scorecardresearch

लोकसहभागातून शिक्षण

आम्ही वीटभट्टीवरच्या एकूण १६६ मुलांपैकी १२७ मुलांना शाळेत घातले पण गैरहजर राहणारी मुलेच जास्त.

|| रजनी परांजपे

आज अनेक मुले केवळ त्यांच्या सोयीची, त्यांच्या परिस्थितीला साजेल अशी लवचीक, सर्वसमावेशक, शिक्षणव्यवस्था उपलब्ध नाही म्हणून प्रवाहाबाहेर राहत आहेत. अशांसाठी ‘शिक्षणमित्र’सारखे उपक्रम उपयोगाचे. आम्ही वीटभट्टीवरच्या एकूण १६६ मुलांपैकी १२७ मुलांना शाळेत घातले पण गैरहजर राहणारी मुलेच जास्त. फक्त एकच वीटभट्टी अशी आहे, जिथली १२ मुले नियमित शाळेत जातात. आणि त्याचे कारण तिथले ‘शिक्षणमित्र’ सुपरवायझर. म्हणूनच या मुलांच्या शिक्षणासाठी गरज आहे ती लोकसहभागाची.

‘‘खरं सांगू का ताई तुम्हाला, आपण मुलांना शाळेत घालण्यासाठी एवढे प्रयत्न करतो, त्यांच्यासाठी बस, रिक्षा लावतो, त्यांना रोज सकाळी उठवून तयार करण्यासाठी, बसच्या पिकअप पॉइंटला नेण्यासाठी एक माणूसही नेमतो, पण मला नाही वाटत त्याचा खरंच काही उपयोग होतो. एक तर त्यांना सहज कोणी शाळेत घेत नाही. घेतले तर वेगळ्या खोलीत तरी बसवतात नाही तर शेवटच्या बाकांवर. आधीच या मुलांना काही येत नसते, त्यातून शाळेत अशी वागणूक आणि घरी कामाचा डोंगर. मला तर वाटते एवढा खटाटोप करण्यापेक्षा आपणच त्यांना रोज तास-दोन तास शिकवावे – काही नाही तर चांगले लिहायला-वाचायला तरी शिकतील.’’ उर्मिला, वीटभट्टय़ांवरच्या मुलांबरोबर काम करणारी आमची एक ताई, पोटतिडकीने बोलत होती.

गेली तीन-चार वर्षे आम्ही वीटभट्टीवरच्या मुलांबरोबर काम करतो आहोत. वीटभट्टय़ांवरचे काम तसे सोपे नाही. निरनिराळ्या प्रकारची कामे, त्यातील फायदे तोटे, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, करावे लागणारे कष्ट आणि मिळणारा मोबदला याचा विचार केला तर वीटभट्टीवरचे काम सर्वात जास्त कष्टाचे, पूर्ण वेळ गुंतवून ठेवणारे आणि पूर्ण कुटुंबाला त्यात अडकवून ठेवणारे असते असे म्हणावे लागेल. वीटभट्टीवरचे काम भल्या पहाटे तीन-साडेतीन पासूनच सुरू होते. नवरा बायको दोघेही जोडीने पहाटेच कामाला लागतात. आदल्या दिवशी माती, दगडी कोळशाची पूड, उसाची मळी, पाणी वगरे मिसळून पायाने तुडवून-तुडवून तयार केलेल्या मिश्रणाचे गोळे साच्यात घालून त्याच्या विटा पाडायच्या. दिवसाला एक जोडी हजार-बाराशे विटा पाडते. हजार विटा पाडल्या तर जोडीला ९०० रुपये मिळतात. पण हे ९०० रुपये त्यांना हातात मिळत नाहीत. ते फक्त उचल घेतलेल्या पशांतून वजा होतात. वीटभट्टीवर येणाऱ्या सर्वच मजुरांनी वीटभट्टीमालकाकडून पावसाळ्यात, हाताला फारसे काम नसताना मोठय़ा रकमेची उचल घेतलेली असते. असलाच एखादा जमिनीचा तुकडा मालकीचा तर त्याची मशागत, बी, बियाणे आणि रोजचा खर्च भागविण्यासाठी, तर कधी औषधपाण्यासाठी, कधी क्रियाकर्मासाठी, कधी नवस फेडण्यासाठी तर कधी मुलीच्या लग्नासाठी अशी अनेक कारणे यामागे असतात. अशी उचल घेतली, की ती ज्याच्याकडून घेतलेली असते तो जिकडे नेईल तिकडे मजुरीसाठी जाणे त्यांना बंधनकारक असते. त्यामुळे दर वर्षी एकाच ठिकाणी, एकाच गावी जाऊ असे होत नाही.

आम्ही गेली दोन-चार वष्रे बघतो आहोत त्यावरून पुन्हा-पुन्हा त्याच जागी, त्याच ठिकाणी येणाऱ्यांची संख्या फारच कमी. तीन-साडे तीनला सुरू झालेले विटा पाडण्याचे काम साधारण अकरा वाजेपर्यंत चालते. त्यापुढे घरी येणे, आंघोळ करणे, जेवण करणे सुरू होते. नंतर थोडा वेळ विसाव्याचा असतो पण फार नाही. कारण कोळसा कुटून पूड करणे, वाळायला ठेवलेल्या विटा वरखाली करणे, विटांची इकडून तिकडे ने-आण करणे, दुसऱ्या दिवशीसाठीचे मिश्रण तयार करणे अशी कामे संध्याकाळपर्यंत चालतात. पायाने तुडवून-तुडवून मातीचा लगदा करणे हे काम पुरुषांचे. मुलांचा हात लागतो तो तयार केलेल्या, तयार करून वाळत ठेवलेल्या, वाळून सुकलेल्या, भट्टीत लावण्यासाठी तयार झालेल्या, विटा वर-खाली करणे, उलटून ठेवणे, इकडून तिकडे डोईवरून वाहून नेणे अशा कामांसाठी. इथे अगदी चार-पाच वर्षांचे मूलदेखील आपापल्या कुवतीप्रमाणे मदत करू शकते. त्याशिवाय आई-वडील पहाटेपासूनच कामात गुंतल्यामुळे घरकामाचा, भावंडांचा, पाणी भरणे, भांडी घासणे वगैरेचा बोजा मुलांवरच पडतो. हजार विटांचे मिळणारे पसे हिशेबात वळते होतात. पण त्यानंतर केलेल्या कामांची रोख मजुरी मिळते. रोजचा खर्च त्यातून चालतो.

इथे कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत. काम पहाटे लवकर सुरू होते ते उशिरापर्यंत चालते. रविवारी बंद असते असे नाही. त्यामुळे येथील पालकांशी एकत्रितपणे बोलण्यासाठी वेळ काढणे खरेच कठीण. एकेका पालकांशी ते काम करत असतानाच बोलावे लगते. वीटभट्टय़ा गावापासून जवळच असतात. गेल्या वर्षी आम्ही काम करत असलेल्या परिसरात लहान मोठय़ा ७०-७५ भट्टय़ा लागलेल्या. त्यावरची शाळायोग्य वयाची एकूण मुले १६६. मुलांना गावी शाळेत घातलेले असतेच असे नाही. काहींना घातलेले असते काहींना नाही, पण पाटी जवळजवळ सर्वाची कोरीच. पूर्ण मुळाक्षरे येणारी मुले शंभरात दहा-वीसदेखील नसतात. पंचाहत्तर टक्क्यांहून जास्त पालक निरक्षर किंवा अर्धसाक्षर. घरे विटांची. ‘सेकंडचा माल’ वापरत एकावर एक रचून तयार केलेल्या भिंती, थोडा जोराचा धक्का दिला तर पडतील अशा. माणूस जेमतेम उभा राहील एवढी उंची आणि रुंदीही बेताचीच. रात्रीच्या वेळी वीज असते. मोजके का होईना पण पाणी असते. परिसर अर्थातच दगड, विटा, माती यांनी भरलेला, रखरखीत. त्यात भट्टीच्या उष्णतेची भर.

बांधकाम मजूर, वीटभट्टी कमगार ही माणसे दुसऱ्यांची घरे उभी करतात पण त्यांचीच घरे घर म्हणावे अशी नसतात, हे पाहून विषाद वाटतो. ‘तळे राखील तो पाणी चाखील’ अशी म्हण आहे. पण या माणसांच्या ओठी तळ्याचे पाणी लागत नाही. ती बिचारी सतत तहानेलीच राहतात. ‘बालमजूर’ म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर डोक्यावर घमेल्यात विटा घेऊन उभ्या असलेल्या मुलाचे चित्र उभे राहते. वीटभट्टीवरची मुले सर्रास हे काम करतात हे खरे. ही बालमजुरी म्हणायची की आई-वडिलांना घरकामात केलेली मदत म्हणायची हा एक प्रश्नच. अशी मदत करावी किंवा नाही हा दुसरा प्रश्न. या विषयावर बोलण्यासारखे पुष्कळ. पण या लेखाचा तो विषय नाही. विषय आहे शिकण्याचा. कमीतकमी चांगले लिहायला-वाचायला शिकण्याचा. गरज आहे ती शिक्षणाची, निरनिराळ्या व्यवसायात शिरून आपापल्या आवड आणि कुवतीप्रमाणे चरितार्थ चालवण्यापुरती कमाई करण्यासाठीच्या सक्षमतेची वाट सर्वाना मोकळी करून देण्याची. प्रत्येक माणसाला सक्षम करून देश बलशाली बनवण्याची. पण आज अनेक मुले केवळ त्यांच्या सोयीची, त्यांच्या परिस्थितीला साजेल अशी लवचीक, सर्वसमावेशक, शिक्षणव्यवस्था उपलब्ध नाही म्हणून प्रवाहाबाहेर राहत आहेत. कोणी शाळेपर्यंत पोहोचतच नाहीत, कोणी अध्र्यातच हात सोडतात तर कोणी दहा-दहा, बारा-बारा वष्रे खर्चून रिकामीच राहतात ही आजची शोकांतिका.

नवीन शिक्षण धोरणाचा मसुदा जाहीर झाला. पण त्यातही स्थलांतरित होणाऱ्या, सर्वच अर्थानी मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी, किमान लिहिते-वाचते करून सोडण्यासाठी, शाळांव्यतिरिक्त पर्यायी उपाय नाहीत आणि जे उपाय आहेत त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणारी माणसेही नाहीत. अशी माणसे मिळाली तर हा प्रश्न काही न सुटणारा नाही.‘शिक्षणमित्र’च्या प्रयोगातून हे आम्हाला दिसले. अगदी वीटभट्टीवरील मुलांच्या बाबतीतही ते दिसून आले. आम्ही वीटभट्टीवरच्या एकूण १६६ मुलांपकी १२७ मुलांना शाळेत घातले होते. त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्थाही केली. त्यांनी नियमित शाळेत जावे म्हणून सर्व प्रयत्न केले. पण दोन-तीन दिवस शाळेत जाऊन परत परत गरहजर राहणारी मुले जास्त. जवळजवळ सगळीच. फक्त एकच वीटभट्टी अशी आहे, जिथली १२ मुले नियमित शाळेत जातात. आणि त्याचे कारण तिथले सुपरवायझर, जे ‘शिक्षणमित्र’ म्हणूनही काम करतात. तात्पर्य एकच, हे काम केवळ कायदे करून होणार नाही त्यासाठी पाहिजे लोकसहभाग. म्हटलेच आहे ना, ‘गाव करील ते राव काय करील.’

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

हा सगळा लेखनाप्रपंच त्या ‘गावाला’ जागे करण्यासाठीच.

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Right to education child labour mpg

ताज्या बातम्या