आपल्या तोडीची नाही असं मानून तो तिला माहेरी पाठवून देतो. तेव्हा आपण आयुष्यात काहीतरी बनायचं, असा संकल्प ती करते, नेटानं शिकते आणि ‘अंबई’ या टोपणनावानं लेखन करू लागते. तिचं लेखन खूप लोकप्रिय होतं. नवऱ्यालाही आवडतं. जेव्हा त्याला कळतं, की ही लेखिका म्हणजे आपलीच पत्नी आहे तेव्हा तो तिला म्हणतो, ‘‘आता तू माझ्यासोबत राहण्याच्या पातळीवर आलीस. आता आपण एकत्र राहू या.’’ तेव्हा ती त्याला म्हणते, ‘‘मी शिकले, मी लिहिते ते मला स्वत:ला कुणीतरी बनायचं होतं म्हणून. तुमच्यासोबत पुन्हा राहायला मिळावं म्हणून नव्हे.’’ १९६२-६३ च्या काळात अशी कादंबरी त्यांनी लिहिली होती म्हणजे पहा. त्यातल्या नायिकेचं टोपणनाव लक्ष्मी यांना आवडलं आणि तेच टोपणनाव आपणही घ्यायचं असं ठरवून त्या त्याच नावानं कथा लिहू लागल्या. त्याशिवाय अंबई नावाला ‘अंबा’ ऊर्फ महाभारतातील शिखंडीचाही संदर्भ होताच. त्यातली अंबाच पुढे शिखंडीचं रूप धारण करते. म्हणूनच तिच्यात स्त्री-पुरुष दोघांचे गुणधर्म एकवटलेले असतात. मानवी भावनांवर ‘या स्त्रीच्या भावना’, ‘या पुरुषाच्या भावना’ असे शिक्के मारणं लक्ष्मींना मान्य नव्हतंच.  हे एवढं सगळं त्या एका टोपणनावानं साध्य झालं. अर्थात एवढा विचार वयाच्या विसाव्या वर्षी ते टोपणनाव घेताना त्यांनी केला नव्हता.

लक्ष्मींना ‘बी.ए.’ झाल्यावर चेन्नई येथील ‘मद्रास ख्रिश्चन कॉलेज’मध्ये ‘एम.ए.’ करायचं होतं. वडील नोकरीतून निवृत्त होऊन दुसऱ्या नोकरीसाठी केरळला गेले होते. ते सुट्टी घेऊन घरी आले तेव्हा लक्ष्मींना चेन्नईला जायंचंय असं कळल्यावर म्हणाले, ‘‘कशाला जायचंय चेन्नईला? काही नाही जायचं. इथे बेंगळूरुत शिकायला काय झालं? मी परवानगी देणार नाही.’’ पण तोवर मोठय़ा बहिणीला बँकेत नोकरी लागली होती आणि तिच्याकडून पैसे घेऊन लक्ष्मींनी मद्रासच्या कॉलेजमध्ये प्रवेशअर्जही केला होता. पण बाबांची परवानगी नसताना जायचं कसं? असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा आईनं त्यांना विचारलं, ‘‘मद्रासला जाऊन तुझ्या आयुष्यात फरक पडेल असं वाटतं का तुला?’’ तर त्या म्हणाल्या,‘‘हो, मला वाटतं तसं.’’ आणि मग, आई त्यांना घेऊन बँकेत गेली. तिनं स्वत:चे दागिने गहाण ठेवून कर्ज काढलं. लेकीसाठी चांगली सूटकेस घेतली, चार साडय़ा घेतल्या, रात्री बसून ब्लाऊजही शिवून दिले. त्या दिवशी संध्याकाळी बहीण बँकेतून घरी आली आणि हा सगळा प्रकार पाहिल्यावर आईला म्हणाली,‘‘माझ्यासाठी तू हे केलं नाहीस.’’ त्यावर आईनं दिलेलं उत्तर लक्ष्मींच्या चांगलं लक्षात राहिलं. आई म्हणाली होती, ‘‘पण तू विचारलंस कुठे? तू विचारायला हवं होतंस. हिनं विचारलं. असं विचारायलाही धैर्य लागतं आणि ते लक्ष्मींकडे होतं.’’ लक्ष्मी म्हणतात, की तो त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण होता. आई तेव्हा पाठीशी उभी राहिली. मुलीला वसतिगृहात सोडल्यावर तिनंच वडिलांना तार केली- ‘लक्ष्मीला मद्रास ख्रिश्चन कॉलेजात प्रवेश मिळाला.’ लक्ष्मींना माहिती होतं, की शिक्षणानंच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. अन्यथा घराबाहेर पडण्याचं दुसरं निमित्त ‘लग्न’ हेच होतं. ते त्यांना करायचं नव्हतं. तार मिळाल्यावर वडील आईला म्हणाले, ‘‘आता ही घर सोडून गेली म्हणजे परत कधीच घरी येणार नाही.’’ आणि तसंच झालं. त्यानंतर त्या आईवडिलांच्या घरी कायमच्या असं राहायला परत गेल्या नाहीत.

स्वातंत्र्यानंतरच्या काळातली त्यांची ती पहिलीच पिढी. त्यामुळे गांधीवादी विचारांनी प्रेरित झालेल्या लक्ष्मींनी एम.ए. झाल्यावर  आजन्म अविवाहित राहून शिक्षिकेची नोकरी करायचं  ठरवलं. आसपास तशी बरीच उदाहरणं होती. गांधीवादी विचारसरणीच्या कडलूर येथील एका शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी सुरू केली. वडील पुन्हा नाराज झाले. लेक ‘आयएएस’ अधिकारी तरी होईल अशी आशा त्यांना होती. पण पुन्हा आई मदतीला धावून आली. तिनं लेकीचं घर लावून दिलं. शाळा सुरू झाली. मात्र इथेच त्यांचा बंडखोरपणा उफाळून आला. त्या शाळेत खूप चुकीच्या गोष्टी घडत होत्या, बाकीचे शिक्षक बोलायला घाबरत. पण लक्ष्मींचं वय अवघं बावीस. अंगात भरपूर उत्साह आणि बंडखोरी.  त्यामुळे त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. इतका, की शेवटी सहा महिन्यांनी संस्थेनं त्यांचा राजीनामा मागितला.  राजीनामा दिला, पण पुढे काय? मग मद्रासमध्ये इंग्रजी लेक्चररची नोकरी मिळाली. ते साधारण ६५-६६ चं वर्ष असेल.  तेवीस वर्षांची मुलगी एकटीच राहते हे आसपासच्या कर्मठ लोकांना पचवणं जडच गेलं. जाता-येता गल्लीतले लोक विचित्रपणे बघायचे. तशी घरात कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींची ये-जाही होऊ लागली. पण त्यांना स्वत:ला आपण चुकीचं वागतो आहोत असं वाटत नव्हतं आणि त्या कुणाची पर्वाही करत नव्हत्या.

घराच्या कोषातून बाहेर पडल्यावर एक वेगळीच दुनिया त्यांना बघायला मिळाली. एम.ए.च्या दोन वर्षांत लेखन कमी झालं, तरी गाठीशी भरपूर अनुभव जमा झाले होते. त्या शिदोरीवरच त्यांचा पुढचा लेखनप्रवास होणार होता. तेव्हाची एक गंमत त्या सांगतात, की बी.ए.ला असताना आणखी एका स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी कादंबरी लिहिली होती. तिला दुसरं बक्षीस मिळालं आणि साधारण वर्ष-सव्वा वर्षांनं पहिली कांदबरी छापून आल्यावर त्यांची ही कादंबरी क्रमश: छापून येऊ लागली. लक्ष्मी सांगतात, की ती कादंबरी वाचताना त्यांना स्वत:चीच लाज वाटू लागली. कादंबरी आत्मिक प्रेम म्हणजे ‘प्लॅटॉनिक लव्ह’ या विषयावर होती. त्यांना वाटू लागलं, की आपण हे सगळं किती कृत्रिम लिहिलं आहे! आपलं वय काय, आपला अनुभव काय आणि  विषय कुठला घेतला आहे. मुळात त्या काळात शरीराबद्दल तरी काय मुलामुलींना सांगितलं जात होतं? शरीराचा अनुभव नाही, जीवनाचा अनुभव नाही आणि थेट आपण आत्म्याबद्दल लिहायला लागलो. साहजिकच त्यात कृत्रिम, ठरावीक छापाचं असणार नाही तर काय असणार?

जसजसं अवतीभवतीचं भान येत गेलं, तसतशी अंबईंची कथा प्रगल्भ होऊ लागली. त्या एम.ए.ला असताना जिथे राहात होत्या, तिथला घरमालक बायकोशी निष्ठूरपणे वागायचा. त्या अनुभवावर त्यांनी  ‘सिरगगळ मुरियम’ (‘पंख तोडले जातील’) ही कथा लिहिली आणि तमिळमधल्या लोकप्रिय मासिकांकडे पाठवली. त्या सर्वानी ती साभार परत पाठवून दिली. एका संपादकांनी तर त्यांची कानउघाडणीच केली. कारण आता लक्ष्मींचे विषय बदलले होते, अनुभव बदलले होते, भाषाही बदलली होती. एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर लक्ष्मी अधिक मोठय़ा समुद्रात म्हणजे दिल्लीला ‘इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ संस्थेत ‘पीएच.डी.’साठी दाखल झाल्या. हीच संस्था नंतर ‘जेएनयू’मध्ये विलीन झाली. दिल्लीतून ‘कनत्याळी’ हे तमिळ मासिक निघत होतं. त्याचे संपादक होते कस्तुरीरंगन. लक्ष्मींनी त्यांच्याकडे चेन्नईतील मासिकांनी नाकारलेली कथा पाठवून विचारलं, ‘‘ही कथा सगळय़ांनी नाकारलीय, हिच्यात काय चुकीचं आहे ते सांगा.’’ कथा वाचल्यावर कस्तुरीरंगन भेटायला आले, म्हणाले, ‘‘कथेत काहीच चूक नाही, निवड करणाऱ्या संपादकांतच चूक आहे!’’ त्यानंतर हळूहळू लक्ष्मींच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. 

घराबाहेर पडल्यानं आपला दृष्टिकोन व्यापक बनतो. अनुभवांकडे तटस्थपणे बघता येतं. लक्ष्मी यांच्याबाबतीत तसं घडलं. नव्या विचारांच्या कथा त्या दिल्लीत राहून लिहू लागल्या. त्यामुळेच स्थानिक, कर्मठ समाजाच्या रोषापलीकडे जाऊ शकल्या. मुख्य म्हणजे लेखन छापून येऊन वाचकांपर्यंत पोहोचू तर लागलं. पण झालं असं, की कथा दिल्लीच्या तमिळ मासिकात प्रसिद्ध झाल्या तरी हाहाकार चेन्नईत उडू लागला. ही मुलगी संस्कृतीविरुद्ध लिहिते म्हणजे ही शीलभ्रष्ट असली पाहिजे, असं लोकांनी ठरवलं. एका माणसानं तर त्यांना म्हटलं, की ‘‘एवढी स्वतंत्र आहेस, तर माझ्यासोबत झोपायला ये.’’ त्यावर लक्ष्मींनी त्याला ठामपणे उत्तर दिलं, की ‘‘स्वतंत्र आहे म्हणूनच मी नाही, म्हणू शकते.’’   १९७६ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला तेव्हा तमिळ माध्यमांनी त्याची दखलही घेतली नाही. त्यांच्यावर जणू बहिष्कारच घालण्यात आला होता. १९६७ ते ७८ अशी अकरा वर्ष लक्ष्मी दिल्लीत राहिल्या. १९७६ मध्ये विष्णू माथुर यांच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर १९७८ मध्ये त्या मुंबईला आल्या. लग्नाच्या वेळेस आणि नंतरही त्यांनी काही निर्णय जाणीवपूर्वक घेतले. दोघांनाही टिपिकल नोकरी करायची नव्हती.लग्नाच्या वेळेस विष्णूजी ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये नोकरीला असले तरी तीच नोकरी आपण कायम करत राहणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यातूनच पुढे मूल नको हा निर्णय त्यांनी घेतला.

१९८१-८४ या कालावधीत संशोधनासाठी लक्ष्मींना ‘फोर्ड फाउंडेशन’ची शिष्यवृत्ती मिळाली. तसेच १९९१-९२ या काळात ‘होमी भाभा शिष्यवृती’ मिळाली. या दोन्ही शिष्यवृत्ती घेऊन त्यांनी ‘द फेस बिहाइंड द मास्क- द विमेन इन तमिळ लिटरेचर’ आणि ‘अ‍ॅन इडियम ऑफ सायलेन्स’ असे दोन प्रकल्प पूर्ण केले. एकीकडे लेखनही चालू होतंच, परंतु या प्रकल्पांवर काम करताना लक्ष्मींना जाणवू लागलं, की स्त्रियांविषयी, स्त्री-साहित्याविषयीचं दस्तऐवजीकरण झालं पाहिजे. त्यातूनच त्यांनी ‘स्पॅरो’ या संस्थेची १९८८ मध्ये उभारणी केली. लक्ष्मींच्या लेखनावर ‘स्त्रीवादी’पणाचा शिक्का बसलेला असला, तरी स्त्रीवादी लेखनच करायचं असं ठरवून त्यांनी लिहिलेलं नव्हतं. जीवनात काही गोष्टी आपण निवडतो, काही अनुभवांतून जातो, सामाजिक घडामोडी आणि इतिहासाचं भान आपल्याला येतं, त्यातूनच जीवन कसं जगावं हे आपल्याला समजतं. एका सर्जनशील लेखकामागे या सगळय़ा गोष्टी असतात. कथा-कादंबरी ही तिच्याच मार्गानं चालत असते. ती पूर्ण झाल्यावर वाचकांनाच ती स्त्रीवादी वाटत असेल. मुळात स्त्रीवाद हा जीवनापेक्षा वेगळा आहे, असं त्या मानतच नाहीत. त्यांनी निर्णय घेतले ते स्त्रीवादी आहेत की नाहीत, यापेक्षा योग्य आहेत की नाहीत, हाच विचार करून घेतले होते. खरं तर स्त्रीवादी विचार कळण्यापूर्वीच त्यांनी काही स्त्रीवादी निर्णय घेतले होते. आई त्यांना पोहोचवायला मद्रासला आली, हाही एक स्त्रीवादीच निर्णय होता. स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीच्या आत्मप्रतिष्ठेचा सन्मान, असं त्यांना वाटतं. तिच्या अस्मितेचं खच्चीकरण न होता तिला मोकळा श्वास घेता आला पाहिजे.

डॉ. सी. एस.लक्ष्मींच्या तमिळ कथांचा अनुवाद मला करायला मिळाला, हे मी माझं भाग्यच समजते. त्यांच्या लेखनाचा कस, गहनता आणि आवाका मी अनुभवला आहे. त्यांच्या प्रतिभेचे झरे वयाच्या ७८ व्या वर्षीही आटलेले नाहीत. त्यामुळेच त्या कथा, कादंबरी अजूनही लिहीत आहेत, स्त्री-गुप्तहेर कथांसारखा वेगळाच साहित्यप्रकारही त्यांनी निवडला आहे. त्यांच्या तमिळ साहित्याचा इंग्रजीत अनुवाद होतो आणि तो सगळय़ा जगातील वाचकांपर्यंत जातो, हेच त्यांच्या लेखनाचं यश आहे. त्यांचं पुन्हा एकवार अभिनंदन!

savitadamle@rediffmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Respect self esteem feminism feminist ysh

Next Story
समष्टी समज : सामाजिक पालकत्व!
फोटो गॅलरी