– प्राची पेंडसे
आजकाल प्रत्येक जण आपल्या आयुष्यात इतका व्यग्र असतो की, अगदी रोजच्या जगण्यातल्या अनेक साध्या साध्या गोष्टी करायच्या राहून जातात. पण खरंच त्यासाठी वेळ नाही हे कारण असतं, की…? यासाठी लक्षात ठेवायला हवं की, दिसामाजी दिस भुर्रकन उडून जातील… करायच्या गोष्टी मात्र केल्यावाचून राहातील.
रोजच्या सवयीनुसार मला सकाळी साडेपाचलाच जाग आली. वळून पाहिले तर अजून रेवा उठली नव्हती… तेव्हा आठवलं, ओह… काल आणि आज माझ्यासाठी तिने सुट्टी घेतलीय. कालचा ३१ मे हा माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस आणि आजपासून निवृत्तीचं आयुष्य सुरू.
एका प्रतिष्ठित बँकेतून सरव्यवस्थापक म्हणून मी निवृत्त झालो होतो. कर्मचारी ते सरव्यवस्थापक हा ३९ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास. आज सकाळी आठ वाजता कार्यालयीन गाडी मला न्यायला येणार नव्हती… हंमम्… एक दीर्घ नि:श्वास नकळत सुटलाच. जागाच होतो. झोप येत नव्हती. शेवटी उठून स्वयंपाकघरात गेलो. चहा-साखरेचे डबे शोधून काढले. दोघांसाठी चहा केला. ट्रेमधे दोन कप घेऊन बेडरूममधे आलो. चकित करायचं होतं रेवाला, पण माझ्या आवाजाने तिला जाग आलीच.
‘‘राणी सरकार, चाय गरम.’’ रेवाला झीट यायचीच बाकी होती. या आधी मी कधीही तिला असा आयता चहा करून दिला नव्हता. त्या पहाटे रेवाच्या एका डोळ्यात हासू तर दुसर्यात आसू होते. आम्ही एकत्रितपणे चहा घेतला…
जाणवलं… किती साधी गोष्ट. पण मी इतकी वर्षं माझ्यातच इतका मश्गूल राहिलो, की हे सुख बायकोला द्यायचं राहूनच गेलं…
सात वाजता रोजच्यासारखाच जॉगर्स पार्कमधे गेलो. आजपासून लवकर परतायची घाई नव्हती. मधल्या पटांगणामध्ये मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांचा बॉल माझ्या पायात आला. मुलांनी माझा चेहरा ओळखला. आत्तापर्यंत ‘बॉल प्लीज’या त्यांच्या विनंतीला मी बॉलसह लाथाडून पुढे जायचो. सहज एक बॉल त्यांच्याकडे फेकायला वास्तविक काय हरकत होती ना? पण…
आज मात्र मी चक्क बॉल हातात घेऊन त्यांच्याकडे गेलो. काही काळ मी बँकेच्या टीमचा प्रशिक्षक होतो. मी त्यांना बॉलिंग आणि फिल्डिंगचा सराव करवला, जो की मी याआधीही सहजच करू शकलो असतो. पण उगाचच खत्रुडासारखं वागून साधा पायात येणारा बॉल त्यांच्याकडे फेकायचेही आत्तापर्यंत राहूनच गेले होते. उद्यापासून मात्र ही मुलं माझी वाट पाहाणार हे नक्की होते..
साडेसात वाजता घरी आलो. हॉलमध्ये माझा सव्वादोन वर्षांचा नातू खेळत होता..
‘‘काय पंपूशेठ (मी ठेवलेलं लाडाचं नाव) काय करताय?’’ माझा रोजचा प्रश्न.
‘‘खेलतोय आबा.’’ त्याचंही रोजचंच उत्तर. आमची खूप जवळीक नव्हती. त्या दिवशी काय वाटलं कोणास ठाऊक… मी आडवा झालो पायावर. ‘‘पंपूशेठ, बसा माझ्या पाठीवर. आपण घोडा घोडा खेळू.’’ पंपूशेठच्या डोळ्यातही आश्चर्य. आज या आबांचा वेगळाच मूड दिसतोय हे त्याच्या लक्षात आलं, पण हातातला खेळ टाकून लग्गेच माझ्या पाठीवर स्वार झाला. ‘‘चलो आबा, फास फास आपला घोडा धावनाल…’’ त्यानं माझी कॉलर घट्ट पकडून धरली होती. हॉलभर आमचा घोडा पाचसहा राऊंड धावला. पंपूशेठला खूप मज्जा आली असावी…
‘‘आबा, आता आपन लोज लोज घोला घोला खेलायचं.’’
‘‘हो तर, रोज खेळूया.’’ घरातले सगळेच आमची ही सर्कस पाहून आश्चर्यचकित झाले होते. खरंच हे सुख काहीतरी वेगळंच, खूप सुखावणारं होतं. मग आजपर्यंत हे करायचं राहून का गेलं?…
सहजच आईच्या खोलीत डोकावलो. आई पायाला तेल चोळत बसली होती. ‘‘अरे श्री, ये ना बस. खूप वर्षं कसून मेहनत केलीस रे. म्हणून आज हे दिवस दिसताहेत. आता थोडा स्वत:साठी जगून पाहा.’’ शब्दाशब्दांतून माया ठिपकत होती तिच्या. खरंच पाच वर्षांचा होईपर्यंत सगळ्या कामाला मला आईच लागायची. आता तिला होईनासे झाल्यावर चोवीस तास तिच्या दिमतीला माणूस ठेवला होता आम्ही… तरी पण, वय झालं की माणूस स्पर्शाचा भुकेला असतो, प्रेमाच्या चार शब्दांसाठी तहानलेला असतो. तसा मीही यायला रात्री कितीही उशीर झाला तरी आईच्या खोलीत डोकावून हवं नको ते विचारत असे, पण आजपासून एक ठरवलं होतं. रात्री झोपायच्या आधी किमान अर्धा तास तिच्यासोबत घालवायचा. आताही काशाच्या वाटीने तिचे तळपाय घासून दिले. ती ‘पुरे पुरे रे आता’ म्हणत माझ्या कमी झालेल्या केसातून थरथरता हात फिरवत राहिली. आणि कधीतरी अतीव समाधानानं लहान मुलीसारखं झोपून गेली. खरंच मी मुलगा म्हणून कर्तव्यात काही कसूर ठेवली नसली तरी तिची एवढी माफक अपेक्षा पुरी करायचं राहूनच गेलं होतं…
दोन बहिणींच्या पाठचा, धाकटा म्हणून बहिणींचा मी खूप लाडका. दोघी बहिणींनी माझे सगळे खूप लाड पुरवले. दोघीही छान सुस्थळी आहेत. दोघींचेही खूप छान चाललं आहे. दोघींचीही माहेरपणं आई आणि रेवाने खूप छान केली, पण एक भाऊ म्हणून मी काय केलं? राखीपौर्णिमा, भाऊबीजेला त्याच यायच्या घरी, पण सहज म्हणून एखादा उगीचच बिनकामाचा, चौकशीचा फोन केल्याचं मला आठवत नाही. इतकाही मला वेळ नव्हता? तसं नव्हतं… पण राहूनच जायचं…
दुसर्या दिवशी दोघींनाही सहज फोन केले. चांगलं अर्धा अर्धा तास बोललो आम्ही, ते ही बिनकामाचं… काय बरं वाटलं त्यांना…
एवढी साधी गोष्ट, पण राहूनच गेली होती खरी…
मी श्रीधर साठे एक जबाबदार, निवृत्त, एका प्रथितयश बँकेचा सरव्यवस्थापक. एवढ्या साध्या वरवर पाहाता क्षुल्लक वाटणार्या गोष्टी करायच्या राहूनच गेल्या होत्या खर्या… आज ते लक्षात आलं… देर आए दुरुस्त आए…
prachipendse18@gmail.com
