-डॉ नंदू मुलमुले

‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते’ हा टप्पा आयुष्यात आल्यावर वाढणारा प्रत्येक दिवस ‘काढदिवस’ होतो! ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत,’ वगैरे सब झूठ वाटू लागतं. मरेपर्यंतचं जगणं असंच आहे, ही अस्वस्थता दाटून आल्यावर गाणं म्हणायला सूर कसे शोधणार?… सगळ्या माणसांच्या गोष्टीचा शेवट असाच असतो का?… नाही! सापडतातच काहींना ते सूर. कसे? …

जगणे कशासाठी? हा प्रश्न माणसाला ज्या वयात पडू लागतो ती साठी. ‘विशी, तिशी नि चाळिशीही लोटली जरी दिसे’ तरीही ‘अजून यौवनात मी’ असं कवी म्हणत असला, तरी तारुण्य ओसरलं आहे हे माणसाला आतून कळत असतं. मग असे प्रश्न पडू लागतात. त्यातलेच एक नाना टरके. आता ‘टरके’ हे काही नानांचं खरं आडनाव नव्हे. साध्या साध्या गोष्टींनी हा टरकतो, म्हणून मित्रांनी त्यांचं नाव ठेवलं टरके. नानांना मित्र आहेत, त्यातल्या एक-दोघांची रोज सकाळी नित्यनेमानं भेट होते. निवृत्तीच्या पहिल्याच दिवशी कामाच्या ओढाताणीपेक्षा रिकामपणा जास्त अंगावर येतो, याचा प्रत्येकानं अनुभव घेतला आहे. सकाळच्या कौटुंबिक धांदलीत निवृत्त माणूस हा घरातला सगळ्यात दुर्लक्षित इसम असतो, हे सत्य तेव्हाच उमगलं आहे. ‘‘तुम्ही पोरांच्या घाईच्या वेळी बाथरूम अडवून बसू नका. दुपारी करा अंघोळ. तुम्हाला दिवसभर कामच काय?’’ असं बायकोही झापून जाते. ती पहाटेच अंघोळ उरकून कामाला लागलेली असते. नानांची पत्नी भारती ही ‘टेलिकॉम’ची निवृत्त कर्मचारी. अतिशय सुगरण. त्यामुळे निवृत्त झाल्या झाल्या तिनं कुकिंग क्लासेस सुरू केले. त्याबरोबर स्त्रियांचा बचत गट, संगणक वर्ग, विविध पदार्थांचे व्हिडीओ, यूट्यूब वाहिनी, असे असंख्य उपक्रम. सगळे आवडीचे, आपणहून ओढवून घेतलेले. इतके व्यापताप कशाला, हा नानांना प्रश्न पडतो. पण ते काही बोलत नाहीत. त्यांच्या निवृत्त आयुष्यातला मात्र सगळ्यात मोठा विरंगुळा म्हणजे मित्रांबरोबर रंगणाऱ्या गप्पा. विषयाचं बंधन नाही.

हेही वाचा…भरकटलेली ‘लेकरे’?

मित्र कोण?… वसंता हा एस.टी.चा निवृत्त डेपो मॅनेजर, छंद शेरोशायरीचा. तर रावसाहेब कधीतरी जिल्हा परिषदेत सभापती होता. पुढे सचोटी या कालबाह्य गुणामुळे सक्रिय राजकारणातून बाहेर फेकला गेला. त्याच्यागाठी थोरामोठ्यांचे असंख्य किस्से आणि ते रंगवून सांगण्याची कला. टीटी सोबत असला तर मात्र गप्पा तत्त्वज्ञानाच्या. टीटी ऊर्फ तात्या तत्त्वज्ञानी. तात्या खरंच रेल्वेत टीसी होता. भुसावळ मनमाड चकरा करायचा. मनमाडच्या विश्रामगृहात रात्रभर शिरवाडकरांचं ‘आपले विचारविश्व’ वाचायचा. तो स्वत:ला ‘सकारात्मक शून्यवादी’ म्हणायचा. म्हणजे काय, हे बाकीच्यांना कळायचं नाही, पण ते माना डोलवायचे! आयुष्यात जे समजलं, त्यापेक्षा न समजलेलं अनंत आहे याची त्यांना खात्री पटायची.

नानांचं टीटीबरोबर चांगलं जमायचं. एकतर दोघंही वेळेचे काटेकोर. ‘‘आता वाजले सात, मी बारा मिनिटांत चहाच्या टपरीवर पोहोचतो,’’ नाना सांगायचे आणि पोहोचायचे. बरोब्बर सात-बाराला टीटी चहाचे पेले हातात धरून उभा! रावसाहेब तक्रार करायचा, ‘‘दहा-पंधरा मिनिटं मागेपुढे चालतंय की नाना! दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतींचा शपथविधी आहे होय?’’
‘‘आपली कमिटमेंट स्वत:शी. कुणी वाट बघो न बघो. काय वसंता?’’
वसंता खाकरत एखादा शेर आठवतो का, ते आठवायचा. ‘‘व़क्त रहता नही कही टिक कर, आदत इसकी भी आदमी सी हैं…’’ तो हा शेर तिसऱ्यांदा सांगतोय, हेही कुणाच्या लक्षात यायचं नाही, कारण तो कुणी नीट ऐकतच नसे.

हेही वाचा…माझी मैत्रीण: ‘या, स्वागत हैं, वेलकम!’

सकाळच्या फेरीचे खरे पक्के मेंबर नाना आणि टीटी. रावसाहेबाच्या गुडघ्यांनी एक्स्पायरी डेट ओलांडलेली, त्यामुळे त्यांनी अविश्वासाचा ठराव आणला की तो यायचा नाही. वसंताला निद्रानाश, त्यामुळे तो अधूनमधून गैरहजर. अशा वेळी नाना आणि टीटी दोघंच, मग गप्पा वळायच्या तत्त्वज्ञानावर.
त्या दिवशी असेच ते चहाचा कप घेऊन बसलेले. नाना गप्प गप्प.
‘‘टीटी, हल्ली पहाटे उठल्यावर एक पोकळपणा जाणवतो रे! उमेद आटल्यासारखी भावना भरून राहते मनात. आपण एका उतरणीच्या वाटेला लागलोय, याची जाणीव काही पाठ सोडत नाही. हे सगळं कशासाठी? आणि किती दिवस? आयुष्य आता ‘सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते’ झालंय!’’
टीटीनं विंदांची कविता पूर्ण केली- ‘तोच चहा, तेच रंजन, माकडछाप दंतमंजन…’

‘‘अरे नाना, तुझ्या मनात निर्माण झालेले प्रश्न अनेकांच्या मनात येतात. सार्त्र वगैरे अस्तित्ववादी लोकांच्याही मनात. शंभर वर्षांपूर्वीच त्यांनी आयुष्याच्या प्रयोजनाचं चिंतन मांडलंय.’’
‘‘मग काय म्हणणं आहे त्यांचं?’’
‘‘आपल्या अस्तित्वाचा गाभा रिक्त आहे. आयुष्याला मूलत: काही प्रयोजन नाही. या अर्थहीन जगण्याला अर्थ प्राप्त करून देणं हीच आयुष्याची कसरत. प्रत्येक जण आपापल्या आकलनानुसार तो देतो. नाना, तुला पडणारे प्रश्न अस्तित्वाचे तात्त्विक प्रश्न आहेत. हे पडतात, कारण तू या वयात का होईना विचार करतोस. अनेकजण तेही करत नाहीत.’’
‘‘मग ते बरे, की आपण बरे?’’

हेही वाचा…जिंकावे नि जागावेही: ‘सजग’ जगण्यासाठी आहार!

‘‘खरं सांगायचं, तर याचं उत्तर काही सापडत नाही. ते बरे, की हे बरे? माझ्यासारख्याला वाटतं, आपल्या दु:खाचा शोध माणसासारख्या विचारी प्राण्यानं घ्यायचा नाही, तर कुणी घ्यायचा?’’
‘‘शोधून थकलो रे! उत्तर कुठे सापडतं?’’
‘‘शोध हा उत्तरासाठी कुठे असतो? आयुष्य नावाचं रिकामपण भरून काढण्यासाठी असतो. ‘सिसिफस’ या ग्रीक राजाची कथा माहीत आहे ना?… एक प्रचंड गारगोटीसारखी गोल शिळा टेकडीवर ढकलत नेण्याची त्याला सजा मिळाली होती. दर वेळी ती गडगडत खाली यायची आणि सिसिफस पुन्हा ढकलत वर न्यायचा. आयुष्य हे असं शिळा पुन:पुन्हा ढकलत नेणं आहे.’’

नाना टीटीच्या तोंडाकडे बघत बसले. तेवढ्यात वसंता आला. गप्पा वेगळ्या दिशेला भरकटल्या. अजून एक सकाळ कटली. नाना घरी आले, तेव्हा सारी तरुण मंडळी कामाला गेली होती. भारती फोनवर कुणाशी तरी बोलत होती. ‘‘आपली रश्मी हो! महिन्यापूर्वी लग्न झालं आणि आता रेसिपी विचारतेय,’’ एकीकडे फोनवर बोलतच हलक्या आवाजात तिनं नानांच्या कानावर टाकलं. ‘‘बोल रश्मी, मजेत? नागपूरकडची पुडाची वडी?…’’ नानांना आठवलं, रश्मी त्यांची पुतणी. आयटी इंजिनीयर, सासर नागपूरचं. ‘‘सासूला सरप्राईज द्यायचं होय? यूट्यूबवर सारं काही आहे गं! थोड्या टिप्स देते. चण्याचं पीठ आणि मैदा घेऊन पातळ पुरी लाट, त्यात थोडं गरम तेल घाल… मग कोथिंबिरीचं सारण भरशील ना, तेव्हा लिंबू पिळायला विसरू नकोस. शिवाय त्यात तुकडा काजू टाक, भारी वाटेल सासूला! अगदी बडकस चौकातल्या रामभाऊ पाटोडीसारखी होईल! पुढल्या वेळी तुला उकडपेंडीची रेसिपी सांगीन. नवरा खूश होऊन जाईल! ओके, बाय!’’ भारतीनं फोन ठेवला.

‘‘आजकालच्या पोरी! आयुष्यात कधी स्वयंपाकघरात पाऊल टाकलं नसेल, पण आपण सुगरण असल्याची भर बायोडेटात असायला हवी याचा आग्रह. मात्र रश्मीसाठी मन हळवं होतं! आईचं प्रेम, शिकवण फारशी मिळाली नाही ना…’’
तेवढ्यात भारतीचा फोन पुन्हा वाजला. ‘‘नलू, आपली बैठक दुपारी चारला ठेवू. बायकांची कामं आटोपलेली असतात आणि नवरे परतायला अवकाश असतो. टोपले बाईचं कर्ज मंजूर झालंय सांग तिला…’’ फोन ठेवता ठेवता नानांच्या दिशेला पाहून ‘‘बचत गटाची बैठक!’’ असा भारतीनं खुलासा केला आणि ती स्वयंपाकघरात गेली.

पाच मिनिटांत हातात बशी घेऊन आली. ‘‘उपमा केला होता पोरांसाठी, उरलाय.’’ मेथी दाणे घातलेला, वाफवून गरम केलेला उपमा, वर हिरवी कोथिंबीर आणि ताज्या खोबऱ्याचा कीस. पहिल्या घासातच पोट भरावं असा.
नानांनी तृप्तपणे बायकोकडे बघितलं. ती पुन्हा फोनला लागलेली. कुणाला तरी सांगत होती, ‘‘हे बघ, भेळीसाठी कांदा अगदी बारीक चिरावा, मात्र भाजीत टाकताना फोडी मोठ्या हव्यात, नाहीतर त्या रश्श्यात मिसळून जातील. पण भेळ संध्याकाळी, सकाळी सगळ्यात छान पोहे! पोहे सालीसकट संपूर्ण तांदळाचे बनतात, त्यामुळे ते पौष्टिक! हो, संध्याकाळी संगीतसभेसाठी ये सहाला. आज कोरसची तालीम आहे आपली.’’ भारतीनं फोन ठेवला. ‘‘काय बघताय? कधी न बघितल्यासारखं?’’ तिच्या डोळ्यांत मिश्कील भाव होते.
‘‘ये, बैस पाच मिनिटं. तुला सिसिफस राजाची गोष्ट सांगतो!’’

हेही वाचा…पडसाद: पालकांसाठी योग्य लेख

‘‘माहितेय मला! अभ्यास करून स्पर्धा परीक्षेतूनच नोकरी लागली होती मला! त्या टीटीनं सकाळी तत्त्वज्ञानाचा डोस दिलेला दिसतोय. नातू यायची वेळ झाली. त्याला खायला केक करतेय ओव्हनमध्ये. दोन दिवसांपासून मागे लागलाय माझ्या. शिवाय देवाचं वस्त्र शिवायचंय म्हणून सूनबाईनं छिटांचा ढिगारा टाकलाय.’’ नवऱ्याच्या हातातली रिकामी बशी घेत ती स्वयंपाकघरात वळली.

नानांना आश्चर्य वाटलं आणि कौतुकही. हिच्या आयुष्याचा गाभा निश्चितच रिक्त नाहीये! त्यांच्या मनात विचार आला. या सगळ्या लहानसहान गोष्टींनी तिनं तो भरून टाकलाय.

‘‘टीटी…,’’ दुसऱ्या दिवशी चहाच्या टपरीवर स्थिरावताच नानांनी विषय काढला, ‘‘सिसिफस आयुष्यभर शिळा ढकलत राहिला, पण त्याला ते काम कंटाळवाणं वाटत होतं असा आपण समज कशाला करून घ्यायचा? कदाचित आवडत असेल… किंवा कदाचित त्यानं आवडतं करून घेतलं असेल.’’

‘‘म्हणजे?’’ टीटी चमकला. पाठोपाठ आलेला वसंताही कुतूहलानं ऐकू लागला.

‘‘असं बघ, आपलं निवृत्त आयुष्य पोकळ, कंटाळवाणं समजून आपण खंत करत बसतो. म्हणजे मी बसतो! पण आपल्या बायकांकडे पहा, किती लहान-लहान गोष्टींनी त्यांनी ती पोकळी भरून काढलीय… त्यांना असले विचार पडत नाहीत. त्यासाठी वेळही नाही! पोरांची उठाठेव, नातवांची देखभाल, पाहुण्यांची आवभगत, वर अनेक छंद. माझी अर्धी रात्र तळमळत जाते, पण बायकोला मात्र शांत झोप लागलेली असते. पहाटे छोटा नातू येऊन तिच्या पांघरुणात शिरतो तेव्हाच तिची सकाळ होते. भारतीला सिसिफस माहितेय, पण तिचा सिसिफस शीळ वाजवत शिळा ढकलतो!’’

हेही वाचा…भय भूती: भीती नकोशी… हवीशी!

टीटीनं भारल्यागत चहाचा कप खाली ठेवला. ‘‘आता मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर नाना! हे बरे, की ते बरे? विचार करणारे बरे, की जगणारे बरे? आपण निरर्थक समजतो अशा अनेक गोष्टींनी आयुष्य अर्थपूर्ण करून टाकतात या बायका, नाही?…’’ तोवर वसंतानं शेर जुळवून ठेवला होता. त्याला दोघांनीही पहिल्यांदाच दाद दिली.

‘माना की इस जमीं को न गुलज़ार कर सके
कुछ खार कम तो कर गए गुज़रे जिधर से हम।’

nmmulmule@gmail.com