तुळशी बी वा सब्जा

उन्हाळ्यात जरूर वापरावा असा एक पदार्थ म्हणजे सब्जा वा तुळशी बी.

उन्हाळ्यात जरूर वापरावा असा एक पदार्थ म्हणजे सब्जा वा तुळशी बी. ही शरीरातील उष्णता तर कमी करतेच शिवाय सर्व उष्णतेच्या विकारांवर खूप उपयुक्त आहे.
घेण्याची पद्धत- सब्जा कोरडा घेऊ शकत नाही. पाणी किंवा कोणत्याही द्रव पदार्थाबरोबर मिसळून/भिजवून घ्यावे लागते. पाणी, दूध, सरबत, सूप, ज्यूस, नारळपाणी, ताक इत्यादी अनेक द्रव पदार्थाबरोबर घेऊ शकतो. यात जरा वेळ भिजवल्यानंतर सब्जा फुगून बुळबुळीत होतो. सब्जामध्ये कॅल्शियम, मँगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, ‘ब’ जीवनसत्त्व, प्रोटिन, तंतूयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. मजबूत हाडांसाठी लागणारे प्रोटिन्स, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम यामध्ये असल्याने हाडांचा ठिसूळपणा लवकर कमी होतो. त्यामुळे सर्व वयोगटांसाठी तर उपयुक्त आहेच. शिवाय बच्चेकंपनी आणि वृद्धांसाठी खास उपयोगी. भिजवल्यानंतर सब्जा फुगतो, त्यामुळे पातळ पदार्थाबरोबर खाल्ल्याने पटकन पोट भरल्याची भावना येते. त्यामुळे अतिरिक्त आहार घेण्याचे टाळले जाते. वजन आटोक्यात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी खूपच उपयोगी आहे. हृदयरोग्यांनी सब्जा नियमित घ्यावा. कोलेस्ट्रॉल कमी होते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदय आरोग्यासाठी उपयुक्त असणारे एचडीएल नावाचे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. मधुमेह्य़ांसाठीही उपयुक्त. त्याच्या श्लेष्मल गुणधर्मामुळे सर्व पदार्थाचे सावकाश शोषण होते. त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही. विविध प्रकारच्या कर्करोगांमध्ये तसेच जखम लवकर भरून निघण्यास मदत होते.

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ayurveda and medical use of tulsi